Home > मॅक्स ब्लॉग्ज > सुहाना सफर और ये ऍप हसिन

सुहाना सफर और ये ऍप हसिन

आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. त्यामुळे आपण सगळेच आपले प्रॉब्लेम्स हे मित्रांना, नातेवाईकांना सांगण्य़ाच्या ऐवजी मोबाईल ऍपवर शोधत असतात. आता हे ऍप्स किती आणि कोणत्या प्रकारचे आहेत? ते कसे काम करतात? त्यांचे काय परिणाम होतात हे सांगत आहेत डॉ. प्रदीप पाटील.

सुहाना सफर और ये ऍप हसिन
X

आज-काल ॲप्स चा जमाना आहे! या जमान्यात सर्व विषयांवरील ॲप आता तयार होत आहेत. व्यायामावर देखरेख ठेवण्यापासून तुमचे आर्थिक वेळापत्रक तयार करण्यापर्यंत. मग स्त्री-पुरुष नातेसंबंधांनी काय घोडे मारले आहे? नातेसंबंधांना उधाण आणणारे आणि अवधान घालविणारे ॲप्स तयार न झाल्यास नवलच!!

डेट वर जाण्यासाठी ॲप आहे.. लग्नातील भांडणं सोडवण्यासाठी ॲप आहे... प्रेम जुळवण्यासाठी आणि प्रेम तुटण्यासाठी ॲप आहे... आपला जोडीदार बाहेर कुठे लफडं करतोय काय हे शोधण्यासाठी ॲप आहे... जोडीदार असावा तर मनासारखा यासाठीही ॲप आहे... म्हणजे तुमच्या प्रेमप्रकरणांसाठी, तुमच्या सेक्स प्रकरणांसाठी, आता मोबाईल तुमच्या हातात सरसावला आहे.

अतिशय क्षुल्लक गोष्टी आणि गंभीर समस्या या दोन्हीही साठी हे ॲप्स तुमच्या पाठी खंबीरपणे उभे राहतात. का उभे राहतात? कारण आपण आता एका 'क्लिक' सरशी प्रेमात पडतो आणि 'क्लिक' सरशी प्रेमातून बाहेर पण पडतो ! म्हणजेच ब्रेकप घेतो. हे क्लिकपण आपणास इंटरनेटने प्रदान केले आहे. २४ तास आणि बारा महिने. आपण इंटरनेटवर जाण्याचे प्रमाण देवळात जाण्यापेक्षा वाढले आहे आणि हा सायबर फेरफटका आपणास नव्या नव्या मोबाईल्सच्या..स्मार्टफोनच्या.. टॅबलेट्सच्या..आगमनाने उन्मादी सफर घडवू लागला आहे.

मग, आपण शिरतो अशा दुनियेत, जिथे अनेक नाती आपली प्रतीक्षा करीत असतात. अनेक प्रेमाचे भुंगे भिरभिरत असतात. तेथे आपल्याला माजी प्रेयसी दिसते, माजी प्रियकर दिसतो, आपण नव्याच्या शोधात असतो, प्रेमाची पहाट उगवेल या आशेने अॅप्पाची वाट धरतो. तर ज्यांचे जुळले आणि तांदूळ डोक्यावर पडले अशांसाठी 'हॅप्पी कपल अॅप'ने जगाला त्यांची नाती पोहोचण्याचे काम चालू केले आहे.

तरुणाईस प्रेमात पडणे...गुंतून पडणे...भावना आदान-प्रदान करणे...आज त्यामुळेच सोपे झाले आहे. तरुणाई त्यांचा वापर सराईतपणे का करते आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्यू रिसर्च इंटरनेट प्रोजेक्ट ने जे सर्वेक्षण केले, त्यानुसार "संवादी राहणे' हा सर्वात मोठा फायदा सायबर सफरीचा आहे. हा संवाद नुसता रहात नाही तर तो बळकट होत जातो. मग येतात भांडणे. तीही सोडविली जातात. मग जर ताटातूट झाली तर येते डिप्रेशन. तेही दूर करण्यासाठी ॲप आपणास कुशीत घेते अन् खुश करते. प्रेमात पडल्यावर, पार्टनर आपणास योग्य आहे का हे, 'लव्ह टेस्ट कॅल्क्युलेटर ॲप' सांगते.

