Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'कोत्या' मनाची 'मोठी' माणसं...

'कोत्या' मनाची 'मोठी' माणसं...

कोत्या मनाची मोठी माणसं...
X

पत्रकारिता करतांना अनेक चांगले-वाईट अनुभव येत असतात. पत्रकारिता हा तसा 'थँक्सलेस जॉब'. त्यामूळे सचोटीनं काम करणारा कोणताही पत्रकार कधी चांगल्या अनुभवानं हूरळून जात नाही. किंवा वाईट अनुभवानं नाउमेद होत नाही. मी गेल्या वीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून अकोल्याच्या पत्रकारिता क्षेत्रात काम करतो आहे. सदैव आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचं भलं व्हावं, त्यांना न्याय मिळावा हा माझा नेहमीच सकारात्मक प्रयत्न असतो. सुदैवानं मी ज्या 'झी मीडिया' परिवारात काम करतो तिथेही याच संवेदनेनं काम करणारी माणसं असल्यानं नेहमीच कामाची एक ऊर्जा मिळत आली आहे. त्यातूनत कामाचा हूरूपही नेहमीच वाढत आला आहे. मात्र, बातमीदारी करतांना या आठवड्यात आलेला एक अनुभव अतिशय चिड आणणारा ठरला. सोबतच 'मोठे'पणाचा आव आणणारी काही माणसं, त्यांची प्रवृत्ती किती 'खुजी' अन 'कोत्या' मनाची असते, याचा प्रत्ययही आला.

या नकोशा वाटणाऱ्या अनुभवाला निमित्त झाली माझी एक बातमी. 'झी 24 तास'नं मागच्या चार-पाच वर्षांपासून समाजातील दहावी-बारावी प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी एक चळवळ सुरू केली. 'संघर्षाला हवी साथ' या आमच्या कार्यक्रमातून अशा विद्यार्थ्यांचं आयुष्य घडविण्यासाठी आम्ही महाराष्ट्राला हाक दिली. अन परिस्थिती विपरित असतांना स्वत:च्या यशानं महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवणाऱ्या या गुणवंत आणि प्रतिवंतांना आम्ही महाराष्ट्रासमोर आणलं. या चळवळ कम उपक्रमात दरवर्षी मी सुद्धा बातम्यांच्या माध्यमातून सहभागी झालो. अकोला, वाशिम जिल्ह्यातील जवळपास दहावर विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी झी मीडियाच्या माध्यमातून आजवर लाखोंची मदत मिळाली. आयुष्याच्या या संघर्षाच्या वळणावर 'झी 24 तास'च्या माध्यमातून महाराष्ट्रानं केलेली ही मदत या विद्यार्थ्यांचं आयुष्य घडविणारी आहे. मदत मिळालेले विद्यार्थी कधीतरी फोन करून, भेटून आपल्या यशाची, शिक्षणातल्या नव्या उपलब्धींबद्दल सांगतात तेंव्हा मी पत्रकार असल्याचा अन 'झी परिवारा'चा घटक असल्याच्या अभिमानाने ऊर भरून येतो.

मात्र, यावर्षी अशा प्रकारची बातमी करतांना आलेला अनुभव अतिशय वेदनादायी होता. सोबतच सेवेला चमकोगीरी समजणारे ....आपल्यावरचा 'फोकस' दूर होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थी अन त्यांच्या पालकांना वेठीस धरणाऱ्या काही 'तथाकथित' समाजसेवक अन संस्थांची नवी 'जात' ही समजली. मी आमच्या 'संघर्षाला हवी साथ' या कार्यक्रमासाठी या विद्यार्थीनीची बातमी केली. बातमी करतांना काय-काय 'दिव्या'तून जावं लागलं, हे लिहिण्यासाठी स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. बातमी करतांना त्रास होणं हे कोणताही पत्रकारासाठी नवी गोष्ट नाही. मात्र, आपल्या बातमीमूळे एका गरीब विद्यार्थीनीच्या आयुष्याला आधार आणि आकार मिळणार म्हणून ते सारं मी अगदी आनंदानं सहन केलं.

