Home > मॅक्स ब्लॉग्ज > नवीन क्रांतिकारी औषधोपचाराने होणार कॅन्सरवर मात...

नवीन क्रांतिकारी औषधोपचाराने होणार कॅन्सरवर मात...

नवीन क्रांतिकारी औषधोपचाराने होणार कॅन्सरवर मात...
Xकॅन्सर हा शब्द उच्चारला की क्षणार्धात पोटात भीतीचा गोळा उठतो, निराशा, वैफल्य अशा संमिश्र भावना उमटतात. शेवटी हा कॅन्सर मलाच का झाला असा प्रश्न प्रत्येक कॅन्सरग्रस्ताला पडतो. बरीच वर्षे या क्षेत्रात कॅन्सरतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. रुग्ण कोणीही असो, त्याला/तिला कुठल्याही अवयवाचा कॅन्सर असो, दरवेळी हीच भावना ठरलेली असते. मी स्वतःलाच विचारतो की, कधीतरी ही भावना बदलेल का ? आणि दुर्दैवाने उत्तर नाही असे असते. पण मी तरीही आशादायी आहे.

2012 साली 'इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर' यांनी प्रकाशित केलेल्या ग्लोबोकॉन या डॉक्युमेंटमध्ये कॅन्सरमुळे एकंदरीत मृत्युदर प्रमाण आणि कॅन्सरच्या वाढलेल्या आकडेवारीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 2012 मध्ये जगभरात नवीन भर पडलेल्या कॅन्सरपीडितांचे प्रमाण 14.1 दशलक्ष, तर कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडणाऱ्याचं प्रमाण 8.2 दशलक्ष आणि कॅन्सर वर मात करून जगणार्‍याचे प्रमाण पाच वर्षांच्या कालावधी दरम्यान 32.6 दशलक्ष एवढे प्रचंड आहे. जगभरातील पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर आणि त्यापाठोपाठ प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर सर्वाधिक आढळतो. तर महिलांमध्ये सर्वात जास्त स्तनांचा कॅन्सर आणि त्यानंतर (आतड्यांचा) कोलोन कॅन्सर आणि गर्भ पिशवीचा कॅन्सर आढळून येतो.

भारतीय पुरुषांमध्ये देखील फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त असून त्यापाठोपाठ तोंडाच्या कॅन्सरचा आणि मानेच्या कॅन्सरचा क्रमांक लागतो. तर भारतीय महिलांमध्ये स्तनांचा तसेच गर्भपिशवीचा कॅन्सर आणि आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त आहे. 2020 मध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णाची संख्या 1.25 दशलक्ष इतकी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि मृत्यूदर 0.84 दशलक्ष इतका असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. भारतामध्ये 2012 मध्ये एक दशलक्ष नवीन कॅन्सरपीडितांची भर पडली असून 0.68 दशलक्ष एवढी लोकसंख्या कॅन्सर पीडित होती. तसेच कॅन्सरवर मात करून पाच वर्ष जगणाऱ्यांची संख्या १.७ दशलक्ष एवढी आहे. भारतीय पुरुषांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त असून त्याखालोखाल मेंदूच्या कॅन्सरचा आणि मानेच्या कॅन्सरचा नंबर लागतो. तर भारतीय महिलांमध्ये स्तनांचा तसेच गर्भपिशवीचा कॅन्सर आणि आतड्यांच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वात जास्त आहे.

कॅन्सर आणि मुंबई

२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 25 लाख एवढी आहे. यामध्ये 53.8% पुरुष आणि 46.2% स्त्रिया आहेत. साक्षरतेचे प्रमाण 90.28% असून ते देशाच्या साक्षरता प्रमाणापेक्षा जास्त आहे. देशाचे साक्षरता प्रमाण 74.4% आहे. तर मुंबई वगळता महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचे प्रमाण 82.3 % आहे.

ग्रेटर मुंबई मध्ये 2012 मध्ये 13,383 नवीन रुग्णाची नोंद झाली असून त्यामध्ये पुरुषांची संख्या 6,597 इतकी होती तर स्त्रियांची संख्या 6,786 इतकी होती. स्त्रियांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचे 35% एवढे जास्त प्रमाण असून त्याखालोखाल ओटीपोटाच्या कॅन्सरचे 11.7% तर गर्भाशयाच्या कॅन्सरचे 6.7% इतके प्रमाण आहे. 2012 मध्ये ३५ ते ६४ या वयोगटामध्ये स्तनांच्या कॅन्सरच्या 1964 केसेसची नोंद झाली.

गेल्या पंचवीस वर्षात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. मुबलक आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असतांनाही ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या महिलांची संख्या खूप जास्त आहे. उशिरा होणारं निदान हे त्याचं प्रमुख कारण आहे. जर सुरूवातीच्या टप्प्यातच कॅन्सरचं निदान झालं आणि तत्परतेनं त्यावर उपचार झाले तर कॅन्सरमधून सुटका होऊ शकते.

