राहुल गांधी यांच्या 24x7 विरोधकांनी त्यांचा गुण घ्यावा – हेमंत देसाई
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. याबाबत विविध स्तरावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण यासर्व यात्रेत राहुल गांधी यांच्या व्यक्तीमत्वाबाबत काय माहिती मिळते आहे याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...
X
'भारत जोडो यात्रे'तील राहुल गांधींचे वावरणे, शांत बसून भजने ऐकणे, लहान मुलीपासून जेष्ठांपर्यंत कोणालाही सहजपणे भेटणे, त्याचे दुःख समजून घेणे, कोणालाही प्रेमभराने आलिंगन देणे, चहूबाजूंनी विद्वेषी कृष्णमेघांनी घेरलेले असतानाही, आपल्या ध्येयापासून विचारत न होता सर्वांना बरोबर मैलोन्मैल चालणे, अनेकांमधील एक होऊन जाणे, हे मला खूप महत्त्वाचे व मोलाचे वाटते. एकेकाळी देशातील अन्नापासूनच्या अनेक समस्या वेशीवर टांगण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी होऊन अव्वल लेखक दि बा मोकाशी यांनी '18 लक्ष पाऊले' हे पुस्तक लिहिले होते, त्याची आठवण झाली.
गांधीजी, विनोबा अशा अनेकांच्या यात्रांची आठवण झाली. इथे मी राहुल गांधीची अन्य कोणाबरोबर तुलना करत नाहीये. नाहीतर तेच वाक्य घेऊन ट्रोलर्सकडून हल्ला चढवला जाईल, हे मला माहिती आहे. मात्र मला सर्वात जी गोष्ट आवडली ती म्हणजे राहुल यांचे निर्व्याज हास्य! त्या हास्यातून चांगुलपणा, माणुसकी आणि विलक्षण अशी संवेदना प्रकट होत होती. राहुल यांचे राजकारण, काँग्रेस, भाजप हे सर्व बाजूला ठेवून, निकोपपणे या हास्याकडे बघा... दुर्गा भागवतांचा प्रकोप अनेकांनी पाहिला असेल, पण त्यांचे असेच निर्व्याज हसणेही मी पाहिले आहे. त्याचप्रमाणे कुसुमाग्रजांचे देखील आणि भाऊसाहेब खांडेकरांचेही! गांधीजींचे खळखळून हसणे एखाद्या लहान मुलासारखे होते. नेहरूंचे हास्य वातावरण प्रफुल्लित करणारे असे.
मी पाच-सहा वर्षांचा असताना नेहरूंना पाहिले आहे आणि त्यांचा तो टवटवीत व हसरा चेहरा मी विसरू शकत नाही. इंदिरा गांधींचे हास्यही प्रसन्न करणारे असे. राजीव गांधींचा चेहरा निष्पाप, निरागस. पु ल हसायचे आणि हसवायचेही. पु लं च्या विनोदावर शंतनुराव किर्लोस्कर आणि शरद पवार अक्षरशः किलोकिलोभर हसले आहेत... जागतिक स्तरावर बघितले, तर ओबामा आणि ट्रम्प यांच्या हास्यातला गुणात्मक फरक आपल्या लक्षात येतो! आपल्याकडेही ज्यांच्या पोटात विष आहे, त्यांचे हसणे क्वचितच पाहायला मिळते आणि तेही बेतीव आहे, असे दिसते. त्या हास्यात कपट, छद्मीपणा आणि तुच्छताभाव मिसळलेला असतो.
याउलट नितीन गडकरी, सुशीलकुमार शिंदे आणि जुन्या काळात यशवंतराव चव्हाण अथवा वाजपेयी यांच्या हास्यात कमालीचा दिलखुलासपणा आढळतो वा आढळायचा. इथे सर्वांची उदाहरणे देण्याची गरज नाही.असो. परंतु राहुल गांधी यांचे निष्कपट आणि विशुद्ध हास्य हे मनापासून आवडले. राजकारणात विरोधातून विकास साधताना माणसांनी शक्यतो कपटकारस्थाने करू नयेत, अशी अपेक्षा असते. मात्र हसण्यावरून माणसाची वृत्ती निरोगी आहे की नाही ते कळते. राहुल गांधी हे प्रकृतीने आणि मुख्य म्हणजे मनानेही निरोगी आहेत, हे त्यांच्या हसण्यातून स्पष्टपणे दिसून येते. राहुल यांच्या 24x7 विरोधकांनी देखील त्यांचा हा गुण घेण्यास हरकत नाही!.
- हेमंत देसाई






