Home > मॅक्स ब्लॉग्ज > यशाला हजार बाप असतात तर अपयशाला कुणीच वाली नसतो : वैभव छाया

यशाला हजार बाप असतात तर अपयशाला कुणीच वाली नसतो : वैभव छाया

यशाला हजार बाप असतात तर अपयशाला कुणीच वाली नसतो. अपयशाच्या काळातही सोबत उभे राहणाऱ्यांपेक्षा चर्चा अधिक विरोधात बोलणाऱ्यांचीच होते. सध्या काँग्रेस आणि राहूल गांधींना याच अनुभवातून जावे लागत आहे. प्रत्येकजण ताशेरे ओढत आहे. अगदी पक्षातले लोक सुद्धा... कॉग्रेसच्या यशअपयशाविषयी सांगताहेत राजकीय विश्लेषक वैभव छाया...

यशाला हजार बाप असतात तर अपयशाला कुणीच वाली नसतो : वैभव छाया
X

पण हे तेच लोक आहेत ज्यांनी काँग्रेसने सत्ता गमावताच आपापल्या मूळ उद्योगात रममाण झाले होते. कपिल सिब्बल पुन्हा त्यांच्या बिजनेस आणि वकिली व्यवसायात परतले. चिदंबरम सुद्धा कंपनीत परतले. अशी शेकडो उदाहरणे देता येतील.

प्रत्येक राज्यातील प्रदेश काँग्रेस कमीटीची अध्यक्षपदे तरूण नेतृत्वाकडे न देता त्याच जुन्या खोडांकडे ठेवली जातील याची जुनी रणनीती कायम ठेवण्यात आलेली आहे. कधी रस्त्यावर उतरणे नाही, कधी कृती कार्यक्रम करणे नाही. लोकांना समजेल अशी भाषा वापरणे नाही. स्वतःच्या कंफर्ट झोन मधून बाहेर निघत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका किती काँग्रेसी नेत्यांनी घेतली असा प्रश्न विचारला तर आपल्यालाच काय काँग्रेसींना देखील विचार करावा लागेल.

हाथरस प्रकरणी राहूल गांधींनी जी भूमिका घेतली, रस्त्यावर उतरून ज्या पद्धतीने संघर्षाचा पवित्रा घेतला त्या पद्धतीचा आक्रमकपणा महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यांत किती प्रदेशाध्यक्षांनी आजवर घेतला आहे असा प्रश्न केला तर उत्तर मिळणार देखील नाही.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक भिजता ठेवण्यात काँग्रेसची ठंडा करके खाओ वाली नीती अधिक जबाबदार आहे हे नरेटिव्ह एव्हाना राज्यभर पसरले आहे. त्यावर तरी काम करावं अशी एकाही नेत्याला काळजी वाटू नये याचे आश्चर्य़ वाटते आहे.

निवडणूकीत असे उमेदवार उभे करणे ज्यांना मतदारसंघ नीट माहीत नाही. ज्यांचा इतिहास संभ्रमित आहे, ज्यांचा जनसंपर्क नाही, ज्यांच्याकडे नीट योजना नाही ... असे करत राहीले तर निवडणूका तरी कशा जिंकता येतील हा प्रश्न का सतावत नाही.

उदाहरणादाखल... महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक, लोकसभा निवडणूक प्रकाश आंबेडकरांमुळे हरलो, औवेसीमुळे हरलो, बिहारची निवडणूक औवेसीमुळे हरलो. या लोकांचं काय करायचं.. या लोकांचा काय तोड काढायचा म्हणून किती दिवस काँग्रेस रडत बसेल हे त्यांनाच ठाऊक.

स्वतः मेहनत करण्याची तयारी नाही. माध्यमे काबीज करून ती आपल्या पद्धतीने वापरण्याची तयारी नाही. हिंदूत्व सॉफ्ट की हार्ड यावर संभ्रम, अगदी लोकल पातळीवरही नेतृत्व उभे कसे करावे, केले तर आपल्याला स्पर्धा होईल या संभ्रमात असलेल्या संघटनेकडून, नेतृत्वाकडून जिंकण्याची अपेक्षा ठेवता येईल का?

जातवर्गाच्या समस्या काय आहेत? कनिष्ठ मध्यमवर्गाच्या समस्या काय आहेत, तरूणांना काय पाहीजे आहे, त्यांना नेमकी कोणती भाषा आणि कपडे कळतात, त्यांना काय आवडतं हे नेमकं शरद पवारांनी हेरलं, त्यासाठी अथक मेहनत घेतली. लोकांमध्ये गेले. ऊन, वारा, पाऊस सहन करून उभे राहीले. आणि मरगळ आलेला, फुटलेला पक्ष पुन्हा उभाच केला नाही तर तो सत्तेतही बसवला.

राहूल गांधींना आत्तापर्यंत जुनी आणि नको असलेली खोडं काढून कर्करोगाने ग्रस्त झालेल्या पक्ष संघटनेवर किमोथेरेपी करता आलेली नाही. तरी प्रत्येक ठिकाणी राहूल गांधींना तर दोष देता येणार नाही. नेतृत्व खमकं असलं तरी सोबतचं संघटन आळशी असेल तर काहीच होऊ शकणार नाही. आपल्या पराभवासाठी कायम इतरांना दोष देत बसत आळशी राहणाऱ्यांना कधीच कुणी जिंकवू शकत नाहीत.

त्यामुळे प्रादेशिक पक्षच एकत्रितपणे मोदींना हरवू शकतात. उलट काँग्रेस जिथे उभी राहते तिथेच भाजप हमखास निवडून येत आहे. काँग्रेसकडून अशाही फार अपेक्षा नाहीत. आळस हा माणसाचा शत्रु आहे. आराम हराम है हे नेहरूंचं वाक्य देशातल्या प्रत्येक डिस्ट्रीक्ट मॅनेजर असलेल्या काँग्रेसी नेत्यांना कुणीतरी नीट समजावून सांगायला हवं.

Updated : 23 Nov 2020 1:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top