Home > Top News > देवमाणूस गेला...

देवमाणूस गेला...

४० हजाराहून अधिक गाण्यातून लाखो चित्रपट रसिकांचं 5 दशकं मनोरंजन करणाऱ्या एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचं नुकतंच निधन झालं. ‘एक दुजे के लिए’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’ असे सुपरहीट सिनेमे देणाऱ्या ‘एसपीबी’ च्या कार्याचा मंदार जोशी यांनी घेतलेला आढावा...

देवमाणूस गेला...
X

मनोरंजन पत्रकारितेमध्ये काम करतानाच्या काही सर्वाधिक आनंदाच्या क्षणांपैकी एक क्षण म्हणजे दिवंगत पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांच्याशी साधता आलेला संवाद. विशेष बाब म्हणजे बालसुब्रह्मण्यम यांनी गायलेल्या ‘बंड्या आणि बेबी’ या एकमेव मराठी चित्रपटातील गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला मला उपस्थित राहता आले होते. या संगीतकाराला अगदी जवळून पाहता आलं. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जुहूच्या ‘आजीवासन’ स्टुडिओमध्ये या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं होतं. त्यावेळी या विख्यात गायकाबरोबर साधारण पाऊण तास गप्पा मारता आल्या.

महम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश हे तिघे हिंदी चित्रपट पार्श्वगायनामधले दिग्गज मानले जातात. या तिघांनाही मला कधी भेटण्याची संधी मिळाली नाही. परंतु, या तिघांनंतर हिंदी चित्रपट पार्श्वगायनात स्वतःचा आवाज असलेला नि यशोशिखरावर पोहोचलेला गायक म्हणजे बालसुब्रह्मण्यम. मला तोपर्यंत पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा गायक इतकी वर्षं मराठी चित्रपट पार्श्वगायनापासून का दूर राहिला असावा? म्हणूनच मी त्यांच्याशी संवाद साधताना पहिला प्रश्न याबद्दलच विचारला होता. त्यावर एसपीबी (बालसुब्रह्मण्यम हे ‘एसपीबी’ आणि ‘बालूजी’ या दोन टोपण नावांनी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होते) म्हणाले होते,

‘‘मी मराठीत गायलो नाही, हा खरोखरीच एक मिलियन डॉलर प्रश्न आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही मला त्याबद्दल अनेकदा विचारलंय. महम्मद रफी, किशोरकुमार, मन्ना डे यांची नावं घेऊन हा प्रश्न मला विचारला जातो. एक गोष्ट मी नम्रपणे सांगेन की, रफी-किशोरकुमार यांच्याबरोबर माझी तुलना करणं योग्य नाही. ते माझ्यापेक्षा हजारो मैल पुढं आहेत. मराठी भाषेत गाताना शब्दांच्या उच्चारांवर खूप लक्ष द्यावं लागतं. मला ते जमेल की नाही, अशी अनेकांना शंका आहे; पण गंमत म्हणजे हिंदी चित्रपटांमध्ये जेव्हा मी गायला सुरुवात केली, तेव्हा माझ्याबद्दल अशीच शंका घेतली जायची. सुदैवानं आतापर्यंत माझ्या हिंदी उच्चारांमध्ये कोणाला काही खटकलेलं नाही. यापुढेही खटकणार नाही, अशी मी आशा करतो.’’

एसपीबींच्या कारकीर्दीचा आढावा घेतल्यास आपण अचंबित होतो. एवढं अफाट कार्य त्यांनी करून ठेवलंय. आपल्या ५५ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी ४० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यापैकी सहा गाण्यांना त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. एका दिवसात वेगवेगळ्या भाषांमधील (कन्नड-२१, तमीळ-१९, हिंदी-१७) गाण्यांचे ध्वनिमुद्रण करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

एसपीबी हे एक अजब रसायन आहे. ते बनण्याचा प्रवासही तेवढाच उत्कंठतावर्धक आहे. त्यांचे वडील हे आंध्र प्रदेशातल्या एका खेडेगावात हरीकथा सांगायचे. त्याच्यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. एसपीबींना एकूण सात भावंडं. एसपीबी हे जात्याच हुशार. त्यामुळे शाळांमध्ये होणाऱ्या विविध परीक्षांमधील यशाद्वारे मिळणाऱ्या स्कॉलरशीपवर एसपीबींची गाडी पुढं जात राहिली. त्या काळातल्या प्रत्येक घरातल्या आई-वडिलांना आपल्या मुलानं डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं, असं वाटत असे. एसपीबींच्याही घरी काही वेगळी स्थिती नव्हती. परंतु, खुद्द एसपीबींना इंजिनियर व्हायचं होतं. म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच प्रवेश घेतला होता.

