Home > मॅक्स ब्लॉग्ज > #सावित्रीउत्सव: हिम्मतवान, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान सावित्री...

#सावित्रीउत्सव: हिम्मतवान, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान सावित्री...

विद्येची देवता सरस्वतीने शाळा महाविद्यालय सुरू केल्याचा कोणता पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा आहे का? सनातनी परंपरेने कशी रोखली स्त्रियांची प्रगती? वाचा मुलीला वंशाचा दिवा करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत कोकाटे यांचा विशेष लेख मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांसाठी पुनः प्रसिध्द करीत आहोत.

#सावित्रीउत्सव: हिम्मतवान, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान सावित्री...
X

विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने शाळा महाविद्यालय सुरू केल्याचा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती, त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता. सरस्वती एक महिला म्हणून तिच्याबद्दल आदर आहे, परंतु सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया आपल्या देशात प्रथमतः फुले दांपत्याने घातला. सावित्रीबाई फुले यांच्या काळात जर सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाईंनी सरस्वतीलासुद्धा शिकविले असते, इतक्या मोठ्या मनाच्या सावित्रीबाई होत्या.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकविले त्या देशातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढल्या. त्यांनी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींना मोफत शिकविले. अस्पृश्यता नष्ठ करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. बालविवाहाला प्रतिबंध केला. केशवपन पद्धतीला तिलांजली दिली. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून निराधार महिलांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना मदत केली. गुंडांना पायबंद घातला. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्त्री असल्याचा त्यांनी कधीही न्यूनगंड बाळगला नाही. त्यांनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. पती निधनानंतर सती न जाता निर्भीडपणे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेले.

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात अनेक संकटे आली, पण त्या संकटात डगमगल्या नाहीत, निराश झाल्या नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. सावित्रीबाई फुले लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य आपल्याला हे सांगते की मुलगीसुद्धा वंशाला दिवा असतो.

सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा हा फोटो मूळ फोटो आहे. हा फोटो जाणीवपूर्वक काढलेला नसून सहज काढलेला आहे. यामध्ये सावित्रीबाई उजव्या बाजूला आहेत. म्हणजे स्त्री ही दुय्यम दर्जाची नसून ती देखील हिम्मतवान, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असते, हे फुलेंच्या नेणिवेतदेखील होते.

सावित्रीबाई यांनी ते दाखवून दिले, त्या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत, त्या केवळ पारंपारिक शिक्षिका नव्हत्या, तर त्या लेखिका,कवयित्री आणि प्रबोधनकार होत्या. त्यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

-डॉ. श्रीमंत कोकाटे

Updated : 4 Jan 2023 3:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top