Home > मॅक्स ब्लॉग्ज > राजकारण, सोशल मीडिया आणि सामान्य जनतेचे बदलते मतप्रवाह...

राजकारण, सोशल मीडिया आणि सामान्य जनतेचे बदलते मतप्रवाह...

राजकारण, सोशल मीडिया आणि सामान्य जनतेचे बदलते मतप्रवाह...
X

परवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. कलम 370 आणि कलम 35अ रद्द केल्यामुळे आता जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासातील अडसर कसा दूर झाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आपल्या पाठीशी प्रचंड जनसमुदाय उभा आहे. इतका की भारतीय इतिहासात क्वचितच एखाद्या लोकनेत्याप्रती जनलोभ पाहावयास मिळतो. त्यापैकीच आपणही एक आहात अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग अशा स्थितीत आपण काश्मिरी जनतेचं मत काय हे जाणून घेतलं असत तर खूप उत्तम झाले असते.

केंद्र सरकारद्वारे कलम 370 आणि कलम 35 अ जम्मू आणि काश्मीर राज्यांमधून रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख अशी स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात आली आहेत. भाजपने आपल्या निवडणुक जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणं ही कलम रद्द करण्यात केवळ बहुमतामुळं यश मिळवलं. विरोधकांचा विरोध म्हणजे बिनटोकाचा बाण असल्यासारखं भासलं. जो रुतणार तर नाही मात्र गुदगुल्या नक्कीच करेल, अशा प्रकारच्या विरोधाचे स्वरूप संसदेत पाहायला मिळाले. त्यात त्यांचीही चूक नाही म्हणा. एवढा मोठा काळ सत्ता भोगत असताना संसदेतील अपयश काय असत याचीही त्यांना अनुभूती मिळाली.

आधी माहितीचा अधिकार कायदा आणि आता कलम 370, कलम 35 अ हे देशातील अतिमहत्वाचे आणि संवेदनशील कायदे एकामागोमाग आपल्या सोयीप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी आपल्या पायदळी तुडवले. हा निर्णय योग्य की अयोग्य हा नंतरचा विषय पण तो ज्या पद्धतीने राबविला तो मार्ग नक्कीच चुकीचा होता. विरोधकांकडे मूग गिळून गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. अशी ही सर्व आपल्या देशाची राजकीय परिस्थिती दयनीय अवस्थेपर्यंत पोहचली आहे.

राजकीय भाग सोडाच, पण आपण एक सामान्य नागरिक म्हणून विचार करूया माझ्या राज्यात संचारबंदी आकस्मित पद्धतीने लागू केली. सगळीकडे कर्फ्यू लागलाय. अचानक सैन्यबळ तिपटीने वाढवले जाते. सर्व संपर्कांच्या साधनांवर बंदी घातली जाते. मग आपल्या मनात काय विचार येईल. सरकार माझ्या समाज किंवा समूह विरोधी कट रचत आहे असच ना? अहो एवढा कुठला मोठा विचार करायची एखाद्या सामान्य नागरिकांची कुवत असते हो. ही सगळी नेत्यांची काम असतात.

मला प्रथम माझ्या कुटुंबाची, माझ्या मुलांची, आई वडिलांची, नातेवाईकांची, मित्रांची सुरक्षितता धोक्यात आहे ही भीती निर्माण होते. आणि ही भीती रोषात रूपांतरित होते. पण आपल्याला मीडियाद्वारा काय चित्र भासवलं जात, तर नागरिक हातात दगड घेऊन सैनिकांवर फेकत आहेत. जाळपोळ करत आहेत. त्याही पुढे जाऊन ते पाकिस्तानी आहेत आणि भारतीय जवानांवर हल्ला करत आहेत. मग आपण त्या थोड्याशा जमावाची तुलना संपूर्ण जम्मू आणि काश्मीर राज्याशी करतो. आपल्या दृष्टीने एक तरुण हातात दगड घेऊन उभा असतो. जसं काही त्यांचे आई वडील त्यांच्या कपाळी विजयतिलक लावून पाठवत असतील. मग आपण तेही आपलाच भाग आहेत हे विसरून जातो.

