Home > मॅक्स ब्लॉग्ज > राजर्षी शाहू : नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष

राजर्षी शाहू : नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष

राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरच्या मातीला देशच नाही तर परदेशातही स्थान मिळवून दिलेला लोकप्रिय राजा .राजर्षी शाहू यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख नक्की वाचा…

राजर्षी शाहू : नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष
X


राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 या दिवशी झाला होता.जिथं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सर्वाना माणुसकीची वागणूक दिली गेली,स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात झाली,माणुसकीला काळिमा फासणाऱ्या चालीरीतींना कायमचा पूर्णविराम मिळाला .अश्या कोल्हापूर शहरात त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला .तसं पाहता राजर्षी शाहूंचे मूळ नाव यशवंत असं आहे. कागलचे जहागीरदार आणि कोल्हापूर संस्थांचे रिजंट आबासाहेब घाटगे यांचा मुलगा म्हणजे शाहू महाराज . पण कोल्हापूर संस्थानाच्या गादीवर विराजमान होण्याचं भाग्य आणि या गादीची परंपरा साता समुद्र पार नेण्याचं काम हे शाहू महाराज यांच्या कडे कसे आले ?

कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या गादीला वारस कोण ? हा प्रश्न उपस्थित झाला होता. म्हणून आबासाहेब घाटगे यांनी आपला मुलगा महाराणी आनंदीबाई यांना दत्तक दिला आणि १८८४ च्या दत्तक विधीनंतर यशवंत घाटगे बनले राजर्षी शाहू छत्रपती

वयाच्या 17 व्या वर्षी शाहू महाराज यांचा विवाह झाला. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्याभिषेक विधी झाला. तेव्हापासून अखेरच्या क्षणापर्यंत कोल्हापूरचे ते राजे होते. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सामाजिक बदल त्याचबरोबर अनेक राजकीय प्रकरणे सुद्धा गाजली . त्याचा थोडक्यात आढावा खालील प्रमाणे...

कोल्हापूर शहराला Mother of Student's Hostel " नाव कसं मिळालं ?

छत्रपती शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे येऊन चांगले शिक्षण घ्यावे यासाठी शाहू महाराजांनी वस्तीगृहाची उभारणी केली. 1897 मध्ये दुष्काळ पडला होता आणि त्याचवेळी राजर्षी शाहूंनी सर्व जातीय धर्मातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह काढले. ज्या वस्तीगृहात दोन रुपये प्रमाणे जेवण मिळत असे . या वस्तीगृहामध्ये ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत सर्व जातीचे विद्यार्थी एकत्र राहत होते . पण समाजातील विचारसरणी पाहता या हॉस्टेलमध्ये सरतेशेवटी फक्त ब्राह्मण विद्यार्थी राहिले. यावर उपाय म्हणून राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर शहरात एकूण 23 वस्तीगृह बांधली. त्यापैकी काही वस्तीगृहे काही खालीलप्रमाणे...

1) दिगंबर जैन बोर्डिंग

2) व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग

3) श्री नामदेव बोर्डिंग

4) मिस क्लार्क बोर्डिंग

5) वीरशैव लिंगायत बोर्डिंग

6) इंदुमती वस्तीगृह

अशा प्रकारची एकूण 23 वसतीगृहे अनेक जाती-जमातींसाठी बांधली गेली आणि त्यामुळे प्रत्येक जातीला स्वतःचा विकास करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आणि त्यामुळे कोल्हापूर शहराला "मदर ऑफ स्टुडंट्स हॉस्टेल"हे नाव मिळालं

शाहू महाराजांविषयी गाजलेलं वेदोक्त प्रकरण नेमकं आहे तरी काय?

1899 ची ही गोष्ट आहे. शाहू महाराज पंचगंगेवर स्नानासाठी गेले होते. त्यावेळी नारायण भटजी या शाहूंच्या पुरोहिताने पुराणोक्त मंत्र म्हटले . हे शाहू महाराजांच्या लक्षात येताच त्यांनी नारायण भटजी यांना विचारले असता "आपण शूद्र आहात आणि शुद्रांनीच पुरोणोक्त मंत्र म्हणावयाचे असतात" असे उत्तर दिले आणि इथूनच वेदोक्त प्रकरणाला सुरुवात झाली. ज्या प्रकरणांनी कित्येक वर्ष राजकारणात सुद्धा धुमाकूळ घातला. पण यावर "आपण शूद्र नाही तर क्षत्रिय आहोत" असे उत्तर शाहूंनी दिलं होतं. पण नारायण भटजी यांनी आपली भूमिका बदलली नाही . "त्यांनी ब्राह्मण वर्ग जोपर्यंत तुम्हास क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्ही शूद्रच आहात असे प्रत्युत्तर दिले" आणि सरते शेवटी नारायण भटजी यांना त्यांचं पुरोहित पद गमवावे तर लागलंच पण या प्रकरणामुळे पंचगंगेवरील हा वाद इंग्रजांच्या दप्तरापर्यंत पोहोचला आणि यामध्ये लोकमान्य टिळक सामील झाले आणि ब्राह्मण आणि ब्राम्हणेत्तर असे दोन गट तयार झाले. शाहू महाराज यांनी ६ मे 1902 रोजी नारायण भटजी यांच्या मताशी सहमत असलेले छत्रपती घराण्याचे धार्मिक विधी करणारे आप्पासाहेब राजोपाध्ये यांना नोकरी वरून काढले आणि त्यांचे वतन सुद्धा रद्द केले होते .

