Netaji Subhas Chandra Bose : काँग्रेसमध्ये सुभाषचंद्र बोस एकाकी का पडले होते ?
नेताजी बोस यांच्या मनात गांधीजींबद्दल कटुता होती का? नेताजी बोस हे नेहरूंचे प्रतिस्पर्धी होते का? स्वातंत्र्यानंतर भारतात 20 वर्ष पोलादी हुकूमशाही का हवी होती सुभाषचंद्र बोस यांना? आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती! त्या निमित्ताने या जाज्वल्य देशभक्ताच्या जीवनासंदर्भात लेखक सुनील सांगळे यांचा लेख
X
Netaji Subhas Chandra Bose's birth anniversary आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती! त्या निमित्ताने या जाज्वल्य देशभक्ताचे जीवन, त्यांचे Congress काँग्रेसमधील स्थान, त्यांचे Gandhi गांधी, Nehru नेहरू, Patel पटेल यांच्याशी असलेले संबंध आणि त्यांनी आयुष्यभर जपलेली तत्वे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
सुभाष यांचे वडील जानकीनाथ यांची सुभाष यांनी आयसीएस व्हावे अशी तीव्र इच्छा होती. आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार सुभाष हे आयसीएस परीक्षा देण्यासाठी इंग्लंडला आले आणि केवळ आठ महिन्यांच्या तयारीवर कुशाग्र बुद्धिमत्तेच्या सुभाष यांनी इंग्रजी विषयात पहिले येत ऑगस्ट १९२० मध्ये ती परीक्षा देऊन चौथा क्रमांक मिळवला.
आयसीएस परीक्षा तर उत्तीर्ण केली, परंतु सुभाष यांना त्या प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा होईना व त्यांनी आपल्या वडील बंधू सरत यांच्याशी सल्लामसलत केली. सरत यांना लिहिलेल्या एका पत्रात सुभाष यांनी म्हटले आहे की, मी एका हृदयशून्य आणि लाल-फितीच्या कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशासकीय सेवेचा भाग होऊ इच्छित नाही. त्यांच्या मते त्यांच्या पुढे दोनच पर्याय होते; एक म्हणजे एका सडलेल्या व्यवस्थेचा भाग होणे, किंवा मग आपल्या आदर्शाच्या मार्गावर चालत राहणे! सुभाष यांना त्यांच्या आई प्रभादेवी यांनी एक पत्र लिहून कळविले होते की, "जरी तुझ्या वडिलांची इच्छा तू आयसीएस व्हावे अशी असली, तरी मला स्वतःला महात्मा गांधींची तत्वे आणि मार्ग हा आदर्श वाटत आहे." आईचा सल्ला १६ जुलै, १९२१ रोजी बोस Mumbai मुंबईत बोटीतून उतरले आणि त्यांनी लगेचच महात्मा गांधी यांची मणिभवन येथे मुंबईत भेट घेतली. गांधीजींनी बोस यांना बंगालमध्ये जाऊन देशबंधू चित्तरंजन दास यांच्याकडे जाऊन कार्याला सुरवात करण्यास सांगितले.
बोस-पटेल तणाव
Congress काँग्रेसमध्ये जे दोन मोठे गट होते, त्यात Sardar Patel सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, गोविंद वल्लभ पंत, पुरुषोत्तमदास टंडन हे प्रमुख नेते असलेला उजव्या विचारांचा गट होता. या गटाला उजवा एवढ्यासाठीच म्हणायचे की तो भारतात समाजवाद आणण्याच्या मताचा नव्हता, तसेच गांधीजींच्या धोरणांवर या गटाचा पूर्णपणे विश्वास असे आणि आंदोलनेदेखील त्यानुसारच करण्याचे या गटाचे धोरण असे. नेहरू हे काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीच्या गटाचे सर्वोच्च नेते होते आणि त्यांचे बोस हे प्रमुख सहकारी होते. कोणत्याही काळात देशातील तरुण हे नेहेमीच आक्रमक नेत्यांच्या प्रेमात असतात आणि त्यामुळे नेहरू-बोस यांच्या गटाची लोकप्रियता ही तरुण पिढीत प्रचंड होती.
