Home > मॅक्स ब्लॉग्ज > `सनातन`च्या मावश्या आणि पुरोगामी विचाराचे भविष्य

`सनातन`च्या मावश्या आणि पुरोगामी विचाराचे भविष्य

पुरोगामी विचारातून समाजाचे, राष्ट्राचे उत्थान एका दोन पिढ्यांत होणारे नाही. ८०० वर्षांपूर्वी माउलींनी भागवत धर्माचा पाया तयार केला. तुकोबांनी त्यावर कळस रोविला. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुकोबा झालासी कळस". पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या अनुयायांना किमान दोन एकशे वर्षे अजून चिकाटीने काम करावे लागेल. अजून किमान दहा शिकलेल्या पिढ्या याकामी खर्ची पाडाव्या लागतील. त्यावेळीच खऱ्या अर्थाने समता, विश्वबंधुता, भूतदया हे सगळे स्थापन झालेले पहायला मिळेल, अनुभवाच्या आधारे सांगातहेत स्टार्टअप उद्योजक डॉ. नरेश शेजवळ...

`सनातन`च्या मावश्या आणि पुरोगामी विचाराचे भविष्य
X

सनातन विचारधारेचा पुरस्कार करणारी एक संस्था त्यांचे अंक छापणे, वितरण करण्याचे रोज काम करते. नाव तुम्हाला कळलेच असेल. संस्थेची महिला टीम वर्गणीसाठी आज ऑफिसला आले. त्यांनी सनातन बाबत प्रास्ताविक दिले. मी म्हणालो, "तुमचे अंक, त्यातील लिखाण याबाबत मला संपूर्ण कल्पना आहे". त्या मावश्या एक अंक चालू कराच म्हणून मागे लागलेल्या. हिंदू धर्म त्याशिवाय कळायचा नाही असा त्यांचा युक्तिवाद.

मी सांगितले आम्ही घरी रोज भजन, हरिपाठ, नाहीतर गाथा, ज्ञानेश्वरी, गीता काहींना काही रोज वाचनात असतेच. वारकरी संप्रदायापेक्षा, गीतेपेक्षा पुढे जाऊन अजून कुणी उत्तमपणे धर्माबाबत ज्ञान दिल्याचे माझ्या माहितीत अद्यापि नाही. सबब तुमचा अंक मला चालू करायचा नाही. दुसऱ्या मावशी मग जरा अग्रेसिव्हली म्हणाल्या, "राष्ट्रापुढील समस्या बाबत तुम्हाला कळेल या अंकातून. राष्ट्रनिर्मितीसाठी तुम्हाला काय योगदान द्यायचे आहे हे देखील स्पष्ट होईल."

"म्हणजे नेमकी काय करायचे ते स्पष्ट होईल मला?", मी विचारले. पहिल्या मावशी म्हणाल्या "आपल्या धर्मावर जे आक्रमण होते आहे, आपली संख्या कमी होते आहे वगैरे....वगैरे..... " आपली देवळे, आपले देव, आपली श्रद्धास्थाने यांची टिंगल केली जाते आणि ते आपल्या धर्मासाठी घातक आहे, आपण त्याविरुद्ध एकजूट होणे, लढा देणे वगैरे गोष्टी करणे गरजेचे आहे...वगैरे...त्यांचा युक्तिवाद ऐकवला.

मी त्यांना थेट छ. शिवाजी आणि छ. सम्भाजी राजांचे धर्मासाठी योगदान बाबत विचारले. तिन्ही मावश्यानी माझी नस ओळखली, आणि म्हणाल्या, "वा वा यांच्यासारखे धर्मविर, हिंदू धर्म रक्षक अजून कोण असणार?".

माझा पुढचा प्रश्न तयारच होता. म्हंटले गोळ्वळकरांच्या बंच ऑफ थॉट्स मध्ये "संभाजी जो दारू आणि स्त्रियांचा व्यसनी होता.... " असा उल्लेख केला आहे त्याचा निषेध करता का?

तिसरी मावशी लगेच "आमच्या संस्थेचा आणि गोळवलकरांचा थेट काही संबंध नाही हो, त्यांच्याबाबत आम्ही काही प्रतिक्रिया नाही देणार". माझा पुढील तर्क तयारच होता. बरे म्हणजे धर्माविरुद्ध किंवा धर्मरक्षकांविरुद्ध जर कुण्या लेखकाचे काही म्हणणे असेल, तर त्याबाबत साधा निषेध देखील व्यक्त न केल्याने तुम्ही धर्माचे रक्षण करण्यात कमी पडत नाही का? आणि हो, जर धर्मरक्षणाबाबत तुम्ही इतके उदासीन असाल तर मग तुमचा अंक हा केवळ पापड वाळवायच्या कामी येईल."

माझा तर्क आणि युक्तिवाद पूर्ण झाला. म्हंटले आता तरी हा विषय संपेल. शेवटी तिसऱ्या मावशीला मूळ मुद्द्यावर आल्याच, "बरे अंक नका वाचू , पण चारशे रु. काही फार होत नाहीत" त्यांच्या या चिकाटीपुढे मात्र मी निरुत्तर आणि पराजित झालो होतो. मला नेहमीच या लोकांचे कौतुक वाटते.

अशी चिकाटी पाहिजे. असे समर्पण पाहिजे. संस्था त्याशिवाय उभ्या राहत नाहीत.

पुरोगामी विचारातून समाजाचे, राष्ट्राचे उत्थान एका दोन पिढ्यांत होणारे नाही. ८०० वर्षांपूर्वी माउलींनी भागवत धर्माचा पाया तयार केला. तुकोबांनी त्यावर कळस रोविला. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुकोबा झालासी कळस". पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या अनुयायांना किमान दोन एकशे वर्षे अजून चिकाटीने काम करावे लागेल. अजून किमान दहा शिकलेल्या पिढ्या याकामी खर्ची पाडाव्या लागतील. त्यावेळीच खऱ्या अर्थाने समता, विश्वबंधुता, भूतदया हे सगळे स्थापन झालेले पहायला मिळेल.

आजच्या लेखाचे क्रेडिट त्या तीन मावश्याना. त्यांच्या त्या चिकाटीचे खरेच पुन्हा एकदा कौतुक. पुरोगाम्यांनी स्वतःचे आत्मचिंतन करावे आणि यातूनही नक्कीच शिकावे.

"राम कृष्ण हरी"

Updated : 19 July 2022 12:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top