Home > मॅक्स ब्लॉग्ज > चांदीमुळे गावातील ९०% महिला झाल्या आत्मनिर्भर...

चांदीमुळे गावातील ९०% महिला झाल्या आत्मनिर्भर...

हुपरी या गावाला आज चंदेरी नगरी (Silvar City)म्हणून जो नावलौकिक मिळाला आहे त्या मागे येथील उद्योगशील कारागिरांचे कष्ट आहेत. पुरुषांना या कामात मदत म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांनी आज हा व्यवसायच हातात घेतला आहे. चांदी व्यवसायात आत्मनिर्भर होत स्त्रियांनी केलेला चंदेरी प्रवास आपल्या लेखणीतून मांडला आहे अजिंक्य आडके यांनी…

चांदीमुळे गावातील ९०% महिला झाल्या आत्मनिर्भर...
X

साधारणपणे दीडशे वर्षापूर्वी हुपरी येथे चांदी व्यवसायाची सुरुवात झाली. बघता बघता हा व्यवसाय हुपरी बरोबरच आसपासच्या गावात देखील पसरला. हुपरी गावास आज चंदेरीनगरी Silvar City म्हणून ओळख निर्माण झाली आहे. हुपरीतील बहुतांश कुटुंबे आज या व्यवसायात कोणत्या ना कोणत्या प्रक्रियेशी जोडली गेली आहेत. या गावात गेलं की आपल्याला अनेक घराबाहेर शेणकुटांची पेटलेली भट्टी किंवा दुपारच्या निवांत वेळेत घराच्या अंगणात चांदीचे काम करत असलेल्या स्त्रिया पाहायला मिळतात. खरं तर आजचं युग हे स्पर्धेचे युग आहे. आणि या युगात देखील हुपरी गावांने आपला नावलौकिक राखून ठेवला आहे. हा व्यवसायास इतकं नावलौकिक मिळण्यात जसे चांदी व्यवसायिक म्हणून पुरुषांचे योगदान आहे त्याच बरोबर येथील स्त्रियांचेही योगदान आहे.

चांदी व्यवसायातील स्त्रियांचा सहभाग व कामाचे स्वरूप

सुंदर व सुबक दागिने हे हुपरीच्या दागिन्यांचं प्रमुख वैशिष्ट्य. दागिने घडवताना एकूण पंचवीस ते तीस वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. अगदी कच्ची चांदी वितळवण्या पासून ते दागिने बनवण्या पर्यंत विविध प्रकारच्या कामांमध्ये कुशल, अकुशल कारागिरांची मोठी गरज भासते. त्यांच्याकडून विविध टप्प्यातील कामे पूर्ण करून चांदी पासून सुबक दागिन्यांची निर्मिती होते. यामध्ये बरीचशी कामे ही स्त्रियांकडून करून घेतली जातात. सुरवातीला फार कमी स्त्रिया या व्यवसायात होत्या पण जसजसे या व्यवसायाला गती आली तस तशी स्त्रियांची संख्या देखील वाढत गेली. चांदी व्यवसायाशी निगडीत सुरुवातीच्या काळात माट्या भरण्यासारखी प्राथमिक स्वरूपाची कामे स्त्रियांकडे दिली जात. बाकी कौशल्याची कामे पुरुष लोक करत होते. संसाराचा गाडा सांभाळत स्त्रिया दुपारच्या फावल्या वेळात हे काम करत. सुरवातीला महिलांना विशिष्ट वजनाच्या माट्या दिल्या जात होत्या. त्याची साखळी बनवून देण्याचे काम त्या करतात. त्यांना जशी सवड मिळेल त्यानुसार हे काम त्या करत. मात्र इथून पुढच्या सर्व प्रक्रिया पुरुषांकडून केल्या जात होत्या. कालांतराने मात्र नाजूक कामेदेखील स्त्रियांकडून होऊ लागली. पुरुषांपेक्षा महिला ही कामे काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे करता असे इथले व्यापारी सांगतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हुपरी जवळ पंचतारांकित एम.आय.डी.सी. उभारण्यात आली आहे. त्यामुळे गावातील तरुण मुले एम.आय.डी.सी मध्ये पैसे जास्त मिळतात म्हणून कामासाठी तिकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे महिलांनी अनेक कामांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असल्याचं बऱ्याच ठिकाणी दिसतं.

