Home > मॅक्स ब्लॉग्ज > The Hite Report : स्त्रिया हस्तमैथून करतात का?

The Hite Report : स्त्रिया हस्तमैथून करतात का?

स्त्रिया हस्तमैथून करतात का? स्त्रीला कामापुर्तीची काय गरज आहे? स्त्रीच्या दृष्टिकोनातून लैंगिक क्रांती म्हणजे काय? स्त्रियांना आपली लैंगिक मत व्यक्त करण्याचा अधिकार का नाही? स्त्री लैंगिकतेच्या मिथकांना आव्हान देणाऱ्या संशोधिका काम शेरे हाईट यांच्या The New Hite Report पुस्तकाचा रिव्ह्यू वाचा डॉ. प्रदीप पाटील यांच्या लेखातून...

The Hite Report : स्त्रिया हस्तमैथून करतात का?
X

एकविसाव्या शतकात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात आघाडी घेत आहेत. त्यांचे स्वातंत्र्य भौतिक क्षेत्रात किंवा कार्यक्षेत्रात विस्तारते आहे. ती मागे होती ती एकाच बाबतीत. ते म्हणजे तिला तिच्या देहाबाबतीत आत्मविश्वास वाटत नव्हता. तिची लैंगिकता कशी असते, कशी असावी व ती लैंगिक समस्यांतून मुक्त व्हावी याची कोणतीही फिकीर समाज बाळगत नव्हता.

पण जागतिकीकरणाच्या वेगात सारेच काही बदलत चालले आहे. लैंगिक विज्ञानात नवनवीन घडामोडी व संशोधने पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे स्त्रीला स्वतःच्या लैंगिकतेची चांगली ओळख होऊ लागली आहे. तिचे शरीर व तिची लैंगिक मानसिकता याविषयी स्त्रियांमध्ये आता सजगता येऊ लागली आहे. स्त्रीमध्ये आलेली ही सजगता टिपण्याचे काम शेरे हाईट या स्त्री संशोधिकेने केले आहे. या सर्व गोष्टी तिने आपल्या " द न्यू हाईट रिपोर्ट " या पुस्तकात स्पष्टपणे दिल्या आहेत. हा एक रिपोर्ट आहे. यापूर्वी "आॅन फीमेल सेक्शुअलिटी" या नावाने तो प्रकाशित झाला होता.

हाईटने एक प्रश्नावली तयार करून ती अमेरिकेतील स्त्रियांना दिली. हजारापेक्षा जास्त स्त्रियांनी या प्रश्नांची उत्तरे पाठविली. स्त्रियांच्या खाजगी लैंगिक आयुष्याविषयी अनेक प्रश्न या प्रश्नावलीत होते. स्त्रिया हस्तमैथुन कशा करतात? किती वेळा करतात? इत्यादी. स्त्री हस्तमैथुनाविषयीचे प्रश्न त्यात होते. त्याच बरोबर उत्कट कामक्षण कोणते? व कसे वाटतात?या विषयी काय मत आहे? आपल्या जोडीदाराविषयी कोणती लैंगिक मते आहेत? स्त्रीला स्त्रीविषयी व नात्यातील अन्य नातेवाईकांविषयी कोणत्या भावना वाटतात? असेही प्रश्न समाविष्ट केले गेले होते. ते अमेरिकेततूनच नव्हे तर जगभरातूनच सर्व स्त्रियांनी वरील प्रश्नांची उत्तरे" द हाईट रिपोर्ट" मध्ये दिली आहेत.

