Home > मॅक्स ब्लॉग्ज > चवदार तळ्यात डुबकी मारून कुणाचा खरूज, नायटा बरा होत नाही!

चवदार तळ्यात डुबकी मारून कुणाचा खरूज, नायटा बरा होत नाही!

चवदार तळ्यात डुबकी मारून कुणाचा खरूज, नायटा बरा होत नाही! गौतम बुद्धांनाही पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी संघर्ष करावा लागला या दोन्ही ऐतिहासीक घटनांमधून आजच्या तरुणाईने काय घ्यावं? वाचा प्रा. सागर भालेराव यांचा तरूणाईला दिशा दाखवणारा सागर भालेराव यांचा लेख

चवदार तळ्यात डुबकी मारून कुणाचा खरूज, नायटा बरा होत नाही!
X

चवदार तळ्याचा संघर्ष हा पाण्यासाठी होता. ज्या तथागत बुद्धांचा सम्यक मार्ग स्वीकारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला, त्या बुद्धाच्या जडणघडणीतही पाण्याचा संघर्ष होता. 'रोहिणी' नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय ही दोन गणराज्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. कुणीही मागे हटायला तयार नव्हते तेव्हा राजकुमार सिद्धार्थने मध्यस्थी केली. पुढे बुद्धाला त्याचे परिणामही भोगावे लागले. असेच साम्यस्थळ डॉ.आंबेडकरांच्या आयुष्यात बघायला मिळते, ते चवदार तळ्याच्या सत्याग्रहात. समाजात जातीयतेचे विष सर्वदूर पसरलेले असताना पिण्याच्या पाण्यासाठी अस्पृश्य समजला जाणारा वर्ग संघर्ष करत होता. खरे तर 'माणूस' म्हणून ओळख निर्माण करण्याचा हा संघर्ष होता. बुद्धासारखाच मध्यम आणि सम्यक मार्ग स्वीकारून डॉ. आंबेडकरांनी दलित समाजाला हे तळे खुले करून दिले. तो दिवस होता 20 मार्च 1927.

दरवर्षी 20 मार्चला अनेक जण महाडला जाऊन चवदार तळ्याला भेट देतात. हे तळे काही तिर्थस्थळ नाही. यात डुबकी मारून कुणाचा खरूज, नायटा बरा होत नाही. परंतु इथे घडलेल्या सत्याग्रहातून आपल्या देशात 'माणुसकीची' खरी चळवळ उभी राहिली. ज्या जागेवर ही चळवळ मानवमुक्तीची आरोळी देऊन सुरु झाली ती जागा अनेक अर्थाने प्रेरणादायी आहे. म्हणूनच काल परवा जेव्हा कुठल्या तरी मंदिरात जाऊन पाणी प्याला म्हणून 'आसिफ'ला मारहाण केली गेली तेव्हा अनेकांना डॉ. आंबेडकरांचा हा पाण्याचा सत्याग्रह आठवला. नैसर्गिक संसाधनावर आपली मालकी सांगण्याचा मुजोरपणा माणसात येतोच कोठून? याच उत्तराच्या शोधात बुद्धाने आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं.

अशाच अनेक प्रश्नांनी आज आपण वेढले गेलो आहोत. कायद्याने अस्पृश्यता संपुष्टात आली असली तरी रोहित वेमुला, डेल्टा मेघवाल अशी उदाहरणे जातिवादाची जिवंत मंदिर उभी करतात आणि विद्वेषाचे पुजारी तेथे दिवसरात्र अमानुषतेचा जप करताना दिसतात. रक्ताची चटक लागलेल्या या श्वापदांना अभिषेकासाठी 'चवदार तळ्याच' पाणी कसं चालणार? ज्यांनी ज्यांनी या संघर्षाची प्रेरणा घेऊन माणुसकीचा लढा उभारला त्यांना त्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न सरंजामी प्रवृत्तीने केलाय. असं असलं तरीही या लढ्यात चवदार तळ्याचं पाणी पिलेले लोक पुरून उरले आहेत. ही ताकद आहे या पाण्याची. हे पाणी देखील हायड्रोजनच्या 2 आणि ऑक्सिजनच्या 1 मोल्येक्युलने (H2O) बनलंय. हे पाणी आजही खास आहे, कारण याच्या पाठीशी महानायकाचा इतिहास आहे.

आजच्या तरुणाईने बाबासाहेबांचा 'सत्याग्रह' समजून घ्यायला हवा. अभ्यासपूर्ण मांडणीतून त्यांनी हा संघर्ष पुढे नेला. इंग्रजांविरोधात महात्मा गांधी 'सत्याग्रह' हत्यार म्हणून वापरत होते. याच प्रेरेणेतून बाबासाहेबांनी या संघर्षाला 'चवदार तळ्याचा सत्याग्रह' असं नाव दिल होतं.. यानिमित्ताने तरुणांनी 'सत्याग्रह' समजून घ्यायला हवा. सत्याचा आणि विवेकाचा आग्रह धरणारे कायम जिंकत आले आहेत, हा आजवरचा इतिहास आहे. बुद्धापासून सुरु असलेला हा सत्य शोधनाचा आणि माणुसकीचा लढा समविचारी चळवळीच्या परस्पर सहकार्याने कसा परिणामकारक करता येईल यावर सकारात्मक विचार व्हायला हवा. असे जर घडले तर आसिफला मंदिरात जाऊन पाणी पिण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही.

प्रा. सागर भालेराव

(PhD Research Scholar, Department of Communication and Journalism, University of Mumbai.
Correspondent: Lokmudra Magazine, Mumbai, Maharashtra.)

Updated : 19 March 2022 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top