Home > मॅक्स ब्लॉग्ज > रॉकेट्री : एक बहुपेडी चित्रपट – मेघनाद कुळकर्णी

रॉकेट्री : एक बहुपेडी चित्रपट – मेघनाद कुळकर्णी

केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईत एखाद्या व्यक्तीची एवढी बदनामी होते की, ती व्यक्ती निर्दोष सुटली तरी त्यांची शिक्षा भोगून झालेली असते. काही वर्षांपूर्वी अशाच एका प्रकारामुळे भारत सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मागे पडला. राजकाऱणाचा बळी ठरलेल्या शास्त्रज्ञाची आणि देशाच्या अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची कहाणी सांगणाऱ्या रॉकेट्री सिनेमाचे सखोल परीक्षण केले आहे मेघनात कुलकर्णी यांनी...

रॉकेट्री : एक बहुपेडी चित्रपट – मेघनाद कुळकर्णी
X

चरित्रपट म्हटला की एक महत्वाचा माणूस इथे इथे जन्माला, इथे वाढला, इथे शिकला, असा जगला आणि शेवटी असा गेला (आणि मध्यंतरीच्या काळात त्याने काहीतरी महत्वाचं केलं) अशी साधारण ढोबळ मांडणी असते. मध्यंतरीच्या काळात त्याने महत्वाचं केलं त्या बद्दल महत्वाची आंतरदृष्टी मात्र आपल्याला फारच कमी वेळा मिळते. (आपण आधुनिक लोकां बद्दल बोलत आहोत, ऐतिहासिक व्यक्तिरेखा, 'हीरो' बद्दल नव्हे.)

व्यक्ति सामाजिक क्षेत्रात असेल तर त्याचं सामाजिक कार्य त्याचं महत्व समजण सोपं जातं. प्रकाश आमटे यांच कार्य आपल्याला चित्रपटातून कळू शकतं. व्यक्ति जर क्रीडा क्षेत्रात असेल तर त्याच 'कार्य' आपण पडद्यावर पाहू शकतो. सचिन तेंडुलकरचे फटके, मेरी कोमचे ढोसे, पेलेनी मारलेली 'उलटी' किक आपण पडद्यावर प्रत्यक्ष पाहू शकतो. राजकारण्यांच्या जीवनातले बारकावे, टाणेबाणे त्यांचा काळ, त्यांचं राजकारण आपण समजून घेऊ शकतो. पण ती व्यक्ति एक शास्त्रज्ञ असेल तर? त्याने 'मध्यंतरीच्या काळात' जे काय केलं ते विज्ञान असतं, आणि ते चित्रपटाला समजावून सांगावं लागतं. विज्ञान समजावून सांगितलं तर अतिशय रंजक होऊ शकतं आणि आपण ते लज्जत घेऊन वाचू शकतो, बघू शकतो. स्टीफन हॉकिंग्स, फाईनमान आपल्याला बिलकुल क्लिष्ट वाटत नाहीत. विज्ञान सोप्या शब्दात सांगितलं नाही तर तो विषय तुम्हालाच कळला नाही असं फाईनमान म्हणतो ते खोटं नाही.

रॉकेट्री चित्रपट नंबी नारायणन या रॉकेट शस्त्रज्ञावर आहे. साहजिकच त्यात रॉकेट-सायन्स आहे. आणि चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, आणि अभिनेते आर. माधवन यांना हा माणूस, त्याचं कार्य आणि त्याच्यावर झालेला अन्याय 'आतून'कळलेला आहे. चित्रपट पाहतांना हे उत्कटपणे जाणवते. आपल्या एका मुलाखतीत आर. माधवन म्हणाले होते, "इंजिनियर असलेला मी चित्रपटात काय कुचाळक्या करत होतो याची मला एका क्षणी जाणीव झाली, आणि अर्थपूर्ण सिनेमा काढावासा वाटायला लागलं." आणि त्यांनी हात घातला तो थेट नंबी नारायणन यांच्या जीवनाला!

