Home > मॅक्स ब्लॉग्ज > सत्य विचार दडपण्याची ताकद सत्तेत आल्यास काय होते?

सत्य विचार दडपण्याची ताकद सत्तेत आल्यास काय होते?

निर्बुद्ध राजकीय समज असलेल्यांचा ब्रँड केवळ काही महिन्यात घरोघरी पोहोचवणं कशामुळं शक्य होतं. समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, जातिअंताचा, धर्मनिरपेक्षतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, विवेकाचा, शोषणाविरुद्धचा, सत्याचा आणि सत्यशोधना सारखे विचार लोकांपर्यंत का पोहोचत नाहीत? वाचा डॉ. प्रदीप पाटील यांचा विचार करायला लावणारा लेख

सत्य विचार दडपण्याची ताकद सत्तेत आल्यास काय होते?
X

थोर विचारवंत थॉमस हॉब्ज- जॉन मिलर-जॉन लॉक यांच्या काळात इंटरनेट नव्हता. नव्हता ते बरे झाले... कारण विचार स्वातंत्र्याची कत्तल तेव्हा सहज झाली असती.

विचारांचा प्रतिवाद करण्यासाठी आज इतकी सहजसोपी साधने हाती आली आहेत. की त्यांचा स्वैर वापर गोठवून टाकतोय. विचार मारण्यासाठी बंदुकांचा वापर ही आता मुक्तपणे होतो आहे.

विचारांनी विचार मारायचे असतील तर त्यासाठी आपल्याकडे अत्यंत प्रभावी यंत्रणा हवी. कारण जागतिकीकरणाने विचार मारणे तर सोडाच धक्का लावणे ही अवघड करून ठेवले आहे.

होय, मी त्याच अक्राळ-विक्राळ पसरलेल्या सत्ते बद्दल म्हणतोय. घटनेने आपल्याला सात स्वातंत्र्ये देऊ केली आहेत पण ही स्वातंत्र्ये उपभोगण्यासाठी आज परिस्थिती बिघडलेली आहे.

आपण विचार मांडतो आहोत तो समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, जातिअंताचा, धर्मनिरपेक्षतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, विवेकाचा, शोषणाविरुद्धचा, सत्याचा आणि सत्यशोधनाचा.

आपले दृष्टिकोन, विचार, समजुती आणि वैज्ञानिक रित्या सिद्ध झालेली तत्त्वे किंवा गोष्टी सांगण्याचा आपणास कायदेशीर अधिकार आहे. जगभरातील सर्व राष्ट्रांना त्याचे महत्त्व ठाऊक आहे. भारतात तर सम्राट अशोकाने सर्व जगातील तत्त्वज्ञानाच्या अगोदर विचार स्वातंत्र्याचे बीज रोवले आहे. म्हणजे विचारस्वातंत्र्याचा आपण पुरेपूर वापर करू शकतो. तो करीत राहणे याचाच अर्थ सद्सद्विवेकाचा प्रचार करणे होय.

निर्भयपणे आपण तो करीत आलो आहोत. पण तो करीत असताना विचार स्वातंत्र्याची गळचेपी ही सोसत आलो आहोत. हिंदू धर्मातील विषमता मोडताना फुले-आंबेडकरांनी ती पुरेपूर अनुभवली. पण आज परिस्थिती बिकट आहे.

जिओर्दानो ब्रूनो ला जिवंत जाळण्यात आले. चार्वाकांना मारण्यात आले. ती ही एक परंपरा आहेच. ..विचारस्वातंत्र्याचा गळा घोटणारी, बंधने लादणे अटक करणे, पुस्तके जाळणे, खोट्या वार्ता पसरविणे, खोटी गोष्ट सत्य म्हणून ठासून सांगणे, विचार सांगणाऱ्यांना संपविणे, अशा पद्धती विचार स्वातंत्र्याचे शत्रू अवलंबत आहेत.

