Home > मॅक्स ब्लॉग्ज > किल्लारीच्या भूकंपाची कहाणी...

किल्लारीच्या भूकंपाची कहाणी...

किल्लारीच्या भूकंपाची कहाणी...
X

मी जेमतेम सात आठ वर्षांचा असेन तेंव्हा जेंव्हा भूकंप झाला, माझं गाव आणि किल्लारी एकाच जिल्ह्यात असलं तरी जवळपास शंभर किलोमीटरचा अंतर होता. किल्लारी जिल्ह्याच्या त्या टोकाला आणि माझं या टोकाला, मध्यरात्र उलटून गेलेली ढाराढुर झोप लागलेली... पण अचानक घराच्या भिंती दाराच्या कड्या पत्रे घरात लावलेला लाईटचा बल्ब सगळं जोरात हलायला लागलं, हे हलणं इतकं जोरात होतं की आता सगळं घर आपल्या अंगावर पडतं की काय असं होऊन गेलं ताडकन डोळे उघडले उघडून बघतो तर काय बाप उठून दाराला थांबलेला आई घाबरून बसलेली. सगळ्याची पोझिशन अशी की बाहेरून कुणी तरी हल्ला करतंय म्हणून दार अतुन घट्ट दाबून धरलेलं हा भूकंप आहे आणि दार काढून तातडीने बाहेर पळून जायचं असतं अशी भूकंपाबाबतची जागरूकताच नव्हती. झोपेतून उठल्यानंतर सुद्धा काही सेकंद ही धडधड सुरूच होती. धडधड थांबली आणि पुन्हा घाबरून गोधडीत तोंड खुपसून पडलो, थोडा वेळ गेला असेल नसेल तोच बाहेरून लोकांच्या बोलण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून धाडस करून सगळेच घराबाहेर पडले. आणि तेंव्हा काही जुनाट हुशार माणसांकडून कळलं की हा भूकंप होता. जीर्ण झालेल्या म्हाताऱ्या त्यांच्या कधीच्या तरी जुनाट धूसर झालेल्या आठवणी सांगू लागल्या भूकंपाच्या सगळ्यांच्या बोलण्यात एकच शक्यता येत होती. की इतकं हदरलंय तेंव्हा कुठेतरी विध्वंस नक्कीच झाला असणार... माझे आजोबा तेंव्हा शेतात झोपायला जात असत तिकडं काय झालंय की या भीतीने झुंजूरक्याच आम्ही शेताकडे निघालो वाटेने शेतात जागलीला गेलेले अनेक माणसं घराकडे येत होते तेही धास्तीने... आम्ही शेतात पोचलो तेंव्हा आजोबा सावध बसले होते. आम्ही त्यांना दादा म्हणत असू, त्यांना जेंव्हा विचारलं तुम्हाला काही लागलं तर नाही ना.. तेंव्हा ते म्हणाले नाही लागलं काही, आणि त्यांनीच तेंव्हा सांगितले की हे असे तीन भूकंप पाहिलेत मी, 1967 सालातला असाच कुठलातरी एक भूकंप त्यांनी पाहिलेला. पण त्यांचंही हेच म्हणणं पडलं की यावेळी कुठेतरी लैच मोठा नास झाला असणार, इतकी तीव्रता होती त्या भूकंपात किल्लारीच्या भूकंपाची माझ्या ध्यानात असलेली ही लहानपणातली मी अनुभवलेली आठवण पण एव्हाना किलारीत काय झालंय काहीच माहिती नव्हतं तिकडे हजारो माणसं गाढली गेलीत याचीही कल्पना नव्हती..!