या परिस्थीला फक्त सत्ताधारी आणि विरोधकच कारणीभूत आहेत का? तर नाही. या परिस्थितीला आपण सामान्य नागरिकही कारणीभूत आहोत. आपण गोष्टींकडे सामान्य नजरेतून पाहायचे विसरलो आहोत. प्रत्येक गोष्टीत आपण एक धार्मिकतेशी जोडलेला राजकीय हेतू शोधण्याचा प्रयत्न करतो. मग तो हेतू ज्याचा त्याचा आपल्या विचारधारेप्रमाणे असतो. जसं की मी हिंदू तर सरकारने तिहेरी तलाक बंद केला म्हणून मला सुप्त आनंद झाला पाहिजे. तो आनंद एवढा की एखाद्या मुस्लिम महिलेलाही होऊ नये इतका पराकोटीचा असतो. पण मनातून.. जाहीरपणे नाही.

झोमॅटोचं प्रकरण म्हणजे जसा काय हा माझ्याच घरी बीफ घेऊन आलाय असं वातावरण निर्माण होतं. दुसरं उदाहरणं म्हणजे आमच्या हिंदूंच्याच सणांवर नियम का लादतात, आम्ही गणपतीत डीजे का नाही लावायचा, त्यांचे मशिदीचे भोंगे नाही दिसत का, आमची दहीहंडीच का दिसते सरकारला, हे तेव्हाच पाकिस्तानात गेले असतें तर बरं झालं असतं, पण गांधीना हे शहाणपण सुचलं ना... हे आणि असं बरंच काही.. देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा आज धर्म मोठा झालाय का? आज आपण स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या महान व्यक्तींचंच शहाणपण काढतो आहोत.

आपल्या देशाचं राजकारणही जातीपातीवरच चालत. पण आपण तरुण आहोत आणि विशेष म्हणजे शिक्षित आहोत मग ही मानसिकता कशी निर्माण होते. शाळा कॉलेजमध्ये जात पाहून आपण मित्र बनवत नाही. नकळत एका बाकावर बसतो आणि जिवाभावाची मैत्री होते. तिथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध किंवा इतर कुणी असं काहीच नसतं. मग व्हॉट्सअप आणि फेसबुकवर काहीतरी बघून आपली सद्सद्विवेकबुद्धी कशी शेण खाते?

ही भावना कशी निर्माण होते? तर ती आपल्या मनात रुजवली जाते समाज माध्यमांच्या मदतीने. सोशल मीडिया हे अशा प्रकारच्या भावना निर्माण करण्याचे सर्वात धारदार हत्यार आहे. भडकाऊ फोटो आणि व्हिडीओ क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. प्रत्येक समाजाने आपला थोर पुरुष निवडायचा आणि त्यांचा आपल्या धर्मासाठी किंवा समाजासाठी ब्रँड अँबेसेडर प्रमाणे वापर करायचा.

म्हणजे डॉ.बाबासाहेब फक्त बहुजनांचेच, शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, अहिल्यादेवी धनगरांच्या असं या थोरांना आपल्या सोयीप्रमाणे जखडून ठेवणं कितपत योग्य आहे. या महान व्यक्तीनी जातीपातीची बंधन मोडण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि आपण पुन्हा त्यांना जातीतच वाटून घेतलं. थोर नेत्यांच्या फोटोंवर आपल्या सोयीची वाक्य लावून लोकांना ते पटवून द्यायचं. अशा प्रकारचे संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तरबेज मीडिया सेल बनवायचा. आपल्या नेत्यावर टीका केल्यास त्याला मीडिया सेलच्या मदतीनं अश्लील कॉमेंट्स करून नामोहरम करायचं. वैचारिक वादविवादात कुणालाच रस राहिलेला नाही. अशा पद्धतीने हे महान कार्य चालते.

आता हेच पाहा ना कलम 370 ने आपण काय काय विसरलो याची कल्पना आहे का? RTI कायद्याचा उपहास, उन्नाव प्रकरण आणि त्यातील भाजपाचे आरोपी आणि महत्वाचं म्हणजे EVM मशीनचा घोटाळा. आहे की नाही कमाल. याच्या जोडीला बिकाऊ मीडिया आहेच की, ते म्हणजे सोने पे सुहागा..

एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येक घटनेकडे नेहमीच धार्मिक राजकीय आणि मीडियाच्या दृष्टीकोनातून न पाहता स्वतःच्या बुद्धीने डोळसपणे पाहिलं पाहिजे. एक सुदृढ समाज धार्मिक, सामाजिक, विचारशील एकतेतूनच निर्माण होऊ शकतो.

Updated : 12 Aug 2019 5:20 PM GMT
Next Story
Share it
Top