नंबी नारायणन यांचा जीवनालेख म्हणजे एखाद्या पटकथा लेखकला आणि दिग्दर्शकाला मेजवानीच आहे. त्यात काय नाही? त्यात विज्ञान आहे, सस्पेन्स आहे, आंतरराष्ट्रीय कट-कारस्थाने आहेत, देशातील गुप्तचर संस्थाची कट-कारस्थाने आहेत. राजकीय कुरघोडी आहेत. (नाच ,गाणी,रोमान्स, अॅक्शन सोडून सर्व आहे.) अशा वेळी पटकथा लेखकला ( कथा/ पटकथा आर. माधवन यांचीच आहे) काय करू आणि काय नको असं होऊन जाईल, आणि नेमका तिथेच त्याचा तोल जाण्याची शक्यता होती.

नंबी नारायणन आपल्या " ready to fire: how India and I survived ISRO spy case!" या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे जीवन दोन भागात विभागले गेले, त्यांच्यावर रॉकेट तंत्रज्ञानाच्या हेरगिरीचे आरोप झाले आणि अटक झाली, त्या आधीचे आणि नंतरचे.

नंबी नारायणन यांचा जीवनपट थोडक्यात सांगायचा तर असा..

१९६६ साली नंबी सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून इस्रो मध्ये रुजू झाले. १९६९ मध्ये नासाच्या फेलोशिपवर ते प्रिन्सटन युनिवर्सिटीमध्ये दाखल झाले. रॉकेट प्रॉपेलर तंत्रज्ञानात ते पारंगत होते. शक्तिशाली रॉकेट बनवायचं तर क्रयोगेनिक, liquid fluid propellant इंजिन हवे ही दूरदृष्टि त्यांच्याकडे होती. ( liquid propellants ची घनता आणि specific impulse जास्त असते, थोडक्यात ते जास्त शक्तिशाली असतात आणि हे तंत्रज्ञान भारताकडे नव्हतं. Solid fuels साठी फेलोशिप मिळून देखील नंबी यांनी प्रो. लुईगि ग्रोको याची मनधरणी करून liquid fluid चे हे तंत्रज्ञान आत्मसात केलं.

आता क्रयोगेनिक इंजिन तयार करायचे होते, हे तंत्रज्ञान अमेरिका द्यायला तयार नव्हती, १९७४ साली नंबी यांच्या टीमने ते फ्रांसमधून ते मोठ्या हिकमतीने मिळवले. १९८५ साली भारतात 'विकास' हे फ्रांसकडून घेतलेल्या वायकिंग तंत्रज्ञानातून संपूर्ण भारतीय बनावटीचे शक्तिशाली क्रयोगेनिक इंजिन बनवले. इंजिनसाठी लागणारे भाग रशिया कडून घेतले, त्याची चाचणी यशस्वी झाली.

ऑक्टोबर १९९४ मध्ये भारताचा पहिला उपग्रह संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरुन अंतराळात पहिल्याच प्रयत्नात गेला देखील होता. रशियन लोकानी कॉन्ट्रॅक्ट बदलण्या आधी आणि अमेरिकेने निर्बंध लावण्या आधीच!

यात अधिक प्रगती केल्यास भारत ३०० बिलियन डॉलर उपग्रह उद्योगाचा भाग बनू शकला असता.

पुढच्याच महिन्यात ३० नोव्हेंबर १९९४ मध्ये अचानक केरळ पोलिस आणि आयबी (Intelligence Bureau ) यांनी हेरगिरीच्या आरोपाखाली नंबी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यांच्या आयुष्यातील काळं पर्व सुरू झालं. पोलिस, आयबी, वृतपत्रे, विरोधी पक्षातले राजकारणी, आम जनता सर्वच त्यांच्यावर तुटून पडले.

डिसेंबर १०९४ मध्ये सीबीआयने त्यांना खरं तर दोषमुक्त करत सर्व केस बोगस आहे असा निर्वाळा दिला, आणि तसं ते उघडही होतं. त्यांच्यावर आरोप होता गुप्त आकृत्या हेरगिरी करून पाकिस्तानला पुरवल्याचा. पण नुसत्या आकृत्या इंजिन बनवण्यास पुरेशा नसतात, आणि त्यात गुप्त काही नसतं. मुळात इस्रोमध्ये गुप्त असं काही नसतं. शिवाय जे तंत्रज्ञान हेरगिरी करून पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप होता, ते तंत्रज्ञान पूर्णपणे भारताला त्यावेळी मिळालंच नव्हतं.

