Home > News Update > कुठे आहे इंदिरा?

कुठे आहे इंदिरा?

कुठे आहे इंदिरा?
X

मी एकदाच पाहिलंय त्यांना..

या निवडणुकीत मुंबई-बारामती-नागपूर असा 16 दिवस महाप्रदेश 3000km महाप्रवास - पश्चिम, थोडा मराठवाडा, उत्तर आणि विदर्भ - येथील खाचखळग्यातून केला. सोबत प्रदीप धिवार (Pradeep Dhivar), माझे मिड डे चे छायाचित्रकार सहयोगी होते.

विदर्भातील चांदुर रेल्वे ते धामणगाव रेल्वे ला जाताना अचानक 40 वर्षे मागे गेलो.

प्रदीप यांना येथे डोंगर होता, ते उंच ठिकाण - तेथे इंदिरा जी ( Indira Gandhi) भाषण करायला आल्या होत्या असे सांगण्याचा प्रयत्न करीत होतो, पण ते ठिकाण काही दिसत नव्हतं... मोठी मोठी घरे झालीत तिथं. तेथील काँग्रेस आमदारांचा (आता माजी) अतिभव्य हवेलीस्वरूप बंगला तिकडेच आहे.

मी चौथीला धामणगाव च्या नगर परिषद शाळेला होतो तेव्हा. इंदिराबाई (आमच्याकडे त्यांना असेच म्हणायचे) येणार, त्याही हेलिकाप्टर ने! आम्ही पोट्टयांनी ठरवले जायचेच. पहिल्यांदा उडनखटोलं पाहणार होतो एकदम जवळून. बाई दिसणार होत्याच.

गेलो ब्वा सगळे भुसावळ पॅसेंजर नी बिना टिकट 20km. चेन ओढून झाली (आमचा हात पोचत नव्हता, आम्ही ओढली नाही). यार्डात उडी मारून जमावामागे डोंगरसभास्थळी. नुसता कल्ला!!! बाई जनता सरकार घालवायला आल्या होत्या. हा प्रदेश काँग्रेस् चा अभेद्य गढ, पूर्वीही बाई सोबत होताच आणि पुढेही बाई सोबत राहणार होताच.

प्रदीप ऐकत होते आणि कॅमेरा सरसावून बसले होते माझी आठवण (काही खाणा-खुणा शिल्लक असतील तर) साठवुन घ्यायला.

आता सारख सुरक्षा 'D' वैगरे काही नसायचं तेव्हा VIP साठी. जितकं जवळ जाता येईल तितक्या जवळ स्टेज च्या जाता येई. मात्र रेटा द्यावा लागत होता. लहान पोट्टे म्हणजे advantage ! घुसा, घुसा... शेवटी घुसलो ला सगळे एकदम पायथ्याशी. बाई तो ट्रेडमार्क काळा गागल्स लावून. डोक्यावर पदर. काळ्या केसांवर तो अमर्त्य चंदेरी चर.

याआधी हेलिकाप्टर पाहून झालं डोळेभरून. दोन सीटर, ग्लास शिल्ड, सिंगल इंजिन असावे बहुतेक. लाल रंग. फॅब्रिकेटेड टेल. पायलट आणि बाई फक्त दोघेच प्रवासी.

एकदम हिंदी सिनेमातला सिन आठवला ज्यात नेमके असेच काप्टर दिसले होते. आता नजरेसमोर होते. ते पाहून झाले, आणि मग ढूसी (घुसने साठी वर्हाडी शब्द) मारत मारत स्टेज कडे. जमलं नं भौ दनकन.

बाईंचे भाषण आठवत नाही. त्यावेळचा उमेदवार ही आठवत नाही (सुधाकर सव्वालाखे???), मात्र बाईंनी त्याला पुढे ये सांगत, "इनको चुनकर देना है" सांगितले. लोकांनी बम टाळ्या वाजवल्या, नारे दिले... बाईंना दिलेला शब्द पूर्ण केला... अगदी आता आता पर्यंत विदर्भ काँग्रेस (Congress) सोबत होता पूर्णपणे... यावेळी पुन्हा थोडं दान दिलंय त्यांच्या पारड्यात.

बुधवार होता, आठवडी बाजार माझ्या मंगरूळ दस्तगिर गावी. सायकल घेऊन रेकी करायला निघालो होतो बाजाराची, दिवाळी ची सुट्टी होती. मी 10 ला होतो तेव्हा. ऊस विकणाऱ्या काका कडे उभा होतो पोलिस स्टेशन समोर. तितक्यात माझा एक मित्र त्याच्या सायकलने जवळ आला. उसाच्या ढेरात घातल त्यान चाकं. काका पेटला. दोस्त बोलला, आवो मी काय सांगतो ऎका ना. "इंदिरा बाई ला मारले अशी बातमी BBC न दिली आताच. खरी असन का?"

काकाचा चेहरा उतरला. आम्ही खबर पक्की करायला निघालो. काही तासांनी कळले.

बाईंचा अंत्यसंस्कार TV अँटेना 60 फुटावर नेऊन गावानी पाहिला. मुंदडा हवेलीत रंगीत होता, आम्ही तिकडे गेलो.

कुठे आहे इंदिरा?

हा प्रश्न मला नेहमीच पडतो. राजकारण वार्तांकन करतांना जरा जास्तच.

बदल निरंतर असतो म्हणतात. असु दे. पंडितजी गेले, बाई आल्या.

बाई गेल्या, पोरगा आला. पोरगा गेला, सून बाई आल्या. सूनबाई नि बाईंच्या नातवाला मार्ग दिला. नातू खडतर मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करतोय.

हे झाले त्या घराचे. त्यांना बाईंचा विसर पडणे शक्य नाही.

मग कुठे आहे इंदिरा?

आज त्यांच्या स्मृतीदिनी तसबिरी हाराने सजल्या असतील काँग्रेस कार्यालयात. तसबिरी नसतील तर त्या जुन्या जाणत्या कांग्रेसी घरातून आणाव्या लागल्या असतील. इंदिराबाई कुठल्या पोस्टर वर तुम्हास गेल्या किती निवडणुकित/कार्यक्रमात दिसल्या ते आठवा. माझा स्मृतिभ्रंश अजून झालेला नाही. मी अशी अनेक घरे जाणून आहे. यात इतर पक्षांचे निष्ठावान जे जुनं ते सोनं विसरत नाहीत ते सुद्धा आलेत.

इंदिराबाई त्या हवेली स्वरूप आमदार बंगल्यात आहेत का? इंदिरा त्या काँग्रेसी नेत्यांच्या शैक्षणिक साम्राज्याच्या राक्षसी संकुलात आहेत का? की साखर कारखान्यात अप्पां, अण्णा, दादा यांच्या तैलचित्राच्या गर्दीत कुठेतरी, एका कोपऱ्यात?

मी कांग्रेसी आणि नॉन-कांग्रेसी (उजवे म्हणा ना) या दोन्ही विचार समूहात अगदी प्राथमिक शाळेत होतो तेव्हा पासून सहजतेने वावरतो आहे. अजूनही वावरतो.

इंदिराबाई कडून उजवे सुद्धा शिकले हो काहीतरी.

पुन्हा तोच प्रश्न, कुठं आहे इंदिरा?

-धर्मेंद्र जोरे (लेखक 'मीड डे'चे राजकीय संपादक आहेत)

Updated : 31 Oct 2022 4:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top