Home > मॅक्स ब्लॉग्ज > घटना गंभीर आहेत, तंत्र कॉमन आहे, तात्या आणि शेठ समान लाभार्थी…

घटना गंभीर आहेत, तंत्र कॉमन आहे, तात्या आणि शेठ समान लाभार्थी…

डोनाल्ड ट्रंम्प यांची अमेरिकेचे मसिहा म्हणून प्रतिमा कशी निर्माण झाली. खोटी माहिती, फोटोज, व्हिडिओज आणि बातमी प्रसारीत करुन माध्यमांना हाताशी धरुन डोनाल्ड ट्रम्प आपला प्रोपोगंडा राबवतात का? ट्रम्प आणि आणि नरेंद्र मोदी यांचं निव़डणूकीचं तंत्र समान आहे का? वाचा रफीक मुल्ला यांचा लेख

घटना गंभीर आहेत, तंत्र कॉमन आहे, तात्या आणि शेठ समान लाभार्थी…
X

डोनाल्ड ट्रंप, अमेरिकेच्या अध्यक्षपदी कसे निवडून आले? याचे पुन्हा निवडणूक आली तरी लोकांना आश्चर्य वाटते आहे. एवढा मूर्खपणा करुनही ते पुन्हा अध्यक्ष होण्याच्या केवळ लढाईतच नाही तर तुल्यबळ लढाईत आहेत. हे का घडले..? कसे घडले..? कशाच्या जोरावर घडतेय..? अनेक प्रश्न आहेत.

त्यांच्या उजव्या, द्वेषमूलक, भेदभाव करणाऱ्या विचारसरणीचा जोरकस प्रसार सुरु आहे. समाज माध्यमांद्वारे हे काम करणा-यांचा त्यांच्या यशात मोठा वाटा आहे. अमेरिकेत QMap.pub ही वेबसाईट पुन्हा फार चर्चेत आली आहे. गेल्या निवडणुकीत या वेबसाईटने फार धुमाकूळ घातला होता. ही साईट चालवणाऱ्या तेव्हाच्या 'अज्ञातांचा' ट्रंप यांच्यासारख्या आधी राजकारण्यांना पैसा पुरवणा-या आणि नंतर स्वत:च राजकारणी बनलेल्या उद्योगपतीच्या राजकीय व्यक्तीत्व उभारणीत मोठा हात आहे. ही वेबसाईट कोण चालवतो, याबाबत अजिबात कुणाला माहिती नव्हती, या साईटद्वारे फार कल्पकतेने द्वेष पसरवणारी खोटी माहिती पसरवली जात असे.

विशेषत: उजव्या विचारसरणीचा प्रपोगंडा- एक विषय घेऊन बॉम्ब पडावा तशी जनतेमध्ये माहिती टाकणे, ही त्यांची पद्धत. आधी लोकांचे कुतुहल वाढवणारी प्रचंड अशी ठासून जाहिरात करायची, लोकांची उत्सुकता ताणली गेली की, मग तो ठरलेला विषय सर्व प्रकारांतून आक्रमकपणे मांडायचा. या संपुर्ण प्रक्रियेला साईटवाले Q Drops असे म्हणत. ही 'ड्रॉप' केलेली खोटी माहिती खरी आहे. हे स्थापित करण्यासाठी वेगळे डिज़ाइन तयार करण्यात आले होते. विविध सामाजिक माध्यमांमध्ये असंख्य बनावट अकाउंट निर्माण करुन या ड्रॉप केलेल्या खोट्या माहितीला पूरक पोस्टस प्रसारित करायच्या, त्या प्रतिक्रीया- प्रतिसाद- अधिक माहिती म्हणून पुन्हा QMap या वेबसाईट वर घ्यायच्या आणि लोकांच्या समोर ठेवायच्या.

