Home > मॅक्स ब्लॉग्ज > विसराळू राज ठाकरे...

विसराळू राज ठाकरे...

राज ठाकरे यांना त्यांच्याच भाषणांचा विसर का पडला? EVM च्या विरोधात सभा घेण्याची घोषणा करणारे राज ठाकरे कुठं आहेत? राज ठाकरे यांचा अभ्यास कमी पडतो की त्यांनी खोटेच बोलायचे ठरवलं ...? राज ठाकरे यांच्या भूमिकाचं कौतुक करणाऱ्यांनी आणि टीका करणाऱ्यांनी नक्की वाचा राजकीय विश्लेषक व निवडणूक सल्लागार हेमंत पाटील यांचा लेख....

विसराळू राज ठाकरे...
X

 वाण नाही पण गुण लागला…!

12 एप्रिल ला ठाणे येथे झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी ह्या सर्व गोष्टी केल्या. भाजपशी जवळीक वाढल्याने कदाचित त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागल्या असतील. खरं तर 2 एप्रिलला गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी काही वक्तव्य केली होती. तिला वेगवेगळ्या नेत्यांनी प्रतिउत्तरे दिली. त्याला उत्तर म्हणून ठाण्यात ही सभा आयोजित केली होती.

महाविकास आघाडी सरकार आल्याने वंचितचे प्रकाश आंबेडकर, एम आय एमचे ओवेसी आणि मनसेचे राज ठाकरे यांची फार मोठी गोची झाली. त्यात 2019 ला राज ठाकरेंनी मोदी – शहा विरोधी प्रचार केला होता. 2 वर्षे कोरोनात गेली. मोदींना कोरोना हाताळण्यात आलेले अपयश, महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते भाव, शेतकरी आंदोलन, बेरोजगारी या सारख्या अनेक मुद्द्यांवर मनसे कार्यकर्ते मोदी - शहा भाजपवर रोज तोंडसुख घेत आहे. आणि अचानक हिंदू धार्जिन व मुस्लिम विरुद्ध भूमिका घेतल्याने भाजप जवळ जाणे जगजाहीर झाले. इथे कार्यकर्ते तोंडावर आपटले.

असो, आता राज ठाकरेंच्या भाषणातील फोलपणा बघू.

राज ठाकरेंच्या उत्तर सभेच्या भाषणातील मुद्दे.

उघडपणे मुस्लिम विरोधी भूमिका –

मशिदीवरील अजाण देणारे भोंगे काढा.-




वास्तविक पहाता हे बरोबर आहे की 2022 साली अश्या भोंग्यांचा काहीही उपयोग नाही. प्रार्थना करण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. नागरिकांना त्या माहित असतात. त्यामुळे भोग्यांची गरज नाही. त्याचा तेथे राहणार्‍या इतरांना त्रास होतो. हे खरे आहे आणि राज ठाकरेंची ही भूमिका योग्य आहे.... परंतु ही भूमिका घेताना हिंदू सणांच्यावेळेस सुद्धा जोरात लाउडस्पीकर / डीजे वाजवले जातात. 10 दिवस गणपती - नवरात्र काळात कर्णकर्कष्य आवाजात डॉल्बी सिस्टिमवर गाणी लावली जातात. खेड्यापाड्यात असंख्य मंदिरावर भोंगे असून त्यावर आरत्या आणि भक्तिगीते पहाटे लावली जातात. रामनवमी आणि हनुमान जयंतीचे सप्ताह सर्वत्र साजरे होतात, आठवडाभर या दोन्ही प्रसंगी भोंगे लावून भजन - कीर्तन सुरु असतं. वर्षभर कुठे ना कुठे असंख्य ठिकाणी लाऊड स्पिकरवरूनच हरिनाम सप्ताह सुरूच असतात. महाशिवरात्री–गुरुपौर्णिमा-दत्त जयंती–गुढी पाडवा आदी सर्व दिनी भोंग्यांचा वापर होतोच. दहीहंडी हा भोंगे आणि डिजेचाच सण. वर्षातले कितीतरी दिवस हे सगळं सुरु असतं. हां, आता हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी लावल्या जाणाऱ्या भोंग्यांतून विद्यार्थी,रुग्ण,वृध्दांना त्रास होत नाही आणि फक्त मशिदीवरच्या भोंग्यांचाच होतो असे राज ठाकरेंचे म्हणणे असेल तर हरकत नाही!

