Home > मॅक्स ब्लॉग्ज > प्रत्येक Covid संशयित रुग्णाची swab टेस्ट करायलाच हवी का?

प्रत्येक Covid संशयित रुग्णाची swab टेस्ट करायलाच हवी का?

कोव्हिड संशयित रुग्णांची Swab टेस्ट करायलाच हवी का? Swab टेस्ट करण्याचे फायदे-तोटे काय आहे? कोरोना व्हायरसच्या वणव्याची साखळी आपण कशी ब्रेक करू शकतो? जाणून घ्या साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया प्रभू यांच्याकडून

प्रत्येक Covid संशयित रुग्णाची swab टेस्ट करायलाच हवी का?
X

काही वाक्ये सांगते, बघा ओळखीची वाटतात का ते ?

"रुग्णसंख्या वाढवण्यासाठी तपासण्या करतात हे लोक"

"आता तपासण्या करून लक्षणविहीन रुग्ण शोधायची गरज आहे का? लक्षणे दिसली कि कोविड समजून उपचार सुरु करायचे" – बरेचसे डॉक्टर्स

"आता कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झाले आहे, आता का करायच्या तपासण्या?"

"लक्षणे आली तरच करा तपासण्या, नाहीतर नको." – सोशल मिडिया वरील सुप्रसिद्ध डॉक्टर

"काय उपचार करायचे हे माहित असेल तर उगीच swab तपासण्या कश्याला"

"डायरेक्ट सीटी करा, swab तपासणीची काय गरज?"

असे विचार कधी तुमच्या मनात आले असतील किंवा आजूबाजूला कोणाच्या तोंडून किंवा सोशल मिडीयामध्ये ऐकले असतील. अगदी तुमच्या डॉक्टर कडूनदेखील काहीजणांनी ऐकले असतील.

यामागील शास्त्रीय आधार माहित नसल्याने असे मत बनणे अगदी स्वाभाविक आहे. तपासण्या केल्या कि रुग्णसंख्या वाढते म्हणून काही राज्ये तपासण्यांची संख्या कमी ठेवताना आपण बघितली आहेत. यापूर्वीच्या साथीमध्ये आजार ओळखण्यासाठी कार्यकारी व्याख्या (working definition) वापरल्या गेल्या होत्या. उदा. "क्ष शहरातून प्रवास केलेली व्यक्ती व पुढील पैकी दोन लक्षणे असणारी व्यक्ती" अशी व्यक्ती आढळली कि लगेच त्यांना tamiflu च्या गोळ्या देऊन उपचार सुरु केले जात होते.

या पूर्वीच्या अनुभवामुळे डॉक्टरांना "आता तपासण्या नको" असे वाटू शकते. लक्षणविहीन रुग्ण स्वतःला आजारी समजतच नसतात त्यामुळे त्यांना आजाराचे निदान नकोच असते. विलगीकरण करून विनाकारण स्वातंत्र्य घालवायची इच्छा नसते त्यांची.तसेच समाजाकडून अजूनही कलंकित वागणूक मिळत असल्याने ही तपासणी टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे swab ऐवजी इतर कोणतीही महागडी तपासणी करण्याची तयारी दाखवली जाते. असे करण्यामध्ये किती फायदा अथवा तोटा आहे हे आज बघूया !

साथ हि जंगलाला लागलेल्या वणव्यासारखी असते हे आपण जाणतो. वणवा कसा विझवला जातो माहित आहे का? साधी आग लागली कि आपण फक्त आग विझवायचा प्रयत्न करतो, आगीवर पाणी घालतो, मात्र वणवा लागला असेल तर तो थांबवण्यासाठी त्याचा प्रसारदेखील थांबवावा लागतो. वणवा पुढे पसरून वाढू नये यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. जिथे अजून वणवा पोचलेला नाही अश्या ठिकाणी "Line of Control" बनवली जाते आणि तिथे वणव्याला जाळण्यासाठी काही झाडे मिळू नयेत याचे प्रयत्न केले जातात. (सोबतचा फोटो बघा) वणवा ज्या दिशेला वाढतोय, तिथे वणव्याहून चार पावले पुढे राहूनच वणवा थांबू शकतो.

