News Update
Home > मॅक्स ब्लॉग्ज > महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर...

महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर...

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वाद असताना गांधींनी बाबासाहेबांना घटना समितीचे अध्यक्ष पद का दिले? पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा आधुनिक व समाजवादी समाजरचना असलेला समाज नक्की कसा होता? समजून घेण्यासाठी वाचा प्रशासकीय अधिकारी सिद्धार्थ खरात यांचा लेख

महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर...
X

महात्मा गांधी भारतात प्रत्यक्ष १९१५ मध्ये आले. त्यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रीकेत भारतीय वंशाचे प्रश्न हाताळून वंशविद्वेशाविरूद्ध लढा दिला होता. ते भारतात येणापूर्वी गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, लाला लजपतराय, दादाभाई नौरोजी, सुरेद्रनाथ बॅनर्जी वगैरे लोक राष्ट्रीय कॅांग्रेसचे नेतृत्व करत होते.

इंग्रजी शिक्षण घेणा-या भारतीयांना नवीन दृष्टी आली होती. हे नवीन शिक्षण घेऊन सज्ञान झालेला वर्ग जनतेचे तंटे बखेडे ब्रिटीशांकडे मांडत होता. ते सर्वजण इंग्रजीतून भाषणे देत व आपली मते मांडत. हा वर्ग राष्ट्रभावना जागृत करण्यात यशस्वी ठरला असला तरी सार्वत्रिक देशभावना संघटित करू शकला नाही. तसेच हा नवीन शिक्षित वर्ग जवळजवळ एकाच विशिष्ट वर्गातला असल्याने सर्व समाज घटकात ऐक्याची भावना तयार होऊ शकली नाही.

ब्रिटिशांविरूद्ध असंतोष असूनही तो त्यांना सहज दाबता येणे शक्य होते. लोकमान्य टिळकांसारख्यांना तुरूंगात रहावे लागले होते. महात्मा गांधी भारतात येण्यापूर्वीचे हे चित्र होते.

गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरूस्थानी मानत. त्यांनी दिलेल्या सल्याप्रमाणे १९१५ मध्ये भारतात आल्यावर गांधीजी २ वर्षे संपूर्ण देशभर फिरले. या काळात ते कुणाशीही फारसे बोलले नाही. भारत आणि भारतातले प्रश्न समजून घेतले.

त्यानंतर साबरमती येथे आश्रम स्थापन करून ते कॅांग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कामात सहभाग घेऊ लागले. याच काळात उत्तर प्रदेशातल्या चंपारण्य येथील निळ उत्पादन करणा-या शेतक-यांचा प्रश्न हाती घेण्याबद्दल तेथील शेतक-यांनी विनंती केली. त्यानुसार त्यांनी हा प्रश्न स्वतंत्रपणे हातात घेतला व अहिंसात्मक आंदोलन करून सोडवला. गुजरातेतल्या बारडोली येथील शेतक-यांनाही त्यांनी न्याय मिळवून दिला.

सुरूवातीच्या काळात त्यांनी कॅाग्रेससाठी जाहीरनामा तयार करणे, जालियनवाला बाग हत्यांकांडाचा अहवाल तयार करणे. या सारखी कामे केली. अस्पृश्य निवारणाबद्दल भूमिका घेतली व मुस्लिम समाजाला विश्वासात घेऊन हिंदू मुसलमान ऐक्य घडविण्यावर भर दिला.

१९२० च्या नागपूर अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निवारणाचा ठराव महात्मा गांधींनी घडवून आणला. महात्मा गांधीच्या या अशा नवनवीन व सर्वसमावेशक प्रश्नांच्या हाताळणीमुळे आणि जनमानसात निर्माण होत असलेल्या प्रतिमेमुळे १९२० महात्मा गांधीची लोकप्रियता लोकमान्य टिळकांच्याही पुढे गेली होती.

