Home > Max Political > भावनिक मुद्दे नाही चालले की भाजपाची राजकीय नौका डुबू लागते !!

भावनिक मुद्दे नाही चालले की भाजपाची राजकीय नौका डुबू लागते !!

भावनिक मुद्दे नाही चालले की भाजपाची राजकीय नौका डुबू लागते !!
X

१९८० ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्या वर्षी झालेल्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचे १४ आमदार निवडून आले होते. १९८५ ला त्यात २ ने वाढ झाली. त्याचवेळी लोकसभेत भाजपाचे केवळ २ खासदार होते. पण अयोध्या प्रकरणाने १९८९ ला तेच संख्याबळ थेट ८५ इतकं झालं. अयोध्या चळवळीला भाजपा भारताच्या सांस्कृतिक व्यक्तिमत्वाचे प्रतिक म्हणते. भाजपाच्या २००१ च्या सुवर्ण जयंती अधिवेशनातील ठरावात भाजपाने आपला जनसंघापासूनचा प्रवास मांडला होता. त्या ठरावात भाजपा म्हणते की १९८९ च्या काॅंग्रेसच्या लोकसभा पराभवाचे शिल्पकार आम्हीच होतो.‌

१९९० ला महाराष्ट्रात शिवसेनेसोबतच्या युतीत १०४ जागा लढवून भाजपाने थेट ४२ पर्यंत उडी घेतली, तर शिवसेना मोठ्या भावाच्या नात्याने १८३ जागा लढवूनही ५२ वर मर्यादित राहिली. १९८९ ला जसं भाजपाने वी पी सिंगांच्या साथीने बोफोर्सवरून राजीव गांधींना लक्ष्य केलं होतं, तसं १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दाऊदशी संबंध असल्यावरून शरद पवारांना बदनाम केलं होतं. गोपीनाथ मुंडेंनी राज्यभर झंझावाती दौराच केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या भावाला थोडं खाली आणून भाजपाने ९० च्या तुलनेत शिवसेनेकडून १२ जागा अधिक मिळवल्या आणि युतीच्या आधारे स्वत:ला ४२ वरून ६५ पर्यंत वाढवलं.

केंद्रात १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतून भाजपा १६२ जागा मिळवून पहिल्यांदाच सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष म्हणून उभारला. त्यापाठोपाठ १९९९ ला १८२ जागा पटकावला. अटलबिहारी वाजपेयींचं नेतृत्व लाभलेलं सरकार त्या काळात कार्यरत असूनही देशाने भाजपाला पुन्हा संधी दिली नाही. २००४ आणि २००९ काँग्रेस युपीएच्या माध्यमातून पुन्हा सत्तेत आली. या दोन निवडणुकांत भाजपाची १३८ व ११६ अशी घसरण झाली. कारगील विजयावरून भाजपाने देशभर बनवलेला माहौल सत्तास्थापनेसाठी कामी आला नाही.

तीच गत महाराष्ट्र विधानसभेत झाली. १९९९, २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ५६, ५४ आणि ४६ अशी घसरली.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाने साम, दाम, दंड, भेद सगळं काही वापरलं. २००२ च्या गुजरात दंगलीतून कडवट हिंदुत्ववादी म्हणून उभारलेलं नरेंद्र मोदींचं नेतृत्व भाजपाने पणाला लावलं. तत्पूर्वी, पूर्वनियोजितरित्या आण्णा हजारे, माध्यमांना व देशातील उद्योगपतींना हाताशी धरून पध्दतशीरपणे भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनाच्या आडून काँग्रेसच्या विरोधात प्रचंड विरोधाचं वातावरण देशभरात तयार केलं. एक कृत्रिम मोदीलाट तयार करण्यात आली. राष्ट्रवाद चेतवण्यात आला. माध्यमांना स्पष्ट सुपारी होती. त्यांनी मोदींची प्रतिमा प्रखर राष्ट्रभक्त अशी बिंबवली. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असा तो माहौल होता.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने २८२ खासदार स्वबळावर निवडून आणले. ही संख्या आधीच्या लोकसभेपेक्षा १६६ ने अधिक होती. त्याच लाटेवर स्वार होऊन भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेसोबतची युती मोडीत काढून २६० जागा लढवल्या व १२२ जागांवर यश संपादन केलं. भाजपामागे फरफटत न जाता शिवसेनेने विरोधी बाकांवर बसणं पसंत केलं होतं. पण राष्ट्रवादीने सरकारला बाहेरून पाठींबा देण्याची भूमिका घेऊन भाजपाचा ताठरपणा वाढवला व शिवसेनेला नमतं घेऊन सत्तेत सामील व्हायला भाग पाडलं. त्याची परतफेड भाजपाने प्रवृत्तीनुसार, पवारांच्या राष्ट्रवादीवरच डल्ला मारून केली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांना पक्षात घेतलं व महाराष्ट्रातील जनतेसमोर विरोधक क्षीण असल्याचं चित्र निर्माण केलं. पण शरद पवारांच्या पलटवाराने महाराष्ट्रात पुन्हा एकदा विरोधकांचा आवाज मजबूत झाला. दिग्गज पक्षातून गेल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला नव्या चेहऱ्यांना संधी देता आली. ज्यांनी पक्षांतर केलं, त्यातल्या अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यामुळे शिवसेना-भाजपाचा पारंपारिक मतदार नाराज झाला. सर्व विरोधकांनी निवडणूक पूर्व मोट बांधली असती तर भाजपाचा धुव्वा उडाला असता, असं निकालाची आकडेवारी सांगते.