अलीकडच्या काळात कौशल्याची इतर कामे देखील महिला करू लागल्या आहेत. विशेषता साखळी डिझाईनचे स्टोव्हच्या सहाय्याने जोड काम करणे, विणकाम करणे अशी नाजूक कामेही स्त्रियांकडून होऊ लागली आहेत. ही कामे स्त्रियांना घरी दिली जातात. स्वतःच्या सवडीनुसार ही कामे स्त्रिया पूर्ण करतात. ज्यावेळी पती फिरतीला जातो त्यावेळी घरातील महिलाच चांदी कारखान्यातील विविध व्यवहार स्वतः पाहतात. मात्र एखादा कारखाना पूर्णपणे स्त्रियांकडून चालवला जातो असं एक देखील उदाहरण नाही. काही वर्षांपूर्वी चांदी उद्योजक प्रशांत एकांडे व त्यांच्या पत्नी अमृता एकांडे यांनी ६२ स्त्रियांना एकत्र घेऊन २००६ मध्ये खाजगी चांदी कारखाना सुरू केला होता. या कारखान्यात चांदी व्यवसायाशी संबंधित सर्व प्रक्रिया स्त्रियांकडून केल्या जात होत्या. सर्व स्त्रिया पूर्ण क्षमतेने काम करतात असा त्यांचा अनुभव आहे. मात्र त्यांचा हा प्रयोग आर्थिक कारणांमुळे बंद करावा लागला. अनेक व्यावसाईक हुपरीच्या आसपास तीस किलोमीटरच्या परिसरात जाऊन भरणीचे कामे येथील स्त्रियांना घरी नेऊन देतात. काम पूर्ण झाल्यावर साधारणपणे चार ते आठ दिवसात ते परत घेवून जातात. हुपरिपासून काहीच अंतरावर रणदिवेवाडी, रेंदाळ, इंगळी, रांगोळी, पट्टणकोडोली, तळंदगे, तळंदगे फाटा, सीमावर्ती कर्नाटकातील मांगुर, मारवाड या गावातील महिलाचा प्रामुख्याने हे काम करण्यात समावेश होतो.

हस्तोद्योग या स्वरूपात विकसित झालेला हुपरीतील चांदी व्यवसाय हा विशिष्ट जाती धर्मा पुरता किंवा सोनारापुरता मर्यादित राहिलेला नाही. जैन, मराठा, ब्राह्मण, मुस्लिम अशा सर्व जाती धर्माचे स्त्री-पुरुष हा व्यवसाय आज काम करत आहेत. या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. पूर्वी चांदी कारागीर म्हणून काम करणारे अनेक जण आज चांदी उद्योजक बनले आहेत. या व्यवसायाचे स्वतंत्रपणे प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर जावे जावे लागत नाही. या व्यवसायातील स्त्रियांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. मात्र त्यांच्या योगदानाची म्हणावी तशी दखल घेतलेली जात नाही. पुरुष कारागिरांना अनेक सवलती मिळतात मात्र तेच काम करणाऱ्या स्त्रियांना तुलनेने सवलती कमी आहेत. येथील महिलांना उत्तम प्रकारच्या ज्वेलरी डिझायनिंगचे प्रशिक्षण दिल्यास जागतिक स्पर्धेला तोंड देऊ शकतील असे दागिने याठिकाणी बनवले जाऊ शकतील.

स्त्रिया करत असलेली कामे

छुमछुम भरणी, तडे लावणे, माट्या भरणे, वाळे-तोडे लावणे, रूपाली, गजश्री भरणी, पैंजन बांधणे,जोड पोगसणे, घागरी बांधणे, टिक्का लावणे, झाळकाम करणे, सेलम चेन - खुशबू पट्टी बांधकाम, कास्टिंग, नाकीवाली भरणे, अँटिक मनी जोडकाम, पॉलिश पास्ता तयार करणे, अटणी काम, पॉवरप्रेस चालविणे, मीनावर्क भरणे, दागिने पॅकिंग ची कामे करणे आशा वेगवेगळ्या प्रकारची कामे स्त्रिया करतात.

केर धुनीचे काम करणाऱ्या स्त्रिया

हुपरितल्या कचऱ्यात देखील चांदी मिळते. धडी उत्पादक, आठवणी वाले, तासकाम करणारे अशा अनेकांच्या कामाच्या ठिकाणी काम करताना चांदीचे छोटे छोटे तुकडे पडतात. ते गोळा करून पुन्हा वापरणे त्यांना शक्य नसते. त्यासाठी ते दुकानातील दररोजचा पडणारा कचरा गोळा करून ठेवतात. आणि केरधुणी करणाऱ्या लोकांना तो विकतात. कचऱ्यातून चांदी बाजूला करून त्यावर गुजराण करणारा ही एक वर्ग आज हुपरित आहे. या कामाला केरधुणीचे असं म्हटलं जातं. विशेषता ज्यांची शेती नाही किंवा उत्पादनाचा इतर कोणताही सोर्स नाही अशा वर्गाकडून हे काम फार पूर्वीपासून केले जात. त्यामुळे तोच त्यांचा आज एक पारंपारिक व्यवसाय देखील बनला आहे.

