रेस (२०१६) हा सिनेमा आकाशावर दगड मारायला शिकवतो.
X
आकाश किती सुंदर आहे. त्यावर का दगड मारायचं? त्यानं काय होतंय? तर हा विचार तसा नाहीये. आपण तो नीट समजून घेऊ. कदाचित आयुष्यात असे प्रसंग खूपदा येतात. जेव्हा आपल्याला खरंच आकाशावर दगड मारायचा असतो. पण आपण कशाला उगाच त्या विशाल आकाशाच्या नादी लागा. असं म्हणून स्वतःला बांध घालतो. स्वतःला थोपवतो. दुष्यंत कुमारांचा एक शेर आहे. "कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता...एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो" आपल्याला आकाशातही सूराख करणं जमायला हवंय. मूळात त्यासाठी आपल्याला आकाशात सूराख करणारा पत्थर निवडता आला पाहिजे. त्यासाठीचा जिगरबाज हात होता आलं पाहिजे. त्यासाठी हा सिनेमा पाहायला हवा. समजून घ्यायला हवा.
तर हा सिनेमा म्हणजे जेस्सी ओन्स नावाच्या एका अमेरिकन अॅथलिटचा बायोपिक आहे. पण मला जेसी पेक्षाही लूज लाँग हाच या सिनेमाचा खरा नायक वाटला. तर असंय, की जेस्सी हा अमेरिकेतला कृष्णवरर्णीय मुलगा. धावण्यात तरबेज. पण कृष्णवर्णीय म्हणून उपेक्षित. डावलला गेलेला. अशात लॅरी स्नायडर हा कोच त्याला भेटतो आणि जेसीच्या गतिमान पायांना दिशा मिळते. योग्य दिशा. दरम्यान जेस्सीचा वैयक्तिक आयुष्यातला स्ट्रगल यात आहे. बायको आहे. पोरगं आहे. घरच्या जबाबदाऱ्या आहेत. पैशाची चिंता आहे. वगैरे वगैरे जे काही एका बायोपिक होण्याजोग्या माणसाच्या आयुष्यात घडतं, ते सगळं आहे. तर या सगळ्यावर मात करुन जेस्सी ऑलिम्पिकसाठी निवडला जातो. आता खरा सिनेमा, पुढे आहे. सिनेमाचं नाव रेस असं का आहे, याचा संदर्भ खऱ्या अर्थाने पुढे लागेल.
जर्मनीच्या बर्लिनमध्ये १९३६ साली ऑल्मिपिकचं आयोजन करण्यात येत असतं. अर्थात हे घडतंय ते हिटलरच्या काळात. कृष्णवर्णीय अॅथलिट नको, ही हिटलरची भूमिका. शिवाय हिटलर काहीतरी कपट करणार, याची सगळ्यांनाच असणारी शंका. त्यात हा जेस्सी ऑलिम्पिक पदकांवर नाव कोरण्याची स्वप्न पाहतोय. आधीच्या विक्रमांमुळे देशाच्या अपेक्षा खांद्यावर घेऊनच जर्मनीत आलेला. दोन सुवर्ण पदकं स्वतःच्या नावावर करतोही. हिटलर काही त्याचं अभिनंदन करत नाही. का तर, त्याचा वर्ण काळा आहे. मग पुढे येते तो आकाशात सूराख करायला शिकवणारा प्रसंग.
तर होतं असं, की जेस्सी आता लाँग जंपसाठी स्पर्धेत उतरलाय. इथे त्याच्यासमोर आहे तो जर्मनीचा लुज लाँग. जेस्सी उपांत्यपूर्व फेरीत दोन फाऊल टाकतो. आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे, लुज स्वतः जेस्सीला सल्ला देतो. जेस्सी तो सल्ला अमलात आणतो आणि अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होतो. अंतिम फेरीत अगदी कांटे की टक्कर होते. आणि चक्क लुज फाऊल करतो. जेस्सी शेवटची उडी न मारताच खरंतर जिंकलेला असतो. मात्र लुज स्वतःच त्याला शेवटचा प्रयत्न सोडू नकोस म्हणून सांगतो. आणि जेस्सी विक्रम करतो. एका अमेरिकन कृष्णवर्णीय अॅथलिटला मिळालेलं ते तिसरं सुवर्णपदक. तेही जर्मनीच्या धर्तीवर. मुख्य म्हणजे हिटलच्या डोळ्यांसमोर. त्यात जर्मनीचा हा लूज जेस्सीच्या गळ्यात हात टाकून त्याचा विजय साजरा करतो. हिटलर त्याच क्षणी उठून निघून जातो. पुढे जेस्सी चौथंही मेडल आपल्या नावे करतो. नव-नवे विक्रम नावे करतो. वगैरे वगैरे फार बायोपिक मटेरियल गोष्टी घडतात.