कॅन्सर होण्याचे प्रमाण दिवसोदिवस वाढत असल्यामुळे कॅन्सर मुक्त होण्यासाठी आवश्यक ती साधन प्रणाली विकसित होणे फार गरजेचे आहे. कॅन्सर मुक्त होण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ, आर्थिक मदत, सामाजिक आणि मानसिक पाठबळ या सर्वांचा मेळ असणे फार आवश्यक आहे. कॅन्सर मुक्तीचं ध्येय गाठण्यासाठी टीमवर्क सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

मेडिकल प्रक्टिस ही शारीरिक चाचण्यांवर आधारित असते आणि ओंकोलोजी ही त्याला अपवाद नाही. कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये अनेक प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. सर्जरी, केमो थेरपी, रेडीयेशन थेरपी, हार्मोनल थेरपी, टार्गेटेड थेरपी अशा पद्धती आहेत. पण त्याच बरोबरीनं सपोर्टीव्ह केअर म्हणजेच योग्य आहार, पेन मॅनेजमेंट, मानसिक पाठबळ आणि आधार हे सुद्धा महत्त्वाचं आहे.

सरकारच्या अंतर्गत असलेल्या नागरी वैद्यकीय सुविधा केंद्रात मी काम करत असल्यामुळे सरकार उपलब्ध करून देत असलेल्या उपचार सुविधा, सवलती, योजना, या बाबतीत सामाजिक तसंच आर्थिकदृष्ट्या सरकारची नीती या बद्दल अधिकारवाणीनं बोलू शकतो.

आता हे चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात आलेले आहेच की, कॅन्सर मुक्त होणे म्हणजेच कॅन्सरला नष्ट करणे होय. सरकार आणि अनेक एनजीओ तंबाखू वापरावर बंदी यावी याकरिता कसोशीने प्रयत्न करीत आहेत. 30 ते 35% पीडित हे डोकं आणि मानेच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत. जो तंबाखू मुळे होतो. दुसरा उपाय म्हणजे कॅन्सरचे प्राथमिक टप्प्यावर निदान होणे ज्याकरिता PAP स्क्रीनिंग टेस्ट खूप उपयोगी पडते. या टेस्ट मुळे कॅर्विकल कॅन्सरचे निदान अगदी सुरूवातीच्या टप्प्यात होऊन ट्रीटमेंट विनाविलंब सुरु करता येते. गर्भाशय कॅन्सर जो भारतीय महिलांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे, त्याचे लवकर निदान झाल्यास यशस्वीपणे ट्रीटमेंट देऊन त्यावर मात करता येते. तंबाखू वापरावर पूर्णपणे बंदी, स्थूलपणावर नियंत्रण, आवश्यक प्रमाणात मेदयुक्त आहार आणि जीवनमानात यथायोग्य बदल या सर्वांमुळे कॅन्सरचे उच्चाटन होऊ शकेल.

सध्या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सरकारनं कॅन्सरच्या समूळ उच्चाटनाच्या दिशेने हळूहळू पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जनतेसाठी राजीव गांधी आरोग्यदायी योजना आणि त्यासारख्या इतर आर्थिक मदत देणाऱ्या योजना असोत किंवा केशरी रेशन कार्डधारकांच्या सवलती किंवा अलीकडेच सरकारनं केमोथेरपी ड्रग्स सुद्धा मोफत उपलब्ध करून दिलेले औषधोपचार असोत, असे प्रयत्न सुरु आहेत. परंतू काही महत्वाच्या कॅन्सर नियंत्रण ड्रग्सवर सरकारचे नियंत्रण नसणे हे जनहिताच्या विरोधात आहे. अर्थात, हे म्हणणे अयोग्य ठरेल की, कॅन्सर उच्चाटन ही संपूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे, नव्हे तर ती आपलीही तितकीच जबाबदारी आहे. ही एक सामाजिक जबाबदारी आहे हे लक्षात घेता निमसरकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यातील प्रभावशाली लोकं यांनी संयुक्तपणे पुढे येऊन कॅन्सरवरील संशोधाकरिता आर्थिक पाठबळ, सशक्त यंत्रणा उभी करण्यास सहाय्य केल्यास कॅन्सर उच्चाटन मोहिमेला बरीच चालना मिळेल.

मला खात्री आहे की या क्षेत्रात अधिकाधिक शास्त्रीय संशोधन होऊन नवीन क्रांतिकारी औषधोपचारांचा शोध लागल्यास कॅन्सर वर नक्कीच मात करता येईल.

डॉ. दिलीप निकम
विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग, ( लेखक स्वतः मुंबईतील कामा रुग्णालयात कॅन्सर तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत )

Updated : 4 Feb 2023 6:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top