Home > मॅक्स ब्लॉग्ज > राजा ढाले, आंबेडकरी समाजाची वैचारिक ढाल!

राजा ढाले, आंबेडकरी समाजाची वैचारिक ढाल!

राजा ढाले, आंबेडकरी समाजाची वैचारिक ढाल!
X

सोशल मिडीयाच्या माध्यमातून झंझावाती,वैचारिक वादळ काळाच्या पडदयाआड गेल्याचं काल कळलं ते प्रेमानंद गज्वींंच्या राजा ढालें निर्वाण या आदरांजली पोस्टने. क्षणार्धात राजा ढालेंना आदरांजली देणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या. राजकारणी, साहित्यिक, कवी, लेखक, कार्यकर्ते आदींच्या पोस्टने सोशल मिडीया व्यापला गेला. ज्यांना ज्या रूपात राजा ढाले, दिसले, भेटले त्या पद्धतीने त्यांनी मांडले.मग रस्त्यावरच्या आंदोलनात, साहित्यिकांच्या मैफिलीत, पुस्तकांच्या गराडयात , माईकवर पँथरची डरकाळी फोडताना, लिहीताना, सत्कार घेताना, इतरांचा करताना अथवा तरूणांच्या पाठीवर शबासकीचा बंडखोर पण परखड पँथर पंजा टाकताना असो, अशा असंख्य स्वरूपात त्यांची छायाचित्रे काल मिडीयावर लाखो जणांनी टाकली. राजा ढालेंनी सामाजिक क्रांतीकरिता केलेला रस्त्यावरचा वैचारिक लढा, प्रस्थापित राजकीय, सांस्कृतिक धर्मांध, जातीयवादी मानसिकते विरोधात थोपटलेले दंड आणि समाजाला वैचारिक दिशा देताना, एका प्रतिभावंत पँथरचं वैचारिक गुरगुरणं म्हणजे आंबेडकरी समाजाची " राजा ढाले " ढाल होते. आंबेडकरी समाजाच्या या विविधांगी संरक्षण ढाली मुळे अनेकांना व्यवस्थे विरोधात उभं राहण्याची, सामाजिक आणि वैचारिक संघर्ष करण्याची, लेखन करण्याची स्फुर्ती मिळाली. अनेक दशकांच्या, विविध पातळयांवर अविरतपणे चाललेल्या संघर्षात न थकता, उसंत न घेता हि ढाल सतत तळपत राहिली.आलिशान वैभव, कुबेरांची मांदियाळी, निर्जिवांच्या प्रकटीकरण व उद्दातीकरणास वाव देणाऱ्या अभिजनांच्या साहित्यिक मंडळात अथवा राजकीय सत्तेचा परिघ अशा कोणत्याही म्यानाच्या ठिकाणी शांतपणे राहणारी हि ढाल नव्हतीच. खरंतर ढाल हि म्यानत नसतेच कधी, घाव, आघात झेलणं आणि मागच्याच्या जीवाचं रक्षण करणं हेच ढालीचं कर्तव्य! राजाभाऊ ढाले आयुष्यभर या पद्धतीने जगले. वैचारिक सिद्धांताशी तडजोड केली असती तर वरिल सर्वच प्राप्त करता आलं असतं. पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वांगीण क्रांतीची मशाल घेऊन चाललेल्या या क्रांतिकारी पँथरला कोणत्याच मोहाने भूरळ घातली नाही.

१९८५ ते १९९० या बालवयात पँथरचा काळ अनुभवता व पाहता आला. अपवाद सोडला तर मुंबईतील प्रत्येक आंबेडकरी वसाहतीतल्या बांंधवाने हा काळ अनुभवलेला, बघितलेला. असंख्य सामाजिक प्रश्नावरिल रस्त्यावरच्या संघर्षाचे ते दिवस होते. आंबेडकरी वसाहती त्या काळी स्थिर नव्हत्याच, सतत मोर्चे, आंदोलने, हाणामाऱ्यांचा तो काळ. वस्ती वस्तीतले तरूण पँथर डोक्यावर निळं कफन बांधून, अन्यायाच्या प्रतिकारासाठी रात्रं- दिवस लढायचे.मराठवाडा विदयापीठ नामांतरचा हा शिखर गाठणारा काळ त्यामुळे सबंध महाराष्ट्रातले पँथर्स चवताळलेले राहयचे. इशान्य मुंबई हा पूर्वी पासुनच आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असल्याने या भागातील असंख्य पँथर्स तळहातावर शिर घेऊन प्रस्थापितां विरोधात दोन हात करत लढत होते. डि.एम,चव्हाण ( मामा) मनोहर जाधव, राजा गांगूर्डे, तानाजी गायकवाड, वसंत आगळे, प्रकाश हिवाळे, उदयराज तोरणे, राजू गांधले, नारायण वाघमारे, मुक्तारभाई, रशिद शेख, श्रीधर साळवे, सुरेश आल्हाट असे असंख्य पँथर इशान्य मुंबई या भागात समाजाची संरक्षण ढाल होऊन प्रस्थापित व्यवस्थे विरोधात सतत संघर्षरत होते. खरंतर इशान्य मुंबईतील हि यादी न संपणारी कारण प्रत्येक आंबेडकरी वस्तीतला एक प्रमुख पँथर असायचा त्यास छावणी प्रमुख म्हणायचे. या सर्व पँथरला वैचारिक दिशा देण्याचं जबाबदारी, राजा ढाले, नामदेव ढसाळ, अरूण कांबळे यांनी पार पाडली त्यात ढाले- ढसाळ हे अग्रणी होते. कवी नामदेव ढसाळ आणि प्रा अरूण कांबळेंचं निर्वाण काही वर्षापूर्वीच झालंय तर काल पँथर्सच्या अग्रणींपैकी शेवटची वैचारिक ढाल आसणाऱ्या पँथर राजाभाऊ ढालेंचं निर्वाण झालंय.