जगद्विख्यात फोर्ब्स मासिकाने एक यादीच प्रकाशित केली आहे....'ग्रुपर', 'टिंडर', 'हाऊस बाईट वी', 'ओके क्युपिड ', 'पी ओ एफ ( प्लेन्टी ऑफ फिश म्हणजे गळाला लागण्यासाठी ) ही पाच ॲप्स फेमस आहेत.

रुपयातील जवळपास पाव जोडपे म्हणतात की...आम्ही आमच्या पार्टनरच्या खूप खूप जवळ आलो ते केवळ अॅप मुळे! बरे, या ॲपच्या कंपन्यांनी नवनवीन क्लुप्त्या काढून प्रेम गिर्‍हाईकांना आपल्या कह्यात आणण्याचा सपाटा लावला आहे.

'इनव्हिजिबल गर्लफ्रेंड ॲप' वाले अदृश्य गर्लफ्रेंड जोडून देतात. ती गप्पा मारते. रिझवते आणि चक्क कधीकधी गिफ्टही पाठवते. 'केमिस्ट्री ॲप' (khemistry) ज्यांना वेळ कमी आहे अशांसाठी कमी वेळेत जास्त लव्ह पुरवठा करते. 'स्प्रेड शीट' नावाचे ॲप तर नंबर वन सेक्स ॲप म्हणवते. तुम्ही सेक्स मध्ये किती माहीर आहात त्याचा डाटा काढून देते.

'ब्रेकप टेक्स्ट ॲप' तुम्हाला मस्त मस्त ओळी सुचवते की ज्यामुळे ब्रेकप सहज होईल आणि तुम्ही तुमची सुटका निराशेत न जाता करून घ्याल पण काही वेळा ब्रेकअप केल्यानंतर लक्षात येते की... 'अरे यार पूर्वीचेच बरे होते, चला परत जुळवून घेऊया का?' म्हणजे 'मेकअप' करू या का? असे वाटले तर 'मेकअप टेक्स्ट ॲप' देखील आहे!

अॅप्सने नटलेली ही सायबर दुनिया जोडप्यांचा ताण हलका करते यात शंका नाही. शिवाय आपण गुप्तपणे खाजगीत आपले प्रश्न सोडवत असल्याने दिलासा मिळतो तो वेगळाच.

अनेक संसार उध्वस्त होण्यापासून वाचविलेली अनेक 'अॅप्पी' प्रकरणे आहेत. त्यासाठी 'माईंड ओव्हर मॅरेज', 'मॅरेज फाईट ट्रॅकर', 'फिक्स फाईट' सारखी अनेक मध्यस्थ ॲप्स आहेत. जी तुम्हाला शिकवतात.. नातं तोडा पण चांगल्या शब्दात.

नाते तोडले. ब्रेकअप झाला. मग वाटते त्याची किंवा तिची कोणतीही आठवण नको. सगळे काही संपवून टाकावे. नाहीसे करावे. मग क्लिक करा 'एक्स लव्हर ब्लॉकर' वर. हे ॲप तुमचे काम फत्ते करते. फेसबुक आणि जिथे जिथे तुमच्या प्रेमाठवणी दडल्या असतील त्या साऱ्या सफाचट करून टाकते. इथेच ते थांबत नाही. ते छान संगीत ऐकवते.. सल्ला देते.. स्टोऱ्या सांगते.. ज्यामुळे तुमचे जड झालेले अंतकरण हलके हलके होते!! ज्यामुळे तुमच्यात उत्साह संचारतो आणि तुम्हाला वाटू लागते...

" अकेले है... तो क्या गम है.."

तुमचा जोडीदार दूर आहे.. त्याच्या किंवा तिच्याबरोबर काही क्षण घालवावेसे वाटत आहेत...काय करावे? 'फिल मी ॲप' डाऊनलोड करा. दोघांच्याही फोनवर असलेल्या स्पॉटला टच करा. ते प्रकाशमान होईल आणि थिरकेल देखील!

रोमँटिक फन आणि प्रपोज करायचे आहे? मग काय गुडघे टेकवायचे आणि फुल हातात घ्यायचे? नाही राव. मोबाईल हातात घ्यायचा आणि 'मॅरेज प्रपोजल पाल' वर बोट दाबा. ते छान प्रपोजल सेंड करेल. ॲप्स डाऊनलोड करून तुम्ही सुरुवात कराल प्रेमाची तेव्हा याद राखा. काहीतरी काळेबेरे घडेल याची. कारण तुम्ही दोघेही असता नेटवर एकत्र पण शरीराने दूर असता. त्यामुळे तुम्ही नेमके ज्या व्यक्तीशी बोलताय ती तीच आहे याची खात्री कशी असणार? ती फेक पण असू शकते. तिचे अगोदरचे अनेक अफेअर्स असू शकतात. एकाच वेळी चार ठिकाणी प्रेम करणाऱ्यांचे आजचे दिवस आलेत. म्हणजे फसवा-फसवी. झूटे कही के. फ्रॉड साले. याला म्हणतात सायबर फसवा-फसवी.