हिंदुस्थानात आमच्या मंदिरावरील भोंग्यांबाबत,आमच्या सण-उत्सवातील कानठळ्या बसवणाऱ्या डीजेबाबत कोणी बोलायचं नाही,फक्त मुसलमानांच्या मशिदींवरील भोंग्यांबाबतच बोलायचं असं काही दिसतय.

दुसरी गोष्ट, मशिदीवरील भोंग्याच्या त्रासाला दुसर्‍या भोंग्यावरून हनुमान चालिसा लावणे हा कुठला उपाय आहे...? म्हणजे जवळपास राहणार्‍या नागरिकांना एका भोंग्याचा त्रास होता, आता दोन्ही भोंग्याचा त्रास सहन करावा लागेल. दिवसातून 5 वेळा दोन मिनिटे अजाणच्या भोंग्याचा त्रास आणि काही तास हनुमान चालीसाच्या भोंग्याचा त्रास...! एक आवाज बंद करण्यासाठी त्या पेक्षा जास्त मोठयाने दूसरा आवाज त्या समोर लावणे हा उपाय कसा होऊ शकतो ....?

तिसरी गोष्ट, समजा उद्या राज्य सरकार म्हणाले की तुम्हाला काय करायचे ते करा.. लावा कुठे स्पीकर लावायचेत ते. मग काय होईल... मनसेची 8 दिवसात गोची होईल. अजाण दोन मिनिटे आणि हनुमान चालीसा 15 मिनिटे. लोकं मनसेवर वैतागतील. "भीक नको पण कुत्रं आवर" अशी लोकांच्यात मनसेबद्दल भावना तयार होईल.

मनसेला खरोखरच मशिदीवरील भोंगे उतरवायचे असतील तर राज्य शासनाकडे पाठपुरावा करा,मुल्ला मौलवींशी चर्चा करा, आसपासच्या नागरिकांच्यामधून सहयांची मोहीम राबवा, उपोषण करा. असे अनेक संविधानिक मार्ग आहेत. परंतु ते न करता हिंदू मतांसाठी हनुमान चालीसा...! राज ठाकरेंचा धार्मिक ध्रुविकरणाचा मार्ग जनतेला स्पष्ट दिसतोय.

गेल्या 75 वर्षापासून असलेली आरएसएसची मागणी राज ठाकरे परत लावून धरताय. – समान नागरिक कायदा आणि मुस्लिमांची लोकसंख्या आटोक्यात आणणे. कोणताही सुज्ञ मुस्लिम किंवा 95 टक्के मुस्लिम एकच लग्न करतात. ते दिवस गेले. जास्तीत जास्त दोन किंवा तीन अपत्य होऊ देतात. कारण त्यांना एकापेक्षा जास्त बायका आणि जास्त अपत्य परवडतच नाही. त्यांच्यात सुद्धा शिक्षणाला महत्व आले. आमच्याकडे एक मुलं आणि तुमच्याकडे पाच पाच असे राहिले नाही.

मदरश्यात जर देशविरोधी कारवाया चालतात, तिथे शस्त्रांचा साठा आहे तर ही गोष्ट राज ठाकरेंना कशी कळली...? बेहरामपाड्यात काय चालते हे कसे कळले...? ते गेले होते का तिथे...? ज्या अर्थी राज ठाकरे छातीठोकपणे जाहीर सभेत आरोप करताय त्या अर्थी त्यांच्याकडे पुरावे असतील. ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पोलिसांना का कळवले नाही...? मोदींना नाही तर अमित शहांना तरी कळवायचे...? मग तुम्हाला माहीत असूनही तुम्ही गप्प बसलात याचा अर्थ तुम्ही सुद्धा तितकेच दोषी नाहीत का ...?

हे राज ठाकरेंचे बरोबर आहे की अतिरेकी मुंब्र्यात सापडले. बरेच सापडलेत. याचा अर्थ मुंब्रावर पोलिसांनी जास्त लक्ष दिले पाहिजे. तेथील गुप्तचर यंत्रणा कायम सजग असली पाहिजे. तुमच्या या मताशी निश्चितच सर्व देशवासीय सहमत असतील.

