Home > Top News > आदित्य ठाकरेंचा सुशांत सिंह राजपुत प्रकरणाशी खरा संबंध काय?

आदित्य ठाकरेंचा सुशांत सिंह राजपुत प्रकरणाशी खरा संबंध काय?

आदित्य ठाकरेंचा सुशांत सिंह राजपुत प्रकरणाशी खरा संबंध काय?
X

सुशांत हा गुणी अभिनेता जरी असला तरी तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि ड्रग्सच्या आहारी गेलेला होता. हे आता सीबीआय, ईडी आणि एनसीबी (नार्कोटिक कंट्रोल ब्युरो) यांच्या तपासातून दिसून आले आहे. त्याला हे ड्रग रिया चक्रवर्ती ही मिळवून द्यायची. हे जवळपास सिद्ध झाले आहे. त्यात तिला मदत करणारा सुशांतचा मॅनेजर आणि स्वयंपाकी यांना अटक झालेलीच आहे आणि आता रियाला कोणत्याही क्षणी अटक होईल असे दिसत आहे.

त्यामुळे आता सगळ्यांनीच या प्रकरणाची सुरवात कुठून झाली आणि ते नंतर कुठे गेले? याचा शांतपणे विचार करायला पाहिजे. कारण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार, आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आणि आता शेवटी तर मुंबई शहर यांची फार घाणेरड्या पद्धतीने बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामागे भाजप आणि त्यांचे रोज वार वाटून घेऊन टीव्हीवर येणारे चार-पाच नेते आहेत. ज्यांना हे पटणार नाही. त्यांनी या प्रकरणाच्या सुरवातीच्या काळात सोशल मीडियावर काय येत होते. याचा घटनाक्रम बघावा.

सुशांतची आत्महत्या नसून तो खूनच होता. असा प्रचार त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसातच सुरु झाला होता. सुशांत स्वतःच्याच घरात तीन-चार नोकर असतांना गळफास घेऊन मृत्यू पावला होता, बेडरूम आतून बंद होती, त्याला नोकराने सकाळी ज्यूस दिला. या सगळ्या परिस्थितीजन्य पुराव्यांवरून ती आत्महत्या होती असे दिसत होते. तरीही ती आत्महत्या नसून तो खून होता. यासाठी फँटॅस्टिक थिअरी तयार करून समाजमाध्यमांवर जोरदार प्रसारित करण्यात आल्या.

दोन-तीन दिवसातच या प्रचारात आदित्य ठाकरे यांचे नाव घेणे सुरु झाले. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी आत्महत्या केलेल्या दिशा सॅलियन हिची तर मृत्यूनंतर यात जी बदनामी केली गेली ती नीचपणाची होती. तिच्यावर तिच्याच घरात सामूहिक बलात्कार झाला आणि तिला नग्नावस्थेत इमारतीतून फेकून देण्यात आले आणि त्या वेळी एक युवा मंत्री आणि त्यांचे मित्र तिथे हजर होते. असे मेसेज फिरवले गेले. अशी गोष्ट लपून कशी राहू शकेल? आजूबाजूच्या इमारतीतील लोकांना हे दिसले नाही का? असले प्राथमिक शाळेच्या मुलांना पडतील. असे प्रश्न भक्तांना तेव्हा पडत नव्हते. या बदनामीने व्यथित होऊन दिशांच्या वडिलांनी एफआयआर देखील दाखल केला होता. आईवडिलांसाठी, मुलीने आत्महत्या करणे वेगळे, आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार होऊन तिचा खून झाला अशा अफवा जगभर पसरलेल्या पाहणे वेगळे, हे नीच मनोवृत्तीच्या लोकांना बहुधा समजणार नाहीच. एवढे ते आंधळे झाले आहेत.

आता दिशा सॅलियनच्या या तथाकथित खुनाचा संबंध सुशांतचा खून झाला. याच्याशी कसा जोडला गेला ते पहा.

दिशाने तिच्यावर बलात्कार झाल्यावर आणि खून होण्याआधीच्या काही मिनिटात सुशांतला हे सगळे फोन करून सांगितले असे पसरवले गेले… मग तेव्हा ते सामूहिक बलात्कार करणारे काय करत होते? ते बघत बसले होते तिला फोन करताना? असले तार्किक प्रश्न भक्तांना विचारायचे नसतात. ही बातमी सुशांतला समजल्यामुळे त्याला धमक्यांचे फोन येणे सुरु झाले व म्हणून तो डिप्रेशनमध्ये गेला म्हणे! हे डिप्रेशनचे तरी अफवा पसरविणाऱ्यांनी कबूल का केले असावे? कारण तो मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार घेत होता. हे जगजाहीर होते आणि त्याचे पुरावे होते. म्हणून ते मान्य करावेच लागले. पुढची सुरस कथा अशी की मग सुशांत ही बातमी फोडेल म्हणून त्याचा खून केला. कोणी केला? सुशांतच्या घरात तथाकथित खुनाच्या रात्री पार्टी झाली. ज्यात युवा मंत्री आणि त्यांचे मित्र उपस्थित होते. त्यांनीच कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याने खून केला आणि ते युवा मंत्री सुशांतच्या बिल्डिंगमध्ये जातानाचे तर सीसीटीव्ही फुटेज होते. असे बिनदिक्कत पसरवण्यात आले. अशी एकंदर सस्पेन्स थ्रिलऱ कथा आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन बनविण्यात येऊन व्हायरल करण्यात आली.

