Home > मॅक्स ब्लॉग्ज > जलनियोजनाचा अभाव आणि कष्टकऱ्यांची फरपट

जलनियोजनाचा अभाव आणि कष्टकऱ्यांची फरपट

आतापर्यंत २० वेळा पाण्याखाली गेलेल्या सीना नदीच्या काठावरील शिवणी गाव... नुकत्याच आलेल्या महापूरात या गावात नेमकं काय झालं? दीड महिना उलटल्यानंतर तेथील सद्यस्थिती काय? सांगताहेत सामाजिक कार्यकर्त्या सिरत सातपुते...

जलनियोजनाचा अभाव आणि कष्टकऱ्यांची फरपट
X

सोलापूर जिल्ह्यात आलेला महापूर चुकीच्या जलनियोजनाचा व छद्म विकासाचा परिणाम आहे यात तिळमात्र शंका नाही. solapur सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी हे गाव तसे आतापर्यंत 20 एक वेळा पाण्याखाली गेलेले. पण यंदाच्या महापुरात flood सोलापुरातील रेल्वे तब्बल 30 तास बंद होती. ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने सीना नदी नेहमीपेक्षा जास्तच फुगली. सीना आणि उजनीचे पाणी शेवटच्या क्षणी सोडल्याने नदीपात्र दुप्पट झालं आणि उत्तर सोलापूर मधील गावांत पाणी शिरलं. विकासाच्या नावावर जलद वाहतुकीसाठी बांधलेल्या फ्लायओव्हर्स मुळे पाणी अडलं आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी सारखी गावं पाण्याखाली गेली. शेतातलं उभं पीक आडवं झालं. पाण्याची पातळी वाढणे नेहमीचेच असल्याने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आणि स्थलांतर केले. नेहमीच्या पुररेषेच्या पुढे पाणी जाणार नाही या अतिआत्मविश्वासामुळे अनेकांचे सामान सुमान, बकऱ्या कोंबड्या वाहून गेले. दहा दिवस गाव पाण्याखाली होते.



गावातील वीजपुरवठा पूर्ववत व्हायला वेळ लागतो दिसल्यावर मानवलोक संस्थेच्या वतीने गावातील रस्त्यांवर तसेच शाळेत सोलार लॅम्प्स लावण्यात आले असे संस्थेचे CEO बाळकृष्ण यांनी सांगितले. गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता शाळेतील वर्ग सुरू झालेले दिसले. मुलांनी नवी कोरी पुस्तके व शैक्षणिक साहित्य मिळालेले दाखवले. मुलांना शालेय साहित्य आले आहे, खिचडीसाठी धान्य आलं आहे. पण बाकं, कपाटं, शाळेच्या दप्तराचे नुकसान झालंय. त्यासाठी शाळेला काहीच सरकारी मदत अद्याप आलेली नाही. वीस दिवस शाळा बंद होती, शाळा दोन दिवस मारुती मंदिरात भरली, शाळेतील ताईंनी घरून खिचडी बनवून आम्हाला आणून दिली, मुलं म्हणाली. अभ्यास दौऱ्यातील ज्येष्ठ साथी डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांनी मुलांबरोबर "लाल टांगेवाला" गाणं म्हटलं आणि महापुराच्या पाण्यात हरवलेलं बालपण पुन्हा एकदा मिळवून देण्याचा छोटासा प्रयत्न केला.




खरीपाचे पीक तर पाण्याखाली गेले, रब्बीसाठी ठेवलेली बियाणंही वाहून गेली. तसेच नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतातील मातीही वाहून गेल्याने रब्बीचे पीक घेणे मुश्किल झालय. चारा टंचाई तर आहेच त्यामुळे जनावरे विकून टाकण्याकडे कल दिसला. एकंदरीत गाव सावरताना दिसलं. मानवलोक सारख्या संस्थेने गावात केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून आला. ही मानव निर्मित आपत्ती टाळता आली असती तर संस्थात्मक कामाची ऊर्जा आपत्ती निवारणा ऐवजी गावाच्या प्रगतीसाठी निश्चितच वापरता आली असती.




शिवणी गावात जाताना रस्त्यावरच पाथरी गावातील घर लागलं. गंगाबाई भीमाशंकर बंडगर यांच्या या घराच्या छतावरून पाणी गेलेलं.




सहा एकर जमिनीत लावलेल्या कांद्याचे नुकसान भरपाई म्हणून दहा हजार रुपये आलेले. या पैशात कसे काय करायचे या विवंचनेत असलेले भीमाशंकर बंडगर आणि घर संसार सांभाळताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या शेळीचे चार दिवसाचे करडू मायेने सांभाळणाऱ्या गंगाबाई. गंगाबाईंच्या दारातील सिमेंटची पाणी साठवायची भरलेली टाकी पाण्याच्या प्रवाहाने दुसऱ्या टोकाला गेली तर शेळी वाहून गेली तर काय नवल!




गावातील अशा कित्येकांच्या शेळ्या, कालवडी प्रवाहाबरोबर वाहून नदीला मिळाल्या. रेशन किट आणि दिवाळीचा फराळ मिळाल्याने महापुरातही आम्ही दिवाळी केली हे पाणावलेल्या डोळ्यांनी सांगणाऱ्या गंगाबाई तुमच्या सारख्यांच्या सोबतीने हे ही दिवस जातील अशा निर्धाराने परत कामाला लागलेल्या! अभ्यासदौऱ्यात अशी अनेक घरं आणि माणसं भेटली. या साध्या भोळ्या कष्टकरी माणसांच्या जीवनाशी खेळायचा अधिकार कोणालाही नाही हे ठणकावून सांगायलाच हवं.

सिरत सातपुते

सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका

(मराठावाड्यातील पूरग्रस्त भागातील अभ्यास दौऱ्यावर सामाजिक कार्यकर्त्या सिरत सातपुते सध्या आहेत. तेथील त्यांचा अनुभव त्या आपल्या लिखाणातून सांगताहेत.)

Updated : 15 Nov 2025 6:00 AM IST
Next Story
Share it
Top