Konkan Rice कोकणचा भात: इतिहास, वास्तव आणि बदलतं भविष्य
स्थैर्याचं प्रतीक असणाऱ्या कोकणच्या भाताचा इतिहास काय? बाजार, किंमत, प्रक्रिया, ब्रँडिंग या सगळ्यांपासून भातशेती दूर का? कोकणचा भात स्वतःच्या घरातही दुय्यम का ठरतोय? भाताचं महत्त्व आणि बदलत्या जगासोबत भाताला नवी दिशा कशी देता येईल सांगताहेत दिलीप परब
X
Konkan Rice कोकणचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर भाताकडे पाहिल्याशिवाय तो पूर्ण होत नाही. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या प्रदेशात हजारो वर्षांपासून भात हा मुख्य अन्नघटक राहिलेला आहे. पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक नोंदी सांगतात की कोकणात भातशेती इ.स.पूर्व काळातही अस्तित्वात होती. सातवाहन, शिलाहार आणि पुढे यादव काळात Konkan कोकणातील खाचर जमिनींमध्ये भात हे मुख्य पीक होते. त्या काळात पावसाच्या पाण्यावर आधारित शेती हीच कोकणची ओळख होती.
Portuguese and British periods पोर्तुगीज आणि नंतर ब्रिटिश काळातही कोकणचा भात प्रशासनाच्या नजरेत महत्त्वाचा होता. ब्रिटिश काळात महसूल नोंदींमध्ये “rice tract” म्हणून कोकणाचा उल्लेख आढळतो. कारण कोकणातील खाचर शेती पावसावर पूर्णपणे अवलंबून असूनही सातत्याने उत्पादन देत होती. त्या काळात भात हा बाजारासाठी नव्हे, तर घरगुती अन्नसुरक्षेसाठी पिकवला जात होता. प्रत्येक घरात भाताचं कोठार असणं म्हणजे सुरक्षिततेचं लक्षण मानलं जायचं.
इतिहासात कोकणचा भात म्हणजे नफा नव्हता, तर स्थैर्य होतं. लहान शेतजमिनी, सामूहिक कामपद्धती, श्रमवाटप आणि कमी बाह्य खर्च यामुळे ही शेती टिकून होती. भातशेतीतून कोणी श्रीमंत होत नव्हतं, पण उपासमारीचा प्रश्नही नव्हता. “धान्य असेल तर जगणं सुकर” ही मानसिकता कोकणात खोलवर रुजलेली होती. १९व्या शतकातील ब्रिटिश गॅझेटिअर (सुमारे १८७० च्या आसपास) मध्ये कोकणातील भातशेतीविषयी एक महत्त्वाची नोंद आढळते. त्या नोंदींनुसार, त्या काळात अनेक कोकणी शेतकरी भाताचा वापर दैनंदिन विक्रीसाठी नव्हे, तर घरगुती साठा आणि सामाजिक प्रसंगांसाठी करत असत. भाताला केवळ अन्न म्हणून नाही, तर सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं धान्य मानलं जायचं. लग्नकार्य, सण, श्राद्ध, पाहुणचार अशा प्रसंगी भाताचा वापर होणं हे समृद्धीचं लक्षण समजलं जात होतं. यावरून स्पष्ट होतं की १९व्या शतकातील कोकणात भात हा बाजारातल्या किंमतीवर मोजला जाणारा माल नव्हता, तर घर, कुटुंब आणि सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू होता.
पण स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः १९७० नंतर चित्र हळूहळू बदलू लागलं. हरितक्रांतीचा प्रभाव कोकणावर मर्यादित राहिला. सिंचन, सुधारित वाण, यांत्रिकीकरण हे सगळं कोकणाच्या भूगोलाशी फारसं जुळून आलं नाही. त्याच काळात शहरांकडे स्थलांतर वाढलं. भातशेतीत काम करणारी तरुण पिढी कमी होत गेली आणि मजुरीचा खर्च वाढू लागला.
आज कोकणात अजूनही भरपूर पाऊस आहे, माती सुपीक आहे, आणि भातशेतीचं पारंपरिक ज्ञान शिल्लक आहे. पण भाताची अर्थव्यवस्था तुटलेली आहे. आकडेवारी पाहिली तर भारतात जवळपास ४५ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, पण शेतीचा GDP मधला वाटा २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोकणात ही तफावत अजून तीव्र आहे. भातशेतीत कष्ट प्रचंड आहेत, पण आर्थिक परतावा अत्यल्प आहे.
आज भातशेती टिकतेय ती भावनेवर. “आपली जमीन पडीक ठेवायची नाही” या मानसिकतेवर. पण बाजार, किंमत, प्रक्रिया, ब्रँडिंग या सगळ्यांपासून भातशेती दूर आहे. रेशनवर स्वस्त तांदूळ मिळतो, बाजारात बाहेरचा तांदूळ सहज उपलब्ध आहे, आणि कोकणचा भात स्वतःच्या घरातही दुय्यम ठरतोय.
इथंच एक मोठा विरोधाभास दिसतो. जागतिक स्तरावर आज पारंपरिक, स्थानिक, heirloom भाताच्या जातींना मागणी वाढतेय. कमी ग्लायसेमिक इंडेक्स, हवामान बदलाला तोंड देणाऱ्या, आणि रसायनमुक्त पद्धतीने पिकवलेल्या भाताकडे आरोग्यदृष्ट्या पाहिलं जातंय. पण कोकणातच तोच भात “जुना” आणि “तोट्याचा” मानला जातो.
याचा अर्थ भातात समस्या नाही; समस्या आहे आपण भाताकडे पाहण्याच्या चौकटीत. कोकणचा भात आजही उत्पादन देऊ शकतो, पण तो जुन्या अर्थशास्त्रात अडकून पडला आहे. भविष्य हे मोठ्या क्षेत्रात, जास्त उत्पादनात किंवा स्वस्त किंमतीत नाही. कोकणच्या भाताचं भविष्य आहे विशिष्ट जाती, गुणवत्ता, प्रक्रिया आणि ओळख यात.
भात पुन्हा किलोमध्ये विकायचा नाही; तो कथेसह मांडायचा आहे. माती, पाऊस, परंपरा आणि स्थानिक संस्कृती यांच्याशी जोडलेला भात हा केवळ अन्न नसून एक ओळख बनू शकतो. पण त्यासाठी भातशेतीला शेतापुरती मर्यादित न ठेवता, संपूर्ण सिस्टीम उभी करावी लागेल प्रोसेसिंग, साठवण, पॅकेजिंग आणि थेट बाजारपेठ यांची.
इतिहास सांगतो की कोकणचा भात कधीच श्रीमंतीचं प्रतीक नव्हता; तो स्थैर्याचं प्रतीक होता. आज स्थैर्य हरवलंय, म्हणून भात मागे पडतोय. पण जर आपण इतिहासातून शिकून भाताला नवी दिशा दिली, तर कोकणचा भात भूतकाळात अडकून राहणार नाही. तो बदलत्या जगाशी संवाद साधू शकतो स्वतःच्या अटींवर.
दिलीप परब | The Konkan Farmer