या नंतर लगेच काही भाजप नेते रोज येऊन टीव्हीवर सांगायला लागले की, या प्रकरणात सत्तेतील एक युवा नेता सामील आहे. आणि त्यामुळे मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत नाहीत. व त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे. हा प्रचार इतका वाढला की, शेवटी आदित्य ठाकरेंना एक निवेदन देऊन या गोष्टींचा इन्कार करावा लागला.. नंतर सीबीआयच्या तपासात आदित्य ठाकरेंबद्दल काहीही निष्पन्न झाले नाही, तेव्हा मात्र, भाजपचे मोठे नेते येऊन सांगायला लागले की, आम्ही आदित्यचे नाव कधीच घेतले नाही, मग आदित्यने निवेदन देण्याची गरज काय होती? निर्लज्जपणाला राजकारणात मर्यादा नसते हेच खरे!

सीबीआय चौकशीची मागणी महाराष्ट्र सरकार मान्य करीत नव्हते, म्हणून मग बिहारमध्ये एक एफआयआर करण्यात आला आणि नंतर दोन राज्यातील वाद म्हणून प्रकरण सीबीआयकडे सोपवणे सोपे झाले. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, एफआयआर करणाऱ्या सुशांतच्या कुटुंबियांना त्याची आत्महत्याच होती. यात शंका नव्हती. पण ते करायला सुशांतला रियाने भाग पाडले. असा त्यांना संशय होता. म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला. त्यात त्यांचा मुख्य संशय हा होता की, रियाने सुशांतचे सगळे पैसे लुबाडून त्याला कंगाल केले. या आरोपामुळे हजारो कोटींच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या ईडीचा या पंधरा कोटींच्या क्षुल्लक प्रकरणात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला.

मात्र, यामागे काहीही नियोजन नव्हते. यावर आपण विश्वास ठेवायचा! ईडी या पंधरा कोटींच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आली. ईडीच्या अनेक दिवसांच्या आणि बँक खात्यातील प्रत्येक व्यवहार तपासून पाहण्याच्या पद्धतीनंतरही सुशांतने रियाला काहीही पैसे दिल्याचे सिद्ध झाले नाही आणि हे ईडीने मान्यही केले आहे.

मात्र, या ईडीच्या चौकशीत एक माहिती मिळाली आणि त्यामुळे केंद्र सरकार, सीबीआय, ईडी आणि महाराष्ट्रातील भाजपचे संपूर्ण वस्त्रहरण होण्यापासून त्यांची सुटका झाली. रियाच्या फोनमध्ये ईडीला रिया सुशांतसाठी ड्रग्स मागवायची. अशी माहिती मिळाली आणि लगेच या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एंट्री झाली.

सुशांत हा जरी चांगला अभिनेता असला तरी तो डिप्रेशनमध्ये असायचा आणि गांजा, चरस आदी घ्यायचा. हे ही आता सिद्ध झाले आहे. अर्थात यात त्याचीही मृत्यूनंतर बदनामीच झाली, पण राजकारणात ते अपरिहार्य आहे. त्याच्या सोबत राहणारी त्याची मैत्रीण रिया, मॅनेजर मिरांडा आणि स्वयंपाकी दिपेश सावंत त्याच्यासाठी हे ड्रग्स मागवायचे. हे त्यांनी कोणीही नाकारलेले नाही आणि दोघांना अटक झाली आहे. आणि रियाला आता होईलच. त्यांनी ते आपला बॉयफ्रेंड किंवा मालक याच्यासाठी केले असले तरी त्यांचे कोणीही समर्थन करण्याची गरज नाही आणि त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. पण मंत्री, खून, बलात्कार आदी आरोपांचा डोंगर पोखरून हा उंदीर बाहेर आला आहे. परत हे सगळे बाहेर यायला सुशांतची आत्महत्या का व्हावी लागली, आणि केंद्र शासनाचा एक मोठा ब्युरो एवढी वर्षे काय करत होता, ते विचारायचे नाही.