सकाळी एसटी गावात यायची तेंव्हाच काय ती गावाला जगाची माहिती होती. सकाळी आठ वाजता बस गावात अली आणि गावभर वार्ता गेली की, किल्लारीत मोठा भूकंप झालाय आणि गावच्या गाव जमिनीत गाढली गेलीत... दिवसभर गावात अफवांचा पेव फुटला होता. कुणी म्हणायचं जमीन फाटली कुणी म्हणायचं आभाळ फाटलं पण खरंकाय ते कळत नव्हतं... पण धास्तीने त्या दिवशी घरात पिठाचा डब्बा आणायला जायला सुद्धा माणसं घाबरत होती इतकी दहशत, त्या दिवशी सगळं गाव अंगणात झोपून होतं... दुसऱ्या दिवशी जेंव्हा कुणीतरी गावात पेपर आणला तेंव्हा थोडाफार कळलं की भूकंप काय असतो ते किल्लारीपासून शंभर किलोमीटर अंतरावर असून सुद्धा तिथं नेमकं काय झालंय हे कळायला दुसरा दिवस उजाडला होता. पेपरात छापून आलेले हजारो लोकांचे मुडदे, पडलेली घरं, धायमोकलून रडणाऱ्या बाया असं असंख्य फोटो पान पानभर छापून चालले असत इतकी भयावह परिस्थिती होती. हे फोटो पाहून गावातल्या सगळ्याच लोकांच्या काळजाचं पाणी झालं. आणि त्या दिवशी रात्री सगळ्यांनीच आपल्या घरासमोर अंगणात झोपण्यासाठी खोपी उभ्या केल्या... चवाळे टाकलेल्या..! पुढे कित्येक तरी महिने लोक याच खोपीत झोपत होते. का कोण जाणे त्यावर्षी रुसलेला पाऊस या भूकंपानंतर अचानक कोसळू लागला... आणि लोकांची त्रेधातिरपीट सुरू झाली गावातले अनेक लोक मदतकार्यासाठी म्हणून किल्लारीला गेले, कुठल्या कुठल्या संस्था संघटना त्यावेळी गावात येत होत्या लोकांना विनवणी करायला मदत कार्यात न्ह्यायला... गावातली बरीच माणसं गेली सुद्धा पण ती आठ दहा दिवसात परतली कारण तिकडे भूकंपात गाढले गेलेले मुडदे आता पावसामुळे सडू लागलेत त्यामुळे महामारी सुरू झालीय... महामारी म्हणजे हगवण लागून माणसं मरत... महामारीच्या भीतीने परतलेली माणसं मग किल्लारीतल्या गोष्टी सांगत... आठ आठ दिवसानंतर कशी घरातून माणसं जिवंत निघत होती, मिल्ट्री कशी काम करतेय, दवाखाने कशी माणसांनी भरून गेलेत वगैरे वगैरे आणि यात आणखी गोष्ट सांगितली जायची ती ही की मुडद्याच्या अंगावरचं सोन लोक कसं ओरबाडून घेतायत ते... आशा अनेक घटना गोष्टी ऐकायला मिळत होत्या..! किल्लारी आणि भूकंप त्रोटक कसाबसा समजत होता. हळूहळू काळ उलटत किलारीच्या गोष्टी कमी होत गेल्या आणि भूकंपाच्या सहा महिन्यानंतर बहुदा लोक घरात राहायला जाऊ लागले... थोडी नीरवा निरव झाली... पण किल्लारीच्या भूकंपाने मनात घर केलं ते कायमचं..!