-सुरुवातीच्या दोन वर्षातच असंख्य योजना अमलात आणल्या

वि. रा.शिंदे यांनी शाहू महाराजांबद्दल म्हटले होते ,की "शाहू राजा नुसता मराठा नव्हता ,ब्राह्मणेतर ही नव्हता ... तो नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता ... तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा स्वाभाविक तरंग होता हेच जास्त खरे" त्यांचे हे उदगार पुढील योजना वाचल्यानंतर कसे खरे होते हे पटते...

१)पदवी पर्यंत पूर्ण शिक्षण मिळावं यासाठी राजाराम कॉलेज ची निर्मिती केली

२)जनावरांसाठी दवाखाने सुरू केले

३)गुळाची नवीन बाजारपेठ सुरू केली

४)डोंगराळ आणि आदिवासी भागातील लोकांना राज्याच्या सेवेत घेतले

५)शाहूपुरी नावाची वसाहत जी आजही कोल्हापूर रेल्वे स्टेशन जवळ आहे ही निर्माण केली वसवली

६)वेठबिगारी ही पद्धत बंद केली

ब्राह्मण वर्गाचं वर्चस्व समजल्या जाणाऱ्या अनेक क्षेत्रात ब्राह्मणेत्तर विद्यार्थ्यांना शाहू महाराजांनी नेहमीच प्राधान्य दिल

- शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कोणती पावले उचलली?

१)शाहू महाराजांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही माफीची सवलत दिली

२)महार वतन पद्धत 1918 साली कायद्याने बंद केली . या वतन पद्धतीमुळे या समाजातील लोकांना अत्यंत हलक्या दर्जाची कामे करावी लागत आणि त्यामुळेच हा समाज गुलामगिरीत जगत असायचा. ही गुलामगिरीच कायद्याने शाहू महाराजांनी नष्ट केली.

३)गंगाराम कांबळे नावाच्या महार समाजातील व्यक्तीला कोल्हापुरात हॉटेल घालून दिलं आणि राजर्षी शाहू इथेच थांबले नाहीत तर आपल्या विचारांची कृती म्हणून ते नेहमी गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये स्वतः जात चहा आणि फराळ घेत आणि त्यामुळेच अस्पृश्यतेचे वलय हळूहळू सौम्य व्हायला लागले.

४)कोल्हापूरचे भवानी मंदिर त्यांनी अस्पृश्यांना खुले केले

५)बारा बलुतेदारांना कोणताही व्यवसाय करता यावा याची मुभा त्यांनी दिली . परंपरागत व्यवसाय करण्यापेक्षा त्यांच्या आवडीचा व्यवसाय ते करू शकतात आणि कामाचा मोबदला पैशाच्या रूपात घेऊ शकतात असे आवाहन राजर्षी शाहू यांनी केलं होतं.

सामाजिक कार्यासोबतच शाहू महाराज यांनी स्त्री संरक्षणासाठी अनेक चांगले निर्णय घेतले होते. त्यांनी 1919 मध्ये कोल्हापूर इलाख्यातील विवाहासंबंधी कायदा पास केला आणि त्यातील एका कलमानुसार पुरुषाचे वय 18 तर स्त्रियांचे वय 14 असावे अशी तरतूद होती . त्याचबरोबर जर एखाद्या स्त्रीला तिच्या घरातून वाईट वागणूक देत असतील तर त्या अपराधींना सहा महिने कारावास आणि त्या काळी दोनशे रुपयांचा दंड करण्याची तरतूद सुद्धा कायद्यात होती. घटस्फोट आणि वारसा कायदा त्यांनी पास केला. त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणाबाबत एक पाऊल पुढे जात त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला . आपली विधवा सून इंदुमती देवी यांनाही त्यांनी शिक्षणाची व्यवस्था केली होती

अशाप्रकारे दिन दुबळ्यांचा वाली ठरलेला लोकप्रिय राजा राजर्षी शाहू आजही जनसामान्यांच्या हृदयात राज्य करत आहे...



Updated : 26 Jun 2023 2:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top