आता यावरून राजकारण सुरू झालं. सीबीआय कॉँग्रेसच्या हाताखाली आहे (पी. व्ही. नरसिह राव ) असा कांगावा विरोधी पक्षाने केला आणि केस हायकोर्टात गेली. पुढे सीबीआय सुप्रीम कोर्टात गेली, आणि सुप्रीम कोर्टानेही कोर्टाची सुनावणी रद्द करून नंबी यांना नुकसान भरपाई द्यायचे आदेश दिले. नंबी यांनी ५० दिवस जेलमध्ये मानसिक आणि असह्य शारीरिक छळ सहन केला. आणि आरोप काय होता, भारताची रॉकेट तंत्रज्ञान विषयक गुप्त माहिती त्यांनी फौझिया हसन आणि मारियम रशिदा या मालद्वीप मधील महिलाना शय्या- सोबतीच्या बदल्यात पाकिस्तानला देण्यासाठी विकली, (एका अग्रगण्य शास्त्रज्ञावर हा अत्यंत घाणेरडा आरोप होता. माहत्वाच्या व्यक्तिचे चारित्र्य हनन करण्यासाठी महिलांचा उपयोग नेहेमीच होत आला आहे. ) वस्तुस्थिती अशी होती की नंबी या महिलांना साधे ओळखत देखील नव्हते. महिलांनी देखील हे सीबीआय कडे मान्य केले. त्यांच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब घेण्यात आला होता.

आणि ज्या जोहेर या श्रीलंकेतील कथित पाकिस्तानी गुप्तहेर एजंटला या दोन महिलांनी गुपित पुरवली ती आणि इतर काही जण तर भारतात कधी आलेच नव्हते. अशी ही कूट कारस्थानाची गोष्ट आहे.

या कथेत भाग असलेल्या भारतातील माहत्वाच्या संस्था नंबी नारायण आणि इतर पाच आरोपींची छळवणूक करणाऱ्या, किंवा त्यांच्या दोषी ठरण्याने वैयक्तिक लाभ किंवा बदला साध्य होणाऱ्या म्हणजे:

केरळ पोलिस: यातील एका पोलिस अधिकाऱ्याने मारियाम राशीदा कडून शय्या सुखाची मागणी केली होती. त्यामुळे तिला यात गोवण्यात आलं.

मीडिया: ज्या सांज दैनिकाने मरियम रशिदाची अटक तिखटमिठ लाऊन प्रथम छापली त्याला सीबीआय प्रमुख रमण श्रीवास्तव यांना या प्रकरणात गोवून बदला घ्यायचा होता.

विरोधी पक्ष: सीबीआय प्रमुख रमणकुमार केरळचे मुख्यमंत्री करूणाकरन यांच्या जवळचे समजले जात, विरोधक विशेषतः ए. के. अॅन्टनी, करूणाकरण यांचे सरकार अस्थिर करायला टपलेच होते.

आय. बी. (इंटेलिजन्स ब्युरो) : या कृष्ण कारस्थानात सर्वात मोठा वाटा होता तो इंटेलिजन्स ब्युरोतिल उच्च पदस्थ व्यक्तींचा, एम. डी. धर (जॉइंट डायरेक्टर) रतन सहगल ( हे CIA चे हस्तक असल्याच पुढे आढळून आलं, यांनी CIA एजंट बरोबर नऊ मीटिंग घेतल्याचं उघड झालं, आणि पुढे त्यांचा राजीनामा घेण्यात आला.) आर. बी. श्रीकूमार ( डेप्युटी डायरेक्टर) : (यांनी एकदा नंबी नारायणन यांच्याकडे एका मुलीच्या इस्रोमध्ये नोकरीसाठी मागणी केली होती आणि ते काम न झाल्याने नंबी यांना "बघून घेईन" अशी धमकी दिली होती.) सीबी मॅथुज ( डायरेक्टर) : हे विरोधी पक्षनेते ओमान चंडी यांच्या तालावर नाचत होते, याचा फायदा त्यांना चंडी सत्तेवर आल्यावर पुढे त्यांना झाला.

थोडक्यात संगायच झालं तर आय. बी. ही संस्था CIA ने ग्रासून टाकली होती. नंबी आपल्या पुस्तकात या व्यापक आंतरराष्ट्रीय करस्थानाचा तपशीलवार उल्लेख करतात. ब्रायन हार्वे देखील आपल्या पुस्तकात CIAचा हात स्पष्टपणे दाखवतात. अर्थातच चित्रपटात असे नावे घेणे आणि थेट आरोप करणे ( कायदेशीर बाबीत चित्रपट अडकू नये या साठी ) टाळले आहे.