साथ थांबवायची असेल तरी देखील आपल्याला विषाणूहून चार पावले पुढे राहावे लागेल. म्हणजे साथ नक्की कुठे आहे, कुठे वाढत आहे. हे जाणून घ्यावे लागेल. आणि त्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींवर लक्ष ठेवून साथ पुढे सरकू नये याचे प्रयत्न करावे लागतील.

आत्तापर्यंत कोणतीही तपासणी ही केवळ रुग्णाचे निदान करून उपचार देण्यासाठी आहे असे आपण समजत होतो. मात्र साथविज्ञानामध्ये तपासणी हे साथ नियंत्रणाचे अत्यंत महत्वाचे शस्त्र आहे. तपासणी म्हणजे आपले डोळे आहेत. कारण तपासणी केल्यानेच विषाणू नक्की कुठे लपून बसलाय हे आपल्याला समजणार आहे. तपासणी न करताच उपचार केल्याने आपण रुग्णाचे नुकसान नाही असे समजत असू मात्र यामध्ये देशाचे नक्कीच नुकसान आहे. असे केल्याने पुढील लाट अधिक जोमाने आपल्यासमोर येऊ शकते. मात्र जर प्रत्येक संशयित रुग्णाची swab तपासणी केली जात असेल तर पुढील लाटेची व्याप्ती कमी ठेवण्यामध्ये आपण यशस्वी ठरू शकू.

याचे मुख्य कारण मानवी स्वभाव आहे. swab टेस्ट positive आल्यानंतर देखील किती तरी रुग्ण आणि संपर्कातील व्यक्ती अलगीकरण आणि विलगीकरणाचे नियम काटेकोरपणे पाळत नाहीत. तेव्हा ज्यांनी तपासणीच केलेली नाही अश्या व्यक्तींकडून नियम काटेकोरपणे पाळले जाण्याची शक्यता कमी आहे.

बरेच डॉक्टर पूर्वीच्या साथींच्या अनुभवातून आता तपासण्या नको असे समजतात किंवा कम्युनिटी ट्रान्समिशन आहे म्हणून तपासण्या नको समजतात – हे योग्य आहे का हे बघूया !

पूर्वीच्या साथीमध्ये आणि या साथीमध्ये फरक आहे. या साथीमध्ये आपल्याकडे करोनाची वाढ थांबवू शकेल असा खात्रीचा उपाय/औषध अजून देखील उपलब्ध नाही. तसेच संपर्कातील व्यक्तींमध्ये आजार टाळू शकेल असेही कोणते औषध नाही. म्हणजे संसर्ग झाल्यावर आपण केवळ रुग्णाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून मुख्य प्रयत्न हे अलगीकरण व विलगीकरण करून साथ पुढे पसरणार नाही यासाठी करायला हवेत. आणि त्यासाठी तपासणी होणे आवश्यक आहे, जेणे करून संपर्कातील व्यक्तींना positive रिपोर्ट बद्दल सांगून अलगीकरणाबद्दल सांगता येईल. आपल्याला विषाणूहून चार पावले पुढे राहायचे आहे आणि विषाणूला पसरण्याला वाव द्यायचा नाहीये.

दुसरा मुद्दा कम्युनिटी ट्रान्समिशनचा !

सध्या आपण नूतन अकल्पित (novel) विषाणूची महासाथ अनुभवत आहोत. कम्युनिटी ट्रान्समिशन हा साथी मधील एक टप्पा आहे. याचा अर्थ "साथ संपली" असा नसून "आता संपर्क साखळी शोधणे अधिक अवघड झाले आहे" असा असतो. कारण समाजातील कोणीही व्यक्ती positive असू शकल्याने संपर्क आपल्या आयुष्यातील कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही प्रसंगी होऊ शकतो. याचा अर्थ असतो – आता नियंत्रणाचे उपाय अधिक काटेकोरपणे पाळायला हवेत. उपाय बंद करा असा अर्थ काढणे चुकीचे आहे. उलट अधिक तपासण्या करून साथीचा प्रसार थांबवणे अत्यावश्यक असते.