मी बातमी केली अन ती बातमी आमच्या कार्यक्रमात झळकली. त्या मुलीच्या संघर्षानं अन या परिस्थितीतही तिच्या धवल यशानं महाराष्ट्र गहिवरला. अनेकांनी आम्हाला फोन करून तिला मदत करण्याची तयारी दर्शवली. तर काहींनी तिच्या शिक्षणातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेण्याचंही मान्य केलं. महाराष्ट्रातील आम्ही दाखवलेल्या या सर्व 'संघर्षयात्री' विद्यार्थ्यांना मुंबईत एका शानदार कार्यक्रमात गौरवान्वित करण्याचं ठरवण्यात आलं. 26 जुलैला त्यांना समाजाकडून आलेली मदत सुपूर्द करण्याचा एक सुंदर कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटूंबियांसह आम्ही मुंबईला सन्मानानं बोलावलं. त्यांची तेथे यथोचित व्यवस्थाही आम्ही केली... त्यांच्या येण्या जाण्यापासून तर त्यांच्या राहण्यापर्यंत... अकोल्यातील मी बातमी केलेल्या त्या विद्यार्थीनीला तिच्या आईसह कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं गेलं.

मात्र, येथूनच सुरू झालं एका समाजातील अतिशय कोत्या मानसांचं अन मानसिकतेचं दर्शन. त्या विद्यार्थीनीला दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर तालूक्यात काम करणाऱ्या एका संस्थेच्या प्रकल्पानं मदत केली. आम्ही आमच्या बातमीत, त्या मुलीनं अन तिच्या आईनं त्यांच्या मुलाखतीतही त्यांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख केला. मात्र, आमची बातमी अन त्यानंतर मुंबईत होणाऱ्या सोहळ्यामूळे त्या 'एनजीओ'च्या पार दुखायला लागलं. बातमी लागल्यावरच या एनजीओच्या नागपुरातील 'आकां'नी आम्हाला न विचारता त्यांना कसा इंटरव्हूव दिला याबद्दल त्या मुलीसह तिच्या आईला 'झापलं'. 'झी'च्या सन्मानामूळे आपलं नाव, आपली चमकोगीरी झाकोळत असल्याच्या विचारानं ही तथाकथित 'मोठी' माणसं बेचैन झाली. अन त्यातूनच सुरू झालं या दोघी माय-लेकींना मुंबईच्या कार्यक्रमाला न जाऊ देण्यासाठीचं अतिशय फालतू अन खालच्या स्तराचं राजकारण. या कार्यक्रमात अकोल्याच्या या लेकीच्या संघर्षातून यश मिळवल्याच्या प्रेरणेचा 'प्रकाश' पडला असता. त्यामूळे तिच्यापासून ऊर्जा, स्फूर्ती घेऊन अनेक गरीब विद्यार्थ्यांना आपल्या यशाच्या 'वाटा' सापडल्या असत्या. मात्र, फक्त नावासाठी, समाजसेवेच्या नावाखाली भविष्यात व्यवस्थेतल्या काही गोष्टींचा 'वाटा' मिळवण्यासाठी काहींनी हा सारा उपद्व्याप केला. या माय-लेकींना मुंबईला जाण्यापासून या हिन वृत्तीच्या तथाकथित समाजसेवकांनी रोखलं.

'प्रसिद्धी पिसाट' नावाची जमात पत्रकारांसाठी काही नवी नाही. मात्र, समाजात खूप मोठी क्रांती घडवण्याचा आव आणणारे अन 'प्रकाशा'चे मुखवटे घातलेल्यांची मनं असुया, असुरक्षिततेच्या भावनेनं किती अंधारलेली असतात, हे पहायला मिळालं. 'झी'चा प्रयत्न त्या मुलीच्या आयुष्याला घडविण्याची मदत करण्याचा होता, आहे अन भविष्यातही राहणारच आहे. मात्र, समाजाला 'प्रकाश' अन त्यासाठीच्या 'वाटा' दाखवणाऱ्या काही माणसांचे हातंही अखेर मातीचेच निघालेत. याचं खूप दु:ख वाटलं. तूमच्यासारखी तथाकथित 'मोठी' माणसं किती 'कोती' असतात ते ही आज समजलं. तुमच्या या नकोशा अनुभवानं मी नव्यानं शिकलो अन सम्रूद्धही झालो. तूम्ही तूमच्या असल्या 'वाटे'नं नक्कीच प्रवास करा. त्यासाठी माझ्या कायम शुभेच्छा!... 'मी', माझा 'झी परिवार' मात्र कायमच समाजात संवेदनेचा, मानुसकीचा, मानवतेचा 'प्रकाश' पेरत राहील!!!!....मात्र यातून एकच शिकावं असं वाटते ते म्हणजे ' कुणाची मदत करा, मात्र त्यांच्या यशाच्या वाटे चा प्रकाशावर मक्तेदारी करू नका..'

जयेश जगड,

झी मीडिया

अकोला.

Updated : 29 July 2019 11:06 AM IST
Next Story
Share it
Top