डिजिटल अप्रामाणिकपणा. आणि नेटाचेटावर हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आणि त्यासाठी सुबक नावे देखील नेटीझन्सनी देऊन टाकली आहेत... बॅकअप नवरे किंवा बायका असे बारसे करून प्रामाणिकपणाची ऐशी की तैशी करून ठेवली जातेय. सरासरीने आपल्या जोडीदाराशिवाय कमीत कमी इतर दोघांशी / दोघींशी तरी कामोत्तेजक संभाषण रोज होत असल्याची कबुलीवाले वाढतच चालले आहेत! कारण काय माहितीये? दिवसेंदिवस दोघांच्या नात्यांमध्ये निर्माण होत चाललेले असमाधान. अमेरिकेत जे पाच जण विभक्त होतात त्यापैकी एकाचे कारण आहे फेसबुक आणि भारतात २० पैकी एकाचे नेटवर जाऊन फ्लर्ट करणे यात असंख्यजणांना काहीच वाटत नाही.

'ना दर्द... बेवफाई तो कुछ भी नही' असे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त.कारण जे काही मी केले ते, 'हवेत' केले. हवेत केलेली गोष्ट हवेतच विरते नाही का? नाही. कारण हवेत गेली आणि हवेची गोष्ट घरात कळली तर संशय कल्लोळ. म्हणजे हवेत जर काही घडले तर.. बटन बंद करता येते.

सायलेंट मोडवर जाता येते.

घरात बटनच नसते किंबहुना बटन कुठे असते हेच माहिती नसते. त्यामुळे "आ देखे जरा किसमे कितना है दम" सुरू होते, आणि सुरू होते डोके फिरणे. असं घरी घडू लागले तर 'नेट बरं की राव' म्हणत ही मंडळी नेटावर दिवस-रात्र पडून राहतात. घुमत राहतात.

लांबून हवेतून जेव्हा रोमांस चालू असतो तेव्हा आपण किती छान छान आहोत हे सहज दाखवून देता येते. समोरासमोर हे करता येत नाही कारण आपण बन्याबापू आहोत की कमळाबाई ते लगेच समजते. म्हणजे तुम्ही हवेतच राहत नाही.

मानवी नातेसंबंधात डिजिटल लफड्यांनी खूप मोठी उलाढाल चालू केली आहे. फोन-टॅबलेट मधून चालणाऱ्या संभाषणात आपणास नको असलेल्या गोष्टी आपण टाळू शकतो. त्यामुळे ते जास्तच 'हवे'शीर बनते.

रोजच्या धकाधकीतलं वास्तव नातं सांभाळणं-वाढवणं कठीण आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा अशा हवेतल्या नात्यांची ओढ वाढते. इतकं की ते वास्तवातलं नसून कल्पनेच्या राज्यातलं एखादं दुसरं पर्यटन आहे हेही ध्यानात येत नाही. कारण तिथं फेकाफेकी केली तर चालसे.

पण हे काही खरं नाही हो! मनातून का होईना आपण आपल्या जोडीदारास फसवीत आहोत असे वाटत राहतेच. जर जोडीदारावर प्रचंड राग असेल तर मग वाटत राहते की आपण सूड उगवत आहोत त्याच्यावर आणि तो जोडीदार त्याच लायकीचा आहे.

मग प्रवास सुरू होतो शहाणपणाचा. जेव्हा काहीच चांगले घडत नाही असे दिसू लागते तेव्हा डोळे उघडतात. पण ते सर्वांच्या बाबतीतच घडते असे नाही. काही जणांना नैराश्यास सामोरे जावे लागते. काही जण स्टेशन बदलत राहतात. मग इथेही त्यांना ॲप्स भेटतात. आणि पुन्हा सायबर विश्वच पुढे सरसावते. जी जान से मदत करायला. कारण सायबर प्रेमातील समस्या वेगळ्या, प्रश्न वेगळे, आणि सारे आजूबाजूला जे असतात ते नात्यातले थोडेच असतात? छे! आजूबाजूस सारे सायबर विश्व वालेच नाहीत का?