सुभाषबाबू हे सुरवातीपासूनच जहाल विचारांचे होते आणि लवकरच त्यांचे उजव्या विचारसरणीच्या गटाच्या नेत्यांशी खटके उडू लागले. त्याला अनेक कारणे झाली. वयाने खूप लहान असूनही सुभाषबाबू हे पक्षातील विरोधकांशी आक्रमकतेने वागत. नेताजी बोस यांच्याबद्दलच्या नाराजीची सुरवात १९२८ च्या कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनापासूनच झाली होती. बोस यांनी त्या ठिकाणी गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी एक वेगळीच व्यवस्था केली होती. त्यांनी दोन हजार स्वयंसेवकांना लष्करी कवायतीचे प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या बटालियन तयार केल्या. यापैकी अर्ध्या बटालियनांना त्यांनी लष्करी गणवेश दिले आणि त्यावर लष्करी अधिकाऱ्यांची सारी चिन्हे होती. बोस यांनी स्वतःसाठी फिल्ड मार्शलचा हुद्दा असलेल्या अधिकाऱ्याचा गणवेश शिवून घेतला होता आणि त्या गणवेशावर फिल्ड मार्शल दर्जाच्या अधिकाऱ्याची सारी चिन्हे होती आणि स्वतः बोस हे गार्ड ऑफ ऑनरच्या वेळी त्या गणवेशात हातात फिल्ड मार्शल हातात धरतात ती काठी घेऊन उभे होते. तो गणवेश अस्सल वाटावा म्हणून तो कलकत्त्यातील ब्रिटिश टेलरिंग फर्म हर्मन यांच्याकडून शिवून घेतला होता. एवढेच नव्हे तर बोस यांनी स्वतःला जनरल ऑफिसर इन कमान्डींग अशी उपाधीही घेतली काँग्रेससारख्या संघटनेत हा लष्करी स्वरूपाचा सोहोळा कोणालाही आवडला नाही.
जवळपास असाच प्रकार बोस यांनी ते स्वतः ज्या हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते तेंव्हा केला होता. त्या अधिवेशनात एखादा प्राचीन काळातील राजा ज्याप्रमाणे एखादे युद्ध जिंकल्यावर आपल्या राज्यात प्रवेश करतो, त्याप्रकारे बोस यांनी त्या अधिवेशनात प्रवेश केला. हा सगळा प्रकार गांधीजींचं नव्हे तर काँग्रेसमधील सर्वच मोठ्या नेत्यांना खटकला होता, कारण व्यक्तिपूजा हा प्रकार थोड्याफार प्रमाणात गांधीजी वगळले तर काँग्रेसमध्ये अजिबात नव्हता.
पुढे १९३० च्या दशकात सुभाषबाबू हे युरोपात असतांना विठ्ठलभाई पटेल यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी काँग्रेसमधील पटेल गटावर प्रचंड टीका केली. तसेच 'द इंडियन स्ट्रगल' या आपल्या पुस्तकात या पुस्तकात त्यांनी तेच केले. त्यामुळे त्यांचे पटेल गटाशी संबंध कायमचे बिघडले. पुढे १९३९ मध्ये त्रिपुरी येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनात काँग्रेस अध्यक्षपदासाठी उभे राहण्याचा सुभाषबाबूंनी निर्णय घेतला आणि ती त्यांची पटेल यांच्या नेतृत्वाखालील उजव्या गटाशी शेवटची लढाई ठरली. पक्षावर पोलादी पकड असलेल्या उजव्या गटाने नंतर कोणतीही दयामाया न दाखवता सुभाषबाबूंना शेवटी शिस्तभंगाची कारवाई करून जवळपास काँग्रेसबाहेर जाण्यास भाग पाडले आणि त्याचा परिणाम शेवटी सुभाषबाबू हे देश सोडून जाण्यात झाला.