2 शरद पवार – सर्वात बेस्ट टार्गेट




1999 नंतर शरद पवारांनी जातीयवाद पसरवला असा राज ठाकरेंचा आरोप आहे. त्यांचा अभ्यास कमी पडला बहुतेक.

 शरद पवारांनी राजकीय किंमत चुकवून औरंगाबाद विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिले.

 देशात प्रथम मंडल आयोगाची अंमलबजावणी करून राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण दिले.

 माळी समाज्याचे छगन भुजबळ आणि आदिवासी समाज्याचे मधुकर पिचड यांना राज्यातील पक्षाचे सर्वोच्च पद दिले. अनेक वर्षे मंत्रिपद दिले.

 दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांपैकी 7 मंत्री सवर्ण समाज्याचे आहेत आणि 7 मंत्री इतर समाज्याचे आहेत.

छगन भुजबळ – माळी,

धनंजय मुंडे – वंजारी,

दत्ता भरणे – धनगर,

जितेंद्र आव्हाड – वंजारी,

नवाब मालिक – मुस्लिम,

हसन मुश्रीफ – मुस्लिम,

संजय बनसोडे – आंबेडकरी बुद्ध.

तरीही पवारांनी जातिवाद पसरवला आणि तो ही द्वेष वाढीला लागेल असा....?

2012 साली मनसेला महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले. नाशिकला मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले. त्रिशंकु अवस्था झाली. महापौर मनसेचा झाला. कसा .. तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर.... राज ठाकरेंना शरद पवारांच्या जातिवादी पक्षाचा पाठिंबा कसा चालला...? की आज 2022 ला राष्ट्रवादी पक्ष जातीयवादी आहे हा साक्षात्कार झाला...?

पवारांनी दोन महिन्यात भूमिका बदलली. आणि कृषिमंत्री झाले. ...

1999ला पवारांनी विदेशी व्यक्ति पंतप्रधान नको म्हणून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी पक्ष काढला. 1999 ला राज्यात सत्ता बदल झाला. कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे सरकार आले. केंद्रात अटल बिहारींचे सरकार आले. 2004 साली देशात सत्ता बदल झाला. केंद्रात कॉंग्रेस आघाडीचे सरकार आले. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. त्यात शरद पवार कृषिमंत्री झाले. सोनिया गांधी पंतप्रधान न झाल्याने विदेशी व्यक्ति पंतप्रधान नको हा मुद्दाच संपला. लक्षात येतय का... पवारांनी दोन महीने नाही तर 5 वर्षाने तेही मुद्दा संपल्याने कॉंग्रेसला जवळ केले.

थोडा अभ्यास कमी पडतो की खोटेच बोलायचे ठरवलं ...?

पवार नास्तिक आहेत हे राज ठाकरेंना कसे कळले...? राजकीय – सामाजिक क्षेत्रात काम करताना आपला धर्म आणि श्रद्धा या घरात ठेवायच्या असतात. त्याचे प्रदर्शन करायचे नसते. पवार नास्तिक हा जावई शोध लावला आणि वर त्यांना हिंदू विरोधी ठरवताय ...? त्यांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अशी कोणती गोष्ट त्यांनी हिंदू विरोधी केली...? आणि हो, राज ठाकरे आज हिंदुत्वाची भूमिका घेतायत तर ते नेहमी देवळात जातात का...? जात असतील तर ते जाहीर करत नाहीत. मग

ते सुद्धा नास्तिक आहेत का...?

शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव ते जाहीर सभेत घेत नाहीत फक्त फुले शाहू आंबेडकरांचे घेतात म्हणून ते हिंदू विरोधी का ..? छत्रपतींचे नाव घेतले आणि मुसलमान मते गेली तर काय करायचं असे त्यांना वाटते ...? कमाल आहे राज ठाकरेंची...याचा दूसरा अर्थ मुसलमान शिवाजी महाराजांच्या विरोधी आहेत असा होतो. कित्येक मुस्लिम शिव जयंती साजरी करतात. गणपती उत्सवात भाग घेतात. जरा गढीतून बाहेर येवून बघा...

3 शिवाजी महाराजांनी हिंदू राज्य निर्माण केलं.

छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मात जन्मले म्हणून त्यांनी भगवा झेंडा घेतला. हिंदू राज्य तयार करायला नव्हते राजे झाले. त्यांना मुस्लिम शासकांच्या जुलमी राजवटीपासून रयतेची सुटका करायची होती म्हणून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. मुस्लिम शासकांच्या जागी जर जुलमी हिंदू शासक असता तर त्याच्या विरुद्ध ते लढले असते हे शेंबडं पोर सुद्धा सांगेल. रयतेच्या न्याय हक्कासाठी त्यांनी रांज्याच्या पाटलाचे हात तोडले होते हे विसरलात आपण. पाटील हिंदुच होता. स्वराज्यासाठी गद्दारी केली म्हणून जावळीच्या मोरेंना सुद्धा शिक्षा केली. अनेक मुस्लिम सरदार त्यांच्या कडे चाकरी करीत होते. अनेक मशिदींना त्यांनी देणग्या दिल्यात. बरं, अफझलखान शिवाजी महाराजांचे स्वराज्य नष्ट करायला आला होता. हिंदूंचे साम्राज्य नाही. असे असते तर त्याने आपल्या पदरी कुलकर्णी नावाचा वकील ठेवला नसता.

ही लढाई भगवा व हिरवा झेंड्यात झाली याचे कारण जुलमी शासक मुस्लिम होते आणि स्वराज्य स्थापन करणारे महाराज हिंदू होते. दोन धर्मातील लढाई नसून दोन साम्राज्यातील लढाई होती.

बाबासाहेब पुरंदरे हे सॉफ्ट टारगेट कसे...? बाबासाहेब पुरंदरे हे आरएसएसचे होते. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणून त्यांच्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु किंवा मार्गदर्शक नव्हते. त्यांनी तसे लिहले. अतिशय निंदनीय लिखाण केलेल्या जेम्स लेनला बाबासाहेब पुरंदरेंनी माहिती पुरवली असा आरोप नारायण राणेंनी त्यांच्यावर केलाय. पुरंदरेंच्या प्रकाशन संस्थेमार्फत लेनचे पुस्तक प्रकाशित झाले असेही राणे म्हणाले. जर तो आरोप खोटा असेल तर बाबासाहेबांनी त्याबाबत राणेंवर केस दाखल करायला पाहिजे होती. तो आरोप त्यांनी खोडून काढला नाही. तुम्ही आज पवारांपेक्षा राणेंवर तोंडसुख घ्यायला पाहिजे. तुम्ही ते का करीत नाही. जेम्सचा निषेध बाबासाहेबांनी आणि काही इतिहासकारांनी एकत्र येऊन पत्र लिहून केला. हे मान्य आहे. कोकाटे किंवा इतर कोणालाही बाबासाहेबांच्या लिखाणाबद्दल आक्षेप असतील तर तुम्ही मध्यस्थी करून तो वाद पुराव्यानिशी सोडवत का नाही..? तुम्ही नेते आहात. सर्वांचे समाधान करावे आणि बाबासाहेबांचा इतिहास बरोबर आहे हे सिद्ध करा. विषय कायमचा संपेल आणि बाबासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभेल. कोणीही परत त्यांना दोष देणार नाही.

शिवाजी महाराज फक्त बाबासाहेब पुरंदरे मुळे घराघरात पोहचले...?

म्हणजे महाराजांच्या कर्तुत्वावर शंका घेण्यासारखे आहे. त्यांचा अपमान करतात राज ठाकरे. महाराजांचे कार्य इतके लहान आहे की त्याला पुरंदरेंच्या लिखणाशिवाय घरोघरी पोहचणे अवघड होते...? गो.नि दांडेकर, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, पानसरे व इतर अनेकांनी लिखाण केले. अनेक शाहीरांनी गावोगावी जावून महाराजांचे पोवाडे गायले. नाटकाच्या माध्यमातून महाराजांचे कार्य जनतेत पोहचवली. कार्यक्रम केले. मग त्यांच्या मुळे महाराज घरोघरी नाही पोहचले का...? पुरंदरेंची तळी उचलताना इतरांचा अपमान का करतायत राज ठाकरे ...?

