Home > मॅक्स ब्लॉग्ज > लढवय्या सत्यशोधक लढला जातीय वादाशी, पण दुर्मिळ आजाराने घात केला

लढवय्या सत्यशोधक लढला जातीय वादाशी, पण दुर्मिळ आजाराने घात केला

सत्यशोधक चळवळीतील अमोल खरात याचे निधन झाले. त्यानंतर अजय कसबे यांनी व्यक्त केलेल्या भावना...

लढवय्या सत्यशोधक लढला जातीय वादाशी, पण दुर्मिळ आजाराने घात केला
X

निजला कसा शांत, तुझं बोलण्याचा लळा

घाई केलीस वेड्या, पोरका झाला मळा

गर्जना मुखी होती जय भीमची

चालताना हाती गड्या, झेंडा लाल निळा

बरे दिसत नाही अर्ध्यात सोडून जाणे

सोडून गेलास सारे, पोरका झाला मळा

-- तुषार पुष्पदीप सूर्यवंशी

सत्यशोधक अमोल खरात म्हणलं की, मार्क्स, फुले, आंबेडकर यांची घुसळण घालणारा सत्यशोधकी, चळवळीतला आणि महाराष्ट्रातल्या मातीतला रोहित विमुलाच म्हणावा. आम्ही पहिल्यांदा विद्यापीठात एका विद्यार्थी आंदोलना दरम्यान भेटलो. तेव्हा सत्यशोधक अमोल नुकताच चळवळीत सक्रिय झालेला होता तेव्हा आम्हा बारावीत शिकणाऱ्या पोरांनासुद्धा चळवळीचे आकर्षण होते. विद्यापीठात गेलं की अमोल दिसायचा. हातात डफ त्यावर असलेली थाप आणि गगनभेदी 'इन्कलाब जिंदाबाद' "जय जय जय जय भीम, जय फुले, सावित्री, भगतसिंग" 'जातिवाद मुर्दाबाद' ची आरोळी देताना.

आम्ही समता कला मंच म्हणून जेव्हा विद्यापीठ आंदोलनात सहभागी व्हायचो. तेव्हा अमोल ताकदीने आम्हाला कोरस द्यायचा म्हणायचा "तुम्हा बंडाचा इशारा देतो रे भाई सळसळत जय भीम च रगात हाय " आशा गाण्यांनी आकाश दुमदुमत असे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑडीटेरियम मध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाच्या निर्धार परिषदेत हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठात प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या रोहित वेमुला या क्रांतीकारी विद्यार्थ्याची आई राधिका अम्मा यांना अध्यक्ष म्हणून बोलावण्यात आलं होतं. प्रमुख वक्ते कोर्ट फिल्मचे अभिनेते आणि रिपब्लिकन पॅंथर जातीअंताची चळवळीचे सांस्कृतिक प्रमुख वीरा साथीदार हे होते. तेव्हा अमोलने राधिका अम्मा ची भेट घेतली असता राधिका अम्माना अमोल रोहित वेमला सारखा दिसला. राधिका माई ने त्याला आपल्या बाजूला घेतलं आणि स्वतः खात असलेला समोसा भरवला. तेव्हापासून अमोलचे सहकारी आम्ही अमोलला आमचा सत्यशोधकी रोहित म्हणून नावाजू लागलो. अमोल चळवळीचा रोहित वेमुला झाला होता.

सत्यशोधक विद्यार्थी आंदोलनाचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष असताना अमोल अनेक कार्यक्रम हाती घेतले होते. ज्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा म्हटलं तर सत्यशोधक विद्यार्थी आंदोलन आणि अमोलची नेहमीच भूमिका असायची की, 28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच 'खरा शिक्षक' दिवस आहे. न चुकता अमोल आणि सहकारी हा दिवस साजरा करायचे.

महाराष्ट्र शासनाच्या तेराशे सरकारी शाळा बंदी या निर्णयावर इंस्टाग्राम वर पोस्ट करत असताना अमोल लिहितो.

"धोक्याचं सरकार

खोक्यात धुंद

म्हणूनच मराठी

शाळा करतो बंद"

"गरिबांच्या शाळेवर आलाय खतरा

विद्यार्थी मित्रांनो रस्त्यावर उतरा"

असा एल्गार पुकारत अमोलने विद्यार्थ्यांना सरकारी शाळा बंदी निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा आवाज दिला आणि अशा गरिबाविरोधातील निर्णयाचा विरोध दर्शविला.

संवाद व वृत्तपत्र विद्या विभागाच्या संशोधक विद्यार्थी मार्गदर्शन उपलब्ध नसल्याच्या निषेधार्थ अमरण उपोषण केलं.

Barti साठी झालेल्या आंदोलनात सक्रिय.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती आंदोलनासाठी झालेल्या हल्लाबोल आंदोलनात हातात डफ घेऊन अग्रभागी अमोल असायचा.

तसेच बार्टी च्या 861 विद्यार्थी पात्र त्यांना सरसकट फेलोशिप शिष्यवृत्ती मिळावी यासाठी झालेल्या 52 दिवसाच्या आंदोलनात अमोल आघाडीवर होता.

आशा अनेकानेक आंदोलनाचा बिनीचा शिपाई अमोल होता.

अमोल मूळचा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील, सोहळा गावातला आहे. अमोल लहान असतानाच अमोल ची आई त्यांच्या कुटुंबियाना सोडून गेल्या. तो गावातला सुशिक्षित पीएचडी धारक विद्यार्थी. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला फुले शाहू आंबेडकरी संस्कार घरातूनच असल्याने अमोल स्वतः आंबेडकरवादी होता. नंतर एमए साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे शिक्षणासाठी आल्याने तो सत्यशोधक चळवळीत सक्रिय झाला. तो तेथेच थांबला नाही तर त्याने फुले आंबेडकर पासून भगतसिंग मार्क्स गॉर्की लेनिन पर्यंतचा प्रवास सुरू केला.

या सत्यशोधक मित्राला अखेरचा जयभीम करताना मन व्यथित होतंय, सकाळी झोपेतून उठून कोणाची तरी व्हॉट्स ॲप स्टोरी पाहावी आणि अमोलच्या निधनाची वार्ता कळावी हे धक्कादायक होतं. महाराष्ट्र भरातून तुला तुझे साथीदार सहानुभूतीदार लागेल ती मदत करत होते. त्यांची तळमळ पाहून वाटत होत की, तू लवकरच बरा होशील पुन्हा रणांगणात उतरशिल आणी म्हणशील 'जातीवाद मुर्दाबाद फुले आंबेडकर जिंदाबाद' कारण तुझ्यासमोर जातीवादी भांडवली पहाड, आजार उभा असताना तू त्याच्याशी झुंजलास, लढलास हार मानली नाही. तू न्युरो ऑटोयुमुन समोर हार मानशील वाटलच नव्हतं. थोडा लढायचं होतास सत्यशोधक अमोल तू जिंकून आला असता पण साला प्रकृतीच्या पुढे कोण मोठा आहे. ना तू ना मी आपल्या सगळ्यांनाच जायचं आहे. अस तुझं सोडून जान चळवळीची खूप मोठी हानी आहे दोस्त ही पोकळी भरून नाही निघणार. सत्यशोधक तुला अखेरचा जय भीम...

लेखक : अजय कसबे

Updated : 21 Sep 2023 8:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top