नेहरू-बोस तणाव
बोस हे नेहरूंबद्दल लिहितात की, १९३६-१९३७ या वर्षात त्यांच्या लोकप्रियतेने शिखर गाठलेले होते आणि काही बाबतीत तर ती लोकप्रियता गांधीजींपेक्षाही अधिक होती. तसेच नेहरूंना डाव्या गटाचा देखील पाठिंबा होता, जो गांधीजींना नव्हता. नेताजी बोस हे नेहरूंचे प्रतिस्पर्धी होते का? किंवा ते स्वतः किमान तसे मानत होते का? तसे अजिबात नव्हते.. एक तर ते वयाने नेहरूंपेक्षा लहान होते (ते नेहरूंना संभाषणात नेहेमी "बडे भाई" असे संबोधित) आणि गांधीजींचा संपूर्ण विश्वास हा नेहरूंवर होता. गांधीजींच्या खालोखाल नेहरूंची देशभर लोकप्रियता प्रचंड होती. १९३० सालापासूनच ते काँग्रेसचे निवडणूक जिंकून देणारे नेते होते. ४ मार्च १९३६ रोजी बोस यांनी नेहरूंना युरोपमधून जे पत्र लिहिले होते, त्यात त्यांनी म्हटले की, “सध्या काँग्रेस पक्षात पहिल्या रांगेत असलेल्या नेत्यात तुम्ही एकच असे आहेत की ज्यांच्याकडे आम्ही आशेने बघू शकतो. तुम्हीच फक्त काँग्रेसला पुरोगामी कार्यक्रमाकडे नेऊ शकाल. या दृष्टीने तुमचे स्थान अद्वितीय आहे.” ही भाषा ज्याला आपण प्रतिस्पर्धी मानतो त्याच्याबद्दल असू शकत नाही, तर आपल्या जेष्ठ सहकाऱ्याबद्दलची आहे हे स्पष्ट आहे.
देशात तत्कालीन कोण मोठे नेते होते याची चर्चा करतांना ‘इंडियन स्ट्रगल’ या आपल्या पुस्तकात बोस लिहितात की, या सगळ्या नेत्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांची लोकप्रियता ही देशात सर्वात जास्त आहे याबद्दल सर्वांचेच एकमत आहे. बोस यांना नेहरूंबद्दल एकच तक्रार होती आणि ती म्हणजे एवढी लोकप्रियता आणि गांधीजींवर वजन असूनही नेहरू हे डाव्या गटाचे कार्यक्रम रेटून नेत नाहीत आणि जेव्हा गांधीजींशी संघर्षाची वेळ येई, तेव्हा नेहरू हे माघार घेत. दुसरे म्हणजे १९३० नंतर बोस हे हुकूमशाही, फॅसिस्ट राजवट यांच्या प्रेमात पाडले आणि लोकशाहीवर आत्यंतिक श्रद्धा असलेल्या नेहरूंना हे मान्य होणे शक्यच नव्हते. त्यामुळे कधी ना कधी त्यांचे मार्ग वेगळे होणे हे अटळ होते.
नेताजी-मुस्लीम संबंध
दुसरी एक विचित्र गोष्ट म्हणजे मुस्लीम अनुनयांबद्दल गांधीजींना दोषी धरले जात असले तरीही गांधी-दास-बोस यांच्या परस्पर संबंधात हा मुस्लीम अनुनय दास-बोस यांच्या बाजूने होता. बोस यांनी कलकत्ता महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरु केली आणि त्यानुसार त्यांनी मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त (३३ पैकी २७ जागांवर) मुस्लीम व्यक्तींच्या नेमणुका केल्यामुळे बंगालमधील हिंदूंच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. यावर, "नोकऱ्या मिळविण्यात पूर्वी हिंदूंची जवळपास एकाधिकारशाही होती, आणि त्यामुळे काही हिंदूंना ही गोष्ट झोंबत जरी असेल, तरी आता मी मुस्लीम, ख्रिश्चन आणि दलित त्यांना न्याय देत राहीन." असे बोस यांनी प्रत्युत्तर दिले. बोस हे मुस्लिमांच्या जवळचे आहेत आणि जीना हे त्यांना हाताशी धरून काँग्रेसमध्ये फूट पडू शकतात अशी भावना बंगालमधील अमृत बझार पत्रिकेसारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रानेदेखील व्यक्त केली होती.