भगतसिंह कोशारी जाहीर सभेत म्हणाले होते की रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोणी विचारले असते...? त्या वेळेस राज ठाकरेंनी त्यांना चांगले खडसावले होते. आता तोच न्याय राज ठाकरेंना लागू होतो.. तुम्ही सुद्धा तसेच बोलताय. "शिवाजी महाराज फक्त बाबासाहेब पुरंदरे मुळे घराघरात पोहचले" तुमच्या वाक्याचा असा अर्थ होतो की 'पुरंदरे नसते तर महाराज घरोघरी पोहचले नसते.' आता तुमच्याबाबतीत काय करायचे ...?

४) ED मी घाबरत नाही.

राज ठाकरेंनी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकी आधी ईव्हिएम विरोधी मोहीम उघडली. त्यासाठी ते सोनिया गांधी व ममता बॅनर्जी यांना भेटून आले. त्यांचा पाठिंबा त्यांनी मिळवला. भाजप – सेना सोडून राज्यातील इतर सर्व पक्षांची त्यांनी मोट बांधली. 2 ऑगस्ट 2019 ला त्यांनी इतर पक्षातील मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील (शेका), राजू शेट्टी, रेड्डी, कपिल पाटील, सुधीर सावंत, कोळसे पाटील हे सर्व प्रमुख नेते त्यांच्या समवेत स्टेजवर होते.

राज ठाकरेंनी 21 ऑगस्टला आम्ही सर्वजण भव्य मोर्चा काढणार आहोत असे जाहीर केले. त्या बरोबरच ईव्हिएम विरोधी एक फॉर्म तयार केला आहे. आमचे कार्यकर्ते राज्यात सर्वत्र तो घेवून लोकांच्या घरी जातील व तो भरून घेतील हे सुद्धा सांगितले. इडी वगैरेंना मी घाबरत नाही असे ठासून सांगितले.

आता खरी गंमत बघा....

2 ऑगस्टला ही प्रेस झाली आणि 19 ऑगस्टला राज ठाकरेंना इडीची नोटिस आली. 22 तारखेला त्यांना इडी कार्यालयात हजर राहायला सांगितले.

आता सगळं संपलं. 21 तारखेचा मोर्चा रहित झाला. 22ला दिवसभर इडीची चौकशी झाली आणि राज ठाकरे ईव्हिएम विसरले. ते आजतागायत विसरलेले आहेत. जर इडीला घाबरले नाहीत तर ईव्हिएमचा मुद्दा कुठे गेला..? 21ला मोर्चा का काढला नाही..? घरोघरी कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून का घेतले नाहीत...? अचानक ईव्हिएम बद्दल तुमच्या शंका दूर झाल्या का...? निवडणूक आयोग निपक्षपतीने निवडणुका घेतात असा दृष्टान्त झाला का ...?

या हातांनी पाप केलं नाही हे सांगायची राज ठाकरेंना काय गरज ...? तुमच्याकडे आज पर्यन्त कोणीही विचारले नाही की इतका पैसा कुठून आला ते...? कोणता व्यवसाय तुम्ही करताय...? सर्व जनतेला माहीत आहे की "हमाम में सब नंगे" | पक्ष चालवायचा तर पेसा लागणारच.

इडीला तुम्हीच काय अनेकजण घाबरलेत....!

5 भाजपशी कुसंग –

जनतेने भाजप सेनेच्या युतीला कौल दिला आणि सेनेने युती मोडली. हे सत्य आहे. परंतु सेनेने युती का मोडली हे लक्षात घेतले का...?

भाजपने सेनेशी 2014 पासून गद्दारी केली.

1. 2014ला भाजपने शिवसेनेबरोबर शेवटच्या क्षणी युती तोडली. मग गद्दारी कुणी केली..?

2. 19 सप्टेंबर 2014ला निकाल लागला आणि दुसर्‍या दिवशी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले. 6 महीने अप्रत्यक्षपणे भाजपने राष्ट्रवादीचा पाठींबा घेतला.

3. भाजपने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांना कधीच विश्वासात घेतले नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांना सतत दुय्यम वागणूक दिली.

4. 2014 ते 2019 या पाच वर्षात जे काही केले ते सर्व भाजपने केले, त्यातही फडणवीसांनी केले अशी सारखी जाहिरात केली. युती सरकार ऐवजी फडणवीस सरकार असाच उल्लेख सतत केला.