हिटलर, नाझी, शोषक ब्राह्मण्य संस्कृती अशी अनेक उदाहरणे देता येतील. गांधींना मारणे आणि मारल्यावर गांधींच्या विचारांचा सोयीस्कर वापर करणे ही एक पद्धती आहे. थोडक्यात इथे राजकारण शिजते. राजकारणात प्रतीकांचा, प्रतिमांचा आणि प्रगत विचारी नेत्यांचा वापर करून आपली पोळी भाजून घेतली जाते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर "हिंदू राष्ट्रपुरुष" होते असा प्रचार प्रतिगाम्यांनी करणे हा पोळी भाजण्याचा हाच प्रकार आहे. म्हणजे इथे विकृत राजकारण भरास आले आहे. विकृत राजकारण हा विचारस्वातंत्र्याचा मोठा शत्रू आहे. कारण विचार स्वातंत्र्य नव्हे तर सत्य विचार दडपण्याची ताकद या राजकीय खेळीत असते.

राजकीय ताकद सत्तेत आली तर तिचा उन्माद वाढवितो तो पैसा. विचार फैलावण्याचे सामर्थ्य अर्थकारणातून येते. निर्बुद्ध राजकीय समज असलेल्यांचा ब्रँड केवळ काही महिन्यात घरोघरी पोहोचविणे हे भांडवलदारांमुळे शक्य झाले आहे.

सामान्यांचे विचार अर्थकारण कसे बदलते त्याचे हे उदाहरण. "विचार बदलणे तसे कठीण काम नसते" असा राक्षसी विचार बाळगणारे भांडवलदार यावेळी आपण यशस्वी झालेले पाहिले आहेत व पहात आहोत.

संस्कृती विचार रुजविते. म्हणूनच तर एक प्रकारची मानसिक गुलामगिरी सर्वदूर पसरलेली आहे. सांस्कृतिक् गुलामगिरी धर्माच्या आश्रयाने जेव्हा भिनते तेव्हा विचारस्वातंत्र्य म्हणजे एक शिवी बनते. आणि भांडवलदार येऊन मिळाले की, ती संस्कृती 'ईश्वरी' आणि 'श्रद्धेची" बनते. मग श्रद्धांचा व्यापार जरी चालू असेल तर गुलाम झालेले त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आंधळे विचार स्वीकारलेली ही संस्कृती विचार स्वातंत्र्याची सर्व कवाडे स्वतःहूनच बंद करून घेते.

समृद्ध पुरोगामी व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेली चिकित्सक संस्कृती असते. बुरसटलेले आणि तखडबंद विचार पाळणारी एक संस्कृती असते. ..आणि या दोन्हींच्या मध्ये हेलकावे खाणारी एक संस्कृती असते जी गोंधळलेल्या विचारांनी सैरभैर असते. ती ठाम नसते. इथे विचारस्वातंत्र्य भुसभुशीत बनते.

विचारस्वातंत्र्य जेव्हा संपविण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा त्यामागील कारणे, दुसऱ्यांचे अविचार स्वातंत्र्य हे असते. विचार करणाऱ्यांची समजूत अशी असते की, विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा. शस्त्रे उचलू नयेत. कारण त्याचा परिणाम शून्य होतो. कोणत्याही युद्धात असो नाही तर संहारामध्ये असो, शाश्वत मूल्ये नष्ट झाली आहेत असे दिसत नाही.

धर्म किंवा मोठ्या जनसमुदायांना जेव्हा अस्मिता मिळतात तेव्हा आपसूकपणे त्यांच्यात विचारस्वातंत्र्याला नकार उत्पन्न होतो... आणि असे उन्मत्त समुदाय.. विरोधी विचारधारा स्वीकारलेल्यांची कत्तल करतात. आपण म्हणतो माणसे मेली, विचार नाही.

(पुर्वार्ध)

- डॉ. प्रदीप पाटील

Updated : 7 Sep 2021 9:54 AM GMT
Next Story
Share it
Top