भारत जोडो यात्रेला नाटक समजणाऱ्यांसाठी मोदींची एक टर्म गरजेची – वैभव छाया
गेल्या महिन्याभरापासून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा निघाली आहे. या यात्रेमुळे राहुल गांधी घरकोंबडा आहे म्हणण्यापासून ते भारत जोडो यात्रा हे राहूल गांधींचं नाटक आहे, असं म्हणणाऱ्या लोकांसाठी मोदी – शहा यांची आणखी एक टर्म का महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा वैभव छाया यांचा हा लेख....
X
मला त्या सर्व लोकांचं कौतूक वाटतं... जे म्हणतात..
राहूल गांधी जमीनी वास्तवापासून कोसो दूर आहे. तो जमिनीवर उतरतच नाही. पण आता तो जमीनीवर उतरलाय. चालतोय. लोकांमध्ये थेट मिसळतोय. तर, हे सर्व नाटक आहे म्हणून निर्भत्सना केली जातेय.
काँग्रेसमधली म्हातारी सरंजामी धेंड खुट्टा टाकून बसलेली. त्यांना सहज काढता येणं शक्य नव्हतं. म्हणून राहूलवर टिका होणं न्याय्य होतं. पण, आता एकेक फ्यूडल लॉर्ड एकामागोमाग काँग्रेस सोडून जात आहेत. राहूलने त्यांना थेट इशारा देऊन चालते व्हा म्हटलंय. तर, राहूलची संघटनेवर पकड नाही म्हणून निर्भत्सना केली जातेय.
अशा सर्वांसाठी मोदींची किंवा अमित शहांची एक टर्म अजून गरजेची आहे असं मनोमन वाटून जातं.
फेब्रुवारीपर्यंत भाजप राज्यसभेत बहुमत मिळवण्यात यशस्वी ठरला तर, सीएए, एनआरसी, फार्म बिल पुन्हा मंजूर होतील. तेव्हा येणारं सर्वात भयानक बिल म्हणजे लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणि नागरिकता विधेयक, नेट न्यूट्रालिटी इत्यादी. डिटेंशन कँपची भीती वास्तवात उतरायला वेळ लागणार नाही. गृहयुद्ध सत्यात होतील.
म्हणून लोकांनी समजदार होणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आपापल्या सोसायटीत, मंदिरांत, प्रार्थनास्थळांत एकोप्याने, आयडिया ऑफ इंडिया, संविधानवादाने एकत्र येणं गरजेचंय.
भारत जोडो यात्रा ते काम १० टक्के तरी निश्चित करेल हा भाबडा आशावाद आहे. देश टिकला तरच स्वतंत्र राजकारण टिकेल.
असो. यावर काँग्रेसभक्त ठरवलं जाऊ शकतं. नाईलाज आहे. सीएए, एनआरसीचा धोका ओळखला तर सम्यक विचार करता येईल.