लोकांनी खरे खोटे करण्या अथवा ठरवण्याआधीच तिस-या बाजुने विविध संघटना आणि ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षाचे छोटे मोठे पदाधिकारी ती QMap ने 'ड्रॉप' केलेली माहिती उचलून धरायचे..! त्यामध्ये तटस्थ वाटणारे बुद्धिवादी, उद्योगपती, खेळाडू आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही नेमून काम दिलेले असायचे, वेगवेगळ्यावेळी वेगवगळ्या व्यक्तींचा वापर- विषयानुसार निवड..! ती माहिती योग्य फोडणी देऊन जनतेमध्ये व्यापकपणे प्रसारित होईल, असा यशस्वी प्रयत्न. माहितीचा प्रवास असा घडवायचा की एका टप्प्यावर ती माहिती खरीच वाटू लागेल.

त्यातील खोटेपणा, आरोपांचे खुलासे करत विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते-संघटना आणि निपक्ष: माध्यमं मेटाकुटीला आली की, विषय नीट शिजलाय असे मानायचे. त्यातच असे प्रश्न निर्माण करायचे की, माहिती खरी की खोटी? हा विषय मागे पडेल, आणि ती खरी आहे. असे गृहीत धरूनच चर्चा घडेल.

10 लाखावर लोक त्या वेबसाईटवरील माहिती एकावेळी वाचत असतं, व्हिडिओज-फोटोज पाहत असत- शेवटी अधिकृत यंत्रणेने व्यापक केलेली माहिती कोट्यावधी लोकांपर्यंत पोहचत असे- तुलनेत ती खोटी आहे. हे सांगणा-यांचा आवाज छोटा पडे- मुठभर ज्यांनी जाणीवपूर्वक पाहिले-वाचले-जाणून घेतले त्यांनाच हे कळे की ही सर्व माहिती खोटी आहे. पण हे प्रमाण नेहमीच अत्यल्प असे.!डोनाल्ड ट्रंप कसे वाईट प्रवृत्ती विरुद्ध लढत आहेत, ते कसे आपला धर्म वाचवत-वाढवत आहेत, त्यांना कसा पर्याय नाही, आपला देश वाचवायचा असेल तर त्यांचेच नेतृत्व कसे योग्य आहे, ते कसे अमेरिकेचे तारणहार आहेत, त्यांनी जग कसे जिंकले आहे, त्यांच्या शौर्य गाथा-किस्से-घटना, सगळं खोटं आणि काल्पनिक- पण ते खरंच घडलं होतं. हे सामान्य अमेरिकन माणसापर्यंत बेमालूमपणे पोहोचवायचं. बरं ही QMap चालवणारे लोक कोण आहेत? हे कायम गुलदस्त्यात, म्हणून अमेरिकेत त्यांना QAnon (अज्ञात) म्हणत असत, पण ते मोठे काम करत आहेत. अशी अनेक ट्रंप भक्तांची ठाम भावना...

जगाला कधीच खात्री पटलीय की ट्रंप हे एक मूर्ख व्यक्ती आहेत. त्यांचे माकडचाळे सतत सारं जग पाहत असतं. ते फार खोटं बोलतात. हे ही वारंवार सिद्ध झालंय, पण QMap सारख्या साईट, ट्रंप महान व्यक्तीमत्व असल्याचे सिद्ध करण्यात कसूर ठेवत नाहीत, बुद्धिभेद करणा-या चर्चा सतत सुरु ठेवतात..!

आपल्याकडे भारतात #Alt News ही वेबसाईट खोटी माहिती, फोटोज, व्हिडिओज आणि बातमी प्रसारीत करणाऱ्यांचे पितळ उघडे पाडते. खोटारडेपणा करणारे अनेक दिग्गज नेते, अभिनेते या पोर्टलने नंगे केले आहेत. अमेरिकेत तशीच एक Logically.ai नावाची साईट आहे. या साईटच्या पत्रकारांनी शोध घेतला तर धक्कादायक बाब समोर आली. सिटी ग्रुपच्या न्यू जर्सी येथील माहिती तंत्रज्ञान विभागाचा वरिष्ठ उपाध्यक्ष जेसन गेलीनस नावाचा महाभाग या साईटचा कर्ताधर्ता निघाला.

