News Update
Home > मॅक्स ब्लॉग्ज > धर्म लैंगिक भावनेवर बंधन आणू शकतो का?

धर्म लैंगिक भावनेवर बंधन आणू शकतो का?

धर्म लैंगिक प्रेरणांना बांध का घालू शकला नाही? धर्माचा आणि सेक्सशी काही संबंध आहे का? हस्तमैथून करणं पाप आहे का? वाचा डाॅ. प्रदीप लोखंडे यांचा लेख

धर्म लैंगिक भावनेवर बंधन आणू शकतो का?
X

धर्म म्हणजे एकच सदरा सर्वांना बसतो असे म्हणणारा पंथ. त्याच धर्माने जे सेक्सविषयी नियम केले, बंधने घातली त्याचा जीवशास्त्र किंवा जनुकशास्त्राशी काहीही संबंध नाही. सामाजिक लैंगिक वृत्ती ही प्रत्येकाच्या लैंगिक नकाशातून येते. अशा वेळी धर्म त्याचा लैंगिक नकाशा प्रत्येकाच्या लैंगिक नकाशावर थापायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळी त्याच्या पदरात अपयश येते!!

विचार करा... किती तरी धार्मिक पापभिरू, मांत्रिक, धर्मगुरू, भटजी, गुरु-महाराज-बुवा, हे वेश्या किंवा जोडीदाराशिवायच्या अन्य स्त्रिया, तरुण मुले किंवा एकांत ठिकाणी लैंगिक चाळे व संबंध ठेवताना आढळले आहेत...ते याच कारणाने!

धर्म कधीही लैंगिक प्रेरणांना बांध घालू शकलेला नाही आणि अनेकानेक संबंधात जाण्यापासून रोखू शकलेला नाही. कारण तसे असते तर प्रत्येक धार्मिक व्यक्ती कधीही लैंगिक आचरणासाठी धर्माने घालून दिलेल्या नियमांच्या बाहेर गेली नसती.

दुसरे असे की, सामाजिक व लैंगिक वृत्ती ही धर्माने आखून दिलेल्या तत्वात बसवायची म्हटली तर स्त्रिया त्यास जास्त बळी पडणार. यासाठी या वृत्तींचे गुणधर्म तपासून घ्यावे लागतील. " अनिर्बंध वृत्तीच्या" लोकांमध्ये पुढील गोष्टी आढळतील...

• जास्त बहिर्मुखी

• जास्त मोकळेपणा

• कमी सहमत होणे

• जास्त लैंगिक आवडीचे

• दबले जाण्याची शक्यता कमी

• जास्त भावनिक प्रतिक्रिया देणारे

• जास्त धोका पत्करणारे

• जोडीदाराशी अत्यंत कमी जुळवून घेणारे.

"बंधनतील वृत्ती" मानणाऱ्या लोकांमध्ये...

• अंतर्मुखी

• सहज सहमत होणारे

• लैंगिकतेची भीती वाटणारे

• सामाजिक दृष्ट्या दबावाखाली असणारे

• कमी भावनिक उद्रेक होणारे

• कमीत कमी धोका पत्करणारे

• अतिशय सुरक्षित वाटते म्हणून जुळवून घेणारे असे प्रत्येक वृत्तीचे ऊणे व अधिक आहे.

धर्माचे म्हणणे असे असते की सेक्सच्या बाबतीत धोके पत्करणे, बहिर्मुखी असणे धोक्याचे आहे. लग्नापूर्वी सेक्स करू नये. पोर्नोग्राफी त्याज्य करावी. विवाहबाह्य संबंध नसावेत. हस्तमैथुन म्हणजे पाप, इत्यादी. असे अनेक नियम धर्म तयार करतो आणि इथेच विसंगती देखील आहे.

त्या त्या धर्माचे बहुसंख्य उद्गाते हे अनिर्बंध वृत्तीचे आढळतात आणि धर्म पाळणारे मात्र निर्बंधात असतात. विरोधाभास आणखी एक आहे. जर धर्मगुरु निर्बंधी वृत्तीचा असेल तर अनिर्बंधी पण धर्म मानणारे अनुयायी व लोक यांच्यावर निर्बंध कसा लागणार? हा सगळा घोळच आहे! यात काही शंका नाही की मानवाच्या या दोन्ही वृत्ती धोकादायक आहेत आणि त्यातून अनेक समस्या निर्माण होतात.