चांदी दुकानात, चांदी कारखान्यात किंवा आठवणी ज्या ठिकाणी काढली जाते अशा ठिकाणचा कचरा आणून तो पाण्यात धुवून त्यातून चांदी वेगळी काढली जाते. या कचऱ्याचा चांदी बरोबरच इतर अशुद्ध अनेक गोष्टी असतात. कचऱ्यातील चांदी काशी वेगळी केली जाते? तर गोळा केलेला कचरा एका मोठ्या पातेल्यात घेतला जातो. तो पाण्यामध्ये धुतला जातो. पाण्यावर तरंगणारे जे पदार्थ असतात ते बाहेर काढले जातात. अशाप्रकारे जवळजवळ सात ते आठ वेगवेगळे प्रक्रियेनंतर जो तळाला उडणारा गाळ असतो त्यात चांदीच्या कणांसोबतच इतर अनेक धातू असतात. म्हणजे त्यामध्ये वाळू वगैरे अशा अनेक गोष्टी असतात. त्यातून दिसणारे जे चांदीचे कण आहेत ते एकेक वेचून बाजूला केले जातात. त्यानंतर ते मुशी मध्ये घालून खार, सोडा यासारखी केमिकल्स वापरून ते विशिष्ट तापमानाला तापवले जातात आणि त्यानंतर त्याची आठवण काढली जाते. त्यातून चांदीचा पाटला म्हणजे शुद्ध स्वरूपातील चांदी तयार केली जाते. त्याची विक्री करून त्यातूनच त्यांचे सगळं घर चालत असतं.

यासाठी आसपासच्या इतर ठिकाणावरून देखील कचरा विकत घेतला जातो. या सर्व प्रक्रिये पैकी कचरा विकत आणून घरांच्या स्त्रियांकडे सुपूर्द करण्याचे काम पुरुष मंडळी करतात. त्यानंतर इथून पुढची सगळी प्रक्रिया स्त्रियांकडून पूर्ण केली जाते. अगदी आठवी काढण्याचे एकदम किचकट काम सुद्धा आज स्त्रिया करतात. वयाची साठी उलटलेल्या महिलादेखील हे काम करताना मी पाहिले आहे. हे काम घरबसल्या करता येतं. हा व्यवसाय करतात अशी जवळजवळ शंभर कुटुंबे या गावात आहेत. की ज्यांचा संपूर्ण गुजराण हा या केरधुणीच्या कामावर होते. केस धुण्याचे काम गेली चाळीस वर्षे करणाऱ्या सुमन भंडारे यांचे वय आज साठीच्या आसपास आहे. आजही त्या आणि त्यांच्या कुटुंबातील इतर स्त्रिया हे काम करत आहेत. त्यांच्या नातेवाईक असलेल्या भारती घोंगडे या आठवणी काढण्याचे काम अगदी सहजपणे करतात. हे काम करताना त्या महिलांचा संपर्क कचरा, घाण पाणी याच्याशी दररोज येत असतो. त्या घरकामा व्यतिरिक्त जो वेळ असतो त्या वेळात हे काम करतात. मात्र एवढं सगळं करून येणारे उत्पन्न हे मात्र अगदी तुटपुंजी आहे. काही वेळा कचऱ्यातून जास्त चांदी मिळते तर काही वेळा खूप कमी. विशेषता अलीकडच्या काळात चांदी कामासाठी मशिनचा वापर वाढला आहे. त्यामुळे वाया जाण्याचे किंवा ही चांदी तुटून पडण्याचे प्रमाण फारच कमी झाला आहे. हे काम करणार्यांना सामाजिक मागास वर्ग म्हणून काही फायदे मिळतात बाकी सरकारकडून यांना कुठल्याही प्रकारची इतर मदत मिळत नाही.

या व्यवसायाचे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून फायदे :

१) कमी शिकलेल्या किंवा ज्या महिला काहीच शिकलेल्या नाहीत अश्यांना हे कौशल्य प्राप्त करून त्या चांगले पैसे कमवू शकतात.

२) अगदी घरात बसून हे काम करता येते. नोकरीप्रमाणे बाहेर गावी किंवा नोकरीच्या ठिकाणी जाण्याची गरज पडत नाही. आपले घरातले काम बघत बघत उरलेल्या वेळेत हे काम करता येते. आपल्या लहान मुलांना सांभाळणे हा नोकरी करणाऱ्या महिलांचा गंभीर प्रश्न यांना भेडसावत नाही.

३) स्त्री किंवा मुलींनी कामासाठी बाहेर न पाठविणाऱ्या परंपरावादी कुटूंबातील स्त्रियांना असे काम उपयुक्त ठरते यातून घरखर्चाला देखील हातभार लागतो. शिक्षण घेणाऱ्या मुली मोकळ्या वेळात हे काम करू शकतात. विशेषत: आर्थिकदृष्टया मागासवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी हे काम उपयुक्त ठरत.

तोटे

१) जे काम दिल जात ते चांदी उत्पादकांकडून दिले जाते. त्यामुळे त्यांनी किती काम देतील हे माहीत नसतं त्यामुळे चांदीमाल उत्पादकांकडून मुळणार्या कामावर पूर्णपणे अवलंबून रहावे लागते.

२)चांदीच्या दरात चढ उतार असतो. दरात अधिक वाढ झाल्यास ग्राहकांकडून खरेदी कमी होऊन मंदी जाणवते. अशा या मंदीच्या कालखंडात काम कमी मिळते.

३)आरोग्याच्या समस्या भेडसावतात. मासिक पगाराच्या तुलनेत हे काम करणाऱ्या स्त्रियांना मजुरी पोटी मिळणारा पैसा फारच कमी आहे.

४) पगाराप्रमाणे नियमित अर्थार्जनाची शाश्वती नाही.

Updated : 9 July 2023 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top