या सर्व अंतर्गत कुरघोडी, स्वतःचे वेगवेगळे अजेंडा साध्य करण्याच्या भानगडीत सर्वात मोठा परिणाम काय झाला तर भारत सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून बाहेर फेकला गेला, भारताच्या या क्षेत्रातील प्रगतीला खीळ बसून तो बावीस वर्ष पाठी फेकला गेला. ( आणि त्यातील प्रमुख शास्त्रज्ञ कायमचा चिरडला गेला.)

तर असा सर्व भरगच्च ऐवज हाती लागल्यावर कुठलाही पटकथा लेखक किंवा चित्रपट दिग्दर्शक हरखून जाईल. त्याला या सर्व करस्थानातील भेंडोळ्यातून नेमका कुठला धागा पकडून सुरवात करावी हे समजेनासे होईल, चित्रपटाची हाताळणी, ट्रीटमेंट काशी असावी? एका कारस्थानात गोवलेल्या शस्त्रज्ञाची ही गोष्ट आहे. तर त्यातील विज्ञान मागे पडतं. अन्याय झालेल्या शस्त्रज्ञाची गोष्ट आहे अशी मांडणी केली तर त्यातील वास्तुनिष्टपणा जाऊन ती व्यक्ति सापेक्ष कौटुंबिक रुदनकथा, सॉब-स्टोरी होण्याची शक्यता आहे. सर्वात धोका या गोष्टीला सस्पेन्स थ्रिलर करण्यात होता. त्याचे सर्व घटक या गोष्टीत होते. सेक्स, हेरगिरी,सरकारी संस्थाचा संशयात्मक रोल, मीडिया हाइप, आंतरराष्ट्रीय कूटनीती वगैरे. फ्रेद्रिक फोरसाइथ च्या कादंबरीत शोभवेत असे हे चटकदार प्रसंग आहेत.

आर. मधवान कुठल्याही बाह्य घटनातून (मीडियातिल बातम्या) कडून नंबी नारायनन या व्यक्ति कडे न येता ते थेट नंबी नारायणन या व्यक्तिपासूनच सुरुवात करतात. नंबी नारायणन यांचे जीवन हेरगिरी केसच्या आधीचे आणि नंतरचे अशा दोन पर्वात विभागले गेले आहे. आर. मधवान याचं पटकथा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कौशल्य असं की ते दोन्ही पर्वांना समतोलपणे सामावून घेतात. चित्रपटातून नंबी तर समजतातच पण त्यांचे विज्ञान, म्हणजे रॉकेट्री यावर देखील प्रकाशझोत पडतो आणि त्याबाबतचे प्रेक्षकांचं कुतूहल जागं होतं. चित्रपटच्या गोष्टीत विज्ञानाचे स्पष्टीकरण नीट देता आले नसते, ( प्रयोग करताना आपण काय प्रयोग करतोय हे शस्त्रज्ञ आम जनतेला, किंवा प्रेक्षकाना सांगू शकत नाही म्हणून माधवन यांनी खुबीने टीव्ही मुलाखतीची योजना केलीय.) शाहरुख खान, नंबी यांची टीव्ही वर मुलाखत घेत आहे आणि नंबी आपले आयुष्य आपले काम आणि आपल्यावरचे आरोप उलगडून संगत आहेत अशी चित्रपटाची योजना आहे. (नंबी यांचं काम स्वतः माधवन यांनी केलं आहे, ते हुबेहूब नंबी सरांसारखे दिसतच नाहीत तर ते परकाया प्रवेश केल्याप्रमाणे नंबी नारायणन झालेले आहेत. त्यासाठी त्यांनी खूप मेहेनत घेतली. मेकअप खोटा वाटेल म्हणून केस नैसर्गिक पणे पांढरे करणे, बजन कमी जास्त करणे वगैरे.)