आता या सगळ्यात कंगना राणावतचा संबंध कुठे आला? "आपकी अदालत" या कार्यक्रमात रजत शर्मा यांनी फार पूर्वी कंगनाची एक मुलाखत घेतली होती, ती हल्ली पाहण्यात आली आणि थोडा उलगडा झाला. त्यात तिने ती स्वतः ड्रग्सच्या आहारी गेली होती हे सांगितले आहे. त्याशिवाय तिने हे ही सांगितले आहे की, ती त्या सुरवातीच्या काळात एका अभिनेत्यासोबत राहायची आणि नंतर त्यांचे संबंध पोलीस तक्रार होईपर्यंत विकोपाला जाऊन ते वेगळे झाले.

आदित्य ठाकरे यांच्यावर जे बेलगाम आरोप झाले होते, त्यात या अभिनेत्याचा मुलगा त्या बलात्कार आणि खुनात त्यांच्यासोबत होता. असे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे त्या सुरवातीच्या आरोपांपासूनच कंगनाचा हे प्रकरण रंगविण्यामध्ये संबंध असावा, किंवा त्या अभिनेत्याच्या मुलाचे नाव त्यात दिसल्यावर तिने जुने हिशोब चुकते करण्यासाठी यात उडी मारली असे दिसते. आता मात्र, तिने आणि रिपब्लिक टिव्हीच्या अर्णब यांनी मुंबई पोलीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याबद्दल आणि मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करण्यासारखी अत्यंत वादग्रस्त वक्तव्ये करून या प्रकरणाला भलतेच वळण दिले आहे. आतापर्यंत आदित्य ठाकरे व रिया चक्रवर्ती यांच्यावर बलात्कार, खून आणि सुशांतला कंगाल करणे, असे बिनबुडाचे आरोप झाले आहेत पण त्यातून निष्पन काहीच झाले नाही. त्या गोष्टींचा लोकांना विसर पडावा म्हणून ही वक्तव्ये केली जात आहेत असे स्पष्ट दिसते आहे.

थोडक्यात आता या प्रकारांत आजपर्यंत जे सिद्ध होते आहे ते असे आहे की... सुशांतचा खून झालेला नाही तर त्याने आत्महत्याच केली होती, रिया चक्रवर्तीने त्याच्याकडून काहीही पैसे घेतलेले नाहीत, मात्र ती, सुशांतचा मॅनेजर आणि स्वयंपाकी यांनी त्याच्यासाठी ड्रग्स मागवले आणि त्याला दिले. पण मग त्या दिशा सॅलियनचा सामूहिक बलात्कार, तिला नग्नावस्थेत वरून फेकून देणे,त्याआधी तिने सुशांतला फोन करणे, मग सुशांतच्या घरी खुनाच्या आदल्या रात्री युवा मंत्र्याने मित्रांसोबत येऊन सुशांतचा खून करणे, रियाने सुशांतचे पंधरा कोटी लुबाडणे, आणि हे सगळे मराठी आणि हिंदी न्यूज चॅनेलनी दिवसरात्र महिनाभर सांगणे, भाजपच्या ४/५ मोठ्या नेत्यांनी याच सगळ्या आज सिद्ध न झालेल्या अफवा रोज जोरजोरात सांगणे, या सगळ्याचं काय? तर ते आपण विसरून जायचं आणि ९ सप्टेंबरला कंगना आता जो नवा तमाशा करणार आहे त्याची मजा परत याच चॅनेल्सवर पाहायची!

आणि हो! आताची ब्रेकिंग न्यूज ही आहे की ,आधी कंगनाला हिमाचल प्रदेश मुख्यमंत्र्यांनी ती “आमची हिमाचलची बेटी” आहे म्हणून हिमाचल प्रदेश पोलिसांची सुरक्षा दिली होती. आता तर केंद्रीय गृहमंत्रालयाने तिच्या जीवाला धोका असल्याने "वाय" दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. अशा कडेकोट बंदोबस्तात बॉलिवूडची "क्वीन" आता ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. तेंव्हा "कंगनाचा मुंबई पोलिसांवर विश्वास का नाही?" अशा हेडलाईन्स आणि त्यावर त्या गोष्टीचे समर्थन करणारे नेत्यांचे व्हिडीओ पाहायला तयार राहा. या सगळ्यात मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर होऊ द्या की! युद्धात सगळं क्षम्य असतं आणि सत्ताकारण हे युद्धच असतं. दिशा सॅलियन, रिया, स्वतः सुशांत आणि थेट आदित्य ठाकरेंची जर बदनामी होऊ शकते, तर मुंबई पोलीस तर बिचारे सरकारी नियमांनी बांधील शिस्तबद्ध पोलीस दल आहे, ते काय करणार आहेत?

Updated : 8 Sep 2020 11:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top