ट्रंप यांच्या काही अधिका-यांच्या तो संपर्कात होता. त्यांच्या मदतीने त्याने हा कारभार चालवला होता..पोलखोल झाली तसे QMap बंद करुन जेसन सुट्टीवर गेला, बँकेने चौकशी केली आणि सर्व अहवाल समोर ठेवून त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले, तसेच त्याच्यावर फौजदारी करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय.. हे असंच सेम टू सेम भारतातही सुरु आहे ना..? किंबहुना अधिक मोठ्या स्तरावर, मुख्य प्रवाहातील जवळपास सर्व माध्यमं हाताशी धरून..! अमेरिकेचे ट्रंप मोदींकडुन हे तंत्र शिकले की ट्रंप यांनी मोदींना शिकवले याचे उत्तर महत्वाचे नाही. हे दोघे एकसारखे आहेत. त्यांची धोरणं एकसारखी आहेत आणि हा योगायोग नाही.हे झाले प्रपोगंड्याच्या फायद्याचे डिज़ाइन. याची दुसरी बाजू म्हणजे विरोध करणा-यांना चेपणे! अशाच प्रमाणे अपप्रचार करुन विरोधी विचार मांडणा-याला गप्प करणे, फारच झालं तर त्याच्या विरोधात चौकशा लावणे, त्यात सुतावरुन स्वर्ग गाठून खरे-खोटे आरोप ठेवणे-नंतर अटक आणि त्या आरोपावरून दोषी-गुन्हेगार ठरवून छी-थू करणे, या सगळ्या प्रकारात त्याची लढण्याची शक्ती संपली पाहिजे. तो लाजुन घरी बसला पाहिजे..!

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणारे सत्य बोलत असतील आणि ते सत्य जर सत्ताधा-यांच्या विरोधात जात असेल तर मग बोलणा-याचे काही खरे नाही. त्याच्या वाट्यालाही बदनामी. त्यासाठी भारतात QMap सारख्या असंख्य वेबसाईट आहेत, वरुन नव्वद टक्के मुख्य माध्यमंही खरेदी केलेली आहेत, ते सर्व दिवसरात्र खुलेपणाने QMap पेक्षाही अधिक क्षमतेने काम करतात, सर्व प्रकारच्या सोशल माध्यमांवर नेत्यांच्या वाहवाहीसाठी भक्त आणि विरोधी विचारसरणीच्या लोकांना चेपण्यासाठी, घाण पसरवण्यासाठी असंख्य बेवारस औलादींची अखंड वळ्वळ सुरु असते. त्याजोडीला प्रवक्ते-नेते आणि कलाकारही..हे सगळे मिळून खोट्याचा खेळ मोठ्या खुबीने खेळतात.अभिनेता सुशांतसिह राजपूतची आत्महत्याच होती, असा अहवाल देणारे एम्सचे डॉ.सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील सात फ़ोरेन्सीक डॉक्टर्सचे पॅनल ताजे उदाहरण आहे. सुशांतची हत्या नव्हे तर ती आत्महत्याच आहे. हा त्यांनी अहवाल देताच सगळं नियोजन विस्कटलं, त्यामुळे हे सगळे सत्य बोलणारे शिव्यांचे धनी झालेत, त्यांना मोहीम राबवून भ्रष्टाचारी ठरवले गेलंय. सुशांतच्या आत्महत्येचा जेव्हा राजकीय वापर करायचा ठरला. तेव्हा पहील्यांदा 80 हजार फ़ेक अकाउंट तयार झाले, त्यावरुन मुंबई पोलिस आणि महाआघाडी सरकारच्या विरोधात मोहीम राबवली गेली, हे अकाउटंस हा एकूण कटाचा एक भाग होता. कलाकारांनी सुरुवात केली, पत्रकार वेडे झाले.

