Home > Top News > चंद्रकांता तेव्हाची आणि आताची : सर्वोच्च TRP ची गाथा

चंद्रकांता तेव्हाची आणि आताची : सर्वोच्च TRP ची गाथा

चंद्रकांता तेव्हाची आणि आताची : सर्वोच्च TRP ची गाथा
X

माझ्या लहानपणी 1994-95 साली चंद्रकांता नावाची सिरीयल दूरदर्शनवर लागायची. तिच्या कथेत चंद्रकांता नावाची राजकुमारी शेजारच्या राज्याच्या राजकुमाराच्या प्रेमात असते आणि दोन्ही राज्यांचे हाडवैर असते. त्यामुळे त्यांच्या लग्नात/प्रेमात बाधा येणार असते. पहिल्या काही भागात चंद्रकांता आणि कुंवरचं long distance relationship दाखवून झालं. त्यानंतर त्यात पाताळयंत्री क्रूरसिंगचा प्रवेश होतो, जो या प्रेमात अडथळे आणत असतो. इथून चंद्रकांता आणि कुंवर सिरीयलमध्ये फक्त title song मध्ये दिसतात. पुढचे असंख्य भाग क्रूरसिंगच्या कपटलीलांवर दाखवून झाल्यावर त्याच्या एका साथीदाराला त्यांचं कारस्थान उघड झाल्यावर हत्तीच्या पायी दिलं जातं. क्रूरसिंग जीव वाचवून पळून शेजारच्या तिसऱ्याच राज्यात जातो.

तिसऱ्या राजाचा राजा असतो शिवदत्त, जो विषपुरुष असतो. त्याची GF असते विषकन्या तारा आणि एक साधीसुधी पतिव्रता महाराणी बायकोपण असते. पुढचे काही भाग शिवदत्तच्या जहरिल्या love triangle वर खर्च होतात. शिवदत्तचा ज्योतिषी हा त्याचा एकदम प्रामाणिक सेवक असतो आणि शिवदत्तवर येणारे प्रत्येक संकट तो आधीच सोंगट्या टाकून बघत असतो.

या संकटात शिवदत्त आणि महाराणीला वाचवायला ज्योतिषीसोबत अजून एक लढाऊ सरदार सतत पुढे असतो, त्याचं नाव बद्रीनाथ (दिवंगत इरफान खान). पुढे या बद्रीनाथच्या पराक्रमावर असंख्य भाग खपून जातात. त्यानंतर येतो बद्रीनाथचा जुळा भाऊ सोमनाथ, आणि कथा सोमनाथवर सरकते. पहिल्या 8-10 भागातच फक्त चंद्रकांता दिसते, आणि त्यानंतर 125-150 भाग ती आणि कुंवर कुठेच न दिसता एकेदिवशी सिरीयल संपून जाते.

प्रातःस्मरणीय सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर या देशात चंद्रकांता सिरीयलची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. महाराष्ट्र पोलीस आले, मग रिया आली, त्यानंतर बिहार पोलीस येऊन गेले. सुप्रीम कोर्टाच्या एंट्रीने आली CBI, तीही निघून गेली. नंतर आली ED, आणि तीही निघून गेली. या सगळ्या काळात या महानाट्यात सुशांतचे रूममेट, कुक, चावीवाला, आधीचा काढून टाकलेला स्टाफ, रिया, शौविक, रियाचे वडील, सुशांतच्या बहिणी आणि बाप, आलिया, जिम ट्रेनर, महेश भट्ट, मानसोपचार तज्ञ, महाराष्ट्र शासनाचे एक मंत्री, करण जोहर, आदित्य चोप्रा, संजय भंसाली, दिल बेचाराची अज्ञात हिरोईन, भक्तांची झाशीची राणी कंगना, शेखर सुमन, गुप्तेश्वर पांडे वगैरे असंख्य पात्रे चमकून जातात.

सरतेशेवटी येते NCB आणि रिया, शौविक या भावा-बहीनीला तुरुंगात टाकते. याच गदारोळात कंगनाताई संजय राऊतांशी वाकयुध्द करतात आणि मग चित्रात येते BMC. कंगनाच्या बाजूने अर्णब, आठवले, करणी सेना वगैरे शिलेदार बाजू लढवतात.

BMC नेहमीप्रमाणे करायचा तो कुटाना करून ठेवते आणि मग सुरू होते डेमोक्रॅसी, मराठी भाषा, हिंदुत्व, श्रीराम, बाबर, मंदिर, मशीद वगैरे वर्णन असणारी घमासान लढाई. सुरुवातीच्या रियाच्या मुलाखतीनंतर मध्येच उर्मिला मातोंडकरचा एक इंटरव्ह्यू राजदीप सरदेसाईकडून होतो आणि चित्र बदलत बॉलिवूड विरुद्ध अमराठी लढाईत.

कंगना मग स्वतःला फेमिनिझमची प्रणेती म्हणत उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न ऍक्ट्रेस म्हणते. रविकिशन, आदित्यनाथ वगैरे पात्रेही मध्येच डोकावतात. जया बच्चनही बाजू लावून धरतात आणि मग कंगनाबाई अभिषेक आणि श्वेताबद्दल काहीच्या काही बोलून जाते.

कंगना आपली Y+ सिक्युरिटी घेऊन माघारी निघून जाते आणि उत्तरेत बसून बॉलिवूडवर निशाणे लावते. NCB ला तेवढ्यात खूप महत्त्वाची माहितीची खाण हाती लागते. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज घेतले जातात. या माहितीतून दीपिका, दिया, श्रद्धा, सारा, रकुल वगैरे समस्त नट्या आता NCB च्या रडारवर येतात.

दुसऱ्या बाजूला अनुराग कश्यप कडून अचानक एका दाक्षिणात्य नटीला धोका उत्पन्न होतो आणि तिला आपलं पण Me Too झालंय हे काही वर्षांनी आठवते. त्या नटीला आठवलं की अजून एका नटीला आठवतं की आपलं पण अनुरागने Me Too केलंय. अनुरागला आधार द्यायला मग तापसी, कल्की वगैरे मैदानात उतरतात. मधल्या काळात सगळ्या पीडित, दुःखी बायकांना काळ्या टोपीचे आबा घरी बोलावून सांत्वन करत त्यांच्यासोबत हसतमुखाने फोटो वगैरे काढतात.

21 व्या शतकातल्या या चंद्रकांताचा TRP अजून ओसरला नाहीये. सुशांतची हत्या का आत्महत्या हा मुद्दा आता अस्तित्वात नाहीये. गुप्तेश्वर पांडेजी आता पोलीस नोकरी सोडून रॉबिन हूड बनून गाणे बनवत इलेक्शन लढणार आहेत. अर्णबचं दुकान नेटाने सुरू आहे आणि आपला मराठी प्रसन्न जोशी सगळीकडे लक्ष ठेवून आहे! उद्या नवीन अंकाला सुरुवात होतेय दीपिकासोबत... शेतकरी मरेना की कामगार मरेना... आम्हाला ट्विटर आणि फेसबुकवर करमणूक पाहिजे!!

Updated : 25 Sep 2020 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top