Home > मॅक्स ब्लॉग्ज > खरे कोरोना फायटर्स!

खरे कोरोना फायटर्स!

खरे कोरोना फायटर्स!
X

कोरोना व्हायरसच्या या जागतिक साथीमध्ये आपण काय करू शकतो हा विचार अनेकांना स्पर्श करून जातो. अर्थात घरी राहाणं, बाहेर न पडणं आणि कोणतीही सामुदायिक कृती न करणं हाच आत्ता गरजेचा उपाय आहे हे नक्की!

परंतू मी ही काहीतरी केलं पाहिजे हा विचार प्रत्येकाच्या मनात असतो. गरजूंना अन्न, शिधा पुरवणं हे काम ही चळवळीतील अनेक दोस्त कार्यकर्त्यांनी हाती घेतलं आहे. अनेक जण याला आर्थिक सहाय्य देत आहेत. अतिशय महत्त्वाची अशी ही कामं आहेत.

मी सुद्धा यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. या विचारातूनच मग थाळ्या वाजवा, शंख वाजवा, घंटा वाजवा आणि आता लाईट घालवा, मेणबत्त्या पेटवा अशा कृती घडतात. कितिही निरर्थक असल्या, अंधश्रद्धांना खत पाणी घालणार्‍या असल्या तरी मग आपण त्या करतो. काहीही करून त्याचं समर्थन करत राहतो. प्रत्यक्षात तरीही मनातून त्या सगळ्याची निरर्थकता आपल्याला जाणवत राहतेच.

या सार्‍या निरर्थकतेच्या आणि उथळपणाच्या अंधारात वैभव छाब्रा, रिचा श्रिवास्तव या तरूण पती-पत्नीनी आणि त्यांचे सहकारी नरेंदर यांनी घेतलेला वसा मात्र आपल्याला लख्ख उजेडाचा अनुभव देऊन जातो.

करोना वायरसचा सामना करण्यासाठी आज सगळ्यात मोठी गरज आहे. ती डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांसाठी लागणार्‍या सेफ्टी पोशाखांची. याला पी.पी.ई. पर्सनल प्रोटेक्शन इक्विप्मेंट म्हणतात. आज भारतामध्ये याची प्रचंड कमतरता भासतेय. लाखो डॉक्टर्सना आता कोट्यावधी पेशंट्सना 24 तास तपासावं लागणार आहे. अशा वेळी डॉक्टर्स -नर्सेसना स्वतः या प्रादुर्भावापासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमेंट्स. परदेशी व्हिडिओज मध्ये आपण हे पोशाख पाहिलेत. पण आपल्या एम्स च्या डॉक्टरांकडे सुद्धा या सार्‍या साहित्याची, पोशाखांची कमी आहे.

AIIMS च्या डॉक्टरांनी आणि अनेक संघटनांनी पंतप्रधानांना पत्र लिहून याबद्दल लिहिलं आहे. यासाठीच कोरोनाची चाहूल लागताक्षणीच पंतप्रधान कार्यालयाने वॉर रूम तयार करायला हवी होती. अनेक तज्ञ यामध्ये असायला हवे होते. कोणत्या साहित्याची गरज आहे, काय उपाय-योजना करायला हव्यात, लॉक डाऊन स्थितीत कोणती परिस्थिती तयार होऊ शकते, या सर्वाचं प्लॅनिंग करण्यासाठी दोन महिने खरं म्हणजे हातात होते आणि आपण ते गमावले. त्यामुळेच आता निरर्थक कृती करण्याची पाळी आली आहे. की, काय असे वाटू लागते . असो, ही वेळ केवळ सरकारवर टीका करण्याची वेळ नाही, आणि निरर्थक थाळ्या-टाळ्या- मेणबत्त्या लावण्याचीही नाही तर विज्ञानाच्या साहाय्याने लढाईत सामील होण्याची आहेय हे वैभव, रिचा, नरेंदर आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नातून समोर आले आहे.

वैभव छाब्रा आणि रिचा हे ‘मेकर्स असायलम’ ही अतिशय वेगळी डिझाईन लॅब चालवतात. ह्या त्यांच्या लॅबमध्ये त्यांनी पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटमधील मधील सर्वात महत्वाचे असणारे M-19 शील्ड्स बनवायला घेतले आहेत. थोडे-थोडके नाहीत तर 1 लाख एम-19 फेस शील्ड्स निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनेक स्वयंसेवक तरुणी-तरूण या द्वयीने इंस्टाग्रॅम च्या मध्यमातून जोडले आहेत. समाजमाध्यमातून अवाहन करून यातील प्रत्येक स्वयंसेवक त्यांना जोडता आला. या प्रयत्नाला त्यांनी नाव दिले आहे, ‘एम-19 कलेक्टिव्ह’.

समाजमाध्यमातूनच क्राऊड फंडिंग करून त्यांनी यासाठी लागणारे भांडवल उभे केले. अथक परिश्रम घेतले. आणि आजपर्यंत 16 हजार 090 शील्ड्स तयार करून महानगर पालिका आणि महाराष्ट्र सरकारच्या हॉस्पिट्ल्स मध्ये पाठवलेही. वेंचर सेंटर, पुणे, मेकर्स अड्डा, नाशिक, विज्ञानश्रम, औरंगाबाद, फॅब-लॅब,नागपूर, ड्रीम वर्क्स, मॅन्गलोर,आणि बंगलोर, अशा एकूण 10 शहरांमधून हा प्रकल्प त्यांनी सुरू केला आहे. तरूण स्वयंसेवक अक्षरशः 18-18 तास काम करत आहेत. काहींनी 24 तास ह्या प्रकल्पाला स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.

ह्या फेस-शील्ड्सची जुळणी कशी करायची याची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या वेबसाईट्वर उपलब्ध केली आहे. त्यांच्या या प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती www.makersasylum.com/covid19 संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अनेक वेळा नवीन पिढी इंटरनेटवर, इंस्टाग्रॅमवर काय करते? आहे असे प्रश्न प्रौढांना पडत असतात. याच माध्यमातून काही रोगट लोक सतत धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेजेस पाठवताना आपण काल परवा पाहिले. परंतू याच माध्यमांचा सकारात्मक उपयोग करून काय घडवून आणता येऊ शकते? याची चुणूक या सर्जनशील तरूणांनी दाखवून दिली आहे.

कॉविड 19/ करोना व्हायरसचा मुकाबला करायचा असेल तर छद्म-विज्ञान (pseudo-science) चालणार नाही, भोंगळ उपाय, थाळ्या- टाळ्या- छात्या बडवून चालणार नाही. तर आधुनिक विज्ञानाची मदत घ्यावी लागेल. विज्ञानाचे, आणि वैज्ञानिक-प्रयत्नांचे हात बळकट करावे लागतील हे सुद्धा या राष्ट्रप्रेमी तरुणांनी दाखवून दिले आहे. तरूण पीढीतील हे प्रयत्न म्हणूनच आजच्या अंधकारात प्रकाशाची बेटं ठरतात.

- आशुतोष शिर्के

Updated : 5 April 2020 12:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top