5. शिवसेनेचे 18 खासदार असतानाही केंद्रात कमी दर्जाचे मंत्रिपद दिले. भाजपा आघाडीतील सर्वात जास्त जागा 18 शिवसेनेने जिंकल्या. तरी त्यांना अवजड उद्दोग मंत्रालय सारखे कमी दर्जाचे मंत्रिपद दिले. शिवसेनेचा या पेक्षा जास्त अपमान कधी कुणी केला नाही.

6. गेली 6 वर्षे उद्धव ठाकरेंचा सतत अपमान केला. अनेक महत्वाच्या कार्यक्रमाला / उद्घाटनाला त्यांना बोलावले नाही. मोदींच्या हस्ते मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमीपूजन व ठाणे – भिवंडी – कल्याण , दहिसर – मीरा भाईंदर या दोन मेट्रो रेल्वे मार्गाच्या उदघाटनाप्रसंगी उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिले नाही.

7. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किरीट सोमय्या व शेलार यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेवर खालच्या पद्धतीने टीका केली. विशेष म्हणजे राज्यात आणि मुंबईत शिवसेनेबरोबर सत्तेत असूनही अशी टीका केली. मुंबई मनपा मध्ये माफिया राज चालू आहे आणि त्याचे सुत्रधार बांद्राला असतात अश्या आशयाची टीका केली.

8. देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून त्यांना शिवसेनेला शह द्यायचा होता.

9. भाजपने महानगरपालिका, ग्राम पंचायत व जिल्हापरिषद निवडणुकीत सेनेला संपविण्याचा प्रयत्न केला. या निवडणुका भाजपाने स्वत:च्या बळावर लढवल्या. पूर्वी ते शिवसेनेला बरोबर घेवून लढवायचे.

10. भाजपने शिवसेनेला 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत 50 टक्के जागा देतो सांगून कमी जागा दिल्या. इतर सहयोगी पक्षांच्या जागा सुद्धा सहयोगी पक्षांना फसवून भाजपने घेतल्या.

11. 2019च्या निवडणुकीत भाजपने युती असूनही सेनेच्या उमेदवारच्या विरुद्ध प्रचार केला. बंडखोर निवडून आणले. बार्शीचे दिलीप सोपल शिवसेनेतून उभे होते. त्यांच्या विरुद्ध भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत हे विजयी झाले. उरण मतदारसंघात भाजप बंडखोर महेश बालदी यांना शिवसेना उमेदवार मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपने निवडून आणले.

बर, हा मुद्दा सांगून राज ठाकरेंना काय सुचवायचे आहे...? त्यांची भूमिका काय हे सांगण्यामागची...? सेना – भाजप बघून घेतील एकमेकांकडे...!

6 विरोधकांना प्रतिउत्तर –

गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी सभा आयोजित केली होती. त्या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर काही आरोप केले होते. त्याला आघाडीतील नेत्यांनी उत्तरे दिली होती. राज ठाकरेंनी परत त्याला प्रतिउत्तर दिले.

जयंत पाटीलांना चकित चंदू असे नाव देवून त्यांच्यावर टीका केली होती. अतिशय बुद्धीमान , मृदु भाषी, उच्च शिक्षित आणि अनुभवी जयंत पाटलांना जंत म्हणणे अयोग्य आहे. यामुळे राज ठाकरेंची प्रतिमा खालवते. जयंत पाटील जंत होत नाहीत.

जयंत पाटील असे म्हणाले की "हे कधी बघायला गेले उत्तर प्रदेशचा विकास"... त्याला उत्तर देताना राज ठाकरे – "मी म्हंटलं की ज्या बातम्या कानावर येतायत त्या प्रमाणे जर उत्तर प्रदेश मध्ये विकास झालेला असेल तर त्याचा मला आनंद आहे. माझी भाषा काय आहे, जर तरची भाषा आहे. ज्या बातम्या कानावर येतायत तसा जर विकास झाला असेल तर......" राज ठाकरे का खोटं बोलताय...?