बोस यांच्या नेतृत्वाखालील बंगाल काँग्रेस या धोरणामुळे जे निर्णय घेई ते उजव्या गटाच्या दबावामुळे देशपातळीवर मान्य करून घेणे गांधीजींना शक्य होत नसे. बोस यांनी बंगालमधील अतिजहाल मुस्लीम संघटनांना काबूत ठेवण्यासाठी अगदी जीनांच्या मुस्लीम लीगसोबत स्थानिक पातळीवर राजकीय आघाडीही स्थापन केली होती. शेवटी तर देश सोडण्याच्या आधी बोस यांनी देशाची फाळणी टाळण्यासाठी अगदी टोकाला जाऊन जीनांना अखंड भारताचे पंतप्रधानपद देण्याचाही प्रस्ताव ठेवला होता. गांधी-बोस संबंधात अंतराय येण्यास बोस यांच्या नेतृत्वाखालील बंगाल काँग्रेसचे मुस्लिमांना झुकते माप देण्याचे हे धोरण हे ही एक कारण होते.
हुकूमशाही आणि एकपक्षीय राजवटीचा पुरस्कार
दिनांक १५ मार्च, १९३५ रोजी भारतातील वृत्तपत्रांनी बोस यांनी पाठविलेले एक निवेदन प्रसिद्ध केले होते ज्यात त्यांनी तत्कालीन 'काँग्रेस समाजवादी पक्ष' या काँग्रेस-अंतर्गत असलेल्या गटाबद्दल सविस्तर चर्चा केली होती. यात बोस यांनी स्पष्ट म्हटले होते की जरी आपला डावा गट अल्पसंख्येत असला तरीही वेळ आल्यावर इतर पक्षांवर बंदी घालून आपल्या गटाने नाझी आणि फॅसिस्ट पक्षप्रमाणेच आपली सत्ता स्थापन करून आपले कार्यक्रम राबविले पाहिजेत. हा सरळसरळ एकपक्षीय हुकूमशाहीचा पुरस्कार होता. इथेच पुढे स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करावा की नाही याबाबतच्या चर्चेबद्दल बोलतांना बोस यांनी म्हटले की, सत्ता मिळाल्यावर काँग्रेसचे कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे आणि त्यासाठी "Dictatorship of the party both before and after Swaraj is won" हे आपले घोषवाक्य असले पाहिजे.
हे निवेदन १५ मार्च १९३५ रोजीचे आहे हे लक्षात घेतले तर बोस यांची गांधीजींचे नेतृत्व बदलण्याची भाषा, फॅसिस्ट विचारसरणीचा पुरस्कार, स्वातंत्र्याआधी आणि नंतरही इतर पक्षांवर बंदी घालून एकपक्षीय हुकूमशाही आणण्याची भाषा हे पाहिले तर, बोस हे भारतात नंतर परत आल्यावर गांधीजी आणि पटेल-राजेंद्र प्रसाद यांचा प्रबळ उजवा गट यांनी त्यांना पुढे काँग्रेस पक्षावर कब्जा करण्यास कडाडून विरोध का केला हे लक्षात येते. नेहरू जरी बोस यांच्या गटाचे असले तरी वरील हुकूमशाहीचा पुरस्कार करण्याच्या उघड विचारसरणीमुळे ते बोस यांच्या मागे बोस-गांधी-पटेल युद्धात खंबीरपणे उभे राहिले नाहीत आणि शेवटी या सगळ्याचा परिणाम बोस हे काँग्रेसमध्ये एकाकी पडण्यात झाला.
'द इंडियन स्ट्रगल' या बोस यांनी लिहिलेल्या पुस्तकात बोस यांनी भविष्यात आपल्याला कोणता मार्ग पसंत असेल त्याचीही कल्पना देऊन टाकली होती. त्यांच्या मते भारताला लोकशाही आणि हुकूमशाही राज्यपद्धती या दोघांच्यात निवड करायची नव्हतीच. निवड फक्त दोन हुकूमशाही पद्धतीच्या राज्यपद्धतीत करायची होती, आणि त्या दोन राज्यपद्धती होत्या, साम्यवादी हुकूमशाही आणि फॅसिस्ट हुकूमशाही! भारतात जर वेगाने बदल घडवून आणायचे असतील तर एखादी कडक शिस्तीची पक्ष-संघटना आणि हुकूमशाही पद्धतीची राज्यव्यवस्था असली पाहिजे याबद्दल बोस यांची खात्री झाली होती. या पुस्तकात बोस यांनी लिहिले की, " भारताला स्वातंत्र्यानंतर हुकूमशाही पद्धतीचे अधिकार असलेल्या एका बलवान सरकारची आवश्यकता आहे... एक असे सरकार, ज्याच्यामागे लष्करी शिस्त असलेला एक पक्ष उभा असेल..”
