Home > मॅक्स ब्लॉग्ज > व्रतस्थ समाजवादी पन्नालाल सुराणा भाऊ !

व्रतस्थ समाजवादी पन्नालाल सुराणा भाऊ !

देशातल्या आजच्या तरुणाई समोरची आव्हाने अधिक गंभीर आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. रोकडा नव्हे तर नागडा स्वार्थ हा परवलीचा शब्द बनलेल्या वातावरणात आजच्या तरुणाईला आपली वाट शोधायची आहे. ही वाट तुडवताना पन्नालालजींच्या पिढीचा मूल्यांचा वारसा घेऊन आपली स्वतःची नवी रणनीती तरुणाईला आखावी लागेल.

व्रतस्थ समाजवादी पन्नालाल सुराणा भाऊ !
X

Democratic socialist ideology लोकशाही समाजवादी विचारधारेचा एक व्रत म्हणून अंगीकार केलेले आणि आयुष्यभर तसे जगलेले Pannalal Surana पन्नालाल भाऊंचे काल रात्री निधन झाले.

दैनिक मराठवाड्याचे संपादक Editor of Dainik Marathwada , राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष, नळदुर्गच्या टेकडीवर उभं असलेल्या आपलं घरचे आधारवड, सोशलिस्ट पार्टीचे नेते अशा अनेक जबाबदाऱ्या भाऊंनी आयुष्यभर व्रतस्थ भावनेने निभावल्या. रचना आणि संघर्ष अशा दोन्ही आघाड्यावर समर्पित भावनेने ते आयुष्यभर काम करत राहिले.

उंचेपुरे आणि धिप्पाड म्हणता येईल अंगकाठी लाभलेले पन्नालालजी वृत्तीने तसे गंभीर प्रकृतीचे. सतत कामात मग्न. साधेपणा आणि काटकसर टोकाची. कामाशिवाय आवांतर गप्पा अजिबात नाहीत. त्यामुळे पन्नालाल आणि इतर कार्यकर्ते यात एक प्रकाराचं अदृश्य अंतर राहायचं. त्यांना स्वतःला हसी मजाक करता यायची नाही पण इतरांनी तसं केलेलं ते ऐकून घ्यायचे. एकूणच त्यांना ऐकणारा कान लाभला होता. समाजवादी आंदोलनावरील टीका ते शांतपणे ऐकून घ्यायचे. भाऊ, तुमच्या पिढीचं हे जरा चुकलंच असं म्हटलं तर, असुद्या आता तुमच्या पिढीला काय सुधारणा करायच्यात ते करा असं म्हणून चेंडू टोलावायचे, पण त्यांच्यात टीका ऐकून घेण्याची क्षमता होती जी इतर काही समाजवादी नेत्यात मला दिसली नाही.

लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा विषयावरील साध्या, सोप्या आणि प्रवाही भाषेतील त्यांची बौद्धिके हे कार्यकर्त्यांचा वैचारिक दृष्टिकोन हळुवारपणे विकसित करणारी असत. हेच विषय विस्ताराने समजावून देणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. पण पुस्तकांच्यापेक्षा त्यांनी पुस्तिका अधिक लिहिल्या असाव्यात. सार्वजनिक जीवनात कुठलाही प्रश्न निर्माण झाला की, त्याबद्दल कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आपली भूमिका ठरवायला मदत होईल अशी छोटी पुस्तिका ते तातडीने छापून वितरित करीत. त्यांनी अनेक विषयावर लिखाणं केलं पण अर्थशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय. Gyanbacha Arthashastra ग्यानबाचं अर्थशास्त्र हे त्यांचं पुस्तक अर्थशास्त्रीय संकल्पना सोप्या भाषेत समजावून देतं.

एसटीची लाल परी आणि पोस्टाचा लाल डबा यांच्याबरोबर सोशलिस्ट पार्टीच्या लाल झेंड्याइतकंच जिव्हाळ्याचं नातं त्यांनी जपलं. आयुष्याची पंच्याहात्तरी येईपर्यंत एसटीचा प्रवास ते करत राहिले आणि हात चालत होते तोवर पोस्ट कार्ड वर पत्र लिहून कार्यकर्त्यांशी संवाद राखत राहिले. त्यांनी सोशलिस्ट पार्टीसाठी, राष्ट्र सेवा दलासाठी अखंड प्रवास केला. अनेक आंदोलने संघटित केली. हे करताना बार्शी, परांडा परिसरात रचनात्मक कामात ही त्यांनी पुढाकार घेतला. किल्लारी भूकंपानंतर अनेक ज्येष्ठ आणि युवा समाजवादी कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून नळदुर्ग किल्ल्याच्या समोरील डोंगरावर निराधार मुली मुलांसाठी "आपलं घर" उभं राहिलं. त्या आपलं घरला पन्नालालजींनी आपली जबाबदारी मानलं. घार उडते आकाशी, नजर तिची पिल्लांशी या पद्धतीने देशभर भ्रमंती करताना पन्नालालजींनी आपलं घरचा विषय कायम डोक्यात ठेवला.

Socialist Party सोशलिस्ट पार्टीचे ठराव, निवेदने लिहिण्याची जबाबदारी भाऊंची असायची. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची तर असायचीच. महागाई विरोधी आंदोलने असोत की जमीन हक्क आंदोलन असो नियोजनापासून ते अंमलबजावणी पर्यंत भाऊंचा पुढाकार असायचा. त्यांनी निवडणूका लढवल्या पण त्यांना यश कधी लाभलं नाही. मतदारांना साधेपणाचा, काटकसरीचा आग्रह धरणारा निस्पृह उमेदवार भावला नाही. पण पन्नालालजीवर निवडणूकीतील अपयशाचा परिणाम कधी झाला नाही. लोकशाही समाजवादाची वाट ते अखंडपणे चालत राहिले.

आजच्या राजकीय, सामाजिक वातावरणात एलीयन म्हणजे कुठल्या तरी परग्रहावरून आलीत असं वाटणारी माणसं समाजवादी चळवळीने घडवली. पन्नालाल त्या पिढीचे प्रतिनिधी होते. भारतासमोरील आव्हाने अधिक बिकट होत असताना या पिढीचे एक एक साथी आपलं कर्तव्य बजावून निजधामाला जाताहेत.

या देशातल्या आजच्या तरुणाई समोरची आव्हाने अधिक गंभीर आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पन्नालाल यांच्या पिढीने स्वातंत्र्य चळवळीच्या ज्या भारलेल्या वातावरणात आपल्या सार्वजनिक जीवनाची वाटचाल केली ते भारलेपण वातावरणातून केंव्हाच गायब झालंय. रोकडा नव्हे तर नागडा स्वार्थ हा परवलीचा शब्द बनलेल्या वातावरणात आजच्या तरुणाईला आपली वाट शोधायची आहे. ही वाट तुडवताना पन्नालालजींच्या पिढीचा मूल्यांचा वारसा घेऊन आपली स्वतःची नवी रणनीती तरुणाईला आखावी लागेल.

पन्नालाल सुराणा यांना विनम्र अभिवादन!

सुभाष वारे

सामाजिक कार्यकर्ते

Updated : 3 Dec 2025 9:50 AM IST
Next Story
Share it
Top