जीएसटी, महापूर, पीएमसी, खड्डे त्यात आगीत तेल ओतणारी भाजपा नेत्यांची बेताल वक्तव्ये, आरे प्रकरणातली मुजोरी, देशभक्तीचा उबग येईल इतका अतिरेक, विरोधात बोलेल त्याची मुस्कटदाबी यांमुळे सर्वसामान्यांत असंतोष होता. तरीही, भाजपाने माध्यमांना हाताशी धरून निवडणूक एकतर्फी होणार असं वातावरण तयार केलं होतं. ईव्हीएमच्या सोबतीचीही शक्यता होतीच. पण समाजमाध्यमातून सातत्याने उठत राहिलेला आक्रमक आवाज, विरोधकांचा तितकाच आक्रमक पवित्रा व सावधगिरी यांमुळे या निवडणुकीत हवी तशी ईव्हीएमशी छेडछाड करता आलेली नाही, असं दिसतंय. तरीही, अनेक ठिकाणांहून सर्वसामान्य जनतेतून न देऊनही मत भाजपाला जात असल्याच्या तक्रारी व भाजपाच्या नेते, कार्यकर्त्यांकडे सापडून आलेल्या ईव्हीएम मशीन्सचे विडियो यामुळे हेराफेरीचा प्रयत्न भाजपाकडून झाला असल्याचा संशय सामान्य लोकांतून, भाजपाच्या जागा कमी झाल्या तरी व्यक्त होतोच आहे. ईव्हीएम हातात असती तर १२२ वरून १०५ वर संख्याबळ का आलं असतं, असा भाजपाचा युक्तिवाद आहे, पण इतक्या असंतोषानंतरही भाजपाच्या १०५ जागा येणंही लोकांना पचनी पडत नाहीये. लोकसभा निवडणुकीतही लोकात प्रचंड असंतोष असतानाही देशात भाजपाला एकट्याला ३०३ जागा मिळाल्यावर लोकांनी तोंडात बोटं घातली होती. तीच प्रतिक्रिया आताही आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या ताज्या निकालात मतांच्या एकूण टक्केवारीत भाजपा प्रथम क्रमांकावर आहे. २५ टक्क्यांहून अधिक मतं भाजपाने एकट्याने घेतलीत. एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता, शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी काँग्रेसने पाठींबा देण्याची शक्यता धुसर आहे, तर जनमताचा रेटा पाहता भाजपासोबत जाणं शरद पवारांनाही शक्य होणार नाहीये. त्यामुळे शिवसेना-भाजपाचंच सरकार स्थापनेची शक्यता अधिक आहे. एकत्र राहणं दोन्ही पक्षांची राजकीय अपरिहार्यता आहे. फक्त यावेळी भाजपाला तुलनेत निम्म्या संख्याबळावर असलेल्या शिवसेनेला फरफटवता येणार नाही, असं चित्र आहे. एकंदरीत भाजपाचा राजकीय प्रवास हा प्रत्येक टप्प्यावर कुठल्या ना कुठल्या भावनिक मुद्द्यांचा आधार घेत व वावटळ उठवतच झाला आहे.

आपल्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनातील ठरावात सामाजिक तणावमुक्त भारत हे आपलं ध्येय असल्याचं भाजपाने म्हटलं होतं. मात्र, भाजपाची एकूण राजकीय वाटचाल आणि सद्यस्थिती पाहता, हे ध्येय म्हणजे एक विनोद होऊन बसला आहे. स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक विखारी परिस्थिती भाजपाने देशात व राज्याराज्यांत करून ठेवली आहे. पण, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य लोकांनीच जेव्हा आपल्या प्रश्नांवर समाजमाध्यमात रान उठवलं, तेव्हा भाजपाची ट्रोलधाडही बचावात्मक पवित्र्यात गेली. भावनिक मुद्दे नाही चालले तर भाजपाचे राजकारण डुबायला लागतं, हा संदेश ताज्या निकालातून अधोरेखित होताना आपल्याला दिसतो.

Updated : 25 Oct 2019 4:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top