Home > मॅक्स ब्लॉग्ज > Risk capital : IKEA फर्निचर कंपनी दहा वर्षे तोट्यात, तरीही सुरूच

Risk capital : IKEA फर्निचर कंपनी दहा वर्षे तोट्यात, तरीही सुरूच

उद्योग क्षेत्रात जोखीम भांडवल किती महत्त्वाचं ? जाणून घ्या अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांच्याकडून

Risk capital : IKEA फर्निचर कंपनी दहा वर्षे तोट्यात, तरीही सुरूच
X

IKEA ही फर्निचर बनवणारी कंपनी. मोठ्याप्रमाणांवर ऑनलाइन विक्री पण करते. ग्रामीण नसेल पण शहरी लोकांना हा ब्रँड माहीत झाला आहे. ही ऐंशी वर्षे जुनी स्वीडिश कंपनी आहे. २०१८ मध्ये तिने भारतात उपकंपनी स्थापन करत धंदा सुरू केला. या काळात मूळ कंपनीने १०,००० कोटी भांडवल ओतले. आठ वर्षांनंतर देखील ही कंपनी दरवर्षी तोटा सहन करत धंदा करत आहे. कंपनीच्या प्रवक्त्याप्रमाणे अजून दोन वर्षे कंपनी नफा कमवू शकणार नाहीये.

IKEA हे निमित्त आहे या पोस्टचे. IKEA घेतली कारण आज वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या म्हणून. बाकी काही नाही. खालील विश्लेषण भारतासकट अनेक देशातील महाकाय कॉर्पोरेटना लागू पडेल. महाकाय भांडवल असणारी कॉर्पोरेट आणि एम एस एम इ क्षेत्रातील बिगर कॉर्पोरेट यामधील फरक स्पष्ट करण्यासाठी आहे. कोणत्याही धंद्यांत भांडवल लागते असे म्हटले जाते. ते अर्धसत्य आहे. जोखीम भांडवल लागते, रिस्क कॅपिटल. ते जेवढे जास्त तेवढे तोटा झाला तरी दटून राहता येते. नवीन भांडवल घालून अद्ययावत प्लांट मशिनरी घालता येते.

IKEA इंडिया कंपनीला दहा वर्षे तोटा झाला आहे होणार आहे म्हणजे स्वीडिश पेरेंट कंपनीला एकही डॉलर नफा मिळालेला नाही. दहा वर्षे ! आणि तरी ते चालून जाते. इतकी वर्षे तोटा होत आहे तरीदेखील कंपनीत काम करणारे कामगार कर्मचारी व्यवस्थापक वर्ग यांना व्यवस्थित पगार मिळत आहे. कंपनीला तोटा झाला तरी त्यांचे संसार इन्सुलेटेड आहेत.

याउलट बिगर कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योजक. त्यांना कमी जास्त तोटा झाला की नवीन भांडवल नाकारले जाते. दुकान / धंदा बंद करण्याशिवाय पर्यायच नसतो. सगळ्यांना संसार असतात त्यामुळे किमान पैसे वेतन/ पगार म्हणून लागतोच लागतो.

कॉर्पोरेट भांडवलशाही म्हणजे हवा तितका काळ तोटा सहन करण्याची तयारी आणि लागेल तेव्हा बाह्य स्त्रोतातून भांडवल उभे करण्याची क्षमता. महाकाय कॉर्पोरेट क्षेत्रासमोर बिगर कॉर्पोरेट क्षेत्राला स्पर्धा करायला लावणे म्हणजे वाघासमोर खांबाला बांधून शेळी उभी करण्यासारखे आहे. ते नफा कमवतात तर तुम्हाला कोणी अडवले आहे असे म्हणणाऱ्यांसाठी ही पोस्ट नाही.

संजीव चांदोरकर

(लेखक, अर्थतज्ज्ञ)

(साभार - सदर पोस्ट संजीव चांदोरकर यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 13 Nov 2025 7:11 AM IST
Next Story
Share it
Top