योग्यवेळी राजकीय पार्टीही उतरली, गुप्तेश्वर पांडेसारखे वरिष्ठ आयपीएस, बिहारचे पोलिस महासंचालक बेधूंद झाले, सगळा तमाशा झाल्यावर शेवटी जे साधायचे होते, त्यातले काहीच निष्पन्न झाले नाही. पण सरकारी यंत्रणेच्या जोरावर रिया चक्रवर्तीला जसे घेरले, तसे सुतावरुन स्वर्ग गाठून बाकी अपेक्षीत सर्वांना जात्यात घेतले गेले असते तर..? कितीतरी जणांचे आयुष्य उद्ध्वस्थ झाले असते. शेवटी न्यायालयातच खरे खोटे ठरणार ना..? पण न्यायालयातही न्याय मिळाला नाही तर..? सुशांतच्या केसमध्ये दिग्दर्शकांची स्क्रिप्ट नंतर विस्कळीत झाली, बहुदा आजारी होते म्हणून..! जेएनयू, CAA विरोधी आंदोलन, दिल्ली दंगल, त्यात अनेक निरपराधांना अडकवणे,संसदेचे कामकाज आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांवर विविध आरोप ठेवणे, चौकशा लावणे, काहींना जेल मध्ये पाठवणे, या मालिकेच्या सर्व स्क्रिप्ट्स तुलनेत टाईट होत्या..! पुलवामा स्क्रिप्ट होती की घटना- याचाही नीट शोध घेतला पाहीजे.विषय न्यायाचा म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई असे काय झाले, ज्यामुळे त्यांची भुमिका 360 डिग्रीमध्ये बदलली..?नंतर ते इतके शरण गेले की थेट सत्तेचे लाभार्थी झाले. सामजिक नेते डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा प्रामाणिक तपास करणा-या अधिका-यांचा अतोनात छळ केला गेला, त्यातून तपासात अडथळे आणले गेले, त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले गेले, त्यामुळेच बहुदा सत्य अद्याप समोर आलेले नाही.

काहीजणांना अटक झाली. मात्र, मास्टर माईड़ सुरक्षित आहेत. दहशतवादाला धर्म-जात नाही. हे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये पुरव्यासकट समोर ठेवणा-या शहीद हेमंत करकरेंच्या वाट्याला काय आले..? तुलनेत आरोपींना आज अधिक सन्मान मिळाला आहे- कारण हेच डिज़ाइन..! अनेक खोटे आरोप करुन आपला छळ सुरु असल्याने आपले कुटुंब प्रचंड घाबरले आहे,अशा भावना मांडून माझ्याकडुन हा तपास काढून घ्या, अशी विनंती करकरेंनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना केली होती.. आणि जस्टिस लोया..?! त्यांच्या मृत्युचे रहस्य कधी शोधले जाईल का..? ती हिंमत हे सरकार दाखवेल असे अजिबात दिसत नाही. मुद्दा हा की या सर्वांनी निपक्ष:पणे आपले कर्तव्य बजावले म्हणून छळले गेले, त्याच तंत्राचा वापर करुन. ही समोर आलेली उदाहरणे आहेत- जी सर्वांसमोर आली. अशी कितीतरी प्रकरणं असतील- त्यामध्ये संबंधीत अधिकारप्राप्त व्यक्तीने घाबरुन सत्य दाबले असेल, अशा कितीतरी घटना असतील, ज्यात सत्य दाबलं गेलं असेलच, उलट असत्य-फ़ेक सत्य म्हणून लोकांच्या समोर ठेवलं गेलं असेल.

उन्नाव, कठवा, मुजफ्फरनगर आणि आता हाथरस, बलरामपूर किती तरी उदाहरणं आहेत- ज्यामध्ये विषयाला फाटे फोडले गेले आहेत, गोंधळ निर्माण केला गेलाय, पिढीतांना न्याय सोडाच थेट आरोपी केलं गेलेय. हे प्रपोगंडा तंत्र, समजून यासाठी घेतलं पाहिजे की म्हातारी केव्हाचीच मेली आहे, ती मेल्यावरही दु:ख व्यक्त करण्याची अपेक्षा असलेले हसताना दिसत आहेत. काळ असा विचित्र सोकावला आहे..!
रफीक मुल्ला

Updated : 12 Oct 2020 3:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top