Home > मॅक्स ब्लॉग्ज > "रोहित वेमुला आम्हा लढणार्‍यांसाठी तू कायमच आकाशातला एक झगमगता तारा आहेस"

"रोहित वेमुला आम्हा लढणार्‍यांसाठी तू कायमच आकाशातला एक झगमगता तारा आहेस"

रोहित वेमुला आम्हा लढणार्‍यांसाठी तू कायमच आकाशातला एक झगमगता तारा आहेस
X

आज Facebook फेसबुक मेमरीत हा फोटो आलाय. हा केवळ एक फोटो नाहीय. ठणका देणारी वेदना आहे. तिला गोठवून टाकणं, सामूहिक स्मृतीतून वजा करणं, या प्रतिमेचं विपर्यस्त भंजन करणं आपल्या स्मरणात ताजं आहे. ही चलाखी प्रभुत्ववादी सांस्कृतिक राजकारणाचं कायम मोठं हत्यार राहिलेलं आहे. अर्थात ते नेहमीच यशस्वी झालेलं नाही, याची नोंद आपल्याजवळ हवी.

Rohit Vemula रोहित वेमुलाचा हा फोटो त्याच्या ज्या मित्राने काढला त्यालाही माहीत नसेल या प्रतिमेतून आणि त्याच्या वाचनातून सांप्रत भारताचंही एक काळकुट्टं वाचन होणार आहे. रोहित वेमुलाला असं सहजासहजी पुसता येणार नाही. कितीही प्रयत्न केले तरी. जसं निक यूटच्या व्हिएतनाम युद्धावरची 'नापाम गर्ल' ही प्रतिमा. केविन कार्टरची सुदानच्या जमिनीवरुन खुरडत खुरडत सरकणार्‍या, कुपोषणामुळे जणू शरीराचे अवयवच नष्ट झालेली/ पाठपोट एकच झालेली/ हाडांना कातडी चिकटलेली/केवळ धुगधुगी उरलेल्या मुलीची आणि ती ज्याचं खाद्य आहे त्या गिधाडाची प्रतिमा. गुजरात दंगलीत होरपळून निघालेल्या आणि समोरच्या हिंस्त्र जमावासमोर आपल्या प्राणांची याचना करणारी, टाहो फोडणारी कुतुबुद्दीन अन्सारीची प्रतिमा. स्थलांतरितांचं दुःख ज्या एका दृश्यातून जगासमोर आलं ती समुद्रात बुडुन मेलेल्या आणि वाहात वाहात किनार्‍याला लागलेल्या चिमुरड्या ॲलन कुर्दीच्या पालथ्या शवाची प्रतिमा.

या आणि अशा कित्येक प्रतिमा जगाचं अर्थनिर्णयन करणार्‍या आणि व्यवस्थेच्या निर्मम हिंसेला प्रश्नांकित करणार्‍या, जाब विचारणार्‍या स्फोटक प्रतिमा आहेत तितक्याच भीषणही. यात काळ आणि अवकाश आहे. इतिहास आणि भूगोल आहे. त्यात शोषणाची कैक रुपं आहेत आणि त्याचं दस्तावेजीकरणही. अर्थातच या राजकीय प्रतिमा आहेत. पण ते मुक्तीचं राजकारण आहे. पृथ्वी आणि त्यावर वसणार्‍या व्यक्ती- समष्टी- सृष्टीच्या एकमय नात्याला तीव्रतेने वाचवू पाहणार्‍या या राजकीय प्रतिमा आहेत.

प्रतिमा वाचनासंबंधीचे प्रश्न जग समजून घेण्याचे, ते तसे का आहे हे जाणण्याचे आणि अर्थातच जगाचा अर्थ लावण्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. रोहित वेमुला, तू या जगात नसलास तरी आम्हा लढणार्‍यांसाठी तू कायमच आकाशातला एक झगमगता तारा आहेस. कायम तसाच राहशील.

सॅल्यूट!

(साभार - सदर पोस्ट प्रज्ञा दया पवार यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 17 Jan 2026 4:40 PM IST
Next Story
Share it
Top