धक्कादायक, covid सेंटर मध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा...
X
दिनांक २९ ऑगस्ट २०२० रोजी देशभरात आर्किटेक्ट अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी आवश्यक असणारी प्रवेश परीक्षा पार पडली.हि परीक्षा घेण्याची जबाबदारी नाटा या संस्थेकडे आहे. अहमदनगर जिल्ह्यातील या परीक्षेची नेमकी स्थिती.
या ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देण्याचा पर्याय होता आणि ज्यांच्याकडे घरी पुरेसे नेटवर्क अथवा संगणक नाहीये त्यांना सेंटरवर परीक्षा देण्याचा पर्याय होता.
परीक्षेचे ठिकाण शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेल होत.परीक्षेचा कालावधी दोन सत्रात होता जो सकाळी साडेबारा ते अडीच या वेळेत होता.कोविड नियमांचे पालन करण्यासाठी, कागदपत्र तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी सव्वा अकरा वाजताच सेंटरवर बोलवण्यात आलेले होते.
परीक्षेचे ठिकाणी पोहोचल्यावर विद्यार्थी आणि पालकांना पहिला धक्का बसला.परीक्षेच्या ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वारावर कोविड सेंटर म्हणून मोठी पाटी लावण्यात आलेली होती.ज्या प्रवेशद्वारात विद्यार्थी रांगेत उभे होते तिथूनच कोविड रुग्णांची ये जा सुरु होती.मात्र कोविड टेस्ट करून तिथे थांबवलेल्या रुग्णांच्या संबंधी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या पैकी कुणालाही पीपीई कीट घालून वावरताना पाहिले नाही.
तापमान तपासून हात निर्जंतुक करून विद्यार्थी परीक्षेच्या हॉल मध्ये पोहोचल्यावर अगदी शेजारच्या खोल्यामध्ये, हाकेच्या अंतरावर सलाईन व्यवस्था असलेले कोविड बेड्स त्यांना दिसत होते. मार्च २०२० पासून घरात अडकून पडलेल्या बारावी परीक्षा दिलेल्या मुलांना पहिल्यांदा परीक्षेसाठी बाहेर पडल्यावर त्यांना तुम्हाला तीन तास कोविड रुग्णालय असलेल्या ठिकाणी परीक्षा द्यायची आहे हे समजल्यावर काय मानसिक स्थिती होईल आणि त्यांच किती प्रमाणात मन एकाग्र होऊन ते परीक्षा देऊ शकतील हे तुम्ही ठरवा.
परीक्षेच्या जागेवर कुठेही निर्जंतुक केल्याची चिन्हे मुलांना दिसत नव्हती.मुलांनी आपापले मास्क, अल्कोहोल युक्त निर्जंतुक करण्यासाठी द्रावण , हातमोजे नेलेले असले तरी परीक्षेच्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जेमतेम दोन फुट अंतर ठेवून होती.सहा फुटांचे अंतर राखावे हि सूचना फक्त कागदावर आहे काय ? प्रत्यक्ष परीक्षेचा वेगळाच सावळागोंधळ होता.
नाटा ने जिंजर नावाच्या कुठल्या एजन्सीला परीक्षेचे काम दिले, त्यांनी ते अजून दुसऱ्या कंपनीला दिले आणि जिल्हा पातळीवर प्रत्यक्ष परीक्षा घेणारी खाजगी एजन्सी तिसरीच. परीक्षा सुरु झाल्यावर अनेक मुलांचे लॉगीन होण्यात अडचणी आल्या, लॉगीन झाल्यावर अनेकांना प्रश्नच दिसेनात, प्रश्न दिसले तर उत्तरांचे पर्यायाच दिसेनात.हे अडथळे पार करत मुलांनी परीक्षा द्यायला सुरुवात केल्यावर एक प्रश्नाचे उत्तर निवडून “ सेव्ह “ म्हणून पुढल्या प्रश्नाकडे जाताना मधला प्रश्न गाळूनच थेट तिसऱ्या प्रश्नावर संगणक उडी मारत होता. हा असा गोंधळ सुरु असताना अडीच वाजता दोन सत्र संपल्यावर १४-१५ विद्यार्थी असे उरले ज्यांची परीक्षा होऊच शकलेली नव्हती.
पुन्हा नव्याने लॉगीन करून त्यांना कशीबशी परीक्षेची व्यवस्था करून साडेचार पावणे पाचला परीक्षा संपली.अडीच ऐवजी पावणे पाच वाजता विद्यार्थी मोकळे झाले. सकाळी साडेअकरा ते संध्याकाळी पावणे पाच इतका काळ पालक आणि विद्यार्थी तिथेच. या अनागोंदीचा जाब विचारायला गेल्यावर परीक्षा घेणाऱ्या लोकांनी उडवाउडवीची उत्तर दिली. कॉलेजने जागा भाड्याने दिलेली त्यामुळे त्यांची जबाबदारी नाही, नाटा चा कुणीही प्रतिनिधी नाही, अशावेळी पालकांनी निदान आम्हाला आमच्या लेखी तक्रारीची पोहोच द्या म्हणून विनंती केल्यावर त्यालाही नकार मिळाला.आता पालकांनी इमेल करून तक्रार केली तरीही त्यांच्याकडे परीक्षा न झाल्याचा कुठलाही पुरावा नाहीये.
या प्रवेश परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी दहावी पास झाल्यापासून कोर्स करतात, तीन तीन वर्षे मेहनत घेतात त्यांच्या दोन तीन वर्षांच्या मेहनतीवर दोन तासात पाणी फिरवून सगळ्या आशा आकांक्षा धुळीला मिळणार असली तर याला जबाबदार कोण ? इतक्या भीतीदायक वातावरणात परीक्षा देताना नैराश्य येऊन मुलांना मानसिक त्रास झाल्यास जबाबदार कोण ? इतक्या धोकादायक अवस्थेत परीक्षा देऊन जर शेकडो विद्यार्थी आणि पर्यायाने त्यांचे पालकही कोरोना बाधित झाले तर त्यांच्या आरोग्याची , जीवाची जबाबदारी कोणावर ? परीक्षा घेण्याचा अट्टाहास नेमका कुणाचा आणि कुणाला या सगळ्यातून फायदा मिळवायचा आहे ?