Home > मॅक्स ब्लॉग्ज > BMC Commissioner Bhushan Gagrani राजीनामा द्या, मराठी अभ्यास केंद्राचा मुंबई महापालिकेवर एल्गार, काय घडलं काल?

BMC Commissioner Bhushan Gagrani राजीनामा द्या, मराठी अभ्यास केंद्राचा मुंबई महापालिकेवर एल्गार, काय घडलं काल?

आचारसंहिता असल्यामुळे आता चर्चा करता येणार नाही. निवडणूका झाल्यानंतरच या प्रकरणावर चर्चेसाठी वेळ देवू शकतो. - मनपा आयुक्त भूषण गगराणी

BMC Commissioner Bhushan Gagrani राजीनामा द्या, मराठी अभ्यास केंद्राचा मुंबई महापालिकेवर एल्गार, काय घडलं काल?
X

Maharashtra Marathi people महाराष्ट्रात मराठी माणूस, Marathi schools मराठी शाळा, मराठीकारण आणि महाराष्ट्र धर्मावर आधारित आंदोलन अहिंसक मार्गाने करणे देखील गुन्हा ठरत आहे का, असा संतप्त सवाल आजच्या मराठी शाळांच्या मोर्चात आंदोलकांनी उपस्थित केला. मराठी अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या मराठी शाळांसाठीच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. Marathi Abhyas Kendra launches a protest against the Mumbai Municipal Corporation मात्र, मोर्चास पाठिंबा असलेल्या संघटना व कार्यकर्त्यांच्या निर्धारामुळे व अहिंसक मार्गामुळे पोलिसांची दडपशाही टिकू शकली नाही.



हुतात्मा स्मारक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात येईल असे घटनास्थळी पोलिसांना सांगण्यात आले. त्याला पोलिसांनी मज्जाव केला. मात्र आंदोलकांच्या ठाम निर्धारावर चार चार जणांनी जावून अभिवादन करावे असा पर्याय पोलिसांनी मान्य केला. त्यानंतर डॉ. दीपक पवार, चिन्मयी सुमीत, आनंद भंडारे, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. अजित अभ्यंकर, राजन राजे, धनंजय शिंदे, गोवर्धन देशमुख या आंदोलकांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर महाराष्ट्र गीताचे सामूहिकपणे गायन झाले.

त्यानंतर हातात फलक घेवून मोर्चा शांतपणे मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने सुरू झाला. मात्र मोर्चाला परवानगी नाही असे म्हणत आंदोलकांना ठिकठिकाणी अडविण्याचे प्रकार पोलिसांनी केले. आंदोलकांनी हातात धरलेले फलक पोलिसांनी जबरदस्तीने हिसकावून घेण्याचे प्रकार झाले. त्यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये शाब्दिक वाद होवून वातावरण तणावपूर्ण झाले.



मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ आंदोलक पोचल्यानंतर सर्वांना जबरदस्तीने ढकलून आझाद मैदानात रेटण्यात आले. तिथे पोलिस आणि आंदोलक यांच्यात प्रचंड धुमश्चक्री झाली. आयुक्तांची भेट मिळत नाही तोवर तिथेच बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले. सनदशीर मार्गाने भेटीची वेळ मागणारे आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे लक्षात आल्यामुळे अखेर पोलिसांनी मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार, आनंद भंडारे, साधना गोरे, स्वप्नील थोरात या कार्यकर्त्यांना अटक केली. त्याचबरोबर कॉ. प्रकाश रेड्डी, धनंजय शिंदे, गोवर्धन देशमुख, राज्यसभेचे माजी सदस्य भालचंद्र मुणगेकर यांसह अनेकांना ताब्यात घेतले. या वेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते तरी कोणतेही अनुचित वर्तन झाले नाही. ताब्यात घेतलेले नेते व आंदोलक या सर्वांना आझाद मैदानात आणून सोडले. त्यानंतर आंदोलनातील इतर सर्वच आंदोलकांना आझाद मैदानात आणण्यात आले.

आझाद मैदानात सर्व आंदोलक जमलेले असताना मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडून शिष्टमंडळाला भेटीची वेळ देण्यात आली. डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली चिन्मयी सुमीत, आनंद भंडारे, डॉ. प्रकाश परब आणि सुशील शेजुळे या मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे आणि आयुक्तांचे अतिरिक्त अधिकारी चवरे यांची भेट घेतली.

या वेळी आयुक्तांनी “आंदोलकांना त्यांचे निवेदन तुम्हाला द्यायचे आहे असे मला पोलिसांनी कळविले आहे, त्यामुळे मी केवळ तुमचे निवेदन स्वीकारतो आहे. पण निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने मी आपल्याशी कोणतीही चर्चा करू शकणार नाही" अशी सुरुवातीलाच आडमुठी भूमिका घेतली.