मग आपण हे दाखवून द्यायला नको का की आपल्यातील "जी" वृत्ती आहे ती "तीच" आहे. ती एखाद्या बुरख्याखाली लपवून का ठेवायची? हा दांभिकपणा होत नाही काय? खास करून अतिशय हटवादी असलेल्या ठाम मतात गुरफटलेल्या धर्माच्या पांघरून खाली? असे असेल तर दोन्ही बाजू चूक किंवा बरोबर कसे म्हणायचे? कारण दोन्ही वृत्ती आहेत! ज्या जशा आहेत तशा राहणार आणि त्या स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही.

जे लैंगिकदृष्ट्या मुक्त आहेत त्यांच्याही समस्या आहेत. भावनिक गुंतागुंत आणि रोग कसे हाताळायचे हा त्यांचा मोठा प्रश्न आहेच पण यातही एक गोष्ट अशी आहे की जे मुक्त वादी आहेत त्यांना सेक्ससाठीची जी नाती ठेवायची असतात त्यात त्यांना खूप काळजी घ्यावी लागते. कारण मुक्त स्वातंत्र्य जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची जबाबदारी देखील घ्यावी लागते. म्हणजे स्वातंत्र्य मिळाले म्हणून काही कसेही वागायचे त्यांना लायसन मिळत नाही. मिळाले तरी त्यात समस्याग्रस्त राहणे आलेच. इथे धर्माने काही नाक खूपसायचे काही कारण नाही.

जे स्वतः वर नियम लावून घेऊन जगत राहतात त्या वृत्तीच्या लोकांचे म्हणणे असते की इतरांनीही तसेच वागावे. मग ते शेजारी असो, आपले बहीण-भाऊ असो, नाहीतर आपला जोडीदार असो. त्यांच्या या अतिरेकी आग्रहाचा परिणाम नाते बिघडण्यात होतो. म्हणजे बंधने लादणारे पालक आपल्या बंधने न पाळणार्या मुलाला समजून घेऊ शकत नाहीत आणि नैसर्गिक वृत्तींना जर कोणी घालून पाडून बोलू लागले तर विषय संपला, अशा दोन्ही वृत्तीचे व्यवहारात परिणाम काय दिसतात ते काही उदाहरणासहित सांगता येईल.

सामान्यपणे एकूण समाजापैकी १० ते २० टक्के लोक हे नैसर्गिकपणे बंधने पाळणारे आढळतात. ते आपल्या धर्माच्या रूढी-परंपरांचे पालन इमानेइतबारे करतात. कारण ती त्यांची नैसर्गिक वृत्ती असते. त्यांना हस्तमैथुन विषयी तिटकारा असतो. पोर्नोग्राफीत अजिबात रस नसतो. अशी जोडपी फक्त एकाच पद्धतीच्या आसनाने संभोग करण्याने समाधानी असतील. त्यांना याबद्दल काहीच वाटणार नाही नाही. ते त्यांच्या अशा निवडलेल्या जीवनशैली प्रमाणे बरोबरच वागत आहेत.

बंधने झुगारणारे बरेच जण असतात. त्यांना लैंगिक व्यवहार कधीही करण्यात गैर वाटत नाही. पोर्नोग्राफी पाहताना हस्तमैथुन करण्यात काहीच वावगे नाही असे त्यांना वाटते. आपल्या कामाच्या ठिकाणी या विषयी उघडपणे बोलणे गैर वाटत नाही.

या दोन्ही वृत्तीच्या अधेमधे अनेक जण असतात. त्यांना वेगळे काहीतरी संभोगा वेळी करावेसे वाटते पण तेही अधेमधे जमेल तसे. तीच गोष्ट पोर्नोग्राफीविषयी किंवा लैंगिक समाधान देणाऱ्या वस्तूंविषयी. दुसऱ्यांना कल्पनेत आणून त्याच्याबरोबर सेक्स ही गोष्ट यांच्या बाबतीत अधेमधे घडते आणि हस्तमैथुनहि अधूनमधून घडते.