एकमेकांशी प्रेमालाप करण्याचे.. प्रपोज करण्याचे.. जोडीदार शोधण्याचे.. नियम आज कमालीचे बदलले आहेत. ते पूर्णपणे नवीन आहेत. एसएमएस, ई-मेल, व्हाट्सअप, फेसबुक, मेसेंजर, टिंडर यांनी 'चौदवी का चांद हो' असे म्हणणे म्हणजे किती बोअर असते हे सांगायला जराही हात.. सॉरी.. तोंड.. आखडता घेतलेले नाही. आणि हे करताना प्रत्येक पावला पावलावर ही मंडळी आपटत आहेत हे स्वच्छ दिसूनही येत आहे.

सर्वसाधारणपणे नेटाचेटावरील सध्याचे चित्र असे आहे. आवडलेल्या व्यक्तीस सोशल साईट्स वरून गाठले जाते. मग शर्यत सुरू होते चॅटिंगची. त्यात भरपूर मसाला असतो.. स्मायली आणि न्यू टेक्स्ट घुसडलेले असतात. जीआयएफ किंवा तयार केलेल्या गोष्टी असतात. या गोष्टी स्पष्टपणे कोणताही संदेश देत नाहीत. पण तेच जुळायला कारण ठरते. मात्र नेमके काय म्हणायचे आहे पलीकडच्याला हेच बहुसंख्य वेळा समजत नाही. पण तरीही आपणच अर्थ काढतो. सोयीचा. म्हणजे आपण स्माईली तज्ञ व्हायला हवे ना. मग गळ्यात गळे सुरू होतात म्हणजे जे काही घडते ते फ्लूक असू शकते. मग आवडीनिवडी, छंद यांची शोधाशोध होते. पलीकडच्याला वाईट वाटू नये म्हणून मग आपणासही तीच गोष्ट कशी आवडते हे सहजपणे फेकले जाते. आणि मग सुरु होतो प्रवास... सायबर प्रेमाचा!

असे का केले जाते?

कारण सायबर विश्वात तुम्हाला तात्काळ, तत्क्षणी सुखाचा डोस मिळतो. हा डोस मिळवायला "चाहूंगा मै तुम्हे.. सांज सवेरे" म्हणत दिवसेंदिवस वाट पहावी लागत नाही. 'चट बात, पट प्यार' चालू आहे ना. कुठे बाहेर भेटण्याची गरज नाही. आणि हे सायबर भेटणे रातभर चालू राहू शकते. आणि हे सर्व वयातल्या स्त्री-पुरुषांना सहज जमनेबल आहे ना!

पण हे सारे आहे दिखाऊ. क्षणभंगुर. म्हणूनच जास्त वाईट आहे. कारण एक क्षणभंगुरपण आपल्याला अधाशीपणाकडे नेते. क्षणभंगुर नको अखंड हवे अशी ओढीची साखळी तयार होते. लाईक शेअर याचाही कंटाळा येतो. कारण जर एकही लाईक नाही मिळाला तर डोके फिरू लागते. मग आपण लायकेबल आहोत हे सिद्ध करण्यासाठी तासंतास वेळ दवडू लागतो आणि हाच वेळ आपणाकडे दुर्मिळ होत चालला आहे. मग चक्रात अडकणे सुरू होते...

वेळ कमी, ओढ जास्त. वेळ वाढली, ताण जास्त. मग पुन्हा वेळ कमी.

'ओके क्युपीड' या साइटवर दर दिवशी चाळीस हजार जण डेटिंग वाले नवीन असतात. तर 'टिंडर' वर बारा लक्ष जणांची जुळवाजुळवी रोज सुरू असते. हे जर एवढे वेगवान असेल तर त्याचे परिणाम?

पूर्वीच्या काळी प्रत्येक पुरुषास जास्तीत जास्त पाच बायकांपर्यंत पोहोचता येत असे. आत्ताच्या सायबर कट्ट्यावरच्या बिनधास्त पणामुळे प्रत्येक पुरुषास हवे तितक्या जणींपर्यंत पोहोचता येते. पण मग हे काही चांगले आहे का?

अर्थातच नाही. एखादा जरी फसवाफसवीचा प्रकार उघडकीस आला तर प्रचंड अपमान, निराशा, चिंता यांनी घेरले जाते आणि मग सुरू होतो प्रवास....प्रेमास बदनाम करण्याचा. प्रेमाचा व्यापारी बनण्याचा. नाती उथळ होण्याचा. आणि मनोरोगतज्ञाकडे जाण्याचा.