एसपीबींनी स्वतः गायनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही. मात्र, त्यांच्यावर पगडा होता तो विख्यात गायक महंमद रफी यांचा. त्यावेळी नुकताच ‘काश्मीर की कली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला हा. या चित्रपटामधील ‘दीवाना हुआ बादल’ हे गाणं खूप गाजत होतं.

एसपीबी कॉलेजला सायकलनं जात असताना दररोज त्यांच्या हे गाणं कानी पडत असे. पुढं या गाण्याचं गारुड त्यांच्यावर झालं नि महम्मद रफी नावाच्या पार्श्वगायकाचं देवत्व त्यांना कळलं. रफीसाहेबांकडून एसपीबींनी घेतलेल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे गाण्यातील गोडवा आणि माणूसपण. या दोन गोष्टींमुळेच एसपीबी पुढे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले.

कोणत्याही कलाकाराच्या कारकीर्दीत नशीब हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. एसपीबी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असतानाच खूप आजारी पडले नि त्यांना परीक्षाच देता आली नाही. पुढच्या सेमिस्टरसाठी अजून काही महिने होते. आता मधल्या वेळात करायचं तरी काय? या प्रश्नामुळे मग स्थानिक गायनाच्या स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. तिथं त्यांना पहिलं बक्षीस मिळालं. परंतु, तोपर्यंतही त्यांना स्वतःमधील गायकाच्या गुणवत्तेचा अंदाज आला नव्हता. त्या दिवशी चांगले गायक आले नसल्यामुळे आपल्याला बक्षीस मिळालं असेल, असं वाटण्याएवढा नम्रपणा त्यांच्या स्वभावात मूळतःच होता. त्यानंतर आणखी एका स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. तिथंही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. त्याहून कडी म्हणजे या स्पर्धेला उपस्थित असणाऱ्या एका संगीतकारानं त्यांना थेट चित्रपटामध्ये पार्श्वगायनाची संधी दिली.

दरम्यानच्या काळात काही महिने गेले. कोणी तरी आपली गंमत केली असेल म्हणून एसपीबींना या संधीचा विसरही पडला होता. ते पुन्हा नियमित कॉलेजला जाऊ लागले. तेव्हा त्याचं संगीतकारानं पुन्हा त्यांना शोधून काढलं. रेकॉर्डिंगची सगळी माहिती दिली. परंतु, पुन्हा एकदा नियती एसपीबींची परीक्षा घेत होती. निर्मात्यानं पाठवलेली गाडी काही आलीच नाही. त्यामुळे एसपीबी सायकलवरून रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पोहोचले. त्या स्टुडिओबाहेरचा सुरक्षारक्षक त्यांना आतमध्ये सोडेना. कारण सायकलवरून गायला येणारा गायक अजूनपर्यंत त्याच्या पाहण्यात आला नव्हता. अखेर बऱ्याच मिनतवाऱ्यानंतर एसपीबी आत गेले आणि पहिल्याच टेकमध्ये त्यांचं आयुष्यातील पहिलं गाणं रेकॉर्ड झालं.

एसपीबींच्या कारकीर्दीला वळण मिळालं ते दक्षिणेताली विख्यात व्यक्तिमत्त्व एम. जी. रामचंद्रन यांच्यामुळे. त्यावेळी रामचंद्रन आणि दक्षिणेतील विख्यात नायिका जयललिता यांच्यावर एक चित्रपट बनत होता. त्याचं महिन्याभरानं जयपूरमध्ये चित्रीकरण ठरलं होतं. त्या गाण्यासाठी रामचंद्रन यांना एसपीबींचा आवाज हवा होता. पुन्हा एकदा भूतकाळाची पुनरावृत्ती झाली. एसपीजींचं आणखी एकदा आजारपण उद्भवलं. हातातोंडाशी आलेली सोन्याची संधी दवडली जाण्याची भीती निर्माण झाली. परंतु, रामचंद्रन यांनी तोपर्यंत एसपीबींची गुणवत्ता हेरली होती. त्यांनी जयपूरमधील आपलं शूटिंग रद्द केलं नि एसपीबी पूर्णतः बरे होण्यासाठी त्यांनी वाट पाहिली.

