Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'चला जग जिंकूया' म्हणणारा संदीप असा कसा हे जग सोडून गेला? – अलका धुपकर

'चला जग जिंकूया' म्हणणारा संदीप असा कसा हे जग सोडून गेला? – अलका धुपकर

व्हिडीओ जर्नालिस्ट संदीप मोरे यांनी नैराश्येच्या भावनेतून आत्महत्या करत स्वतःच आयुष्य संपवलं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या माजी सहकारी प्रसिध्द पत्रकार अलका धुपकर यांनी देशात वाढता आत्महत्यांचा आकडा आणि तरूणांमध्ये येत असलेलं नैराश्येचं प्रमाण याकडे लक्ष अधोरेखीत केलं आहे. त्यांनी फेसबुकवर व्यक्त केलेल्या भावना इथे मांडत आहोत.

चला जग जिंकूया म्हणणारा संदीप असा कसा हे जग सोडून गेला? – अलका धुपकर
X

National Crime Records Bureau ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये 1 लांख लोकसंख्येमागे 12 जणांचा मृत्यू आत्महत्येमुळे झालाय. एकूण आत्महत्यांपैकी 72.5% आत्महत्या या पुरूषांच्या आहेत. 2021 च्या आकडेवारीनुसार 164,033 लोकांनी भारतात आत्महत्या केली. साठीच्या आतील कमावत्या वयातील लोकांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे.


डिप्रेशनचे निदान वेळीच न होणे, हे या सर्वांमधील प्रमुख कारण असल्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

आयबीएन लोकमत मधील माझा माजी सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेच्या आत्महत्येनंतर या आकड्यांची भयानकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

संदीपच्या कुटुंबाच्या दु:खात सोबत आहे.... अगदी त्याच टीमस्पिरीट ने जसं म्हणायचे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह अलका धुपकर....माझ्या नावाच्या जागी कुणाही रिपोर्टरचं नावं लावावं, इतक्या जणांसोबत संदीपने टीम वर्क केलंय. सहवेदना लिहिणं कोरडेपणाचं होईल. त्यापलीकडे सगळ्यांनाच धक्का बसलाय.

फील्डवर, प्रेस क्लबच्या बाहेर दिसणारा संदीप एवढं टोकाचं पाऊल उचलेलं याची पुसटशी कल्पनाही आम्हा कुणालाच आली नाही याची हळहळ वाटतेय.

असे जीव जाऊ नयेत म्हणून संवेदनशीलपणे वागावं लागेल.

आर्थिक मंदी, वाढते ताण तणाव आणि खूप आव्हानं आहेत. ते लिहायचा दिवस आजचा नव्हे, हे कळतंय.

एक लाखात बारा व्यक्ती जाणं म्हणजे कोटीत लोकसंख्या असलेल्या आपल्या देशासाठी फार मोठं वाटतं नाही. पण असा एकेक जीव अवेळी, अकारण गेलाय हे मनाशी येतंच.


मानसिक आरोग्याची काळजी घेणं, त्याबाबतची जागरूकता वाढवणं हे डोंगराएवढं आव्हान आहे. पण अशक्य खचितच नाही.

तूर्तास संदीप मोरेच्या कुटुंबियाला लागेल ती मदत करण्याचा विश्वास देऊन सुरूवात करू.

आयबीएन लोकमतची टॅगलाईन होती,'चला जग जिंकूया'....असं कसं हे जग सोडून संदीप गेला? आम्ही सगळेच आज दु:खात आहोत.


NCRB च्या आकडेवारीतला 2022 चा निव्वळ एक वाढलेला आकडा म्हणून संदीप मोरेच्या एक्झिटची रूक्ष नोंद होऊ नये. त्यापलीकडे संवेदनशील राहून मानसिक आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी कटिबद्ध होऊया.

Updated : 20 Oct 2022 4:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top