पण मला इथे लुज लाँगची कृती फार महत्त्वाची वाटतेय. हिटलरनं खेळात आणू पाहिलेला वर्णभेद. कृष्णवर्णीय अॅथलिटला दिला गेलेला दुजाभाव. या सगळ्याचा निषेध त्याला करावासा वाटतो. आणि तो काहीच न बोलता आपल्या पराभवाने त्याचा निषेध करतो. हे कसलं धाडसाचं आहे. हा पराभव काही कुठल्या शाळा-कॉलेजातल्या सामन्यातला नाही. तर जगभराच्या नजरा असलेल्या ऑलिम्पिकमधला. पहिल्या फेरीत ज्या लुजने जेस्सीला फाऊल न होण्याची ट्रिक सांगितली. तो अंतिम फेरीत फाऊल करतो, हे तर अविश्वसनीय. त्यामुळे त्याने हे केलं ते निषेधासाठी हे उघड आहे.
शिवाय त्यानं भर मैदानात एका कृष्णवर्णीय मुलाच्या गळ्यात आत घालून त्याचा विजय साजरा करणं हेही निव्वळ कम्माल. तर इथे मला दुष्यंत कुमार आठवतात. एक पत्थर तो तबियत से उछालो यारो म्हणणारे. लुजने हार पत्करली. जेस्सीला जिंकू दिलं. तेव्हा तो खऱ्या अर्थानं जिंकला. कारण त्यानं हिटलर सारख्या एका काळ्या आकाशावर सूराख केला होता. तोही केवळ आपल्या कृतीने.
बरं हे काही नुसतं फिल्मी नाही. तर हे खरं खरं घडलेलं आहे. हा सिनेमा अर्थातच्या त्या खऱ्या खऱ्या घटनांवरुन आलेला आहे. त्यामुळे तर या सगळ्याचं अजूनच अप्रूप आहे. नुसतं सिनेमातलं असतं तर आपण सिनेमात काय करतात लोक असं, हे म्हणून सोडून दिलं असतं. पण इथे ती मुभा नाहीये. लूज लाँग इथे काय शिकवतो. तर तुम्ही जिथे जिथे म्हणून अन्यायकारक घडतंय तिथे बंड करायला हवाय. अन्याय करणारा कितीही मोठा असला, तरीही तुम्हाला बंड करता यायला हवाय.
लूजने इथे निवडलेलं बंडाचं शस्त्र हे अन्याय करणाऱ्या हिटलरचं काळीज चिरून गेलं. हे जमायला हवंय आयुष्यात. जेव्हा जेव्हा एखाद्या बलाढ्य व्यक्तीनं केलेला अन्याय मोडून काढण्याची वेळ येईल, तेव्हा तेव्हा आपल्याला लूज लाँग होऊन बंड करता यायला हवंय. स्वतःचा पराभव पत्करून अन्याय करणाऱ्यावर विजय मिळवता यायला हवाय. आपण हे करु शकतोय. फक्त आकाशाच्या दिशेने भिरकावण्यासाठीचा योग्य दगड आपल्याला शोधायचाय. आपल्या हातात ती जिगर आणायचेय. आपल्या मनात सूडाग्नी नाही तर मानवतावादाची ज्योत तेवायला हवेय.
काल परवा अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड अमानुष पद्धतीने मारला गेला. पुन्हा रंगभेदावर चर्चा झाली. अन्याय करणारी भूमी यावेळी जर्मनीची नसून अमेरिकेची होती. इतकाच काय तो फरक. आपण या सगळ्याकडे ते अमेरिकेत घडलंय, म्हणून दुर्लक्ष करु शकत नाही. करता कामा नये. ही पृथ्वी आजही एका शेषनागावरच उभी आहे. हा शेषनाग सह्रदयी मानवतावद्यांचा आहे. आपण बोललं पाहिजे. आपण आपला दगड या रंगभेदाच्या काळ्या आकाशाच्या दिशेने भिरकावला पाहिजे. आपण केवळ व्यवस्थेच्या दिशेने दगड भिरकावणाऱ्या जब्याचं कौतुक सांगत फार काळ तोंड लपवू शकत नाही.
गुरुप्रसाद
(लेखक साम टिव्हीचे वृत्तनिवदेक आहेत)