Home > मॅक्स ब्लॉग्ज > संभाजी ब्रिगेडचा छावा आर.एस.एस.च्या गोठ्यात?

संभाजी ब्रिगेडचा छावा आर.एस.एस.च्या गोठ्यात?

संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या लेखात भाजपशी युती करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आलं आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या भूमिकेचा डॉ. सुभाष यांनी घेतलेला समाचार

संभाजी ब्रिगेडचा छावा आर.एस.एस.च्या गोठ्यात?
X

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांचे मुखपत्र मराठा मार्ग चे संपादकीयमध्ये 21सप्टेंबर अंकामध्ये, त्यांच्या 33 कक्षांच्या प्रगतीचा चढता आलेख वर्णन केला आहे. त्याचबरोबर नव्याने मराठा समाज उभा करण्याची आवश्यकता मांडली. त्यांचे म्हणणे "संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. अवघड आहे. शेवटी भाजपा युती हाच पर्याय दिसतो.

राजकारणात अंतिम यश मिळणे हेच एकमेव तत्त्व असते. जो जीता वही सिकंदर. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी जी किल्ली उपयोगी पडते ती वापरली पाहिजे स्वार्थ व हीत हे अंतिम उद्दिष्ट. तेव्हा वेळ व संधी हेच राजकीय सत्य आहे. संभाजी ब्रिगेडचे ब्राह्मण वाद विरोधी कार्य चालूच राहील. याची खेडेकर खात्री देतात.

संभाजी ब्रिगेडने पुढील काळात फक्त आणि फक्त शंभर टक्के राजकारण करावे. कारण राजकारण हीच समाजकारणाचे अंतिम उद्दिष्ट आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम त्यांना कोणी अतिशयोक्तीने युगपुरुष म्हणतात. ते मोठे आहेत यात शंका नाही पण युगपुरुष म्हणण्याइतपत आहेत की नाही हे काळच ठरवेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अपत्य भाजपा यांच्या मनुवादी विचाराने भारताची लोकशाही, समाजवादी, सेक्युलर, राज्यघटना भंग पावलेली आहे. मनुचे कायदे प्राथमिक शिक्षणापासूनच नव्या पिढीवर लादून त्यांचा ब्रेनवॉश करू लागला आहे. त्यामुळे देश धर्मांधतेकडे, अराजकाकडे आणि आर्थिकरित्या दिवाळखोरीच्या मार्गाने गतीने जात आहे.

भाजपा ही तर मनुवाद्यांची वैचारिक गंगा. त्यात मराठा सेवा संघाच्या एक आक्रमक संभाजी ब्रिगेडला स्नान करून पवित्र व्हा. असा सल्ला त्यांचा संस्थापक देतो. तेव्हा बापाने पोराला दरडावून सांगणारा हुकूमशहा मला दिसायला लागतो.

पंतप्रधान त्यांच्या मागचा बोलवता धनी आरएसएस आहे. हे खेडेकरणा पूर्णपणे माहिती आहे. आपल्या चाणक्य नीती चे त्यांनी किती उभे-आडवे तर्कशास्त्र वापरले आणि समर्थन केले तरी त्यांना आपल्या हयातीत संभाजी ब्रिगेडला महाराष्ट्राचा राजकीय मुकुट घालून राज्याभिषेक करण्याची घाई झाली आहे हे निश्चित.

ज्या भाजपाच्या गोठ्यात संभाजी ब्रिगेडचा छावा खेडेकर बांधू इच्छितात. त्यांनी ईतकी घाई करू नये. छावा आरएसएसच्या गाईबरोबर कधीच मैत्री करू शकणार नाही उलट संघाची कुटील नीती छत्रपती संभाजी महाराजांच्या सारखे साखळदंडाने बांधून शेवटी त्यांचा घात करेल .

सरदार वल्लभाई पटेल यांनी बंदी घातली त्याला स्थापनेपासून सत्तेवर यायला 80 /90 वर्षे लागली. राजकारणात सत्तेवर यायला दीर्घकाळ वाट बघायला लागते. त्यासाठी खेडेकरांना थोडे दम धरायला हरकत नव्हती पण घाई घाई ते तडजोड करायला निघालेत ती तत्वच्युती म्हणावी लागेल.

अर्थात माझ्यासारख्या राजकारणाच्या रिंगणात बाहेरच्या व्यक्तीच्या विचाराकडे त्यांनी फार गांभीर्याने बघायचं कारण नाही पण तुमच्या संघटनेमध्ये फूट आनिवार्य दिसते.


लेखक- डाॅ. सुभाष देसाई ज्येष्ठ पत्रकार आहेत. अनेक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलं आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषयांवर शोध पत्रकारिताही केली आहे.)


डॉ. सुभाष कोल्हापूर

9284731009

Updated : 20 Sep 2021 12:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top