Home > मॅक्स ब्लॉग्ज > शहराच्या हिताला अग्रक्रम देणारा नेता सुरेश कलमाडी - महेश झगडे

शहराच्या हिताला अग्रक्रम देणारा नेता सुरेश कलमाडी - महेश झगडे

सत्तेच्या कोलाहलापलीकडे उभा असलेला, प्रशासकीय स्वायत्ततेचा मान राखणारा आणि शहराच्या हिताला अग्रक्रम देणारा नेता म्हणजे सुरेश कलमाडी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे सांगताहेत त्यांच्या भेटीचा तो किस्सा...

शहराच्या हिताला अग्रक्रम देणारा नेता सुरेश कलमाडी - महेश झगडे
X

dynamic leader of the country देशातील एक वादळी नेतृत्व Suresh Kalmadi सुरेश कलमाडी यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.

मी पुणे महापालिका आयुक्त असतांना ते फक्त एकदाच मला कार्यालयात भेटायला आले. सोबत त्यांच्या कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि पक्ष पदाधिकारी असा मोठा लवाजमा होता. अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा झाली, त्यावर त्यांनी हे सर्व प्रश्न तातडीने निकाली निघाले पाहिजेत असे निक्षून सांगितले.

शेवटी त्यांनी काही खाजगी चर्चेसाठी मला ऑफिस लगतच्या कक्षात(ante-chamber) जाण्याचे सुचविले. तेथे आम्ही दोघेच होतो. काहीतरी त्यांचे खाजगी आणि अवघड काम असावे असे मला अपेक्षित होते. मी त्यांना त्याबद्दल विचारले. त्यावर त्यांनी तसे काहीही खाजगी काम नसल्याचे सांगितले. पण पुढे त्यांनी असेही सांगितले की एक महत्वाची बाब ते त्या गर्दीत बोलू शकत नव्हते, ती म्हणजे ,”मी आलो म्हणजे नगरसेवकांनी बाहेर जे सांगितले ते सर्व करावेच असे नाही, तुम्हाला शक्य आणि नियमात असेल तेच करा, त्यांनी चुकीचे काही सांगितले तर अजिबात करू नका. शहराच्या पायाभूत सुविधावर लक्ष्य केंद्रित करा, त्यासाठी माझा आणि कॉंग्रेस पक्षाचा तुम्हाला पाठिंबा असेल. काही समस्या आल्या तर बिनधास्तपणे मला सांगा. केंद्र सरकारमध्ये काही मदत लागली तर मला फोन करा आणि दिल्लीला आल्यानंतर चहासाठी भेटत चला”.

त्या क्षणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू जाणवला सत्तेच्या कोलाहलापलीकडे उभा असलेला, प्रशासकीय स्वायत्ततेचा मान राखणारा आणि शहराच्या हिताला अग्रक्रम देणारा नेता. राजकीय जीवनात अशा प्रकारात बसणारी अनेक व्यक्तिमत्त्वे जवळून पाहण्याचा योग आला; परंतु आज त्यांपैकी हे नेतृत्व हरपले आहे, ही जाणीव मनात हळहळ निर्माण करते. काळाच्या ओघात मते, भूमिका, प्रतिमा बदलत जातात; पण काही भेटी आणि काही वाक्ये स्मरणात खोलवर रुतून बसतात आणि ही भेट तशीच एक होती.

(साभार - सदर पोस्ट महेश झगडे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 6 Jan 2026 10:32 AM IST
Next Story
Share it
Top