Home > मॅक्स ब्लॉग्ज > Sinhasan Marathi Movie : 'सिंहासन सिनेमाची ४४ वर्षे'

Sinhasan Marathi Movie : 'सिंहासन सिनेमाची ४४ वर्षे'

Sinhasan : 'सिंहासन' सिनेमाची 44 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सिंहासन सिनेमाच्या निर्मीती प्रक्रियेतील अनेक किस्से जब्बार पटेल यांनी सांगितले आहेत. ते किस्से काय होते? सिनेमाची मांडणीबद्दल जब्बार पटेल काय म्हणाले? याबरोबरच सिंहासनमधील निळू फुले यांनी साकारलेली पत्रकाराची भूमिका आणि कार्यक्रमात प्रश्न विचारणारे पत्रकार राजीव खांडेकर आणि अंबरिष मिश्र यांची भूमिका याविषयी ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी परखड विश्लेषण केले आहे.

Sinhasan Marathi Movie : सिंहासन सिनेमाची ४४ वर्षे
X

हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने आज आयोजित केला होता. शरद पवार, जब्बार पटेल, मोहन आगाशे, नाना पाटेकर यांच्याशी राजीव खांडेकर आणि अंबरिष मिश्र यांनी गप्पा मारल्या.

Sinhasan and Mumbai Dinank Novel : सिंहासन आणि मुंबई दिनांक या अरुण साधूंच्या (Arun Sadhu) दोन कादंबर्‍यांवर आधारित चित्रपट बनवावा, ही कल्पना जब्बार पटेल यांची. अरुण साधू त्यांना म्हणाले, मला या चित्रपटाची पटकथा लिहीता येणार नाही, तुम्ही विजय तेंडुलकरांना (Vijay Tendulkar) विचारा. विजय तेंडुलकरांनी त्यामध्ये खूप रस घेतला. केवळ पटकथाच नाही तर लोकेशन्स, कास्टिंग या अंगांमध्येही विजय तेंडुलकरांनी लक्ष घातलं.

त्यावेळी शरद पवार (Sharad pawar) मुख्यमंत्री होते. सिनेमाचं शूटिंग मंत्रालयात करावं, मंत्र्यांच्या बंगल्यांत करावं, ही सूचना विजय तेंडुलकरांची. जब्बार पटेल (Jabbar Patel) हा प्रस्ताव घेऊन शरद पवारांकडे गेले. राज्याच्या मुख्य सचिवांनी पटकथा वाचली आणि या प्रस्तावावर प्रतिकूल अभिप्राय दिला. शरद पवारांनी स्वतःच्या जबाबदारीवर हा प्रस्ताव मान्य केला. शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील सहकारी हशू आडवाणी (Hashu Advani), सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी आपल्या बंगल्यांच्या चाव्या जब्बार पटेलांकडे दिल्या. सह्याद्री गेस्ट हाऊस (Sahyadri Guest House), जे एकेकाळी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान होतं त्यामध्ये शूटिंग करण्याची परवानगी मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिली.

त्या चित्रपटाचं एडिटिंग एका रात्रीत पूर्ण करण्यात आलं. चित्रपट प्रदर्शित करण्यामध्ये व्ही. शांताराम (V Shantaram Advice) यांनी दिलेला सल्ला मोलाचा होता.

या चित्रपटात मुख्यमंत्र्याची भूमिका अरुण सरनाईक (Arun Sarnaik) यांनी करावी ही सूचना विजय तेंडुलकरांची. अरुण सरनाईक यांनी एक रुपया मानधन घेतलं. रुपयाची नोट नाही तर नाणं हवं, एवढीच अट घातली. या चित्रपटात त्यावेळचे सर्व मराठी स्टार्स, नट आणि नट्या, होते. कोणीही मानधनाची अट घातली नाही. नाना पाटेकर (Nana patekar role in Sinhasan) यांचा हा दुसरा चित्रपट होता. त्यांना तीन हजार रुपये मानधन जब्बार पटेल यांनी दिलं.

सिंहासन हा चित्रपट कमर्शियल व्हेन्चर नाही तर सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय जबाबदारी आहे, अशीच सर्व चित्रपटकर्मींची धारणा होती. त्यामुळे हा चित्रपट केवळ चार लाख रुपयांत तयार झाला. त्यासाठीही बँकेने कर्ज दिलं होतं.

जब्बार पटेल हे या चित्रपटाचे केवळ दिग्दर्शक नव्हते तर कप्तान होते.

अंबरीश मिश्र (Ambarish Mishra), राजीव खांडेकर (Rajiv Khandekar) यांच्यासारख्या अनुभवी, उत्साही, व्यासंगी पत्रकारांना चित्रपट या माध्यमाची जाण नाही. त्यांची राजकारणाची जाणही कमालीची प्राथमिक आहे, ही बाब या कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देऊन जब्बार पटेल यांनी वरील सर्व माहिती दिली. त्यामुळे हा कार्यक्रम उत्तम झाला. प्रश्न विचारणार्‍यांनी पूर्वतयारी केली असती तर कार्यक्रम उत्कृष्ट झाला असता. उदाहरणार्थ, महाराष्ट्र हे मराठी भाषकांचं एकमेव राज्य नाही तर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या प्रदेशांनी बनलेलं आहे, ही जाण अरुण साधू, विजय तेंडुलकर, जब्बार पटेल यांना होती म्हणून हा उत्तम राजकीय चित्रपट आहे. शरद पवारांना अर्थातच हे माहीत आहे. परंतु अंबरीश मिश्र, राजीव खांडेकर यांना हे वास्तव माहीत नाही. चित्रपट निर्मितीमध्ये कथा, पटकथा, लोकेशन्स, कास्टिंग, शूटिंग शेड्यूल, चित्रपटकर्मींच्या तारखा ठरवणं, शूटिंग, एडिटिंगचं तंत्रज्ञान इत्यादी बाबी असतात. सिंहासन हा चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला त्या काळातलं तंत्रज्ञान कोणतं होतं? आजच्या काळाच्या म्हणजे तंत्रज्ञानाच्या तुलनेत ते कसं होतं? इत्यादी कोणताही प्रश्न अंबरीश वा राजीव यांनी विचारला नाही.

अंबरीशने दोन राजकीय प्रश्न विचारले. हा चित्रपट जॉर्ज फर्नांडिस (jorge fernandez) आणि वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी पाहिला होता का? त्यांची प्रतिक्रिया काय होती. जब्बार पटेल म्हणाले यासंबंधात त्यांची या दोन महानुभावांशी काहीही चर्चा झाली नाही. वसंतराव नाईक यांचं निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी झालं. सिंहासन हा चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला. हा तपशील अंबरीशला माहीत नव्हता. जॉर्ज फर्नांडीस यांनी हा चित्रपट पाहिला होता की नाही? याबाबत जब्बार पटेल पूर्णपणे अनभिज्ञ होते. जब्बार पटेल यांची जवळीक मराठा नेतृत्वाशी होती, जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी नव्हती.

मी हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह वर पाहिला. निळू फुले (Nilu Phule Role in Sinhasan) यांची या चित्रपटातली पत्रकाराची भूमिका ऑब्जर्वर वा निरीक्षकाची आहे. अंबरीश आणि राजीव खांडेकर हे पत्रकार ऑब्जर्वर नाहीत. अंबरीश केवळ मैफील रंगवणारा आहे आणि राजीव खांडेकर टीआरपी वर डोळा ठेवून पत्रकारिता करणारा आहे. ही बाब या कार्यक्रमातून मला कळली.

Updated : 13 April 2023 3:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top