Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्निपंखांचा 'मिसाईलमॅन'

अग्निपंखांचा 'मिसाईलमॅन'

ठेंगू म्हणावी, इतकी कमी उंची, पिंजारलेले अस्ताव्यस्त लांब केस, डोळ्यापर्यंत पोहोचलेल्या पिकल्या केसांच्या करड्या-काळ्या बटा, अशा रुपातला भारताचा पहिला मिसाईलमॅन. ज्यांच्यामुळे राष्ट्रपतीपदाची व भारतरत्नचीही शान वाढली अशॉ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती त्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या आठवणी पुन्हा मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी पुनःप्रसारित करत आहोत.

अग्निपंखांचा मिसाईलमॅन
X

भारताची प्रतिमा केवळ भारतीयांमध्येच नव्हे तर जगभर उंचावणारे जे राष्ट्रपती लाभले, त्यांत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतर ज्येष्ठ अण्वस्त्र तज्ज्ञ डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा क्रमांक लागतो. त्यांचा आज जन्मदिन. ते आज आपल्यात असते तर आपण त्यांचा ८९ वाढदिवस साजरा केला असता. पण २०१५ साली २७ जुलैला ते आपल्याला सोडून गेले.

खरे तर अब्दुल कलाम यांचे वास्तव्य बहुतेक काळ दिल्लीतच. बारा वर्षांत त्यांची डझनभर वेळा भेट झाली, तोच काय तो त्यांच्याशी संबंध. तरीही या माणसाने मनात असा काही घरोबा केला की, तो `घरचा' माणूस बनून गेला. अशी काय जादू होती, या माणसात? ठेंगू म्हणावी, इतकी कमी उंची, पिंजारलेले अस्ताव्यस्त लांब केस, डोळ्यापर्यंत पोहोचलेल्या पिकल्या केसांच्या करड्या-काळ्या बटा, अशा रुपातला हा भारताचा मिसाईलमॅन. त्यांच्याशी मनाचा स्नेहबंध निर्माण झाला, तो त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच.




ही गोष्ट २००३ ची. कलामसाहेब राष्ट्रपती होऊन एक वर्ष उलटले होते. टाइम्स इमारतीत एका कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. राष्ट्रपती येणार असल्याने आमच्याबरोबरीने पोलिस खातेही लगबगीने कामाला लागले होते. त्यांच्या शिष्टाचाराचे शेकडो नियम आणि तितकेच पायंडे. त्याबद्दलच्या `मौलिक' सूचनांचा पाऊस पोलिस, राष्ट्रपती भवन, राज्य सरकार यांच्याकडून पडत होता. कुठूनशा आलेल्या राजशिष्टाचार अधिकाऱ्यांनी इमारतीच्या दारात त्यांचे स्वागत करायला कुणी कुठे उभे राहायचे, याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्याची तालीमही करून घेतली. फक्त सर्वात ज्येष्ठ अधिकाऱ्याने हस्तांदोलन करायचे. बाकीच्यांनी केवळ नमस्कार करायचा, असे सोपस्कार सांगण्यात आले.

राष्ट्रपती नियोजित वेळीच पोहोचले. सारे कारच्या मागच्या दरवाज्याकडे पाहात होते. तर ते पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या शेजारी बसलेले. उतरल्यावर त्यांनी स्वत:च हात पुढे करून हस्तांदोलन केले. त्यामुळे ठरवून दिलेला शिष्टाचार तिथेच कोसळला. इमारतीच्या पायऱ्या चढतानाच त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला व ते चालू लागले. लिफ्टमध्ये शिरताना त्यांनी विचारले, इथले वैशिष्ट्य काय? मी बरेच काही सांगताना स्पिरिच्युॲलिटी, असे अडखळतच म्हटले. `ऑल राईट', असे काहीसे पुटपुटत ते सभागृहात शिरले. नंतर स्वत:चे भाषण करताना त्यांनी लेखी भाषण बाजूला ठेवले व `माध्यमे आणि अध्यात्म' या विषयावरच ते तासभर बोलले. नंतर चहापान करताना ते स्वत:हून जवळ आले आणि पुन्हा हात हातात घेत म्हणाले, `मी ठीक बोललो ना?'... .. मी पुरता गारद!

