Home > मॅक्स ब्लॉग्ज > Stock Market Volatility : नवीन वर्ष भारतातील शेअर मार्केटसाठी अनेक वाईट बातम्यांचा काळ

Stock Market Volatility : नवीन वर्ष भारतातील शेअर मार्केटसाठी अनेक वाईट बातम्यांचा काळ

नवीन वर्षापासून सुरू होणारा काळ जगभराच्या आणि भारतातील शेअर मार्केटसाठी अनेक वाईट्ट बातम्या घेऊन येऊ शकतो. - संजीव चांदोरकर

Stock Market Volatility : नवीन वर्ष भारतातील शेअर मार्केटसाठी अनेक वाईट बातम्यांचा काळ
X

१ जानेवारी २०२५ रोजी तुम्ही Mumbai Stock Market मुंबई स्टॉक मार्केट वर लिस्टेट शेअर्समध्ये काही पैसे गुंतवले आहेत असे समजा. तुमच्या दुसऱ्या मित्राने तेव्हढेच पैसे State Bank of India स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वर्षाच्या मुदत ठेवींमध्ये ठेवले आहेत असे समजा.

तुमचे नाव ससा आहे आणि त्याचे कासव असे समजा. तर २६ डिसेंबर २०२५ पर्यंत सशाला त्याच्या गुंतवणुकीवर जास्त पैसे मिळाले असतील का कासवाला? ८० टक्के शक्यता आहे, कासवाला जास्त पैसे मिळाले असतील…. नाही विश्वास बसत?

अनेक दशके, बहुसंख्य मध्यमवर्गीय कुटुंबे आपल्या बचती सार्वजनिक बँकांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवत असत. एखादा टक्का व्याज कमी मिळाले तरी या बँकांची मालकी सरकारी असल्यामुळे आपले मुद्दल कधीच बुडणार नाहीत असा विश्वास त्यामागे होता.

गेली वीस वर्षे देशातील भांडवली बाजाराने मध्यमवर्गीयांना “पटवले”. मराठीत जे “पटवणे” म्हणतात तेच. बँकांमध्ये बचती गुंतवणे म्हणजे बावळटपणाचे लक्षण. स्मार्ट बना. स्मार्ट गुंतवणूकदार बनणे म्हणजे आपल्या बचती शेअरमध्ये गुंतवणे. त्यात जोखीम असते. पण त्यातून आकर्षक परतावा/ रिटर्न देखील मिळतो ना? बावळट लोक घरात गोधडी पांघरून बसतात तर स्मार्ट लोक बाहेर पडून काहीतरी धाडसी करतात. स्मार्ट फोन वापरणारे स्मार्ट गुंतवणूकदार बना.

म्हणता म्हणता देशात २० कोटी डिमॅट अकाउंट उघडले गेले. त्यात अर्थात “पहिल्यांदा” वाल्यांचा भरणा आहे. कंपन्यांच्या आयपीओ मध्ये, म्युच्युअल फंडात किंवा डायरेक्ट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ लागली. तीन दिवसांनी संपणाऱ्या २०२५ च्या वित्तीय वर्षात तर रिटेल गुंतवणूकदार जत्रेत सामील व्हावे तसे सामील झाले आहेत. त्यांच्याकडे मोदी सरकारच्या कृपेमुळे अतिरिक पैसे आले म्हणून नव्हे. तर बँकांमध्ये आपल्या बचती न ठेवता त्या बचती त्यांनी शेअर्स मध्ये गुंतवल्या म्हणून. याचे प्रतिबिंब आकडेवारीत पडले.

वित्त वर्ष २०२४ मध्ये देशातील कुटुंबांनी बँकांमध्ये १४ लाख कोटी रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या त्या २०२५ मध्ये १२ लाख कोटींवर आल्या. त्याच काळात कुटुंबाच्या शेअर्स मधील गुंतवणुकी २९,००० कोटींवरून ७४,००० कोटींवर पोचल्या. (स्त्रोत रिझर्व बँक)

फाईन. त्यांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करतांना जास्तीची जोखीम घेतली कारण त्यांना असे सांगितले गेले की बँकांमधील मुदत ठेवीमध्ये तुम्हाला जेवढे व्याज मिळेल त्याहीपेक्षा जास्त नफा/ परतावा तुम्हाला शेअर्स गुंतवणुक करून मिळेल

वस्तुस्थिती काय आहे ?

जानेवारी २०२५ पासून २६ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या काळातील परताव्याची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यावरून असे दिसते की या काळात…मुंबई शेयर बाजारात अंदाजे ३, ५०० कंपन्यांच्या शेअर्सची सक्रियपणे खरेदी-विक्री झाली.

त्यातील फक्त २० टक्के शेअर्स मध्ये स्टेट बँकेच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या ६.२५ टक्के व्याजदरापेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. उरलेल्या ८० टक्के कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यावर मिळणारा परतावा ६.२५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

शेअर्समध्ये गुंतवणूक करून मुदत ठेवींवरील व्याजापेक्षा नफा मिळाला पण तो ट्रेड झालेल्या फक्त २० टक्के कंपन्यांच्या शेअर्स मधून.

दुसऱ्या शब्दात जास्तीचा नफा कमावण्यासाठी कोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे याचे ज्ञान गुंतवणूकदारांना हवे. वित्तीय साक्षरता नसेल तर आपला बँकांमधील मुदत ठेवींचा गाव बरा !

शेयर मार्केटमध्ये नव्याने सामील झालेल्या माझ्या मित्रांनो. ते तुम्हाला झाडावर चढवतात हे उघड आहे. चढायचे की नाही हा निर्णय फक्त आणि फक्त स्वतःचाच असेल हे बघा. उचकवले जाऊ नका. स्वतःची जोखीम क्षमता, मराठीत अवकात स्वतः जोखा.

नवीन वर्षापासून सुरू होणारा काळ जगभराच्या आणि भारतातील शेअर मार्केटसाठी अनेक वाईट्ट बातम्या घेऊन येऊ शकतो.

संजीव चांदोरकर

अर्थतज्ज्ञ

(सर्व आकडेवारी बिझिनेस लाईन डिसेंबर २८, २०२५; पान क्रमांक एक)

Updated : 29 Dec 2025 8:26 AM IST
Next Story
Share it
Top