कम्युनिटी ट्रान्समिशन हे साथीच्या प्रसाराचे अत्युच्च प्रमाण असते आणि हे कमी होताना हळू हळू कमी होते. साथ ठराविक गटांमध्ये थांबवणे शक्य झाले नाही आणि आता संपूर्ण समाजाचे नियमन आवश्यक आहे हे आपण समजून घ्यायला हवे.

रुग्णाची swab तपासणी पहिल्या आठवड्यामध्ये न केल्याने रुग्णाचे नुकसान देखील होऊ शकते. ऑक्सिजन बेडची गरज पडली कि positive रिपोर्ट नसल्याने उपचारामध्ये अडचणी येतात. उशिरा swab पाठवला कि तो निगेटिव्ह येण्याची शक्यता वाढते. जर positive रिपोर्ट नसेल तर पोस्ट कोविड चा त्रास झाल्यास त्याच्या निदानामध्ये अडचणी येतात. लहान मुलांच्या MIS-C आजाराच्या निदानामध्ये "कुटुंबामध्ये कोणाला कोविड झाला होता का?" हा मुद्दा ग्राह्य धरला जातो. आपण तपासण्या केल्याच नाही तर मुलांचे वेळेत निदान होऊन उपचार मिळणे अवघड होईल.

विषाणूजन्य आजारांमध्ये "विश्रांती" उपचारासारखी काम करते. मात्र कुटुंबातील लक्षणविहीन रुग्ण तपासणी न केल्याने विश्रांती घेणार नाहीत आणि त्यामुळे त्यांचेच नुकसान होईल. लक्षणविहीन रुग्ण प्रसार मात्र करत असतात म्हणून असे रुग्ण देखील सापडणे महत्वाचे असते. लसीमुळे मिळणारी सुरक्षा समजून घेण्याच्या दृष्टीने लसीकरणानंतर किती ब्रेकथ्रू इन्फेक्शन होतात हे समजणे देखील महत्वाचे आहे. आणि हे तपासण्या केल्याखेरीज समजणार नाही, हो ना?

साथ नक्की कशी व कुठे वाढत आहे हे सरकारला व जनतेला न समजल्याने करोना अनुरूप वर्तन करण्याचे प्रमाण कमी होऊन त्यामुळे साथ वाढण्याचा धोका देखील आहे. साथीची वाढ भूमितीय पद्धतीने होत असल्याने व नवे व्हेरीयंट अधिक प्रसारक्षम असल्याने संशयितांची तपासणी टाळणे ही खूप मोठी चूक असेल.

Covid विरुद्धचा लढा सर्व संशयितांच्या तपासण्या न करता म्हणजे डोळे झाकून लढणे हे साथ थांबवण्यासाठी आणि नॉर्मल आयुष्य जगण्याच्या दृष्टीने निरुपयोगी ठरेल. जेव्हा १००% संशयित रुग्णांची swab तपासणी होईल, तेव्हाच आपण करोनाला "चुनचुन के मार डालु" शकू.

आणि जर प्रत्येक रुग्ण शोधण्याचा प्रयत्न करणार नसू तर करोनाला स्वतःची संख्या वाढवण्याची आणि नवनवे व्हेरीयंट निर्माण करण्याची संधीच देणार आहोत.

प्रत्येक संशयिताची swab तपासणी करायला सांगणारा डॉक्टर साथीला समजून घेणारा डॉक्टर आहे आणि साथ थांबवण्यासाठी प्रयत्न करणारा डॉक्टर आहे. त्यांचे आभार मानायला हवेत.

आपल्या प्रिय देशाचे साथीमुळे होत असलेले आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर लक्षणे आल्यावर प्रत्येकाने swab तपासणी करून साथ नियंत्रणामध्ये आपले बहुमोल योगदान द्यावे ही विनंती!

(साथ शारीरिक अन्तर ठेवल्याने (तसेच अलगीकरण / विलगीकरण केल्याने) थांबते कारण संसर्ग साखळी तोडली जाते हे दाखवणारा व्हिडीओ

https://www.youtube.com/watch?v=WGBMzEkk9M4 )

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोग तज्ञ , मिरज.

साभार @UHCGMCMIRAJ page

Updated : 10 Aug 2021 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top