नंतर मी खासदार झालो, तेव्हा त्यांची राष्ट्रपतीपदाची मुदत संपली होती. पण ते दिल्लीतच निवासाला होते. त्यांचा बंगला राजाजी रोडवर. माझ्या घरापासून जेमतेम दहा मिनिटांच्या पायी अंतरावर. कधी तरी सकाळी फोन करून त्यांच्याकडे गेलो की, भेटायची संधी मिळायची. तो अनुभव अनोखा व अद्भूत होता. त्यांच्या बैठकीच्या खोलीत शेकडो पुस्तकांचे व देशभरच्या वर्तमानपत्रांचे गठ्ठे. बोलायला लागल्यापासून निरोप घेईपर्यंत ते फक्त देशभरच्या बातम्यांबद्दल परदेशांतील नवनव्या संशोधनाबद्दल आणि तरुणांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधींबद्दल बोलायचे.

संसदेत वेगवेगळ्या विषयांवर गोंधळांचे प्रयोग रोजच चालायचे. त्या बातम्या वाचून त्यांचे मन विषण्ण होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत राहायचे. `मी आता निवृत्त आहे. पण तुम्ही मंडळी काही तरी करा. पुढच्या पिढीचा विचार करून काम करा. आजचा तरूण तुमच्याकडे आशेने पाहातो आहे. त्याला निराश करू नका!' असे ते सांगत राहायचे, तेव्हा त्यांच्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांत अश्रू तराळताना दिसायचे. कलामसाहेबांचे कर्तृत्त्व चौफेर. इस्रोमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून ते आले, तेव्हा त्यांचा होमी भाभा यांच्याशीही संपर्क आला होता. नंतर त्यांनी अवकाशापासून क्षेपणास्त्र निर्मितीपर्यंत झेप घेतली. भारतीय बनावटींची वेगवेगळ्या पद्धतीची व क्षमतेची क्षेपणास्त्र बनवून त्यांनी भारताचा `मिसाईलमॅन' हे बिरूद मिळवले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने पोखरणचा दुसरा अणु चाचणी स्फोट घडवून आणला, त्या कामगिरीचे तेच प्रमुख होते.



त्यावेळचे त्यांचे अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकणे हा एक दिव्य साक्षात्काराचा अनुभव होता. अनेक देशी - विदेशी दबाव गट या चाचण्यांना आडून विरोध करत होते. पण कलामसाहेब शांतपणे काम करतच राहिले. त्यामुळे भारत निवडक देशांच्या अण्वस्त्र क्लबमध्ये दाखल झाला. या कर्तृत्त्वामुळेच त्यांना `भारतरत्न' या सर्वोच्च किताबाने गौरवण्यात आले. नंतर वाजपेयींच्या काळातच ते राष्ट्रपतीही झाले. भारताच्या काही राष्ट्रपतींना ते पद भूषवल्यानंतर `भारतरत्न' मिळाले आहेत. पण `भारतरत्न' या सर्वोच्च नागरी सन्मानानंतर `राष्ट्रपती' या सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते पहिले व एकमेव. त्यांच्यामुळे राष्ट्रपतीपदाची व भारतरत्नचीही शान वाढली, हे नक्की.