त्यावर डॉ. पवारांनी विचारले की, “सहा महिने आम्ही पत्रव्यवहार करत होतो, त्याला आपण उत्तरे दिली नाहीत. ही असंवेदनशीलता नाही का?” आनंद भंडारे यांनी आयुक्तांना मोर्चानिमित्त कालच पाठवलेले पत्र बैठकीत वाचून दाखवले आणि आम्ही मांडलेल्या दहा शाळांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण भेटीची वेळ द्यावी असे पत्रात स्पष्टपणे म्हटल्याचे दाखवून दिले. यावर गगराणी म्हणाले, “आचारसंहिता असल्यामुळे आता चर्चा करता येणार नाही. निवडणूका झाल्यानंतरच या प्रकरणावर चर्चेसाठी वेळ देवू शकतो. आम्ही शाळांच्या प्रश्नांवर चर्चा करतच असतो. महापालिका काहीच करत नाही असे नाही.” मात्र, दहा शाळांच्या प्रश्नांवर बैठक का आयोजित केली नाही, असे विचारले असता उपायुक्त प्राची जांभेकर यांनी भेटीची वेळ दिली होती, पण आपणच आला नाही, असे सांगितले.

पूर्वीचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार, पालकांच्या महासंमेलनाबाबत बोलावण्यात आले होते. मात्र बंद पडलेल्या शाळांचा विषय त्या चर्चेत नव्हता. आजच्या बैठकीला जांभेकर उपस्थित नव्हत्या. वारंवार मागणी करूनही त्यांना बोलावण्यात आले नाही. अखेर शिष्टमंडळाच्या मागण्यांवर अनौपचारिक चर्चा करण्यासही गगराणी यांनी आचारसंहितेचे कारण सांगून चर्चा करण्यास स्पष्टपणे नकार दिला. शेवटी चिन्मयी सुमीत यांनी आयुक्तांना सांगितले की ज्या शाळा पाडायचा निर्णय पालिकेने घेतला आहे त्या तरी निर्णयाला निवडणूका होईपर्यंत स्थगिती द्यावी. त्यावर आयुक्त असे म्हणाले की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जे निर्णय झालेत त्याची अंमलबजावणी ठरल्याप्रमाणे होईल. मात्र आचारसंहिता काळात कोणतीही नवी शाळा पाडायचा निर्णय घेतला जाणार नाही. याचा अर्थ न्यू माहिम स्कूल पाडायचा निर्णय १० ऑक्टोबरला घेतला आहे त्याची अंमलबजावणी होणार असे विचारले असता आधी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार, नवीन निर्णय होणार नाही असेच आयुक्त पुन्हा पुन्हा सांगत राहिले. थोडक्यात, गेले सहा महिन्यांहून अधिक काळ मराठी शाळांच्या प्रश्नांवर मराठी अभ्यास केंद्र महापालिकेशी चर्चा करण्यासाठी प्रयत्नशील राहिली, शेवटी मोर्चा काढून आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले तरी मराठी शाळा या संवेदनशील मुद्यावर आचारसंहितेचे कारण सांगत आयुक्तांनी कोणतीही औपचारिक चर्चाही करण्याचे सौजन्य दाखविले नाही.

या भेटीचा सर्व वृत्तांत शिष्टमंडळाने आंदोलकांना सांगितला तेव्हा उपस्थित सर्वांनी आयुक्त गगराणी यांचा तीव्र निषेध केला. आयुक्तांच्या मराठीद्रोही भूमिकेबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मराठी शाळा, मराठी भाषा हे मुद्दे सर्व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात येतील यासाठी सर्वांनाच कसून प्रयत्न करावे लागतील, असे डॉ. दीपक पवार यांनी आंदोलकांना सांगितले.



हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून मोर्चेकरी मुंबई महापालिका मुख्यालयाकडे निघाले त्या वेळी डॉ. दीपक पवार, चिन्मयी सुमीत, आनंद भंडारे, सुशील शेजुळे, गिरीश सामंत, डॉ. प्रकाश परब, माजी राज्यसभा सदस्य भालचंद्र मुणगेकर, आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. आनंद अभ्यंकर, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, माकपचे शैलेंद्र कांबळे, बिदर-भालकीच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिनेश मुधाळे, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, प्रमोद पार्ट, कृष्णा जाधव, प्रदीप सामंत, राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम, युवराज मोहिते, आविष्कारचे दीपक राज्याध्यक्ष, नाट्यकर्मी संदीप मेहता, लेखक दिग्दर्शक स्वप्नील जाधव, अभिनेता हृदयनाथ जाधव, शिवनाथ दराडे, जालिंदर सरोदे, संतोष सुर्वे, संगीता कांबळे, आनंद निकेतनच्या विनोदिनी काळगी, संभाजी ब्रिगेड, डीवायएफआय आणि विविध शैक्षणिक, सामाजिक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 19 Dec 2025 9:37 AM IST
Next Story
Share it
Top