अशातच १९२० मध्ये तुर्कस्थानमध्ये ब्रिटीशांनी खलिफा हे धार्मिक पद बरखास्त केले होते. ते पुन्हा पुनर्स्थापित करावे म्हणून भारतातील मुस्लिमांनी ब्रिटीशांविरूद्ध चळवळ सुरू केले होती. गांधीजींनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन या चळवळीत प्रत्यक्ष सहभागी झाले. या खिलाफत चळवळीत भारतातील मुस्लीमांचे नेतृत्व महात्मा गांधी या हिंदूने केले हे जगातले पहिले उदाहरण आहे .

सत्य, आणि अहिंसा या मूळातल्या भारत भूमीतल्या तत्वाचा त्यांनी अंगीकार करून या तत्वांचा त्यांनी आग्रह धरला. तसेच ब्रिटीशासारख्या शक्तीशाली सत्तेविरूध्द लढण्यासाठी भारतीय जनतेला सत्याग्रहाचे अमोघ असे शस्त्र दिले. त्यांच्या या शस्त्राचा वापर पुढे अनेकांनी केला.

डॉ. बाबासाहेब आणि सत्याग्रह

डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या शस्त्राचा वापर १९२७ मध्ये महाड सत्याग्रहावेळी केला. महाड सत्याग्रहावेळी उभारलेल्या मंडपात एकच फोटो लावण्यात आला होता व तो फोटो महात्मा गांधीचा होता. डॉ. बाबासाहेबांनी मात्र, सत्याग्रहाला अधिक शाश्त्रशुद्ध पाया दिला.

अस्पृश्यांचा प्रश्न हा हिंदूनी निर्माण केला असून हिंदू आणि अस्पृश्य या दोघांनी मिळून सोडवला पाहीजे. अशी गांधीजींची धारणा होती. तर अस्पृश्य व त्यांचा हिंदू धर्मातील हीन दर्जा घालविण्यासाठी हिंदू धर्माचा दयाभाव उपयोगाचा नसून अस्पृश्यांना गुलामीची जाणीव करून देणे व राजकीय व आर्थिक हक्क प्रदान केल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. असे डॅा. बाबासाहेबांचे प्रतिपादन होते. या विषयावर दुस-या गोलमेज परिषदेत डॅा बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्यात घुमशान झाले.

डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना द्यावयाच्या राजकीय हक्काची आवश्यकता साधार मांडली. याबाबत ब्रिटीश पंतप्रधानांचे मन वळविण्यात ते यशस्वी झाले. याची परिणीती म्हणजे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले.

गोलमेज परिषदेत डॅा बाबासाहेब आंबेडकर तिनही वर्षे उपस्थित राहीले होते. इतकेच नव्हे तर स्ट्रक्चरल कमीटीचे ते सदस्य होते. तर महात्मा गांधीजी केवळ दुस-या गोलमेज परिषदेत उपस्थित राहीले होते. या परिषदेत भारतीयांना भविष्यात राजकीय हक्क देण्यासंबधाने विचारविनिमय करण्यात आला.

तीन वर्षे चाललेल्या प्रदीर्घ बैठकानंतर भारतियांना डॅामिनियन स्टेटसचा दर्जा बहाल करून १९३५ चा कायदा अस्तित्वात आला. परंतु ही परिषद मुख्यत्वे गाजली. ती अस्पश्यांच्या प्रश्नावर डॅा आंबेडकरांनी उठवलेवलेल्या झंजावाती प्रचारामुळे. अस्पृश्य हे हिंदूचा भाग आहे. हा कलंक पुसून काढण्यासाठी हिंदूंनी स्वत:हून पुढे आणण्यासाठी मला वेळ द्या अशी मागणी महात्मा गांधींनी डॅा. आंबेडकरांना इंग्लंड मध्ये केली होती. तर हा प्रश्न गांधीजी आणि कॉंग्रेसने केवळ शोभेसाठी ठेवला तसेच कॉंग्रेस पक्षाचा सदस्य होण्यासाठी अस्पृश्यता न पाळण्याची व अस्पृश्य सदस्यांना घरात ठेवण्याची अट घालता आली असती.