१९७० ते १९८० या दशकादरम्यान एसपीबी दक्षिणेतील एक लोकप्रिय गायक होते. परंतु, त्यांना अजून जगन्मान्यता मिळालेली नव्हती. ती मिळाली, ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटामुळे. दिग्दर्शक के. बालचंदर यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्यासाठी एसपीबींचं नाव सुचवल्यानंतर संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ते अमान्य केलं होतं. एक मद्रासी गायक लताबाईंबरोबर हिंदी गाणं गाऊ शकेल, याची त्यांना खात्री नव्हती. परंतु, ‘एक दुजे के लिए’च्या नायकाला हिंदी भाषा येत नसल्यामुळे एसपीजींकडून काही चूक झाली तरी ती चालून जाईल, असं बालचंदर यांनी ठामपणे सांगितलं.

चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकाचाच शब्द अंतिम असतो. त्यामुळे एसपीबींना लताबाईंसमवेत गाण्याची संधी मिळाली. या गाण्याचा बहुतांश भाग हा लतादीदीच गाणार होत्या. फक्त त्यामधील तमीळ बोल हे एसपीबींच्या वाट्याला आले होते. त्याचा मराठीत अर्थ आहे, ‘अगं मुली, तू किती सुंदर गातेस...’ प्रसंग पाहा काय आहे ते! समोर साक्षात लतादीदी गाताहेत आणि त्यांच्यासमवेत पहिल्यांदाच गाणाऱ्या एसपीबींच्या तोंडी ‘अगं मुली, तू किती सुंदर गातेस…’ या अर्थाची ओळ होती. त्याचंच त्यांना कमालीचं टेन्शन आलं होतं. गाण्यापूर्वी लतादीदींचे चरणस्पर्श करून एसपीबींनी आशीर्वाद घेतले. त्याचवेळी कोणीतरी एसपीबींच्या हाती चहाचा कप दिला आणि टेन्शन म्हणा किंवा अन्य काही म्हणा, हा कप बाजूलाच उभ्या असलेल्या लतादीदींच्या साडीवर सांडला. एम. जी. रामचंद्रन यांच्याबरोबर काम करताना एकदा त्यांची नियतीनं परीक्षा घेतली होती. त्याप्रमाणेच पुन्हा एकदा एसपीबींना वाटलं, की आयुष्यातील सर्वात मोठी संधी आपणच आपल्या हातानं दवडली. परंतु, दुसऱ्याच क्षणी लतादीदी म्हणाल्या, ‘‘बालूजी, हा शुभशकून आहे. तुम्ही हिंदीतही बराच काळ चांगलं काम करणार आहात.’’

लतादीदींचे हे शब्द खरे ठरले. ‘एक दुजे के लिए’तील ‘तेरे मेरे बीचमें’ या गाण्यासाठी एसपीबींना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे मग हिंदीसाठी त्यांना भरपूर ऑफर्स येऊ लागल्या. ‘मैने प्यार किया’मुळे तर ते सलमान खानचा आवाजच बनले. परंतु, खुद्द एसपीबींचं सर्वात आवडतं गाणं म्हणजे ‘तेरे मेरे बीचमें’. एक काळ असा होता, की एसपीबी हिंदी चित्रपटात चांगलेच ‘पॉप्युलर’ होते. 1990च्या दशकात ते दररोज सकाळी मुंबईत यायचे आणि रात्री चेन्नईला परतायचे. आनंद-मिलिंद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली तर एके दिवशी त्यांची तब्बल 16 गाणी रेकॉर्ड झाली होती. एसपीबींनी आपल्या कारकीर्दीत विविध भाषांमध्ये गाणी गायली. इतक्या सगळ्या भाषा अवगत नसतानाही केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर ते गायले. मुख्य म्हणजे ध्वनिमुद्रणापूर्वी त्या गाण्याचा ते ‘फील’ घेत आणि मगच गात. त्यामुळे ते गाणं त्यांच्या आवाजाशी अगदी एकरुप होत असे.