याच उत्सुकतेपोटी पुढे पत्रकारितेत आल्यानंतर 2013 साली किल्लारी भूकंपला 21 वर्ष पूर्ण होत असताना, मी मराठी कडून त्यावेळचे संपादक रवी आंबेकर सर यांच्या सांगण्यावरून 20 वर्षानंतरची किल्लारी हा रिपोर्ट करण्यासाठी मी किल्लारीत दाखल झालो. आणि त्यावेळेला पहिल्यांदा किल्लारी कशी आहे, हे पाहायला आलो... किल्लारी आणि परिसरात फिरताना एका बाजूला नव्याने बांधलेली अरसीसीची दणकट घरं दिसत होती.. तर दुसऱ्याबाजूला 20 वर्षांपूर्वी उध्वस्त झालेली परिसरातली नांदती खेळती घर जमीनदोस्त झालेली दिसत होती. कुठे दगडी भिंतीवर गवत वापलेलं, घरावर पिंपळाची मोठी झाडं वाढलेली दिसत होती. तर कुठे उध्वस्त झालेल्या अख्या गावावर काटेरी बन तयार झालेलं दिसतं... आजही रात्री अपरात्री या भागाकडं कुणीच फिरकत नाही... कारण रात्री इथं भुतं फिरतात अशी लोकांची धारणा झालीय... कधी अजूनही रात्री अपरात्री धन शोधण्याच्या हेतूने मांत्रिक तांत्रिक लोक गड्डे खोदतात त्याच्या खुणाही इथे फिरताना दिसतात मघेच कधीतरी धन शोधण्याच्या लालसेने इथे एका लहान मुलाचा नरबळी देण्याचाही प्रयत्न झाला होता तेही प्रकरण खूप गाजलं..! आज किल्लारीत एक अशी पिढी तरुण झालीय की ज्यांनी भूकंप काय असतो तो पाहिलेलाच नाही फक्त त्यांनी ऐकल्यात त्या कहाण्या भूकंपात त्यांच्याच घरातलं कुणीतरी म्हणजे आजी, आजोबा, मोठा चुलता, लग्नाला आलेली कोणती तरी आत्या वगैरे असंच काहीतरी... पण ज्या लोकांनी हा भूकंप पाहिलाय ती लोक आजही बंद डोळ्यांनी घरात झोपू शकत नाहीत... आणि त्यांना भूकंपबद्दल विचारायला लागलं तर ते हळवे होतात, आवाज कातर होतो, रडतातातही पण त्यांच्या डोळ्यातून पाणीच येत नाही कारण ते इतक्यांदा रडलेत की पाणी कुठवर ढाळतील..?

किल्लारी जेंव्हा उध्वस्त झाली तेव्हा किल्लारी आणि परिसरात हजारो मुलं अशी होती की जी अनाथ झाली होती. आणि त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी तात्काळ त्यांना या परिसरातून लांब नेणं गरजेचं होतं आणि त्यांचं शैक्षणिक पुनर्वसन करणं महत्वाचं होतं... हेच काम भारतीय जैन संघटनेच्या शांतीलाल मुथा यांनी उचललं आणि भूकंप झाल्याच्या एक महिन्याच्या आत त्यांनी किल्लारीतली तब्बल बाराशे मुलं शिक्षणासाठी पुण्याला वाघोलीत आणली आणि त्यांचं पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण होईपर्यंत ठेवली शिकवली सुद्धा..! आज 39 वर्षांचा असलेला अमर बिराजदार हा मुलगा सुद्धा त्यातलाच एक..! जो आज भूकंपग्रस्त कृती समितीचा अध्यक्ष आहे आणि भूकंप ग्रस्तांच्या प्रशांवर जोरदार काम करतोय..! प्रकृतीने शांत आणि कमालीचा प्रामाणिक असलेले अमर बिराजदार सांगत होते की, "भूकंप झाला तेंव्हा फक्त 14 वर्षांचे होते... मी जेंव्हा त्यांना कसा झाला होता भूकंप असं विचारलं तेंव्हा अमर बिराजदार सांगू लागले की, "भूकंप झाला तेंव्हा मी 14 वर्षांचा होतो किल्लारीपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं मंगरूळ हे माझं गाव, पण त्या रात्री मी माझ्या मामाच्या गावी माडजला गेलो होतो. तिथे आम्ही वाड्यात मोकळ्या जागेत झोपलो होतो रात्री भुकंप झाला तेंव्हा आम्ही दचकून उठलो होतो माडजलाही भूकंप झाला होता घरं पडली होती पण तेवढं नुकसान झालं नव्हतं नंतर उशिराने बातमी आली की किल्लारी आणि मंगरुळला मोठा भूकंप झालाय आणि सगळी घरं पडली आहेत. सकाळी खूप लवकर आमच्या मामांनी बैलगाडी जुंपली आणि साडेआठ पर्यंत आम्ही मंगरुळला पोचलो. गावात पोचलो तर गाव कुठे आहे कसं आहे काहीच कळत नव्हतं सगळं भुईसपाट झालं होतं. आम्ही कसंतरी आमचं घर शोधून काढलो घरात आई वडील आणि आज्जी अडकली होती. आम्ही कितीतरी वेळ घराच्या ढिगाऱ्याहून फिरत होतो आम्हाला काहीच कळत नव्हतं... टिकाव फावड असं काहीच सोबत नव्हतं घर दगड माती आणि माळवदाचं होतं. माळवद भुईसपाट झालं होतं त्यामुळे घरातले लोक जगण्याची काहीच शक्यता नव्हती. शेवटी आम्ही उंचवट्याच्या जागेवरून दगड माती बाजूला करायला सुरुवात केली थोडा अंतर खोदला असेल नसेल तोच आतून आई आणि वडिलांचं जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला मग आम्ही सगळ्या आवाजाच्या दिशेने माती उपसली तर मध्ये आई वडील आणि आज्जी जखमी अवस्थेत पडलेले होते. घराचं माळवद भिंतीवर तिरपं कोसळलं होतं त्यामुळे आई वडील आणि आज्जी वाचली होती त्यानंतर अंबेजोगाईच्या दवाखान्यात तब्बल दोन महिने आई आणि वडिलांवर उपचार सुरू होते. त्यावेळी माझ्या अडीच हजार लोकसंख्येच्या गावात तब्बल 750 लोक मृत्युमुखी पडले होते. त्यातले 12 कुटुंब असे होते की त्यांच्या घरात नाव सांगायला सुद्धा कुणी शिल्लक राहिलेलं नाही. माझ्याच गावात मृतदेहाच्या आशा रांगाच रांग लागलेल्या पहिल्या आहेत. आजही ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो."