अस्पृश्यता निवारणासाठी कॉंग्रेसने मनापासून प्रयत्न केला नाही. असा आरोप बाबासाहेबांनी महात्मा गांधींजी व कॉंग्रेसवर केला. ब्रिटीशांनी डॉ. बाबासाहेबांची मागणी मान्य केली. या विरूद्ध महात्मा गांधीजींनी येरवडा कारागृहात उपोषण सुरू केले. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात चर्चेच्या फे-या होऊन पुणे करार अस्तित्वात आला.

या करारामध्ये अस्पृश्यांना भरीव राखीव जागा मिळाल्या. महात्मा गांधीजींनी डॉ. बाबासाहेबांचे आभार मानून पुणे करार केल्याबद्दल अभिनंदनही केले. या कराराबद्दल पुढील ३ वर्षे महात्मा गांधीजी व डॅा. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांचे आभार मानत असत.

या प्रश्नावर डॉ. बाबासाहेबांनी रान उठविल्यामुळे अस्पृश्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यांची किर्ती या काळात खूप वाढली होती. महात्मा गांधीजी देखिल त्यामुळे प्रभावीत झाले होते.

राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे कार्य थांबवून त्यांनी अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याला प्राधान्य दिले. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश देण्यासाठी हिंदूनी पुढाकार घ्यावा यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले. या विषयावर ते सन १९३२ ते १९३५ असे तीन वर्षे काम करत राहीले. अस्पृश्यता निवारणाच्या कामासाठी त्यांनी २६ लाख उभे केले. हिंदूंनी हा कलंक धुऊन टाकण्यासाठी मंदिर उघडण्याची हाक दिली.

जर भारतातील हिंदू समुदाय अस्पृश्यतेच्या सर्व फांद्या कापून काढून तिला मुळासकट उपटून काढणार नसतील तर त्यांनी कोणतेही आढे वेढे न घेता माझ्या प्राणाचा बळी घ्यावा. असे अपील केले.

या प्रश्नावर डॅाक्टर साहेब तुमचे सहकार्य पाहीजे. अशी मागणी डॉ. आंबेडकर यांचेकडे केली.

डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत प्रभावाने व त्यांनी या प्रश्नावर उभ्या केलेल्या चळवळीचा प्रभाव सर्वत्र दिसून येत होता.

अस्पृश्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन गांधीजींनी आयुष्यभर अस्पृश्यांचा वेष परिधान केला.

याचा परिणाम असा झाला की अनेक हिंदू मंदिरे उघडण्यात आली. सहभोजने सुरू झाली. तथापि त्यांच्या या कामामुळे त्यांचेसोबत असलेले कॅाग्रेस पक्षातील अनेक हिंदू धर्माभिमानी व सनातनी हिंदू त्यांना सोडून गेले. महात्मा गांधीजींनी त्यांची शक्ती राष्ट्रीय कार्यावर म्हणजे स्वातंत्र्य चळवळीवर खर्च करण्याऐवजी अस्पृश्य निवारणासारख्या निरूपयोगी कार्यावर खर्च करून राष्ट्राचा वेळ वाया घालवत आहेत. असे आरोप करण्यात येऊ लागले.

कट्टर हिदू धर्माभिमानी व सनातनी तसेच शंकराचार्य यांनी महात्मा गांधी हे हिंदू धर्म बुडविण्यास निघालेले ब्रिटीशांचे हस्तक आहेत. असा त्यांच्यावर आरोप करू लागले. हा प्रश्न अधिक लावून धरल्यामुळे १९३३ मध्ये एका सनातनी हिंदूने महात्मा गांधीजींवर बॅांब टाकून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून ते बालंबाल बचावले.