चित्रपटाचा घाट नंबी यांच्या पुस्तकाच्या रचने प्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुस्तकातून हेरगिरीच्या केसबद्दल बोलत असताना पुढच्या प्रकरणात आपल्या आयुष्यातील प्रसंग, आपली शास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द नंबीसर आपल्या पुस्तकातून उलगडत जातात. चित्रपटाचा घाट देखील तसाच आहे. नंबीसरांची कारकीर्द, मुलाखत, आणि हेरगिरीची केस यांच्या सरमिसळीतून, जॅक्सटपोझिशन मधून चिटपटची सांधणी केलेली आहे.

चित्रपटाची सुरुवात नंबी यांच्या घरातून होते. कॅमेरा (एका 'टेक' मध्ये )घरातील व्यक्ति दाखवत पूजा करणाऱ्या नंबी यांच्यावर स्थिर होतो. नंबी यांचं कुटुंब एक समारंभाला निघालेत, मध्ये मध्ये त्यांना उचलून पोलिस व्हॅनमध्ये टाकताना, बायकोला काळं फासताना, वृत्तपत्रात बातमी छापली जात असताना , असे केसशी निगडीत काही सेकंदांचे 'जंप-कटस' आहेत. असे कट्स मधून मधून वापरुन "ऑल इज नॉट वेल विथ नांम्बी नारयनन्स लाईफ" ही जाणीव प्रेक्षकांच्या मनात सतत जागरूक ठेवली आहे.

नंतर टीव्ही मुलाखतीतून नंबी याची इस्रो मधील शास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द उलगडत जाते. ती देखील अत्यंत रोमहर्षक आहे. क्रीओगेनईक इंजिन आणि liquid propellant technology यांच महत्व फारच आधी समजण्याची दूरदृष्टि नंबी याच्याकडे होती. क्रीओगेनईक तंत्रज्ञान म्हणजे अत्यंत कमी तापमानात (१२३ केविन च्याही खाली होणारी घडामोड) आणि liquid propeller का? तर तर त्यात क्लियर बर्न मिळतो, पाण्याची वाफ बाहेर पडते, थोडक्यात ते कमी धोकादायक, अधिक शक्तिशाली असते आणि त्याच्या नाकामयाब होण्याचा धोका कमी असतो. नंबी यां तंत्रज्ञाना बाबत का आग्रही होते त्या पाठचे विज्ञान शाहरुख खानने घेतलेल्या मुलाखतीतून प्रेक्षकाना कळू शकले असते तर बरे झाले असते.

( नंबी यांनी पॅरिस मधील प्रदर्शनात एक रशियन इंजिन पहिलं त्यावर DR -१०० असं लेबल होतं, नंबी यांनी तक्षणी जाणलं की हे ते इंजिन नाही, एका रशियन माणसाने उलगडा केला की ते KVD-1 हे क्रीओगेनईक इंजिन होतं, ज्याची specific impulse (शक्ति म्हणू) ४६१ सेकंद होती. नंबी प्रथमच ते इंजिन बघत होते. हा प्रसंग त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवला आहे.)

चित्रपटात एका प्रसांगात फ्रेंचा बरोबर बनवलेल्या आपल्या इंजिनची चाचणी करत असताना नंबी १३६ सेकंद ही आवश्यक मर्यादा पुरी केल्यावर देखील ते १८० सेकंदा पर्यन्त यशस्वीरित्या घेऊन जातात, आर. माधवन 'रॉकेट्री'मध्ये रॉकेट विज्ञानकडे जराही दुर्लक्ष करत नाहीत हे अशा अनेक प्रसंगातून दिसून येतं.

नंबी यांची दुर्दम्य इत्छाशक्ति आणि कुठलाही प्रतिकूल परिस्थितीत कसेही करून आपले साध्य मिळवण्याची हातोटी चित्रपटात वेळोवेळी अधोरेखित केलेली आहे.

प्रिन्सटन मध्ये असताना ते आपल्या प्राध्यापकाची चूक लक्षात आणून देतात आणि ती सिद्ध करण्यासाठी पाठयपुस्तकाच्या लेखकाकडे पाठपुरावा करतात तो प्रसंग असो किंवा liquid तंत्रज्ञान लुईगि ग्रोको या नासाच्या शास्त्रज्ञाकडून शिकण्यासाठी त्याच्या घरात पडेल ती कामं आवडीने करणे, त्यांच्या आजारी बायकोची आस्थेने काळजी घेणे, अशा प्रसंगातून त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ति तर दिसतेच पण त्यांच्यातील माणुसकीची देखील प्रचिति येते. ही माणुसकी त्याच्या कर्तव्याच्या आड येत नाही हे फ्रांस येथील प्रयोगशाळेत दिसतं.