मानसिकता बिघडण्याचा धोका आहेच यात काही वाद नाही पण या साऱ्या ॲप्स मुळे शारीरिक स्वास्थ्याचेही तीन तेरा वाजू लागले आहेत. प्रेमाच्या भरात मोबाईल बटणे किती वेळा दाबतो याचे भान उरत नाही. आणि मग सुरू होते मोबाईल अंगठ्याचे दुखणे ज्याला 'डी क्युरवेन सिंड्रोम' म्हंटले जाते. म्हणजे कोणतीही वस्तू पकडताना अंगठ्याच्या दुखापतीमुळे पकड ढिली राहते. आपण मोबाईल पाहताना आणि ऐकताना हाताच्या कोपऱ्याची अगणित हालचाल करीत असतो. ज्यामुळे 'क्युबायटल टनेल सिंड्रोम' होतो. ज्यात करंगळी आणि त्याच्या शेजारच्या बोटात बधिरता येते तो आहे सेल फोन एलबो किंवा सेलफोन कोपरा. जर फक्त हाताचे मनगट दुखत असेल तर व्हाट्सअॅप्पायटीस झालाय असे समजावे. झोप उडणे, डोळे कोरडे पडणे, अवेळी लॉगिन करण्याची इच्छा होणे, अस्वस्थ होणे, ही सारी इंटरनेटच्या आहारी जाऊन व्यसनी होण्याची लक्षणे आहेत. ज्यास इंटरनेट एडिक्शन डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे सायबर प्रेमाचे परिणाम कुठे कुठे व कसे होत चालले आहेत त्याचा फक्त आहे हा ट्रेलर.

नातेसंबंधांबरोबर आणखी अनेक समस्या जर येत असतील तर अनेक नवनवीन गोष्टी घडू लागतील आणि बिघडू लागतील. आभासी जगात जाऊन वास्तवाला मुकणे ही चांगली गोष्ट नाही. कारण कल्पनेच्या राज्यात आपण आपल्या विचारांना आणि भावनांना वेठीस धरतो. त्यांची जडणघडण बिघडवून टाकतो. कल्पना जर प्रत्यक्ष वास्तवात आल्या नाहीत तर आपण पुन्हा पुन्हा कल्पनेच्या राज्यात परततो. आणि मग आपली परवड सुरू होते.

वास्तवात जगताना नात्यांची गुंफण करणे म्हणजे एक कला असते आणि हुशारी पण असते. ही हुशारी कमावण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये शिकणे आवश्यक असते. आभासी दुनियेत ही कौशल्ये विकसित होत नाहीत. प्रत्यक्ष व्यक्तीबरोबर नाते सांभाळताना त्या व्यक्तीचे दुर्गुण आणि दोष यांचाही सामना करावा लागतो. तो कसा करायचा हे अनुभवातून आपण शिकत जातो. आभासी दुनियेत शिकणे तर सोडाच, जर समोरच्याचे पटले नाही तर बटन ऑफ करणे एवढेच केले जाते. प्रत्यक्ष बोलण्यास पैसे पडत नाहीत पण काल्पनिक दुनियेत आपण विनाकारण पैशाचे ओझे वाहतो. याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे सायबर गुन्हे वाढण्याचे. दिवसेंदिवस मुलांना आणि पुरुषांना व स्त्रियांना फसवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यातून पैसे लुटीचे प्रमाण तर वाढले आहेच पण अगदी आत्महत्या - खुनापर्यंतही काही गोष्टी गेल्या आहेत.

म्हणजे आभासी प्रेम हे आपणास वास्तवापासून दूर नेणारे असते आणि तेच खरे मानून जर आपण जगू लागलो तर पुढे नात्यांना भविष्यकाळ ऊरत नाही. नात्यांचा व्यापार सुरू होण्यास वेळ लागणार नाही आणि मग नात्यांची एक भांडवलदारी व्यवस्था अवतरेल. 'नात्यांची भांडवलशाही' नावाचे नवे तत्त्वज्ञान उगवेल.

विचार करू तेवढा थोडाच आहे.

तूर्त या सायबर प्रेमाचे काय करायचे याचा विचार करायला सुरुवात करा...!!

- डॉ. प्रदीप पाटील

Updated : 29 Oct 2022 11:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top