आपली लैंगिक मते व्यक्त करण्याचा आपल्याला अधिकार आहे असे बहुसंख्य स्त्रियांनी मत नोंदविले आहे. त्याचबरोबर शिश्निका उद्दीपणाचाही अधिकार स्त्रीने वापरावा असा आग्रह व्यक्त केला आहे. हाईटच्या या नवीन रिपोर्ट मुळे खूप मोठा गदारोळ उठला होता. शेरे हाईट ही स्वतः मानवी नाती व लैंगिक वर्तन या विषयातील तज्ञ आहे. स्त्रीवादी चळवळीत तिचा सहभाग दीर्घकाळापासून आहे. तिची स्वतःची न्यूयॉर्कमध्ये संस्था होती. 'हाईट रिसर्च इंटरनॅशनल' नावाच्या या संस्थेत खाजगी व सार्वजनिक व्यवहारातील लैंगिक नीती या विषयावर प्रशिक्षण व संशोधन केले जात होते. जपानमधील निहाॅन विद्यापीठात ती शिकवत असे त्यामुळेच तिच्या रिपोर्टला एक वजन प्राप्त झाले आहे. तिच्या या पुस्तकास " दि अमेरिकन असोसिएशन ऑफ सेक्स एज्युकेटर्स, काऊंसेलर्स अँड थेरपिस्टस" या नामांकित संस्थेचा पुरस्कारही मिळाला आहे. या पुस्तकाच्या २५ लक्षाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. सुमारे पावणे सातशे पानांच्या या पुस्तकात नऊ विभाग आहेत.
सुरुवातीलाच स्त्रीची लैंगिक शरीररचना दिली आहे. शिश्निकेविषयीची रचना नीट व संपूर्ण दिली आहे. शिश्निका म्हणजे इंग्रजीत क्लायटोरीस असे म्हणतात. शिश्निका ही स्त्रीस अमर्याद लैंगिक आनंदाची अनुभूती देते हे या ठिकाणी ठासून सांगितले आहे. त्याचबरोबर स्त्रीचे शरीर म्हणजे 'घाण', 'अस्वच्छ', 'वासकट' वगैरे मतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. स्त्रीची योनी जेव्हा स्फुलकित होते तेव्हा स्त्रीत्वाची भावना किती सुंदर आणि आनंदी बनते हे नमूद केले आहे. पहिला विभाग हस्तमैथुन यावर आहे. हे अनेक स्त्रियांनी शरीर आनंद मिळतो म्हणून हस्तमैथुन करते असे सांगितले. काही स्त्रियांना असे करणे पाप वाटले किंवा त्यांना अपराधीपणाचे वाटले. पण नंतर त्यांनी त्यावर मात केली. इतर स्त्रियांनी हस्तमैथुन करण्यास ठाम नकार दिला आहे. सर्वच्या सर्व स्त्रियांना मात्र असे शिकविले गेले होते की हस्तमैथुन करणे चुकीचे आहे व करू नये.

जर जोडीदार नसेल तर त्यास पर्याय म्हणून हस्तमैथुन चांगला उपाय आहे असे अनेक स्त्रियांनी सांगितले. तर काही जणींना आपल्यातील लैंगिकता कशी व किती आहे हे हस्तमैथुनानंतर समजले. आपले स्वातंत्र्य आपणास गवसले असेही काहीजणींनी सांगितले. एकूण उत्तरे दिलेल्या स्त्रियांपैकी सुमारे ८१ टक्के स्त्रिया हस्तमैथुन करतात असे व १५% करीत नाहीत असे आढळले. सुमारे एक तृतीयांश स्त्रियांना हस्तमैथुनाने कामपूर्ती होते असे दिसते.

दुसरा विभाग आहे कामपूर्ती किंवा आॅरगॅझम वर. स्त्रीला कामापुर्तीची काय गरज आहे? असे मत व्यक्त जर कोणी करीत असेल तर निश्चिंातपणे तुम्ही समजा की तो "पुरुष" आहे. पुरुषांनी फक्त कामपूर्ती मिळवली तर स्त्रीस नैराश्य येईल हे अनेक जणींनी नोंदविले आहे. काही जणींना मात्र अशी कामपूर्ती सेक्स करताना येते याचा पत्ताच नव्हता. तर काही जणींना ते महत्त्वाचे वाटत नव्हते. दीर्घ काळाची कामपूर्ती खूपच आनंददायी असते असे अनेक स्त्रियांनी नोंदविले आहे. पण पुरुष मात्र दीर्घकाळासाठी थांबत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे. कामपुर्ती म्हणजे नक्की काय होते याविषयी प्रत्येकीने त्याविषयी वर्णनही केले आहे. विशेष म्हणजे सर्वजणींना खूप प्रेमळ नाजूक आणि खूप जवळ गेल्याची भावना दाटून येते. अनेक जणींना एकापेक्षा जास्त कामपूर्तीच्या लाटा येतात तर काही जणींना एक कामपूर्ती पुरेशी वाटते. पुरुषी पद्धतीने कामपूर्ती कशी वाटते यावर विविध मते व्यक्त केली आहेत. कामपूर्तीचा क्षण जवळ आलेला असताना जर फोन रिंग वाजली, दरवाजा वाजवला, मुल जागे झाले किंवा जोडीदारास अगोदर कामपूर्ती झाली तर बहुसंख्य जणींना त्रास होतो किंवा त्या चिडतात. अनेक स्त्रिया कामपूर्तीसाठी व्हायब्रेटर्सचाही उपयोग करतात.

तिसऱ्या विभागात संभोग व त्यातून येणारी कामपुर्ती याविषयी आश्चर्यकारक मते व्यक्त केली आहेत. बहुसंख्य स्त्रियांनी असे म्हटले आहे की प्रत्येक संभोगातून कामपूर्ती मिळतेच असे नाही. फक्त तीस टक्के स्त्रियांनी थेट संभोगातून कामपूर्ती नेहमी मिळते असे म्हंटले आहे. शिश्निकेच्या मर्दनातून मिळणाऱ्या काम पूर्तीपेक्षा थेट मैथुनातून मिळणारे सुख कमी असते असे बहुसंख्य जणींना वाटले. जवळपास ३२ टक्के जनींना थेट मैथुनाने कामपूर्ती कधीही मिळाली नाही. यामध्ये सेमूर फिशर, अल्फ्रेड किंसे, हेलेन काप्लान, व्हर्जिनिया जॉन्सन यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष ही दिले आहेत.

