Home > मॅक्स ब्लॉग्ज > #रेल्वेमॅन अंगावर शहारे आणणारी पण प्रोपगंडा सीरिज

#रेल्वेमॅन अंगावर शहारे आणणारी पण प्रोपगंडा सीरिज

#रेल्वेमॅन अंगावर शहारे आणणारी पण प्रोपगंडा सीरिज
X

लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यातील निवडणुका म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम समजली जाते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या पाच राज्यातील निवडणुका जिंकायच्या असा चंग सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने बांधला आहे. त्यातच एकमेकांवर आरोपांची चिखलफेक सुरू आहे. मतदानासाठी धर्माच्या नावाने आवाहन केलं जात आहे. पण हे सगळं सुरू असतानाच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रेल्वेमॅन नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली आणि या वेबसीरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

ही वेब सीरिज भाष्य करते २ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळमधील १५ हजार पेक्षा अधिक लोकांचा जीव घेणाऱ्या भयावह भोपाळ गॅस दुर्घटनेवर.

महात्मा गांधीजींच्या देशात जीव घेणाऱ्याला शिक्षा आणि जीव वाचवणाऱ्याला शाबासकी कधीच मिळत नाही, अशा संवादाने ही सीरिज सुरू होते. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली कारण ते महात्मा होते, असं विडंबन यामध्ये आहे. ही सीरिज भारतातील भ्रष्टाचारी व्यवस्था, परदेशी भांडवलदारांसाठी स्वतःच्या देशातील नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ, प्रशासनातील निष्काळजीपणा याबरोबरच संकटाच्या काळात प्रामाणिकपणे जीवाची बाजी लावणारा प्रामाणिक देशभक्त यांच्यावर परखड भाष्य करते.

तारीख २ डिसेंबर १९८४ च्या आधी १६ तासांपासून ही सीरिज सुरू होते. के के मेनन यांना हैराण करणारे स्वप्न ज्यात रेल्वे अपघातातील चिमुकल्याचा गेलेला जीव यापासून सीरिज सुरू होते. पुढे के के मेनन आपल्या नोकरीवर जातात. दरम्यान अनेक घटना, अनेक फ्रेम खूप काही सांगणाऱ्या आहेत.

रेल्वेमन ही भोपाळमधील युनियन कार्बाईड कंपनीपासून जवळच असलेल्या भोपाळ जंक्शनवरची ही गोष्ट.

यात के के मेनन हे स्टेशन मास्तर असतात. इमाद रियाझ हा युनियन कार्बाईड कंपनी सोडून रेल्वेत नोकरीला लागलेला तरुण असतो. तर लोकांना लुटणार चोर आणि इमानदार रेल्वे अधिकारी या कथानकाच्या भोवती ही सीरिज फिरते. मात्र कथानक पुढे नेण्यासाठी कंपनीत काम करणारा आणि कंपनीतील गडबडी अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून देणारा प्रामाणिक कर्मचारी कमरुद्दिन हेसुद्धा अत्यंत महत्त्वाचं कथानक आहे.

युनियन कार्बाईड कंपनीतील मिथाइल आयसोसायनाईट लिक होण्याचा अंगावर शहारे आणणारा थरार, जिवाच्या आकांताने श्वास घेण्यासाठी धडपडणारे लोक हे सगळं भयावह आहे. पण जीवाच्या आकांताने लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारा रेल्वेमन या सगळ्या घटना कथा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

युनियन कार्बाईड या कंपनीत झालेल्या गॅस गळतीमुळे किमान १५ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. मात्र या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसन या कंपनीच्या संचालकाला देशाबाहेर जाण्यासाठी सरकारने मदत केली ही गंभीर घटना यामध्ये मांडली आहे. त्यातच अत्यंत हेवी music आणि ताकदीचा अभिनय यामुळे चार भागांची सीरिज कधी संपते, समजतही नाही.

सरकारने युनियन कार्बाईड या कंपनीशी अवघ्या ६१५ कोटी रुपयांत तडजोड केली. ही रक्कम ५ लाख पिडीतांमध्ये वाटण्यात आली. त्यामुळे प्रत्येकाच्या हाती २ ते ३ हजार इतकीच रक्कम आली. त्यामुळे ही सिस्टीम पाहून तळपायाची आग मस्तकात जाते आणि कदाचित हाच या सीरिजमागचा उद्देश असावा.

शिव रवैल यांनी रेल्वेमन ही पहिलीच वेबसीरिज प्रदर्शित केली. यामध्ये के के मेनन, बाबिल खान, दिवेंदू शर्मा, जुही चावला आणि आर माधवन यांनी भन्नाट काम केलं आहे. ही वेब सीरिज शंभर नंबरी सोनं आहे, हे मान्यच करायला हवं. पण तरीही वेब सीरिज प्रदर्शित होण्याच्या वेळेवरून काही प्रश्न निर्माण होत आहेत.

देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. मध्य प्रदेशात मतदान होणार आहे. मात्र मध्य प्रदेशात भाजपसाठी वातावरण अनुकूल नसल्याचे चित्र आहे. त्यापार्श्वूमीवर ही सीरिज प्रदर्शित झाल्याने यामागे प्रोपगंडा असल्याचं दिसून येतं आहे.

२ डिसेंबर १९८४ चा काळ म्हणजे इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगलींचा काळ. त्यासंदर्भातील दृश्य दाखवून ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस विरोधी वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जब पेड गिरता है तो धरती हिलती है, हे राजीव गांधी यांचे वाक्य संताप जनक वाटतं. तसेच तत्कालीन सरकारने युनियन कार्बाईड ने सुरक्षेचे नियम पाळले नसतानाही दिलेली परवानगी, हजारो लोकांचा जीव गेल्यानंतरही कंपनीच्या प्रमुखाला खास विमानाने जाऊ देणं, हे सगळं काँग्रेस विषयी राग निर्माण करणारं आहे. या घटनेत काँग्रेसी राजवटीतील मंत्री दोषी असतील. पण ही सीरिज आत्ता भाजप संकटात असताना आल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.#railwayman #railwaymanwebseries #MadhyaPradeshElections #Netflix2023

Updated : 23 Nov 2023 1:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top