परंतु या कार्यापासून ते मागे हटले नाहीत. या कार्यात महात्मा गांधीजी पुढे सरसावले तरी सनातनीनंजळीकडून त्यांना प्रचंड विरोध झाला. या विषयावर हिंदू तितकेसे अनुकूल नसल्याने गांधीजी एकटेच पडू लागले.

डॉ.बाबासाहेबांना देखिल भारतीय हिंदूच्या मनाची स्थिती कळून चुकली. या प्रश्नावर अनेक संतानी प्रबोधन करून हिंदूची मने बदलविण्याचा प्रयत्न करून पाहीला. लोकांनी संताचे पूजन केले. परंतु आचरणात बदल केला नाही.

प्रश्नाचे उत्तर एखाद्या महात्म्याच्या उपदेशात नाही तर अस्पृश्यता व जात प्रमाणभूत मानणा-या धार्मिक शास्त्रात असल्याचे मत डॉ. बाबासाहेबांचे बनले. जात व अस्पृश्यता मानणा-या हिंदूचा तो दोष नसून ज्या शास्त्रांनी, धर्म ग्रंथानी व हिंदू कायद्यांनी या प्रथांना मान्यता दिली. त्यात यांचे उत्तर असल्याची प्रचिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आली. व या विषयावर घाव घालण्याचे त्यांनी निश्चित केले.

या विषयावर त्यांनी नव्याने रणनिती आखली आणि गांधी- आंबेडकर या दोघांत अनुभूती, साध्य व साधन यांत पुन्हा अंतर दिसून आले. गांधीजींनी या विषयावर चिकित्सा केली नाही. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा विषय सामाजिक समता, राजकीय व आर्थिक हक्क आणि अधिकाराच्या पातळींवर आणून ठेवला.

महात्मा गांधीजी कधी संत असत तर कधी राजकारणी, कधी समाज सुधारक तर कधी धर्म सुधारक, कधी अध्यात्म तर कधी सत्याचे प्रयोग करत. कधी अस्पृश्यता निवारण तर कधी हिंदू मुसलमान ऐक्य, कधी अल्पसंख्यांकाचे हिताचे रक्षण तर कधी स्वच्छता या प्रश्नावर काम करीत. दर सोमवारी मौन व्रत धारण करून अध्यात्माचा अनुभव घेत तर कधी ईश्वर अल्लाचे भजन गात असत.

त्यामुळे सर्वांनाच ते आपले वाटत असत. भारतीय राजकारणांत आवश्यक असलेला सर्वसमावेशकता हा गुण अशाप्रकारे महात्मा गांधीजी यांचेकडेच होता. त्यामुळेच तत्कालीन परिस्थितीत एकापेक्षा सरस बुद्धिवान राजकीय नेते भारतात असतांनासुद्धा भारतीय राजकारणाची चळवळ त्यांच्याशिवाय पुढे जात नव्हती. पब्लिक पल्स म्हणजे जनतेची नाडी फक्त गांधीजीकडे असल्यामुळे तत्कालीन भारतीय नेत्यांना गांधीजीशिवाय पर्याय नव्हता.

महात्मा गांधीजी इतका भारत समजलेला नेता त्यावेळी अन्य कुणीही नव्हता.

भारतातील जहाल राष्ट्रवादी व क्रांतीकारक चळवळीकडून करण्यात येणा-या सशस्त्र क्रांतीला व क्रांतीकारकांना गांधीजींनी विरोध दर्शविला व सत्य व अहिंसेचा मार्ग अनुसरला. ते कॅाग्रेस पक्षाचे कुणीही नसताना कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ध्येय घोरणे त्यांच्याशिवाय ठरत नसत. बलाढ्य ब्रिटीश सत्तेविरूद्ध लढण्यासाठी भारतीयांना विनाशस्त्र व निर्भय उभे करण्याचे श्रेय निर्विवाद महात्मा गांधीजीकडे जाते.

भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताची भविष्यातली कार्यपद्धती ठरविण्यासाठी योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचा प्रसंग उद्भवला तेव्हा त्यांच्या मन:चक्षुपुढे कायदेतज्ज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव आले.