सिंगापूर येथे १९४३ साली एका भाषणात बोस यांनी म्हटले होते की स्वातंत्र्य मिळाल्यावर... भारतात दुसरी कोणतीही राज्यघटना नांदणार नाही आणि भारतात सुरवातीच्या काळात तरी भारताला किमान वीस वर्षे तरी एका पोलादी हुकूमशहाची गरज आहे. थोडक्यात, जर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल जर्मनी-जपान-इटली यांच्या बाजूने लागला असता, आणि जपान्यांच्या मदतीने बोस हे जरी भारतात सत्तारूढ झाले असते, तर भारतात लोकशाही नांदली नसतीच आणि बोस हे भारताचे हुकूमशहा झाले असते यात शंका नाही.
लंडन इथे १० जून १९३३ रोजी इंडियन पॉलिटिकल कॉन्फरन्स या संघटनेची तिसरी वार्षिक सभा झाली आणि त्याचे अध्यक्षीय भाषण बोस यांनी केले.१९३३ मध्ये केलेल्या या भाषणात बोस यांनी ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केलेला दिसतो आणि त्यासाठी वेळप्रसंगी लष्कर, पोलीस यात फूट पाडणे, सरकारी अधिकाऱ्यांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे, याकडेही आडून निर्देश केलेला दिसतो. या भाषणात बोस यांनी काँग्रेसचे नेतृत्व जे धोरण स्वीकारत आहे त्याच्यावर कडक टीका केली आणि ब्रिटिश सत्ता घालवून टाकायची असेल तर वेळप्रसंगी सशस्त्र क्रांतीही करावी लागेल आणि त्याची तयारी ठेवावी लागेल असे सांगितले.
देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी शेवटी-शेवटी जगातील सर्वात भयंकर फॅसिस्ट आणि नाझी शक्तींशी हातमिळवणी केली होती. याशिवाय या शेवटच्या काळात फॅसिझम आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे मिश्रण असलेल्या पोलादी हुकूमशाही पद्धतीच्या राजवटीची भारताला स्वातंत्र्यानंतर किमान वीस वर्षे तरी गरज आहे यावर त्यांचा दृढ विश्वास बसला होता आणि हा विचार त्यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवला होता. त्यामुळे नेताजी जर हिटलर, मुसोलिनी आणि जपानच्या साहाय्याने स्वातंत्र्य मिळविण्यात यशस्वी झाले असते, तर देशावर त्याचे परिणाम काय झाले असते, हा वेगळा विचार करण्याचा विषय आहे.
हिंसाचाराचा अवलंब
बोस समर्थकांना आपल्या राजकीय विरोधकांच्याविरुद्ध हिंसाचाराचा अवलंब करण्यात काहीही गैर वाटत नसे. सरदार वल्लभभाई पटेल हे बंगालमध्ये एका परिषदेला जाण्यासाठी हावडा स्टेशनवर उतरले, तेव्हा सुभाषबाबूंच्या जवळपास चाळीस समर्थकांनी त्यांच्याविरुद्ध काळे झेंडे घेऊन निदर्शने केली. ही निदर्शने सुरु असतानाच त्यातील एका निदर्शकाने वल्लभभाईंच्या दिशेने दांडके फेकून मारले. नशिबाने सरदार पटेल यांना ते लागले नाही व ते थोडक्यात बचावले. सुभाषबाबूंच्या या हिंसक आक्रमकतेचा प्रसाद हिंदू महासभेच्या शामाप्रसाद मुखर्जी यांनाही मिळाला होता. मुखर्जी यांच्या सभेत बोस समर्थकांनी गोंधळ घालून दगडफेक केली आणि त्यातील एक दगड तर मुखर्जी यांच्या डोक्यात लागला.
