Home > मॅक्स ब्लॉग्ज > सावकरांच्या माफीनाम्यांशी गांधींचा खरंच संबंध आहे का?

सावकरांच्या माफीनाम्यांशी गांधींचा खरंच संबंध आहे का?

सावकरांच्या माफीनाम्याबाबत वक्तव्य करून देशाचा वीज, कोळसा विभाग उद्योगपतींच्या घशात घालायचा आहे का? इतिहासाचं विकृतीकरण संघ करतोय का? अंदमानातील इतर क्रांतिकारकांचा इतिहास भारतीयांसमोर का आला नाही? 'वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' काय आहे या पुस्तकात? जाणून घ्या तुषार गायकवाड यांच्याकडून..

सावकरांच्या माफीनाम्यांशी गांधींचा खरंच संबंध आहे का?
X

अंदनामातील जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी गेलेल्या भारतातील हजारो क्रांतिकारकांना अनन्वित छळ करुन मारले गेले. सर्वच क्रांतिकारकांवर अनन्वित अत्याचार झाले पण एकानेही ब्रिटीश राजवटीसमोर माफीनामा दिला नाही.

सावरकरांना शिक्षा झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांच्या आत १९११ मध्ये त्यांनी पहिला माफीनामा ब्रिटीशांकडे सादर केला. पुढे १९१३ मध्ये दुसरा माफीनामा सादर केला. यावेळी विनायक सावरकर आणि बरेंद्र घोष यांनी आपला क्रांतिकारक भूतकाळ पुसून टाकण्याची विनंती केली. तर हृषीकेश कांजीलाल, नंद गोपाळ व सुधीरकुमार सरकार या तीन क्रांतिकारकांनी जेलमध्ये मानवतावादी वागणूक मिळावी अशी लेखी विनंती केली.

सावरकर वगळता एकाही क्रांतिकारकाने ब्रिटीशांसमोर संपूर्ण आत्मसमर्पण केलं नाही. वारंवार माफी मागून सुटका झाल्यावर स्वतःच स्वतःवर टोपण नावाने पुस्तक लिहिले नाही. त्यामुळे अंदमानातील क्रांतिकारकांचा इतिहास भारतीयांसमोर आलाच नाही. माफीनामा किंवा दया याचिका एकदाच सादर केली जाते वारंवार नाही.

मात्र, उपलब्ध ऐतिहासिक संदर्भानुसार सावरकरांनी एकूण पाच वेळा १९११, १९१३, १९१४, १९१९ आणि १९२० असे माफीनामे लिहिले. पैकी १९१४ च्या माफीनाम्यात सावरकरांनी, 'पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली.' यानंतर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावकर यांनी सहावा माफीनामा १९२१ मध्ये दिला.

माफीनाम्यावर सुटलेल्या सावरकरांनी सुटकेनंतर कोणतेही काम ब्रिटीशविरोधी केले नाही. उलट ब्रिटीशांना सहकार्य होईल अशा भूमिका वारंवार घेतल्या. संपूर्ण देश ब्रिटीशांशी लढत असताना सावरकरांची हिंदू महासभा मुस्लिम लीग सोबत बंगाल व सिंध प्रांतात सत्ता उपभोगत होती.

बंगालच्या फाळणीची मागणी करत होती. याशिवाय ब्रिटिशांना हव्या असलेल्या द्विराष्ट्रवादाची संकल्पना जिनांच्या अगोदर सावरकरांनी १९३५ च्या हिंदू महासभेच्या अहमदाबाद अधिवेशनात मांडली.

उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या 'वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' पुस्तकाचे शिर्षक अतिशय योग्य आहे.

सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिध्दांत सर्वप्रथम मांडला, तो मांडलाच नसता तर अखंड भारताचे तुकडे झाले नसते! संघ आणि सावरकर यांच्यात कमालीचे टोकाचे मतभेद होते. पण संघाकडे तुरुंगवास भोगलेला एकही क्रांतिकारक नसल्याने सावरकरांच्या प्रायोपवेशना (आत्मवधा) नंतर संघाने सावरकरांना प्रतिक करण्याचे योजले.

यासाठीच रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक आणि द्वितीय माफीवीर बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणी कालखंडातील 'आयबी'चे सहसंचालक टि. व्ही. राजेश्वर यांच्या माध्यमातून मुस्लीम समाजाच्या नसबंदीच्या मुद्दांवर आणीबाणीला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट मागितली.

मात्र, इंदिरा गांधींनी भेट नाकारली. आणि देवरसांची गोची झाली. पुढे सावरकरांच्या उदात्तीकरणाच्या बदल्यात आणीबाणीला पाठींबा दर्शवण्याच्या ऑफरसाठी बाळासाहेब देवरस आणि माजी पंतप्रधान व तृतीय माफीवीर अटलबिहारी वाजपेयी यांनी आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जेलमधून अनेक माफीपत्रे लिहिली.

हा काळा व विकृत इतिहास लपवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून नाकर्ते ठरलेल्या मोदीशहांच्या आदेशाचे चाकर 'कडीनिंदा' फेम राजनाथ सिंहांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरुन सावरकरांनी माफीनामा उर्फ दया याचिका सादर केल्याचा जावईशोध लावलाय. मुळात महात्मा गांधी आफ्रिकेहून भारतात आले १९१५ मध्ये, सावरकरांनी पहिला माफीनामा सादर केला १९११ मध्ये याचाच अर्थ राजनाथ सिंह धादांत खोटे बोलत आहेत.


संघाच्या सहा कोअरपैकी एक कोअर अहोरात्र इतिहासाचे विकृतीकरण करत असतो. कडीनिंदांचे वक्तव्य त्याचाच एक भाग आहे. या वक्तव्याच्या आडाने देशाचा वीज, कोळसा विभाग उद्योगपतीच्या घशात घातला जाणार आहे.

मागे एकदा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्त आणि यंत्रणेत एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो.' असे वक्तव्य केले होते. पण कडीनिंदा सारखी इतिहासाचे विकृतीकरण करणारी गाढवे या वयातही माणसात येईनात हे वास्तव आहे.

तुषार गायकवाड

(शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता)

Updated : 13 Oct 2021 12:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top