Home > मॅक्स ब्लॉग्ज > राज, उद्धव आणि नवा व्हायरस !

राज, उद्धव आणि नवा व्हायरस !

राज, उद्धव आणि नवा व्हायरस !
X

कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे, दिवसेंदिवस वाढणारा मृतांचा आकडा तर त्याहून भयावह आहे. देश आता एका अनिश्चित भीतीच्या सावटाखाली आहे. या संकटातून देशाला जर काही बाहेर काढू शकत असेल तर तो संयम आणि सार्वत्रिक समजूतदारपणा. राजकीय परिपक्वता आणि कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता दाखवली जाणारी सामंजस्यता अपेक्षित आहे. पण नेमका हाच काळ जर कुणाला सुगीचा वाटला तर काय कराय़चं…

एकानं सोडलेली राजकीय जागा ज्याला राजकारणाच्या भाषेत स्पेस म्हटलं जातं ती दुस-यानं मिळवताना त्यात किती जणांचा प्रत्यक्षात बळी जाणार आहे, किती जणांच्या डोक्यात अकारण विष पेरलं जाणार आहे, याची मोजदाद कधी शांतपणे होणार आहे की नाही. या कठिण काळात तरी आपल्या प्रत्येक शब्दाचा कसा अर्थ निघू शकतो, साध्या शब्दांचेही भाले होवू शकतात. ठिणग्या झडू शकतात याचा स्वतःला मास लिडर किंवा लोकनेता म्हणवणा-यांनी तरी साकल्याने विचार करायला हवा.

देशात हिंदुत्ववादी विरोधी धर्मनिरपेक्ष असे दोन मतप्रवाह किंवा विचारधारा सरळ सरळ चालत आल्या आहेत. त्यामुळे मतांचं विकेंद्रीकरणही गेली अनेक वर्षे याच पद्धतीनं सुरू आहे किंबहूना तसे गृहीतक तरी आहे. गेल्या काही वर्षांत यात बदल होत चालला आहे हे खचितच. कारण हिंदुत्ववादी असोत किंवा धर्मनिरपेक्षतावादी असोत दोन्ही मतप्रवाहांमध्ये जहाल आणि मवाळ असे कालानुरूप, बदलत्या राजकीय परिस्थीतीनुरूप बदल होत गेले.

त्याचाच परिपाक म्हणून १९९२-९३ साली जे जहाल हिंदुत्ववादी म्हणून समोर आले, ज्यांनी नथुराम गोडसेची उघड आरतीच सुरू केली असे म्हणणे वावगे ठरणार नाही, ज्यांनी श्रीरामाच्या नावावर सत्तेचा सोपान गाठला ते नंतर गांधींजींपासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत बहुजनांची मानली जाणारी प्रतिकं कशी आपल्या विचाराशी साधर्म्य सांगणारी आहेत हे दर्शवायला लागले.

महाराष्ट्रातही मराठी माणसाची पताका घेणारा शिवसेना हा प्रादेशिक पक्षही उत्तरभारतीयांच्या मतांसाठी जहाल हिंदुत्वाच्या वाटेवर गेला पण महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या सत्तानाट्यात या पक्षालाही मवाळ हिंदुत्वाकडे जावे लागले. शिवसेनेची ही जहाल हिंदुत्वाची रिकामी झालेली स्पेस मिळवण्याचा प्रयत्न मनसेनं करण्याचा विडा उचलला. त्यासाठी आधी त्यांनी आपला रंग आणि झेंडा बदलला. पण त्यानंतरही फारसा फरक पडल्याचं दिसत नसल्यानं अखेरीस मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपला मुळ रंग वापरायचा ठरवल्याचे दिसते.

त्यासाठीच त्यांनी तबलीगींना गोळ्या घातल्या पाहिजेत हे भडक वक्तव्य केले. तबलीगी समाजातील मुस्लिम धर्मियांनी सामाजिक कार्यक्रम करायला नको होते. त्यांनी सामाजिक भान आणि हित जपायला हवे होते याबाबत कोणतेही दुमत नाही. त्याबाबत त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करायलाच हवी. मात्र, म्हणून त्यांना गोळ्या घालायला हव्यात असे भडक वक्तव्य करून एका विशिष्ट समाजाच्या अथवा वर्गाच्या मनातल्या भावनांना चुचकारण्याचा अथवा हवा देण्याचा प्रयत्न हा राजकीय स्पेस मिळवण्याची केविलवाणी धडपड आहे.

खरं तर ही वेळ अशी वक्तव्ये करून भावना भडकावण्याची नाही तर राजकीय परिपक्वता दाखवून शांतता कशी नांदत राहील. लोक कसे घराबाहेर पडणार नाहीत याची ही वेळ आहे हे या सूज्ञ लोकनेत्यांना समजत नाही असं मानण्याचं काही कारण नाही. याउलट ज्यांची प्रतिमा हिंदुत्ववादी अथवा सनातनी मानली जाते अशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या समाजात पसरणा-या नव्या व्हायरसचा धोका ओळखला आहे. अशाप्रकारे कुणी हा नवा व्हायरस पसरवून एका विशिष्ट समाजाविषयी चुकीचे संदेश पसरवून दुही माजवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्य़ाला वेळीच पायबंद केला जाईल.

त्यांच्यावर कायद्याचा सक्त बडगा उगारला जाईल हा इशारा देवून आपला राजकीय मुत्सद्दीपणा आणि समयसुचकता दाखवली आहे. देशात पुन्हा एकदा जातीय विद्वेषाचं विष पेरून कोरोनाच्या तसंच अर्थव्यवस्थेच्या नियोजनातील अपयश झाकण्याचा घाणेरडा डाव आखला जातोय. कारण मुख्यमंत्री असताना सुद्धा या देशात काही नेत्यांनी दंगलींना कसे खतपाणी घातले आणि कत्तलींना कसा राजाश्रय दिला याचा काळाकुट्ट इतिहास आहे.

ज्यांनी अभावितपणे चीनी कोरोना म्हणता म्हणता आता तबलीगी कोरोना म्हणायला सुरूवात केली त्यांच्या राजकीय इच्छा, आकांक्षा आणि डाव लपून राहिलेले नाहीत. वीजेच्या झगमाटानं वाड्या वस्त्या उजळून टाकायच्याऐवजी वीज मालवून ज्यांनी आपल्य़ा अकलेचे दिवे पाजळण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीला धरलं. त्यापेक्षा महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला शोभेल आणि प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा जपला जाईल, असाच इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुही माजवणा-यांना दिला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

(फेसबुक साभार)

Updated : 5 April 2020 3:28 PM GMT
Next Story
Share it
Top