आज पर्यन्त तुम्हाला खोटं बोलायची कधीच गरज पडली नाही. तुम्ही 2 तारखेच्या सभेत असं म्हणाला की " आज माझ्या कानावर येतय तिकडे काही चांगल्या प्रकारचा विकास होतोय, आनंदाची गोष्ट आहे. सर्वांचा विकास व्हावा.', "उत्तर प्रदेशचा निकाल लागला आणि मला कळलं की उत्तर प्रदेशचा विकास होतोय तर हेच पाहिजे." येथे जर तरची भाषा नव्हती. तुमच्या भाषणाचा व्हिडिओ यू ट्यूबवर उपलब्ध आहे. ( व्हिडिओ ह्या नंबरवर पॉझ करून बघा. 24.11 ते 24.41 ) तेथे विकास होतोय असे तुम्ही म्हणालात....! मग खोटे का बोलायला लागतय ...?

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना राज ठाकरेंनी अजित पवारांकडे रेड पडते पण तुमच्या घरी पडत नाही असे वक्तव्य केले. खरं तर ती रेड अजित पवारांच्या बहीणींच्या घरी पडली होती, अजित पवारांकडे नाही. दुसरी गोष्ट संपूर्ण जगाला माहीत आहे की पवार कुटुंब एक आहे. त्यांच्यात कोणतेही मतभेद नाही. अजित पवारांनी राज्य बघायचे आणि सुप्रिया सुळेंनी केंद्र. राज ठाकरेंनी दोघांच्यात दुफळी निर्माण करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला त्याला कोणीही सिरियसली घेणार नाही. उलट असंबद्ध प्रतिउत्तर दिल्याबद्दल त्यांचे हसे झाले.

छगन भुजबळांना "तुमच्यावरील आरोप संस्थेतील सीएम व इतर कर्मचार्‍यांच्यामुळे झाले व तुम्हाला जेल मध्ये जावे लागले. मोदींवर टीका केली म्हणून नाही" असे उत्तर राज ठाकरेंनी दिले. कायद्याच्या दृष्ट्या हे बरोबर आहे. परंतु ह्यात मोदींवर टीका केल्यानेच त्यांना जेलमध्ये जावे लागले हे उघड गुपित आहे. लक्षात घ्या. उद्या कोहिनूर मिलची जागा भागीदारीत खरेदी करताना 421 कोटी कुठून आले असेही राज ठाकरेंच्या बाबतीत विचारले जाऊ शकते. का..? तर ईव्हिएमचा मुद्दा परत काढला तर.....

जितेंद्र आव्हाडांना उत्तर देताना राज ठाकरेंनी मुंब्रामध्ये किती कधी अतिरेकी पकडले याची यादी वाचून दाखवली. परंतु विषय मदरश्याचा होता. तो चेष्टेवारी नेला.

संजय राऊतांना उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की नुसत्या प्रॉपर्टी अॅटच केल्या तर लागले शिव्या द्यायला. राज ठाकरेंना लक्षात का येत नाही प्रॉपर्टी 10 दिवसांपूर्वी अॅटच केली आणि शिव्या 2 महिन्यांपूर्वी दिल्या. बर, तो वाद संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील आहे. राज ठाकरे का राऊतांवर टीका करतायत...?

7 सामाजिक प्रश्नांवर –

हिंदुत्वादी भूमिका आज नाही आणलीय. आधी पासूनच आहे. याचे उदाहरण म्हणजे पाकिस्तानी कलाकारांना मी हाकलले. असा दावा राज ठाकरेंनी केला. इतक असंबद्ध उदाहरण कसे देतात...? पाकिस्तानी कलाकार हे शत्रू देश म्हणून हाकलले. मुस्लिम कलाकार म्हणून नाही. आणि जर तसे असेल तर पाकिस्तानी हिंदू कलाकारांना पायघड्या घातल्या पाहिजेत.

एस टी संप संपलाय. सर्वांना माहीत आहे की कामगारांना त्याला भाजप आणि सदावर्ते यांनी चिथावणी देवून संप चालू ठेवला. कोर्टानेच मध्यस्थी करून कामगारांचे प्रश्न मिटवले. राज्य शासनाने पगारवाढ व इतर मागण्या मान्य केल्यात.

मराठा आरक्षण केंद्राच्या म्हणजे मोदींच्या धोरणावर अवलंबून आहे. नारायण राणे समितीने आरक्षण दिले आणि कोर्टात न टिकल्याने गेले. 58 मुक मोर्चे आणि 42 लोकांचे बळी गेल्यावर फडणवीसांनी आरक्षण दिले. ते सुप्रीम कोर्टात रद्द झाले. मग आता दोषी कोण...? मग हे देणार नाही मला माहीत होतं असे सांगून राज ठाकरे मोदी – फडणवीसांना तर टार्गेट करीत नाही ना ..?