प्रयोग यशस्वी होण्यास काहीच दिवस बाकी असताना त्यात प्रमुख निकड असलेल्या सहकाऱ्याच्या मुलाचा मृत्यु होतो, पण प्रोजेक्टवर परिणाम होऊ नये म्हणून नंबी ती बातमी त्याला देत नाहीत. त्यामुळे त्यांना होणारे क्लेश देखील माधवन यांनी आपल्या संयत अभिनयातून व्यक्त केले आहेत.

नंबी याच्या व्यक्तिमत्वात वैज्ञानिक नैपुण्य तर आहेच, कुठल्याही परिस्थितीत धूर्तपणे आपले उद्दिष्ट साधण्याचा धोरणीपणा देखील आहे. फ्रेंचाकडून Viking तंत्रज्ञान घेताना आपल्याला त्याच्या प्रत्येक विभागातील साधन सांमग्रीचा प्रत्यक्ष हातळणीचा अनुभव हवा, पण हे करताना फ्रेंच हात आखडता घेणार हे त्यांनी आधीच जाणलं होतं. त्यासाठी आपल्या तांत्रिक कौशल्यावर त्यांची मर्जी संपादन करणे आणि काम करताना कान आणि डोळे उघडे ठेवणे असं त्यांचं धोरण होतं. त्यासाठी आपल्या टीमला त्यांनी निर्देश दिले होते की तुम्हाला फ्रेंच येतंय हे फ्रेंच लोकाना कळू देऊ नका. जेव्हा हे फ्रेंचाना कळतं तेव्हा नंबी यांचं काम फत्ते झालेलं असतं. असे प्रसंग माधवन कुठेही अतिरंजित होऊ न देता अत्यंत नैसर्गि पणे वठवतात.

रशियन लोकांकडून नंबी इंजिनचे सुटे भाग घेतात, त्यासाठी उभय देशांच्या प्रतिनिधीशी वाटाघाटी करतात आणि अमेरिकन बंधनं येण्याच्या आत स्वतः जिवाची जोखीम घेऊन, ते भाग वोडकाच्या खोक्यात दडवून, बर्फात ढकलगाडीवरून विमानापर्यन्त आणतात हा सर्व प्रसंग, घटना एखाद्या जेम्स बॉन्ड चित्रपटातील दृष्या सारखी वाटते. मुलाखत चालू असताना शारुख खान तसं म्हणतो देखील. माधवन यांचं दिग्दर्शक म्हणून कौशल्य यात आहे की हे प्रसंग अत्यंत खरे, पटण्याजोगे, convincing वाटतात.

हे सर्व होत असताना रशियात उलथापालथ होत होती, रशिया कोसळत होता. ही सर्व राजकीय परिस्थिति माधवन फक्त एका, काही सेकंदाच्या शॉट मधून सांगतात, शॉटमध्ये आपल्याला लेनिनचा पुतळा खाली खेचताना/पडताना दिसतो. माधवन सर्वच चित्रपटभर अशा स्ट्रेट-कट्स आणि जंप-कट्सचा वापर करुन अत्यंत थोड्या अवधीत जास्तीत जास्त सखोल परिणाम साधतात. अनेकवेळा या साधनाचा चिन्ह किंवा ठराविक वेळाने येणारी विराम चिन्हे म्हणून देखील उपयोग झालेला दिसतो.

