Home > मॅक्स ब्लॉग्ज > सुधारक महात्मा फुले ते उद्योजक महात्मा फुले

सुधारक महात्मा फुले ते उद्योजक महात्मा फुले

बहूजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीचे दारं उघडी करून देणारे सुधारक महात्मा फुले ते बांधकाम व्यावसायिक म्हणून नावाजलेले उद्योजक महात्मा फुले यांच्या कार्याचा वेध घेणारा आनंद शितोळे यांचा लेख महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमीत्त पुनःप्रसारित करीत आहोत.

सुधारक महात्मा फुले ते उद्योजक महात्मा फुले
X

बहुजन समाजाला शिक्षण हाच तगून राहण्याचा ,प्रगती करण्याचा एकमेव मार्ग आहे आणि ते शिक्षण सुद्धा आधुनिक हवं हे नेमकं समजलेला आधुनिक भारतातला पहिला द्रष्टा माणूस म्हणजे ज्योतिराव फुले.

बहुजनांच्या घराचा उद्धार करायला घरची स्त्री शिकली पाहिजे हा क्रांतिकारक विचार मनात येणारा हाच पहिला द्रष्टा आणि काळाच्या पुढे शेकडो मैल पाहणारा तुमच्या आमच्यातला माणूस.

ज्या काळात ज्योतिबा फुले कार्यरत होते त्या काळात शिकलेल्या लोकांनी किंवा व्यवसाय करून पैसे मिळवणाऱ्या माणसांनी सरकारी नोकरी किंवा सरकारी मर्जी सांभाळून आपल घर भरून हवेल्या उभारून पदव्या मिळवणे हीच आयुष्याची कमाई समजली जायची.

इंग्रजांची चाकरी करणे यातच जगण्याची इतिकर्तव्यता मानणारा काळ.

त्यावेळी पदर पैसे खर्च करून, पत्नीला शिकवून ,मुलींची शाळा सुरु करून ,त्यासाठी आपल्याच समाजाच्या लोकांचे शिव्याशाप घेऊन काम चालू ठेवणे ह्याला प्रचंड धाडस आणि झोकून देण्याची वृत्ती लागते.

मुळात आपल्या समाजात अशी काही सुधारणा करायची गरज आहे हे समजणे आणि समजल्यावर त्यावर कृती करायला सुरुवात करणे आणि सुरुवात केल्यावर ते काम सातत्याने चालू ठेवणे हेच अतिशय दुर्मिळ आहे.

अगदी मोजकी माणस नवा विचार जन्माला घालतात आणि हाताच्या बोटावर मोजावीत अशी माणस फक्त असा नवा विचार प्रत्यक्ष कृतीत आणतात.

बर हे करताना ,बहुजन समाजाला दिशा देताना नुसती तोंड पाटीलकी न करता राज्यात अनेक ठिकाणी बांधकाम व्यवसायिक म्हणून दर्जेदार काम करून त्यांनी संपत्ती कशी निर्माण करावी याचेही धडे लोकांना कृतीतून दिलेले. मिळालेली संपत्ती महाल, वाडे बांधण्यात खर्च न करता पुन्हा त्याच समाजाच्या कारणी लावली.

चाकोरी सोडून विचार करण्याची माणसाची प्रवृत्ती जोवर जिवंत राहते तोवर त्याला प्रेरणा देणाऱ्या माणसांच्या आठवणी जगात राहतात.

ज्योतिबा फुलेंची जयंती लोक साजरे करू देत किंवा हारतुरे भाषण ठोकून उपचार पूर्ण करू देत , माझ्यासाठी ह्या पणजोबाचा वाढदिवस आहे , कारण जयंती मेलेल्या माणसांची असतेय आणि वाढदिवस जिवंत माणसांचा असतोय.

पणजोबा अजूनही जिवंत आहे. आपल्या धडावर आपलच डोकं ठेवून आपल्या विचारांनी चालणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात पणजोबा जिवंत आहे.

त्यांना पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन आणि काळाचे काटे उलटे फिरवून पुन्हा भारतीय स्त्रियांना कर्मकांडात अडकवू पाहणाऱ्या बहुजन समाजाला आजच्या दिवशी पुन्हा नव्याने मार्ग सापडायला आणि शोधायला शुभेच्छा !!


Updated : 28 Nov 2022 2:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top