तसेच ओबीसी राजकीय आरक्षण. सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवले. आता इंपरिकल डेटा गोळा करण्यास अवधी मिळवा म्हणून सर्व पक्षीय आमदारांनी विधिमंडळात कायदा केला. हे सर्व राज ठाकरेंना माहीत आहे. तरी ही ......

राज ठाकरेंनी महागाई , पेट्रोल डिझेल गॅसची दरवाढ , 2 कोटी नोकर्‍या या सारख्या विषयावर सुद्धा बोलायला पाहिजे होते.

महाराष्ट्राला कोणी हरवू शकत नव्हतं तर त्याला हरवतं कोण तर आमची जात... मराठी कधी होणार आणि मग हिंदू कधी होणार... ही वाक्य आहेत राज ठाकरेंची. जातीवर टीका करताना स्वत: कट्टर धर्माच्या मागे जातात. मग जातीतील विभागणी काय आणि धर्मातील विभागणी काय एक सारखीच आहे. जे इतर पक्ष करतात तेच राज ठाकरे करतायत. मग इतरांना दोष का देता...?

असो,

जाहीर भाषणात अश्लील शब्दांचा आधार राज ठाकरेंनी का घेतला कळलं नाही.

"विझलेला पक्ष नाही तर समोरच्यांना विझवत जाणारा पक्ष आहे. माझं अक्षर थोडा इकडे तिकडे झाल असेल तर बघून घ्या."

"आमच्या आजोबांनी फार चांगला शब्द काढला होता यांच्यासाठी. हे सगळे लवंडे. 'व' वरती अनुस्वार आहे लक्षात ठेवा."

राज ठाकरेंच्या आजच्या अवस्थेच्या परिणामाबद्दल दोन उदाहरणं देता येतील.

राज ठाकरेंनी 2019 लोकसभेच्या निवडणुकीत व्हिडिओ सहित मोदी – शहांच्या खोट्या विकासाचे पितळे उघडे पाडले. " लाव रे व्हिडिओ " हे राज्यात नाही तर देशात फेमस झाले. लोकांनी राज ठाकरेंना डोक्यावर घेतले, कारण त्यांनी पुराव्यानिशी मोदी – शहांचा खोटेपणा उघड केला.

आज 2022 एप्रिल मध्ये स्वत:चा खरेपणा सिद्ध करण्यासाठी जाहीर सभेत व्हिडिओ लावावा लागतोय. ही लाजिरवाणी गोष्ट आहे त्यांच्यासाठी.

27 वर्षाचा सुजात आंबेडकर राज ठाकरेंना आव्हान देतो की हनुमान चालिसा लावण्यासाठी आधी अमित ठाकरेंना पाठवा. ब्राम्हण मुलांना पाठवा, बहुजन मुलांना पाठवू नका.

काळ बदलतोय....

राज ठाकरेंनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता त्यांची भूमिका लोकं तपासून घेणार आहेत. 2006 पासूनच्या तुमच्या भाषणातील मुद्दे परत तुमच्यावर आदळणार आहेत.

खोटं बोलणे, चुकीचे संदर्भ देणे, अश्लील भाषा वापरणे, मुद्दे भरकटवणे ह्या गोष्टींची मक्तेदार भाजपकडे आहे. राज ठाकरे त्यांच्या कळपात जाऊ लागल्याची ही लक्षणे आहेत.

म्हणून खेदाने म्हणायला लागतयं की वाण नाही पण गुण लागला "

त्यांना त्या बद्दल शुभेच्छा ....!

( लेखक हेमंत पाटील राजकीय विश्लेषक व निवडणूक सल्लागार असून 27 वर्षांपासून निवडणूक सल्लागार, 37 वर्षे राजकारणातील, 38 वर्षे फूटबॉल, 15 वर्षे मराठी चित्रपट सृष्टीचा अनुभव. 'चाणक्य' 'ऑटो डायल' व ऑनलाइन ऑफिस ही तीन सॉफ्टवेअर राजकीय नेत्यांसाठी देशात प्रथम करण्याचा मान)

Updated : 15 April 2022 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top