अशा जंप-कट्स मधून वेळोवेळी हेरगिरीच्या केसची आणि नंबी यांच्यावर झालेल्या अन्यायाची/अत्याचाराची जाणीव प्रेक्षकांमध्ये ठसठसती ठेवलेली आहेच. आता ती दृश्ये पडद्यावर दिसू लागतात. नंबी नारायणन यांना रस्त्यावरुन उचलून निर्दयपणे केरळ पोलिस व्हॅनमध्ये कोंबतात. इथे थोडे कलात्मक स्वतंत्र्य घेतलेलं दिसतं, कारण नंबी यांच्या पुस्तकात त्यांना घरी अटक होते आणि त्याची पूर्वसूचना त्यांना गोपी आणि आयझॅक या मित्रांनी दिली होती, त्यांचे फोन टॅप होत होते असे नमूद केलेले आहे. पण दृश्य हवा तो 'अचानक' झाल्याचा परिणाम साधते. विषयाचा आवाका आणि गांभीर्य माधवन यांना पूर्णपणे कळले आहे, त्यामुळे ते आपला फोकस क्षणभरही ढाळू देत नाहीत. आपण नंबी नारायनन, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची गोष्ट तर सांगतो आहोतच पण त्या बरोबर रॉकेट्रीची गोष्ट देखील सांगतो आहोत याचं भान त्यांना आहे, त्यामुळे फार तपशील दिल्यास चित्रपट पसरट होईल हे ते जाणतात. नंबी यांच्याबरोबरच इतर पाच लोकाना देखील अटक झाली होती, त्यात त्यांचा सहकारी शशिकूमारन देखील होता, त्या तपशिलात ना जाता माधवन आपले सर्व लक्ष नंबी यांच्यावर केंद्रित करतात.

नंबी यांना पोलिस स्टेशनवरुन हिंदुस्तान लॅटेक्स गेस्टहाऊसमध्ये हलवले जाते. त्यांना पहिलाच प्रश्न विचारतात मारियम रशिदाला तुम्ही कधी आणि कसे भेटलात? त्यानंतर पोलिस अत्याचाराची दृश्ये अत्यंत संयतपणे पण प्रभावीपणे चित्रत केली आहेत. कुठलेही भडक पार्श्वसंगीत नाही, आवाज नाहीत. नेमकं संगता येत नाही पण मला वाटतं चित्रपटात पार्श्वसंगीत जवळ जवळ नाहीच. हे प्रसंग खरे वाटतात.

नंतर सीबीआय अधिकारी चार्ज घेतो. मागे सांगितल्याप्रमाणे चित्रपटात कुणाचंही नाव येत नाही, अगदी शाहरुख खानच्या मुलाखतीत नंबी (नट माधवन देखील ते घेत नाहीत) पण त्यामुळे गोष्टीतला गाभा कुठेही ढील होत नाही. सीबीआय अधिकारी रीतसर आपली ओळख करून देतो, नंबी यांना मारहाण झाल्याच्या खुणा सीबीआय ऑफिसरला स्पष्ट दिसत आहेत. नांबीना जेव्हा ते चहा देऊ करतात तेव्हा नांबीचे हात कापतात, कारण पोलिस अधिकाऱ्यांनी चहा त्यांच्या तोंडावर फेकलेला असतो, त्यांनी नांबीना बसायला देखील मज्जाव केलेला असतो. नंतर नंबी स्वतःच बसण्यास नकार देऊन तासनतास उभे राहतात. मारियाम रशिदा आणि फौजिया हसन यांना आणलं जातं तेव्हा उघड होतं की त्यांचा कबुलीजबाब दहशतीखाली घेण्यात आला आहे. पुढे एका वेगळ्या प्रसंगात सीबीआय अधिकारी ही केस संपूर्ण बोगस आहे असा आपला रिपोर्ट देतो. कारण चौकशी दरम्यान पुढे आलेलं असतं ज्या दिवशी, म्हणजे २४ नोव्हेंबर मद्रास इंटेरनॅशनल हॉटेलमध्ये मारियम आणि फौझिया यांना आकृत्या दिल्याचा आरोप होता त्या दिवशी नंबी नारायणन आपल्या इस्रोच्या कार्यालयातच होते, आणि तसा लॉग रेकॉर्ड होता.

सीबीआयने दोषमुक्त करून देखील त्याला पूर्णविराम मिळाला नाही, तर राजकीय विरोधक ते हायकोर्टात घेऊन गेले, चिघळत गेले, पुढे सीबीआय ते सुप्रीम कोर्टात घेऊन गेले, तिथेही बराच वेळ गेला. म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्दोष ठरवेपर्यंत जवळ जवळ दोन दशकांपेक्षा अधिक काळ नंबी यांच्यावरचा 'हेर' 'देशद्रोही' हा ठिपका पुसला गेला नव्हता. समाजाने केलेली अवहेलना, लोकानी घरावर फेकलेले दगड आणि पादत्राणे, भर पावसात त्यांना आणि त्याच्या पत्नीला रिक्षामधून बाहेर फेकणे अशा प्रसंगातून हे प्रस्थापित होते.