पंडीत नेहरूंशी चर्चा करून सरदार पटेल यांचा विरोध असतानासुद्धा व डॅा. बाबासाहेब आंबेडकर हे कॉंग्रेस पक्षाचे विरोधक असतांना सुद्धा घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॅा. बाबासाहेबांना नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यास महात्मा गांधीजींनी भाग पाडले व हे काम सरदार पटेलांमार्फत त्यांनी पूर्णत्वास नेले.

महात्मा गांधी हे महत्वाकांक्षा असलेले राजकारणी तर महाभारत, भगवद्गीता वाचलेले श्रद्धाळू हिंदू होते. श्रृती, स्मृती व इतर हिंदू पुराणे यांवर चिकित्सा न करणारे जाती व वर्णाश्रम धर्माचे अभिमानी होते. तर डॅा. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभुषित असल्याने संशोधन व चिकित्सेच्या शास्त्रशुद्ध पायावर आपले विचार प्रकट करत.

भारत-पाकिस्तान ची फाळणी होऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण धार्मिक दंग्यांनी देश पेटला. या काळात हिंदू मुसलमान समुदायात प्रत्यक्ष जाऊन शांतता राखण्यासाठी ते रस्त्यावर उतरले.

आपला देश अठरापकड जाती, विविध धर्म आणि परंपराचा आहे. एक अध्यात्मवादी व राजकारणी म्हणून महात्मा गांधींनी या सर्व घटकांना सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात बहुतांशी ते यशस्वी ठरले असले तरी कट्टर मूलतत्ववादी शक्ती त्यांच्या विरूद्ध गेल्या.

अस्पृश्यता निवारण, हिंदू -मुसलमान ऐक्याबाबतच्या त्यांच्या भूमिकेमुळे हिंदू धर्माभिमानी अगोदरच चिडले होते. यातच त्यांचा एका हिंदू माथेफिरूने खून केला. हा खून गांधी नावाच्या व्यक्तीचा नव्हता तर सर्वसमावेशकतेच्या परमोच्च स्थानावर पोहोचलेल्या भारतीयत्वाचा हा खून होता.

गांधी आंबेडकराचा तत्कालीन संघर्ष हा तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होता. एक प्रश्न सोडवण्याचे दोन भिन्न मते होती. परंतु प्रश्नाला विरोध नव्हता.

महात्मा गांधी, पंडीत नेहरू, डॅा बाबासाहेब आंबेडकर इत्यादींनी भारतीयांच्या स्वप्नांचा भविष्यासाठीचा सांविधानिक पाया अंतीम केला.

आपला देश विविध भाषा, प्रांत, जाती, धर्म आणि परंपरांचा आहे. कोणताही एक धर्म, वा एका जातीचा आग्रह धरल्यास राष्ट्र उभे राहू शकत नाही. सर्वांचा सन्मान, सर्वांचा आदर, विविधता व त्यातून देशाची एकता साधणारा मार्ग महात्मा गांधींनी घालून दिला आहे.

महात्मा गांधी हे राजकारणात नसते तर सत्य, अहिंसा व सत्याग्रहाचा पुरस्कार करणारे २० व्या शतकातले भारताचे दुसरे बुद्ध ठरले असते.

महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील तत्कालीन तात्विक विरोधाला दुश्मनीचे स्वरूप देऊन समाजासमाजात संघर्षाचे वातावरण निर्माण करत आहेत. यांत अनुयायांची अपरिपक्वता असून ही विकृती आहे.

या उलट महात्मा गांधी यांच्या स्वप्नातला अध्यात्म व नैतीकता प्रधसमाज, पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा आधुनिक व समाजवादी समाजरचना असलेला समाज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समता व परिवर्तनवादी समाजरचना असलेला भारत एकत्र येणे ही आजच्या काळाची गरज आहे.

सिद्धार्थ खरात,मंत्रालय.मुंबई

Updated : 4 Oct 2021 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top