बोस आणि सर्वधर्मसमभाव
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांक गटांना भारतात राहणे सुरक्षित वाटले पाहिजे यावर नेताजींचा कटाक्ष होता. स्वतंत्र भारतात सर्व अल्पसंख्यांक गटांना त्यांच्या धर्माचे पालन करण्यास आणि त्यांची संस्कृती सुरक्षित ठेवण्यास परवानगी मिळेल, तसेच जे विविध भाषिक अल्पसंख्यांक गट आहेत त्यांनाही तशीच संधी मिळेल हे बोस नेहेमी भाषणातून व लिखाणातून सांगत.
हरिपूर अधिवेशनात जो ठराव पारित झाला होता त्यात ज्या मूलभूत हक्कांचा उल्लेख होता त्यात अल्पसंख्याकांची भाषा, संस्कृती आणि लिपी यांना संरक्षण देणे, कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास नागरिकांना स्वातंत्र्य देणे, सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना कायद्यासमोर समान वागणूक देणे, कोणताही धर्म किंवा जात असली तरी नोकरी, व्यवसाय वा पद स्वीकारण्यास मुभा देणे, इत्यादी गोष्टींची ग्वाही देण्यात आली होती. तसेच राज्य हे धर्मनिरपेक्ष असेल, तसेच सर्व नागरिकांना मतदान करणे, देशात कुठेही स्थायिक होऊन मालमत्ता घेणे या अधिकारांची हमी दिलेली होती.
अगदी भाषेचा वापर करतांनाही त्यात विविध भाषांचे शब्द असले पाहिजेत यावर त्यांचा कटाक्ष असे. नेहेमीच वापरल्या जाणाऱ्या 'हिंदुस्थानी' या भाषेत देखील अनेक उर्दू शब्दांचा समावेश केला गेला पाहिजे याकडे ते लक्ष देत. आझाद हिंद फौजेचे घोषवाक्य तयार करतांनाही त्यांनी कटाक्षाने उर्दू शब्दांचा वापर केला होता. ते शब्द होते "इत्तेहाद, ईत्तेमाद, कुर्बानी", ज्या शब्दांचा अर्थ होता एकता, विश्वास आणि बलिदान. आझाद हिंद फौजेच्या काळात मुस्लीम अधिकारी दिवाळीच्या सणात त्यांच्या हिंदू सहकाऱ्यांकरिता 'बडा खाना' म्हणजे मेजवानी आयोजित करत, ईदच्या दिवशी हिंदू अधिकारी तशीच मेजवानी मुस्लीम अधिकाऱ्यांसाठी आयोजित करत. ख्रिसमसच्या दिवशी कॅरोल गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येई आणि फौजेत ख्रिश्चन महिलांची संख्या जरी नगण्य असली तरी राणी झाशी रेजिमेंटच्या महिला संगीताचे कार्यक्रमही आयोजित करत. हिंदू-मुस्लीम समुदायांना परस्परांविषयी विश्वास उत्पन्न व्हावा आणि मुस्लीम समुदायाला आझाद हिंद फौजेविषयी विश्वास वाटावा यासाठी बोस यांनी फौजेतील महत्वाच्या पदांवर मुस्लीम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मुद्दाम केल्या. नेताजींच्या एका मुस्लीम सहकाऱ्याने याबद्दल असे म्हटले आहे की या धोरणाचा परिणाम आझाद हिंद फौजेतील मुस्लीम अधिकारी आणि सैनिकांवर एखादी जादूची कांडी फिरवावी तसा झाला होता.
सिंगापूरमधील एका मंदिराच्या व्यवस्थापनाने नेताजींना सांगितले की ते आझाद हिंद फौजेसाठी मोठी देणगी द्यायला तयार आहेत, पण त्यासाठी नेताजींनी मंदिराला स्वतः भेट देणे गरजेचे आहे. हे मंदीर फक्त उच्चवर्णीयांना प्रवेश देण्याबाबत कुप्रसिद्ध होते. नेताजींनी यावर आपल्या पद्धतीने उपाय काढला. त्यांनी मंदिराला भेट देतांना विविध धर्मातील सहकारी निवडले आणि ते मंदिरात गेले.