साधारण १९९८ पर्यंत त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये मोजकीच पण दर्जेदार गाणी गायली. परंतु, कालांतरानं या गुणी गायकाकडे चित्रपटसृष्टीतील संगीतकारांचं दुर्लक्ष झालं. अगदी सलमान खाननंही हा दैवी आवाज डावलून दुसऱ्या आवाजांना पसंती दिली. तब्बल १५ वर्षांच्या गॅपनंतर विशाल-शेखरनं त्यांना ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. मात्र हिंदी चित्रपटांमधलं आपलं काम कमी झाल्याची खंतदेखील या गायकानं कधी व्यक्त केली नाही. एसपीबी कायम वादविवादापासून दूर राहिले. आपलं काम नि वैयक्तिक आयुष्य यात त्यांनी कधीच गल्लत केली नाही.

२१व्या वर्षी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मद्रासमधल्या आपल्या घरमालकाच्या मुलीच्या ते प्रेमात पडले होते. खरं तर हे दोघेही एकाच जातीचे होते. परंतु, जातीमधल्या गोत्रांनी घोळ घातला नि एसपीबींच्या भावी सासऱ्यांनी या लग्नाला नकार दिला. मग काय फिल्मी स्टाईल पळून लग्न झालं नि दोन वर्षांनी नातवंड घरात आल्यानंतर सगळं काही ठीकठाक झालं.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन १९९९ मध्ये भारत दौऱ्यावर आले असताना त्यांची भेट एसपीबींबरोबर झाली होती. त्यावेळी एसपीबींनी ३५ वर्षांमध्ये ३५ हजार गाणी गायल्याची गोष्ट कानी पडल्यानंतर क्लिंटनदेखील चकीत झाले होते. यावेळी त्यांनी एसपीबींना अवाक होऊन विचारलं होतं, ‘तुम्ही गायनाव्यतिरिक्त इतरही काही केलं आहेत का?’

खरोखरीच एसपीबी हे केवळ गाण्यासाठीच जन्मले असले तरी त्यांनी जवळपास ५०हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केल्याची बाब खूप कमी लोकांना ठाऊक आहे. तसेट डबिंग कलाकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. कमल हासन, रजनीकांत, विष्णूवर्धन, सलमान खान, के. भाग्यराज, अनिल कपूर, जेमिनी गणेशन या कलाकारांच्या त्यांच्या मूळ भाषेव्यतिरिक्तच्या चित्रपटांना त्यांनी आपला आवाज दिला होता.

अर्थात एसपीबींच्या मते सर्व पार्श्वगायक हे मुळात अभिनेतेच असतात. कारण ज्यांच्यासाठी ते गातात, त्यांच्या व्यक्तिरेखेत शिरून त्यांना तसा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा असतो. एसपीबींनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले असते. तर ते आणखी उंचीवर पोहोचले असते, असं काही मोजक्या लोकांना वाटतं. परंतु, खुद्द एसपीबींनीच हा मुद्दा खोडून काढला होता. त्याउलट आपण शास्त्रीय गायन शिकलो असतो. तर चांगला पार्श्वगायक होऊ शकलो नसतो, असं त्यांचं त्यावरचं उत्तर आहे. कारण शास्त्रीय गायक हा त्याच्या गायनशैलीबाबत खूपच हट्टी असतो. त्या तुलनेत पार्श्वगायक हा खूप मोकळा असल्यानं त्याच्याकडून अधिक वेगळ्या पद्धतीचं काम केलं जातं.

५ ऑगस्ट २०२० रोजी थोडीशी सर्दी वाटल्यानं एसपीबी एमजीएम रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी कोरोनाचा अगदी किंचित शिरकाव त्यांच्यात झाला होता. परंतु, त्यावर मात करून आपण पुन्हा रसिकांच्या सेवेत हजर राहू, असं आत्मविश्वासानं एसपीबींनी सांगितलं होतं. परंतु, तसं घडलं नाही. या आजारानं आपल्याला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

- मंदार जोशी

Updated : 26 Sep 2020 7:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top