पण अशा सन्मान, किताबांबद्दल त्यांना फारशी फिकीर नसावी. ते राष्ट्रपती भवनात होते, तेव्हा तिथे ते एकटेच राहायचे, पण राष्ट्रपती भवन माणसांनी भरलेले असायचे. त्यांना भेटायला देशभरातून माणसे विशेषत: तरुण यायचे. ते खऱ्या अर्थाने `रयतेचा राष्ट्रपती' होते. कारण शिष्टाचाराच्या जाळ्यात त्यांनी स्वत:ला गुरफटवून घेतले नाही व स्वत:च्या कार्यालयालाही नसत्या उपचारांची सक्ती केली नाही. राष्ट्रपती हा देशाचा पहिला नागरिक असल्याने तो सर्वांना `जवळचा' वाटायला हवा, अशी त्यांची वृत्ती व नीती. `मी सर्वांना आवर्जून भेटत असे. कारण त्यापैकी एकाच्या मनात जरी मी देशासाठी काम करत राहण्याची प्रेरणा निर्माण केली, तरी माझे जीवन सार्थकी लागले, असे मी मानत राहिलो', असे ते सांगायचे.

निवृत्तीच्या काळातही त्यांच्याकडे युवक, विद्यार्थी येतच होते. त्या सर्वांशी कलामसाहेब बोलायचे, त्यांची विचारपूस करायचे व सल्लाही द्यायचे. `ही पिढीच देशाला 2020 मध्ये सर्वोच्च शक्ती बनवेल, असा विश्वास ते बोलून दाखवायचे. असे कलामसाहेब. त्यांच्याकडचा गोष्टींचा आणि आठवणींचा खजिना इतका मोठा की, त्या ऐकायला महिने कमी पडतील. पण केवळ आठवणींच्या साम्राज्यात न रमता निवृत्तीनंतरही ते देशभर फिरत राहिले. विशेषत: शाळा, कॉलेजे, विद्यापीठे अशा शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात त्यांना विशेष स्वारस्य होते. अशी निमंत्रणे ते आवर्जून स्वीकारत व शेकडो मैलांचा प्रवास करत तिथे पाहोचत.

कलामसाहेबांना संगीताचा विशेष शौक होता, हे फारच थोड्यांना ठाऊक असेल. त्यांच्यापाशी एक सरस्वती वीणा होती. ती ते आवडीने वाजवत. त्यात त्यांना उत्तम गतीही होती. `मी कधी एकटा असलो, मन त्रस्त झालेले असले की, ही वीणाच मला साद घालते. मी तिच्यासमवेत खेळतो. मन हलकं होतं', असं सांगताना ते सरस्वती वीणेच्या तारा अलगद छेडू लागतात. ही तर सरस्वतीची सरस्वतीशी भेट, असेच वाटायचे. कलामसाहेबांना मी एकदा म्हटले तुम्ही खरे कर्मयोगी. ते केवळ मंद हसले आणि त्यांनी स्वत: बनवलेल्या कॉफीचा कप पुढे केला.




ते खरेच भगवान श्रीकृष्ण आणि नंतर लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेले `कर्मयोगी' होते. म्हणूनच तर अखेरचा श्वास घेईपर्यंत ते कामच करत राहिले व शिलाँगला आयआयएमच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करतानाच त्यांनी ईहलोकीचा निरोप घेतला. असे मरण येण्यासाठीसुद्धा तपश्चर्या व सिद्धीही असायला लागते. ती या सिद्धपुरुषाकडे होती. कलमसाहेबांचा पुनर्जन्मावर विश्वास नव्हता. मुक्ती वगैरे गोष्टी त्यांना भाकड कथा वाटायच्या. त्यामुळेच त्यांच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो अशा गोष्टी त्यांना लागू पडत नाहीत. कलाम साहेब आपल्यात होते व आता नाहीत, इतकेच काय ते सत्य.

-भारतकुमार राऊत

Updated : 14 Oct 2022 3:01 AM GMT
Tags:    
author-thhumb

भारतकुमार

Print & TV Journalist,Political Analyst and formerMember of Parliament (RS). Worked in India & abroad and in English & Marathi. Opinions are strictly personal.


Next Story
Share it
Top