स्वातंत्र्यानंतर आपल्या राज्यघटनेत समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करील असे आश्वासन आहे आणि त्या विषयावर वारंवार चर्चा झडत असतात. याबाबत सुभाषबाबूंचे मत मात्र वेगळे होते. फेब्रुवारी १९३८ च्या हरिपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाषण करतांना बोस यांनी हे स्पष्ट केले होते की अल्पसंख्यांक समुदायाला त्यांचे नागरी कायदे तसेच ठेवण्याची पूर्ण मुभा राहील आणि त्यात बहुसंख्यांक समाज हस्तक्षेप करणार नाही.
गांधीजी
नेताजी बोस यांच्या मनात गांधीजींबद्दल कटुता होती का? तर ती अजिबातच नव्हती. याचे साधे उदाहरण पाहायचे झाले, तर हे आहे की काँग्रेस आणि भारत सोडून सशस्त्र प्रतिकाराचा मार्ग अनुसरल्यावरही आझाद हिंद फौजेत सुभाष बाबूंनी ज्या वेगवेगळ्या ब्रिगेड स्थापन केल्या होत्या त्यांची नावे त्यांनी गांधी-ब्रिगेड, नेहरू-ब्रिगेड आणि आझाद-ब्रिगेड अशी ठेवली होती.
नेताजी बोस यांनी ३/२/१९३९ रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. आपल्याला गांधीजींबद्दल काय वाटते ते नेताजींनी या निवेदनाच्या शेवटी सांगितले आहे. ते असे आहे:
"महात्मा गांधी यांच्याबरोबर माझे काही प्रसंगी जरी मतभेद झाले असले तरीही त्यांच्याबद्दल आदरभावना असण्याच्या बाबत मी इतर कोणापेक्षाही कमी पडणार नाही. त्यांचा विश्वास मिळवणे हे माझे कायमच ध्येय आहे, आणि याचे साधे कारण हे आहे की मी जर इतर सर्वांचा विश्वास मिळवला आणि देशातील या महानतम व्यक्तिमत्वाचा विश्वास गमावला, तर त्यासारखी दुसरी शोकांतिका दुसरी कोणतीही नसेल.”
तोच प्रकार 'राष्ट्रपिता' या उपाधीचा आहे. नेताजी बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन केल्यानंतर आपल्या प्रचारासाठी 'आझाद हिंद रेडिओ' ची स्थापना केली होती. या रेडिओवरून २२ फेब्रुवारी १९४४ रोजी रंगून येथून भाषण करत असताना या उपाधीचा प्रथम उपयोग केला जेव्हा आपल्या लष्करी उठावाचा प्रयोग फसला आहे हे सुभाषबाबूंच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी आपल्या सैन्यातील सहकाऱ्यांना सूचना दिल्या की त्यांनी भारतात परत जावे आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या अहिंसक आंदोलनात सहभागी व्हावे. ही गोष्ट परत येऊन गांधीजींना सामील झालेल्या सैनिकांनी सांगितलेली आहे. यावरून गांधी-बोस संबंध कोणत्या प्रकारचे होते ते दिसून येईल.
दुसऱ्या बाजूने पाहिले तर बोस यांच्या सशस्त्र प्रतिकाराचा मार्ग, त्यांची नाझी- फॅसिस्ट यांची मदत घेण्याची भूमिका इत्यादी जरी काँग्रेसमधील कोणत्याही नेत्यांना मान्य नसली तरीही त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीबद्दल कोणालाही शंका नव्हती. शेवटी तर आपल्या या दीर्घकाळच्या सहकाऱ्याचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल तर सर्वांनाच मोठी हळहळ वाटत होती. २४ फेब्रुवारी १९४६ रोजी गांधीजींनी 'हरिजन' मध्ये एका लेखात म्हटले की नेताजी आणि त्यांची सेना यांनी धर्म-जात हे न पाहता, एकी, शिस्त आणि स्वतःचे समर्पण कसे करावे याचा धडा आपल्याला घालून दिला आहे. त्यांचे कौतुक आणि स्तुती किती करावी याची सीमाच असू शकत नाही."
संदर्भ: नेहरू-बोस-पटेल
लेखक: सुनील सांगळे
मनोविकास प्रकाशन






