Home > मॅक्स ब्लॉग्ज > वंचितांचे वर्तमान

वंचितांचे वर्तमान

वंचितांसाठी समाजसुधारणेचा बुरखा घालून टेंभा मिरवणारे विचारवंत, लेखक का दिशाहीन झाले आहेत? वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेते वंचितांना न्याय का मिळवून देऊ शकत नाहीत? कोण करतंय वंचितांच्या भोवती अज्ञानतेचा पगडा? वाचा सुधाकर सोनावणे यांचा मेंदुला शॉर्ट देणारा हा विचार...

वंचितांचे वर्तमान
X

'प्रामाणिक विचारवंताशिवाय परिवर्तन किंवा क्रांती राज्यव्यापी होत नसते. उपाशी माणूसच परिवर्तन किंवा क्रांती करत असतो. क्रांतीच्या प्रक्रियेत राजकीय क्रांती आणि सामाजिक परिवर्तन किंवा क्रांती अंतर्भूत असते.'

विसाव्या शतकाच्या ऐन मध्यानी भारतीय स्वातंत्र्याच्या परिवर्तन किंवा क्रांती प्रक्रियेत लढा उभारणाऱ्या थोर महापुरूष आणि क्रांतीकारक यांच्या डोक्यात राजकीय क्रांती अधिक प्रबळ होती. सामाजिक क्रांतीकडे तसे दुर्लक्ष झाले. त्याचे कारण आपली सांस्कृतिक, धार्मिक, दैवीक तटबंदीची सामाजिक घडी. भारताला स्वातंत्र्य हवेच होते पण त्या स्वातंत्र्यात सामाजिक समतेचा आग्रह फार कोणी धरला नाही. सामाजिक समतेची ती एक मोठी संधी आपण गमावून बसलो.

स्वातंत्र्यानंतर घटनाकारांनी भारतीय संविधानात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा मुलभूत हक्कात अंतर्भाव केला. पण आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, दैवीक समरसतेमध्ये सामाजिक न्यायाला वंचितच रहावे लागले. त्याचा मोठा इतिहास आणि अनुभवही आपणास आहे. वंचितांचा सामाजिक न्यायाचा प्रश्‍न व्यवस्थेने विवाद्य ठेवल्यामुळे मुक्या समाजाला वाचा कोण फोडणार? हाच खरा प्रश्‍न होता. यामुळेच घटनाकारांनी 'मूकनायक' पाक्षिक काढून मुक्या समुहांचा आवाज बुलंद केला. वंचित समुहाला न्याय देण्यासाठी घटनाकारांनी घटनेमध्ये अनेक उपाययोजना सुचवून तशा तरतुदीही करून ठेवल्या.

वंचितांच्या वस्तुनिष्ठ समस्येकडे व्यवस्थेने गांभिर्याने घेणे अभिप्रेत होते पण तसे झाले नाही. याच्या तपशिलातून समजते की, माणसाच्या वर्तनातून आणि अंतमनातून समाज जीवनात सामाजिक समता प्रस्तापित झालीच नाही. मग प्रश्‍न निर्माण होतो हा की, भारत देशाला स्वातंत्र्य मिळाला पण वंचिताच्या सामाजिक स्वातंत्र्याचे काय? समाजसनातनीत व्यवस्थेमध्ये दडपलेला हा वंचित वर्ग आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. न्यायाच्या भूमिकेतून देशाचे आत्मपरिक्षण केल्यास हाती धुपाटनेच लागते. वंचित समुहाच्या स्वातंत्र्यासाठी प्रामाणिक विचारवंत पुढे येतांना किंवा काही निर्णय, भूमिका घेवून सल्ले देतांना दिसत नाहीत. घटनाकारांनी एक सल्ला दिला होता की, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करणार नाही. आज स्थितीत वंचितांमध्ये मोठ-मोठे गबाळग्रंथी विचारवंतांचे, लेखकांचे, पुढाऱ्यांचे काहूर माजले आहे. या उठलेल्या काहूरात वंचित समुहाच्या डोळ्यात इतकी धुळ गेली आहे की, त्यांना समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे त्यांचे बंड आता थंड झालेले आहे.

पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये आपण भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करणार आहोत. स्वातंत्र्याला यावर्षी 74 वर्ष पूर्ण होणार असून या कालखंडात स्वातंत्र्य देशाचे पारतंत्र्य भोगणाऱ्या तीन पिढ्या तयार झाल्या. इथला वंचित समाज आजही पारतंत्र्य भोगतोय. भारतीय स्वांतत्र्याने त्याच्या वाट्याला दिलेला अन्याय, अत्याचार, गुलामी, हिनतेची वागणूक, हिरावून घेतलेले निसर्गदत्त आणि घटनादत्त अधिकार. किंबहूना त्यांचे माणूस म्हणून अमान्य केलेले जगणे हे दु:खी जीवन या समुहाने किती पिढ्या जगायचे? आपली व्यवस्था या समुहाला न्याय देईल ही आशा आता मावळली आहे. कारण परिवर्तन किंवा क्रांतीनंतर सुरू झालेल्या प्रतिक्रांती-वाद्यांनी या व्यवस्थेवर विजय मिळविलेला आहे. त्यामुळे या वंचित समुहांच्या प्रश्‍नांना वाचा फुटणार नाही. हे खरेच. पण जसे वंचितांच्या न्याय हक्काला कोणी वाचा फोडतांना अपवाद वगळता फारसे कोणी दिसत नाहीत. तसेच वंचितही धडपड करतांना दिसत नाहीत. जो कोणी धडपड करत नसतो आणि आहे ते गुलामीत जगत मान्य करतो तो खरा व्यवस्थेचा गुलाम असतो.

वंचित समुहाच्या बाबतीत अपवाद वगळता सारेच व्यवस्थेचे कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक गुलाम आहेत. त्यांना क्रांती करायची आहे हे खरे पण ती करायची कशी? हे मात्र बुध्दीच्या परिघाबाहेरचे. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात यापुढे वंचितांची परिवर्तन किंवा क्रांती भाषा सरकत नाही. हे वंचित विशिष्ट लोकांना खुल्या भाषण समारंभातून ठरावीक समुहाला चक्क शिव्यांची लाखोळी वाहतांना दिसतात. या गैबानदास वंचितांना एवढेही कळत नाही की, आपल्या घटनाकारांनी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत आहोत. किंबहुना बुद्ध, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या या वंचितांच्या एवढेही लक्षात येत नाही की, बुद्ध-फुले-आंबेडकरांनी आयुष्यात कोणालाही शिवी दिली नाही. क्रांतीचा इतिहास, भूगोल, भूमिती माहित नसलेले हे वंचित लोक क्रांतीच्या बाता मारतात. यात अपवाद वगळता लेखक, विचारवंत, वक्ते, समाजसुधारणेचा बुरखा घालून फिरतात खरे पण जायचे कुठे हे अजिबात माहित नसते. अलिकडे तर फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर हे गैबानदास क्रांती करायला निघाले आहे. येवढे विद्वान हे वंचित.

भारतातील सामाजिक संरचना विषमतेवर आधारित आहे. हे माहित असलेले आणि ती विषमता कशी उद्धवस्त करायची याचे सुत्रही माहित असलेले नेते महाराष्ट्रात आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागतं. अशा नेत्यांच्या कार्यकर्त्यांनाच क्रांतीचं सूत्र कळत नाही. त्या नेत्यांच्या वंचित समुहाला क्रांतीचं सूत्र काय कळणार? 'दुर्देवाने म्हणावे लागतयं' की, अशा नेत्यांचे भाषणे सुध्दा कार्यकर्त्यांना कळत नाहीत एवढे मोठे हे दुर्देव. हे सूत्र समजून घेण्याची व्यापकता या वंचित समुहाकडे आणि कार्यकर्त्यांकडे केव्हा येणार? हा प्रश्‍न सध्या तरी निरुत्तरच. परिवर्तन किंवा क्रांती करायची म्हणजे काय ? याचे ज्याला ज्ञानच नाही ते अज्ञानी काय क्रांती करणार? असो. जे उध्दवस्त करायचे आहे त्याचे अकलन होणे अगोदर आवश्‍यक असते. मग जे उध्दवस्त करायचे आहे त्याचा पाय काय आहे ते शोधावे लागते. जे उध्दवस्त करायचे आहे त्याच्या मुळात जाऊन ते उध्दवस्त करता येत असते. यानिमित्ताने वंचितचे वर्तमान क्रांतीकारक घडवून आणायचे असेल तर प्रबुद्ध झाल्याशिवाय पर्याय नाही.

सुधाकर सोनवणे, बीड

Updated : 21 April 2021 7:28 PM IST
Next Story
Share it
Top