स्त्रियांना मैथुनातून कामपूर्ती मिळालीच पाहिजे असे गुलाबी चित्र का रंगविण्यात आले आहे त्याची तीन कारणे शेरे हाईटनी सांगितली आहेत. पहिले कारण म्हणजे स्त्रीचे काम पुनरुत्पादनाचे आहे म्हणून तिने संभोग करणे जरुरीचे आहे. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रीने एक पतीव्रत्ती राहायलाच हवे हे दुसरे कारण आहे. तिसरे कारण आहे फ्राईड या मानस तज्ञाच्या तत्वांचा पगडा. स्त्रियांना कामपूर्ती मिळालीच पाहिजे या हट्टातून अनेक स्त्रिया खोटे-खोटे कामपूर्ती झाल्याचे नाटक करतात. मात्र ज्या स्त्रियांना खरेच कामपूर्ती मिळते त्या स्त्रिया अशीच आसने निवडतात जात त्यांना कामपुर्ती होईल. उदाहरणार्थ 'काऊगर्ल' नावाचे काम आसन. याच विभागात विविध आसनांमुळे येणाऱ्या कामपूर्तीची चर्चा केली आहे.

पाचव्या भागात स्त्रीचा स्त्रीशी संबंध म्हणजे नेमके काय याची चर्चा केली आहे. समलिंगी स्त्रियांचे संबंध हे किती नाजूक असतात व इच्छापूर्ती करतात हे अनेक स्त्रियांनी सांगितले आहे. सहाव्या भागात लैंगिक गुलामी हा समाजात भेडसावणारा प्रश्न चर्चिला आहे. धमक्या, आर्थिक हितसंबंध आणि भावनिकतेचा गैरवापर या आधारे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार वाढत आहेत. पुरुषी मानसिकतेचा स्वीकार नकळत स्त्रीने करणे म्हणजे एक प्रकारे मानसिक गुलामगिरीच होय असे हाईट म्हणते. स्त्रीची ती 'हॅबीट' बनलीय असे तिला वाटते. जसे स्त्रीने स्त्री आहे हेही गृहीत धरले जाते आणि त्यातून स्त्री ही गुलामीची शिकार बनते.

सातव्या भागात लैंगिक क्रांती मांडली आहे. स्त्रीच्या दृष्टिकोनातून लैंगिक क्रांती म्हणजे पुरुषांना वाटते तशी नाही. पुरुषांना कोणीही कोणाही स्त्रीशी रत होण्यात काहीच वाटत नाही. तो त्यांना पुरुषार्थ वाटतो. स्त्रीचे मत याच्या अगदीच विरुद्ध आहे. तिच्या स्वतःच्या कल्पनेतला सेक्स ती करू शकणे आणि तेही तिने निवडलेल्या पुरुषाबरोबरच करणे हे तिच्या लैंगिक स्वातंत्र्यात येते. पुरुषांची लैंगिक भूक ही फक्त त्याच्या आनंदा पुरती मर्यादित असते. पण त्याचे परिणाम स्त्रीला भोगावे लागतात. सेक्सला आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे या प्रश्नाला संमिश्र उत्तरे अनेक स्त्रियांनी दिली आहेत.

आठव्या विभागात मध्यवयीन व उतारवयीन स्त्रियांचे अनुभव आहेत. वयाचा कसा कोणता परिणाम होतो हे अनेक स्त्रियांनी मांडले आहे तर नवव्या विभागात स्त्रियांची नवीन लैंगिकता हा विषय आहे.
पुस्तकाच्या शेवटी प्रत्येक प्रश्नावली चा डाटा दिला आहे. उदाहरणार्थ ब्रिटन, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशानुसार स्त्रीचे हस्तमैथुनाचे प्रमाण किती टक्के ते तक्त्यासहित दिले आहे. टाइम्सने या पुस्तकाचा गौरव करताना म्हटले आहे की आपल्या काळातले यथार्थ पुस्तक आहे. स्त्रीवाद ज्या तर्हेने पूर्वी मांडला जायचा त्याला वेगळे वळण शेरे हाईटने दिले आहे हे या पुस्तकातून स्पष्टपणे दिसते आहे.

या रिपोर्टवर अनेकांनी आक्षेप नोंदविले होते. पण त्यामुळे कामजीवनातील स्त्रियांच्या दृष्टिकोनाचे विविध पैलू जे समोर आले ते दुर्लक्षित करता येणार नाहीत. पुरूषप्रधान व्यवस्थेत तर याचे मोल खूपच मोठं आहे!!

- डाॅ. प्रदीप पाटील

Updated : 10 Oct 2021 8:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top