पण सगळ्यात त्रासदायक गोष्ट ही आहे की धार्मिक जोडपे आहे पण एक जण स्वातंत्र्यवादी आणि दुसरा बंधनवादी असेल तर मात्र मोठा झगडा उभा राहतो. धार्मिक जोडीदारांच्या मनात सतत या सगळ्यांमुळे धार्मिक अपराधीपणाचा भाव राहतो. त्यामुळे मुक्तता वाद्यावर बंधन घातल्यामुळे लग्न मोडते आणि लैंगिक संबंध संपतात. हे स्त्री व पुरुष दोघांनाही लागू पडते. स्त्रिया खरे तर खूपच बंधनात असतात. पण त्यांना सेक्सची इच्छा असतेच आणि नवऱ्याकडून जर ते त्यांना हव्या त्या प्रमाणात मिळाले नाही तर ते इतरांकडूनही हवे असते. पण धार्मिक चुकीच्या कल्पना किंवा टाबू त्यांना अडकवून ठेवतात. एवढे की त्यांना आपल्या नवऱ्याबरोबर खुलेपणाने याविषयी चर्चा देखील करता येत नाही आणि काही ठरविता देखील येत नाही.

जे धर्म पाळतात पण स्वातंत्र्यवादी आहेत त्यांची पाप आणि पुण्याच्या हौदात चांगलीच धुलाई होत राहते. त्यातून त्यांच्यात अपराधीपणा निर्माण होतो. ते आपल्या शरीर धर्मानुसार वागतात पण त्यानंतर त्यांना प्रचंड पश्चाताप होत राहतो. त्यांचे वागणे सेक्सच्या बाबतीत विचित्र बनते. मग ते मानसिकता बिघडली की काय असे वाटण्याइतपत सेक्स विषयी बोलतात-वागतात. खरेतर धार्मिक शिकवण लैंगिकतेच्या बाबतीत चुकीचीच गोष्ट सांगत आहे. पण स्वातंत्र्यवादी धार्मिकांना असे वाटू लागते की आपण काही तरी धर्म- देवाच्या आज्ञेविरुद्ध करीत आहोत. मग देवाची उपासना, प्रार्थना करण्याची सवय लागते. मग ते पण करायचे आणि हे पण करायचे या चक्रात तो अडकतो. म्हणजे पाप पण करायचे आणि पापाचा नाश पण करायचा या चक्रामुळे तो सेक्सविषयी सद्सद्विवेक बुद्धीने विचार करू शकत नाही आणि मग तो बिघडत राहतो आणि जातो..!!

अधार्मिक स्वातंत्र्य वाद्यांना मात्र या गोष्टींना तोंड द्यावे लागत नाही. त्यांना तोंड द्यावे लागते ते वेगळ्या गोष्टीस. आपण मुक्तपणे सेक्स करताना कुणावर अन्याय तर करत नाही ना याची जाणीव त्यांच्यात निर्माण होऊ लागते. ते स्वतः व इतरांना जर मानसिक-भावनिक इजा करत असेल तर त्याविषयी काय करायचे याचाही विचार करतात. आपल्या गरजा व इच्छा मोकळेपणाने व्यक्त करीत राहिल्याने जोडीदाराशी ते प्रामाणिकपणे सेक्स करण्याविषयी बोलतील व वागतील. त्यामुळे सेक्सच्या आहारी गेलेले हे लोक आहेत असे जर कोणी म्हणत असतील तर ते चूक आहे.

सेक्सासक्ती किंवा संभोगासक्ती हा शब्द धार्मिकांनी निर्माण केला आहे. स्वैर सेक्स वाले असा शिक्का ते दुसऱ्यांवर थापतात. परंतु त्यात काही सत्य नाही. धर्मगुरू आणि अपराधीपणाचा गंड असलेल्यांची ती एक प्रमुख गोष्ट आहे.

म्हणूनच सेक्स वृत्ती ही प्रत्येकाची भिन्न असते व ती आपण आहे तशीच स्वीकारण्यात शहाणपणा आहे !!


सेक्स वर कोण कोणते घटक परिणाम करतात?

- डॉ. प्रदीप पाटील

Updated : 13 May 2022 8:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top