Home > मॅक्स ब्लॉग्ज > कु. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनिमित्ताने....

कु. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनिमित्ताने....

आज संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करुन त्यांच्या मानवतावादी, न्यायी आणि समतावादी विचारांचा उदोउदो सुरु असताना पूजा चव्हाण या गोर बंजारा समाजातील मुलीवरी अत्याचार आणि मृत्यूवरुन समाज व्यथित होत नसल्याबद्दल पहिला गोलपीठा पुरस्कार विजेत प्रा. सुदाम राठोड यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत....

कु. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनिमित्ताने....
X

नेमाडेंच्या हिन्दू कादंबरीतील गोर बंजारा स्त्रियांच्या कामशास्त्रात निपुण असल्याच्या नुसत्या उल्लेखाने दुखावलेले तथाकथीत सामाजिक कार्यकर्ते कु. पूजा चव्हाण या गोर बंजारा समाजातील मुलीवर झालेल्या अत्याचाराने आणि तिच्या मृत्यूने अजिबात व्यथित होत नाहीत. कारण जातसमन्त पुरुषाचा तिच्यावर मालकी हक्क असतो आणि जातीतल्या पुरुषाने केलेले अत्याचार हे अत्याचारच नसतात ही ब्राह्मणी पितृसत्ताक विचारधारा त्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेली आहे. आता कुठेही निषेध मोर्चे निघणार नाहीत. आता कुठेही जिल्हाधिकाऱ्यांना सामूहिक निवेदने दिली जाणार नाहीत. आता कुणीही अत्याचार करणाऱ्याला आणि त्याच्या बायकोला फोनवरुन शिवीगाळ करणार नाही.

समाजातील मुलीचा मृत्यू झाला तरी चालेल, पण समाजातील राजकारण्यांनी सत्ताउतार होऊ नये एवढी नीच जातीय मानसिकता नेमकी कुठून येत असेल? समाजातील एका सर्वसामान्य मुलीच्या जीवापेक्षा समाजातीलच जातदांडग्यांची खुर्ची अबाधित रहावी आणि न्यायापेक्षा अन्यायीची सत्ता अबाधित राहावी म्हणून आख्खा समाज रस्त्यावर उतरत असेल तर त्या समाजातील स्त्रियांनी वेळीच आपली जागा ओळखून जातीसाठी माती खाणाऱ्यांच्या सावलीला पण उभ राहू नये. जात ही फक्त पितृसत्तेचीच वाहक असतें आणि स्त्रियांच्या मढ्यांची सीडी बनवूनच ती अस्मितेला कळस चढवत असते.

आता कुणी म्हणेल हा फसवणूकीचा, ब्लॅकमेलींगचा प्रकार आहे. तर माझे म्हणणे असे आहे की, आपल्याच जातीतल्या, आपल्याच मुलीच्या वयाच्या मुलीशी संबंध ठेवताणा एकदाही नैतिक-अनैतिकतेचा विचार आला नसेल ? आपण काय करतो आहोत याची काहीच कल्पना, काहीच भान नसेल ? किमान जातीतली म्हणून तरी तिच्याबद्दल काहीच कणव वाटली नसेल? तुम्ही एवढे भुकेले होता, की आपल्याच जातीचं मांस तुमच्या पुढ्यात कुणीतरी फेकलं आणि तुम्ही झडप घालून आयतेच जाळ्यात अडकलात! तुम्हाला जाळ्यात अडकवले गेल्याची हळहळ सगळा समाज व्यक्त करतोय, पण जिचा शिकार झालाय तिच्या जीवाची किंमत काहीच नाही?

आणि हाच समाज आज संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करुन त्यांच्या मानवतावादी, न्यायी आणि समतावादी विचारांचा उदोउदो करतोय. किती अन्तर्विरोध भरलाय यांच्या जगन्या- वागण्यात! किमान उद्या उजळ माथ्याने जय सेवालाल म्हणण्याइतकी लाज तरी शाबूत ठेवावी, नसता प्रबोधनाच्या शाळेत बालवाडीत पण तुमची नाव नोंदणी होणार नाही.

- प्रा. सुदाम राठोड

नाशिक

Updated : 15 Feb 2021 11:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top