30 सप्टेंबर 1993 रोजी मध्यरात्री झालेल्या भूकंपात अनेक नांदती गावेच्या गावे जमिनीखाली गाढली गेली कित्येक स्वप्न डोक्यात घेऊन जगणारी माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढली गेली होती. या भूकंपात तब्बल 7 हजार 928 लोक मृत्युमुखी पडले होते. काही घरात तर दिवा लावण्यास माणूसही शिल्लक राहिला नव्हता. या भूकंपाचे केंद्र हे किल्लारीजवळ एकोंडी या गावात होते. भूकंपानंतर एकोंडी गावाजवळ असलेल्या नदीत एक मोठी भेग पडली होती ती भेग नंतर कितीतरी दिवस पाहायला मिळत होती. पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटांनी झालेल्या या भूकंपात लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातल्या उमरगा आणि औसा या दोन तालुक्यातील तब्बल 52 गावांना विनाशकारी फटका बसला होता. या भूकंपात जितकी माणसं मेली होती त्याच्या दुप्पट म्हणजे 15854 इतक्या मोठ्या संख्येने जनावरांचा बळी गेला होता. रिस्टर स्केलवर 6.04 इतकी तीव्रता मोजल्या गेलेल्या या भूकंपात तब्बल 30 हजार घर जमीनदोस्त झाली होती तर 13 जिल्ह्यातल्या तब्बल 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले होते.

या भूकंपातून किल्लारी आता सावरली आहे. डोंगराएवढं दुःख आता लोकांनी माघे टाकलंय आणि जगण्याचा दैनंदिन राहाटगाढा पुढे जातो आहे. पण अमर बिराजदार यांना मात्र एक भिती सातत्याने दाटून येते आहे. ती म्हणजे हा विनाशकारी भुकंप पुन्हा आला तर... त्यासाठी तयार असायला पाहिजे पण आज किल्लारी आणि परिसरात शासनासोबत माणसं सुद्धा इतके बेफिकीर झालेत की पुन्हा असा भुकंप आला तर पुन्हा विनाश होणं शक्य आहे. शेवटी अमर बिराजदार सांगत होते की "आजही मी घरात झोपत नाही, बाहेर अंगणात झोपतो, रात्री जमिनीवर पाठ टेकली तरी मोठ्या मुश्किलीने डोळे लागतात" भुकंप इतका दहशत करून आहे या भागातल्या माणसांच्या मनात... लोकांनी जागं राहायला हवं इतकंच..!

दत्ता कानवटे, औरंगाबाद

9975306001

Updated : 29 Sept 2018 5:02 PM IST
Next Story
Share it
Top