लहानपणा पासुन दलित पँथर आणि राष्ट्र सेवा दल या दोन संघटनेच्या विचारांचं घरात वातावरण होतं. त्यामुळे संघटनेच्या नायकांना कायम भेटण्याची, बोलण्याची इच्छा असायची. पँथर चळवळीतील नायक, विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या बरोबर दिड वर्ष पँथरचा मुंबई अध्यक्ष म्हणून काम केलं.तर प्रा. दिवंगत अरूण कांबळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री अविनाश महातेकर, ज, वि. पवार अर्जुन डांगळे, आमदार जोगेंद्र कवाडे आदींना अनेकदा भेटलो. मात्र राजा ढालेंशी चर्चा करण्याइतपत भेट झालेली नव्हती. ५ व्या संविधान हक्क परिषदेचे उदघाटक म्हणून त्यांची निवड करण्याचा आम्ही निर्णय घेतला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम केलेले दिवंगत- आर. डी. भंडारेसाहेबांच्या मुलूंड येथील घरी हा निर्णय घेण्यात आला.. देशभरातील नामवंतांना या परिषदेला निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. भंडारेसाहेबांचे चिरंजीव, संजयजी भंडारे, अरूण कांबळेंचे चिरंजीव अपरांत कांबळे, मी, निना ईंगळेंसह अनेकांनी हा निर्णय घेतला. भंडारेसाहेबांचं घर हे ५ व्या संविधान हक्क परिषदेचं कार्यालय केलेलं.राजाभाऊ ढालेंनी भेटीची वेळ दिली, संजयजी भंडारे मी, साप्ताहिक जंबुद्विपचे संपादक दिलीप बनसोडे, बौद्धाचार्य योगाचार्य निना ईंगळे उदघाटकाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्या घरी पोहचलो. राजाभाऊ पुस्तकांच्या गराडयात बसलेले, चर्चेला सुरूवात झाली आणि संजय भंडारे सरांनी परिषदेच्या उदघाटकाचा प्रस्ताव पुढे केला. राजाभाऊंनी आमचा प्रस्ताव नाकारताना

," संविधानावरचं काम चांगलं आहे पण मला यायला जमणार नाही. असं ते म्हणाले. आम्ही ५ मिनटं येण्याची विनंती केली तर ते परखडपणे, त्यांनी केलेलं लिखाण दाखवत म्हणाले,"

माझं जातीर्मूलनावर मोठं काम चाललंय. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा हा मुख्य लढा होता. मात्र जातीर्मूलनावर पूर्ण झोकून देऊन कुणीच काम करताना दिसत नाही. मला यावर मोठं काम करायचंय. आम्ही सर्व जाण्यायेण्याची पूर्ण व्यवस्था करतो, कांजूर मार्गलाच कार्यक्रम आहे. अगदी १० मिनटाच्या अंतरावर. असं आम्ही म्हणताच. राजाभाऊ म्हणाले ,

" मी संविधानावर काम सुरू केलेलं नाही. मी येऊन मांडणी करायची म्हणजे इतरांसारखी भाषणबाजी नाही. तर इतरांपेक्षा वेगळं पण समाजाला पुरक असं क्रांतिकारी बोलावं लागेल."

या वर्षी कुणालाही बोलवा, पुढच्या वर्षी नक्की येतो. पुन्हा राजाभाऊंनी पुस्तके, हस्तलिखीतांकडे बोट दाखवत, जाती निर्मूलनाची लढाई खूप व्यापक आहे, मी हेच काम करायचं ठरवलंय.. राजाभाऊंच्या परखड, प्रामाणिक, स्पष्टोक्तेपणाचा दाहक पण मन सुखावणारा अनुभव घेऊन पुढच्या वर्षी होणाऱ्या संविधान हक्क परिषदेची वाट पाहत आम्ही बाहेर पडलो. दिवंगत राजभाऊ ढालेंना क्रांतिकारी जयभिम.....

- विशाल हिवाळे

Updated : 17 July 2019 8:12 AM GMT
Next Story
Share it
Top