याचे त्याच्या कुटुंबावर झालेले परिणाम देखील संवेदनक्षमपणे टिपले आहेत. पत्नी मीनावर झालेला मानसिक परिणाम, मुलांची, जावयाची अवस्था मोजक्या आणि नेमक्या प्रसंगातून चित्रित केली आहे.

शेवटी सुप्रीम कोर्ट त्यांना निर्दोष ठरवून केरळ सरकारला नुकसान भरपाई द्यायला सांगते तेव्हा नंबी एका लग्न समारंभाच आहेत, बातमी ऐकून पत्नी मिनाला फिट येते.

इथे चित्रपट संपत आलेला आहे. नॅशनल हयूमन राइट कमिशनने आदेश दिलेल्या १.३ कोटी नुकसान भरपाईचा उल्लेख आहे.

खंत अशी आहे की व्यापक आंतरराष्ट्रीय CIA च्या कारस्थाना बद्दल चित्रपटातले नंबी नारायनन थेट बोलत नाहीत.( त्यांच्या पुस्तकात ते हे थेट बोलतात. इतरत्र मुलाखतीत देखील ते हे बोलले आहेत.) किंवा मुलाखत घेणारा शाहरुख खान वेगवेगळ्या लोकांच्या छुप्या उद्देशनांचं पृथकरण करत नाही. (जे नंबी यांनी आपल्या आत्मचरित्रात केले आहे.) अनेक लोकांनी नंबी नारायण यांचा बळीचा बकरा केला, पण पुरेशा शिक्षे अभावी ते सुटले. एक कळीचा शास्त्रज्ञ आणि भारताचा उपग्रह उपक्रम धुळीस मिळाला.

शाहरुख खानने देशाच्या वतीने नंबी यांची माफी मागून चित्रपट संपतो. पण नंबी म्हणतात त्या प्रमाणे माफी आणि पैसे पुरेसे नाहीत. खरे गुन्हेगार, कारस्थान यांचा पर्दाफाश झाला पाहिजे.

नंबी आपल्या पुस्तकात म्हणतात की त्यांची मागणी एम. डी. धर ( CIA चे आयबी मधील हस्तक, जाइंट डायरेक्टर) यांनी मानभावी पणे त्यांच्या 'ओपन सिक्रेटस' पुस्तकात केल्याप्रमाणेच आहे. इस्रो, आयबी, सीबीआय, रॉ, अशा सर्व लोकांची शोध समिती गठित करून देशाचे खरे गुन्हेगार जनते समोर आणले पाहिजेत.

माधवन यांनी कायद्याच्या, विस्तारभयाच्या चौकटीत राहून एक संतुलित फिल्म लोकांना दिली आहे.

आपल्याला काय करायचे आहे, काय नाही आणि ते कशासाठी आणि कोणासाठी हे माधवन यांना पूर्णपणे कळलेलं आहे. त्यांना कूट-कारस्थान उलगडणारा शोध- चित्रपट करायचा नसून नंबी नारायनन आणि त्यांच्या 'रॉकेट्री' वर लक्ष केंद्रित करायचे आहे, हे स्पष्ट आहे. ही एका सुशिक्षित माणसाने सुशिक्षित, जिज्ञासू प्रेक्षकांसाठी केलेली फिल्म आहे. चित्रपट बघून माझ्यासारख्या अनेक 'ढ' लोकांच, ज्याना रॉकेट तंत्रज्ञान किंवा नंबी नारायनन यांच्या बद्दल काहीही माहिती नाही, कुतूहल जागृत होऊन ते या विषयावरील संदर्भ शोधू लागतात हा या चित्रपटाचा मोठेपणा आहे.

माधवन यांनी एक शीतपेटीतील केस पुनः उघडली आहे. खरं तर मोदीं यांनी आपल्या २०१४ च्या निवडणूक प्रचारात नंबी नारायणन यांचा मुद्दा पुढे आणला तेव्हाच ती पुनः उघडली गेली होती.

नंबी नारायणन यांच्यावरून राजकारण आजही चालू आहे. आजही आघाडीचे वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सल्लागार सरकारी हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामे देत आहेत आणि या राजकरणाकडे, वैज्ञानिकसंस्था बद्दल असलेल्या सरकारी दुर्लक्षाकडे वैज्ञानिक समूह हताशपणे बघत आहे.

Updated : 27 July 2022 2:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top